एकदिवसीय क्रिकेटमधील नियमांमध्ये बदल
- एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नव्या नियम बदलांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मान्यता दिली आहे.
- आयसीसीची वार्षिक बैठक बार्बाडोस येथे पार पडली. आयसीसी क्रिकेट समितीने काही बदल करण्याच्या शिफारसी केल्या होत्या. त्या शिफारसी या बैठकीत आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीने स्वीकारल्या.
- आयसीसीचे चेअरमन एन. श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नवे नियम ५ जुलैपासून लागू करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
- या नव्या नियमांमुळे बॅट आणि बॉलमध्ये समतोल राहणार असून, एकदिवसीय क्रिकेट आणखी रोचक होणार आहे.
एकदिवसीय सामन्यांच्या नियमावलीत करण्यात आलेले महत्त्वपूर्ण बदल पुढीलप्रमाणे:
- पहिल्या १० षटकांमध्ये आता कॅचिंग पोझिशनवर क्षेत्ररक्षक ठेवणे अनिवार्य नाही.
- १५ ते ४० षटकांमध्ये आता बॅटिंग पॉवरप्ले मिळणार नाही.
- ४१ ते ५० षटकांदरम्यान आता ३० यार्डांच्या सर्कलबाहेर चारऐवजी आता पाच क्षेत्ररक्षक ठेवण्याची परवानगी.
- कोणत्याही नो-बॉलवर आता फलंदाजाला फ्री हिटची संधी देण्यात येईल.
२००५पूर्वीच्या नोटा बदलण्यास मुदतवाढ
- सन २००५पूर्वीच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी सध्या असलेली ३० जून ही अंतिम मुदतीत रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांनी वाढवली आहे.
- आता नागरिकांना ३१ डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा बदलता येणार आहे. जुन्या नोटा बदलण्यासाठी त्या संबंधित ग्राहकांनी आपल्या बँक खात्यात जमा कराव्यात किंवा कोणत्याही जवळच्या बँक शाखेत जाऊन बदलून घ्याव्यात, असे रिझर्व्ह बँकेने सुचवले आहे.
- दिलेल्या मुदतीत २००५पूर्वीच्या नोटा बदलून घेणे शक्य न झाल्यास त्यानंतरही या नोटा चलनात राहतील, असेही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.
एशियन ग्रां. प्रि. अॅथलेटिक्स सीरिज स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यात
- एशियन ग्रां. प्रि. अॅथलेटिक्स सीरिज स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यात भारताने तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि पाच कांस्यसह एकूण दहा पदकांची कमाई केली. बँकॉकमध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यात भारताने एकूण ८ पदके मिळवली होती.
- भारताच्या इंदरजित सिंग आणि जिन्सन जॉन्सन यांनी स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातही सुवर्णपदकावर नाव कोरले. भारताला तिसरे सुवर्ण अरोक्या राजीवने मिळवून दिले.
- दुसऱ्या टप्प्यात गोळा फेकमध्ये इंदरजितसिंगने १९.८५ मीटर अशी कामगिरी नोंदवून सुवर्णपदक जिंकले. पहिल्या टप्प्यात त्याने १९.८३ मीटर अशी कामगिरी नोंदवली होती. इंदरजितचे हे या महिन्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील तिसरे सुवर्णपदक आहे.
- पुरुषांच्या ८०० मीटरच्या शर्यतीत जॉन्सनने १ मिनिट ४९.८५ सेकंद अशी कामगिरी नोंदवून अव्वल क्रमांक मिळवला.
- लांब उडीमध्ये अंकित शर्माने रौप्यपदक मिळवले. त्याने ७.८० मीटर अशी कामगिरी नोंदवली. पहिल्या टप्प्यातही अंकितने रौप्यपदक मिळवले होते.
- महिलांच्या ८०० मीटरच्या शर्यतीत एम. गोमंतीने २ मिनिटे ६.२५ सेकंद अशी वेळ नोंदवून रौप्यपदक पटकावले.
- महिलांच्या १०० मीटर अडथळा शर्यतीत गायत्री गोविंदराजने (१३.६६ से.), १०० मीटर स्प्रिंटमध्ये एस. नंदाने (११.७२ से.), ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत एम. आर. पूर्वम्मा (५२. ७२ से.) ब्राँझपदक मिळवले.
- भारताला दोन ब्राँझपदके पुरुष आणि महिला ४ बाय १०० मीटर रिलेत मिळाली. पुरुष संघाने ३९.६० सेकंद अशी, तर महिलांनी ४५.३३ सेकंद अशी वेळ नोंदवली.
जलतरणपटू रोहन मोरेला ‘हॉल ऑफ फेम’चा बहुमान
- पुण्याचा जलतरणपटू रोहन मोरे याने इंग्लिश खाडी, कॅटेलिनाखाडीपाठोपाठ मॅनहॅटन आयलंड (न्यूयॉर्क) मोहिम फत्ते करत वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग फेडरेशनच्या ‘हॉल ऑफ फेम’चा बहुमान मिळविला.
- अशी कामगिरी करणारा रोहन दुसराच भारतीय ठरला आहे. ३० वर्षांपूर्वी तारानाथ नारायण शेनॉय यांनी अशी कामगिरी केली होती.
- न्यूयॉर्कमधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या भोवतीची ४५.८ किलोमीटर अंतराची मॅनहॅटन आयलंड मोहिम रोहनने ७ तास ४३ मिनिटांत फत्ते केली.
- यापूर्वी रोहनने इंग्लिश खाडी (३३.६ कि.मी.) मोहिम १३ तास १३ मिनिटांत, तर दक्षिण कॅलिफोर्नियातील कॅटेलिना खाडी मोहिम (३३.७ कि.मी) १० तास १७ मिनिटांत फत्ते केली होती.
शेअर बाजारात फेसबुक वॉलमार्टच्या पुढे
- शेअर बाजारात फेसबुकचे बाजारमूल्य वॉलमार्टपेक्षा वाढल्याने फेसबुक ही कंपनी आता वॉलमार्टपेक्षा मोठी ठरली आहे.
- जगातील सर्वांत मोठी सोशल नेटवर्किंग साइट असणाऱ्या फेसबुकच्या या कामगिरीमुळे शेअर बाजारात सर्वोच्च भागभांडवल असणाऱ्या पहिल्या दहा कंपन्यांच्या यादीतून वॉलमार्ट बाहेर पडली आहे.
- अमेरिकी शेअर बाजारात सध्या ऍपल, मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सर्वाधिक भागभांडवल असणाऱ्या कंपन्यांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. आता फेसबुक त्यांना सामील होण्याच्या मार्गावर आहे.
- ‘फॅक्टसेट’च्या आकडेवारीनुसार फेसबुकचे बाजारमूल्य २३८ अब्ज डॉलर झाले आहे. वॉलमार्टचे बाजारमूल्य २३४ अब्ज डॉलर आहे.
व्हेअर बॉर्डर्स ब्लीड : ऍन इनसाइडर्स अकाउंट ऑफ इंडो-पाक रिलेशन्स
- १९९२ ते १९९४ या काळात कराचीमध्ये भारताचे वाणिज्यदूत म्हणून काम पाहिलेले राजीव डोग्रा यांनी त्यांच्या ‘व्हेअर बॉर्डर्स ब्लीड : ऍन इनसाइडर्स अकाउंट ऑफ इंडो-पाक रिलेशन्स’ या पुस्तकात दोन्ही देशांदरम्यानच्या अनेक वादग्रस्त मुद्यांविषयी भाष्य केल्यामुळे हे पुस्तक चेचेत आले आहे.
- दोन्ही देशांदरम्यानच्या ऐतिहासिक, राजनैतिक आणि लष्करी मुद्द्यांचा समावेश असलेल्या सुमारे ७० वर्षांतील संघर्ष पुस्तकात मांडण्यात आला आहे. फाळणी, इतिहास, त्यामुळे झालेली भांडणे, लॉर्ड माउंटबॅटन आणि महंमद अली जीनांपासून अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहनसिंग यांच्यापर्यंतच्या आकडेवारीवर आधारित दोन्ही देशांच्या कथेवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
- कारगिलसारखी लष्करी कारवाई करण्याची तत्कालीन डीजीएमओ मेजर जनरल परवेज मुशर्रफ यांची संकल्पना बेनझीर यांनी कशी मोडीत काढली हे डोग्रा यांनी बेनझीर यांच्याच एका मुलाखतीचा हवाला देत स्पष्ट केले आहे.
- ऐतिहासिक दिल्ली-लाहोर बसमध्ये बसून प्रवास केल्याबद्दल तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्वागत करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना पाकिस्तानी सैनिकांनी कारगिलच्या शिखरांवर कब्जा केल्याचे ठाऊक होते, असा दावा डोग्रा यांनी केला आहे.
- तसेच मुंबईमध्ये १९९३ साली झालेल्या साखळी बॉंबस्फोटांविषयी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना आधीच माहिती होती आणि प्रत्यक्षात त्यासाठी त्यांनीच मान्यता दिली होती, असा दावा लेखकाने केला आहे.
- भारतीय विदेश सेवेच्या १९७४ च्या तुकडीचे अधिकारी असलेले राजीव डोगरा यांनी इटाली, रोमानिया, माल्डोव्हा, अल्बानिया आणि सॅन मरिनो या देशांमध्ये राजदूत म्हणून, तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या रोम येथील संस्थांमध्ये भारताचे कायम प्रतिनिधी म्हणूनही काम केले आहे. त्यांचे पुस्तक रूपा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.
लिअँडर पेसचा शंभर पुरुष सहकाऱ्यांसह खेळण्याचा विक्रम
- चाळिशीतही ग्रँडस्लॅम जेतेपद नावावर करणाऱ्या लिअँडर पेसने शंभर पुरुष सहकाऱ्यांसह खेळण्याचा विक्रम नावावर केला आहे. हा विक्रम प्रस्थापित करणारा तो ४७वा खेळाडू ठरला आहे. सध्या ब्रिटनमधील नॉटिंगहॅमला सुरू असलेल्या ग्रासकोर्टवरील स्पर्धेत तो स्पेनच्या मार्सेल ग्रॅनोलर्स याच्या साथी सहभागी झाला आहे. ग्रॅनोलर्स त्याचा शंभरावा जोडीदार ठरला आहे.
सर्वाधिक यशस्वी जोड्या
- या शंभर सहकाऱ्यांमध्ये पेसची सगळ्यात यशस्वी जोडी भारताच्या महेश भूपतीशी ठरली. पेसने भूपतीच्या बरोबरीने खेळताना तीन ग्रँडस्लॅम जेतेपदांवर नाव कोरले. राडेक स्टेपानेक आणि ल्युकास डौल्ही या चेक प्रजासत्ताकच्या सहकाऱ्यांसह पेसने प्रत्येकी दोन तर मार्टिन डॅमसह एका ग्रँडस्लॅम जेतेपदावर नाव कोरले.
- नुकत्याच झालेल्या फ्रेंच खुल्या स्पर्धेत पहिल्या फेरीतील विजयासह कारकीर्दीत ७०० विजय मिळवणारा पेस केवळ आठवा खेळाडू ठरला होता. मात्र ५० जेतेपदे आणि ७०० विजय हा विक्रम करणारा पेस एकमेव खेळाडू आहे.
आठ जणांसह अव्वल
- जागतिक क्रमवारीत पेसने आठ जोडीदारांसह अव्वल स्थान मिळविले आहे. यात महेश भूपती, डॅनिएल नेस्टर, योनास ब्योर्कमन, मार्क नोल्स, बायरन ब्लॅक, डोनाल्ड जॉन्सन आणि जॅरेड पामर यांचा समावेश आहे.
सर्वाधिक जोडीदारांबरोबर खेळण्याचा विक्रम
- सर्वाधिक १६८ जोडीदारांबरोबर खेळण्याचा विक्रम नेदरलॅंड्सच्या सॅंडर ग्रोएनच्या नावावर आहे. त्यानंतर लिबॉर पीमेक (१५५), रॉजर वॅस्सेन (१५१) हे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत.
‘नो ऍक्सिडेंट डे’
- देशात प्रथमच उत्तर प्रदेश सरकारने १ जुलै रोजी ‘नो ऍक्सिडेंट डे’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
- या दिवशी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
- यासंबंधीचे पत्र राज्य सरकारकडून सर्व राज्य परिवहन आयुक्तांना पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
- या दिवशी राज्यातील सर्वच भागातील अपघात रोखणे शक्य होणार नाही. पण अपघातप्रवण भागामध्ये ३० जूनच्या मध्यरात्रीपासून पोलिस तैनात करण्यात येतील.
अमेरिकेच्या सर्व राज्यांमध्ये समलिंगी विवाहाला मान्यता
- समलिंगी व्यक्तींना अमेरिकेतील ५० प्रांतांत कुठेही विवाहबद्ध होण्याचा अधिकार आहे, असा निर्णय अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने २६ जून रोजी दिला.
- अमेरिकेच्या ३६ राज्यांमध्ये आणि कोलंबिया डिस्ट्रिक्टमध्ये पुरुष समलिंगी (गे) आणि स्त्री समलिंगी (लेस्बियन) जोडप्यांना लग्न करण्याची परवानगी आहे. आता दक्षिण आणि मध्य-पश्चिम भागातील उर्वरित १४ राज्यांनाही समलिंगी लग्नांवरील बंदीची अंमलबजावणी थांबवावी लागेल, असा निर्णय न्यायालयाने ५ विरुद्ध ४ अशा बहुमताने दिला आहे.
- अनेक राज्यांच्या कायद्यानुसार लग्नाची व्याख्या ‘पुरुष व स्त्री यांचे एकत्रीकरण’ अशी होती व हाच सुप्रीम कोर्टातील अनेक खटल्यांतील वादाचा विषय होता. ‘लग्नापेक्षा कुठलाही संबंध सखोल नाही’, असे न्यायाधीश अँथनी केनेडी यांच्यासह इतर चार लिबरल न्यायाधीशांनी निकालपत्रात नमूद केले आहे.
- कुठल्याही निकालाच्या फेरविचाराची विनंती करण्यासाठी न्यायालय हरणाऱ्या पक्षाला सुमारे तीन आठवडय़ांची मुदत देते. त्यामुळे या निकालाची अंमलबजावणी लगेचच होणार नाही.
‘अरे यार’, ‘भेळपुरी’ हे शब्द ऑक्सफर्डमध्ये
- भारतीयांच्या तोंडून सहज बाहेर पडणारा ‘अरे यार’ या शब्दाला जागतिक मान्यता मिळाली आहे. जगभरात वाचल्या जाणाऱ्या ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये 'अरे यार' या शब्दाला मानाचे स्थान दिले असून त्याबरोबरच चुडीदार, भेळपुरी आणि ढाबा या शब्दांनाही ऑक्सफर्डमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
- ऑक्सफर्डच्या नव्या आवृत्तीत अलीकडेच ५०० नव्या शब्दांची भर घालण्यात आली आहे. या सर्वच शब्दांना स्वत:चे सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि भाषिक महत्त्व आहे. त्यामुळं या शब्दाला पर्यायी शब्द वापरणं योग्य ठरले नसते. म्हणूनच हे शब्द जसेच्या तसे डिक्शनरीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- १८४५पासून आतापर्यंत अनेक शब्दांचा ऑक्सफर्डच्या शब्दकोशात समावेश करण्यात आला आहे. 'चुडीदार' या शब्दाचा इंग्रजी भाषेतील उल्लेख प्रथम १८८०मध्ये करण्यात आल्याचा कागदोपत्री पुरावा उपलब्ध आहे. त्यानंतर तब्बल १३५वर्षानंतर या शब्दाला इंग्रजी शब्दांच्या यादीत स्थान मिळाले आहे.
- ‘अरे यार’ शब्दाचा इतिहासही पूर्वापार चालत आला आहे. १८४५ मध्ये या शब्दाचा उल्लेख झाल्याचे आढळते. अशाप्रकारे इतर काही ऐतिहासिक आणि रोजच्या वापरातील शब्द डिक्शनरीमध्ये समाविष्ट केले गेले आहेत.
भारताचा सतनाम सिंग एनबीए बास्केटबॉल लीगमध्ये
- भारताच्या सतनाम सिंग या बास्केटबॉलपटूने इतिहास घडवला आहे. जगातील सर्वात लोकप्रिय असलेल्या एनबीए (नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन) या अमेरीकेच्या बास्केटबॉल लीग स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी निवड झालेला सतनाम हा पहिला भारतीय असल्याने जागतिक बास्केटबॉल क्षेत्रामध्ये भारताचे नाव चमकले आहे.
- ७ फूट २ इंच उंचीचा सतनाम एनबीएमध्ये डैलस मैवरिक्स या संघाकडून खेळणार असून एनबीए स्पर्धेच्या एकुण ७१ वर्षांच्या इतिहासामध्ये खेळणार तो पहिला भारतीय ठरणार आहे.
- सतनाम सिंग भामरा असे पुर्ण नाव असलेला हा खेळाडू अमेरीकेच्या फ्लोरीडा शहरातील आयएमजी अकादमीमध्ये शिकत असून या कालवधीत कॉलेज स्तरावरील बास्केटबॉल स्पर्धांत सतनामने आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यामुळेच डैलस मैवरिक्स संघाने त्याला करारबध्द केले.
- विशेष म्हणजे डैलस संघाने २०११ साली एनबीएचे विजेतेपद पटकावले होते. शिवाय या संघामध्ये डर्क नोविट्जस्की सारख्या स्टार खेळाडंूचा समावेश आहे.
- गुरसिमरन ‘सिम’ भुल्लर एप्रिल महिन्यात सैक्रोमेंटो किंग्स संघाकडून एनबीए स्पर्धेत खेळणारा पहिला भारतीय वंशाचा खेळाडू ठरला होता.
सिरियातील कोबाने शहरात इसिसचा हिंसाचार
- सिरियातील कोबाने शहर ताब्यात घेतल्यानंतर इसिस संघटनेच्या दहशतवाद्यांनी २४ तासात झालेल्या हिंसाचारात १४६ नागरिकांना ठार मारले आहे. इसिस या इस्लामिक संघटनेकडून सिरियात झालेला हा सर्वाधिक भीषण हिंसाचार आहे.
- कोबाने हे शहर कुर्दिश प्रतिकाराचे प्रतीक बनल्याने इसिसचे क्रौर्य कळसाला पोहोचले आहे. इसिसच्या आत्मघाती बॉम्बरने कोबाने शहराच्या प्रवेशद्वारात स्वत:चे स्फोट घडवून आणले व येणारी वाहने उडविण्यात आली. मागून येणाऱ्या इसिसच्या जिहादींसाठी रस्ता मोकळा करण्यात आला.
- मृत नागरिकांत महिला व लहान मुले आहेत. त्यांचे मृतदेह रस्त्यावर पडलेले आहेत. शहरात आलेल्या इसिसच्या जिहादींनी घराघरात शिरून गोळीबार केला.
विश्वनाथन आनंदला उपविजेतेपद
- माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदने नॉर्वे क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत नवव्या आणि अंतिम फेरीत बल्गेरियाच्या व्हॅसेलिन टोपालोवविरुद्ध झटपट बरोबरी स्वीकारली. टोपालोव ६.५ गुणांसह निर्विवाद विजेता ठरला.
- नॉर्वेमध्ये ही स्पर्धा झाली. 'इंग्लिश ओपनिंग' पद्धतीत झालेला लेव्हॉन अरोनियन - हिकारू नाकामुरा डावात नाकामुराने विजय प्राप्त केला. यामुळे आनंद व नाकामुरा यांचे समान सहा गुण झाले. टायब्रेकमध्ये आनंद सरस ठरल्याने आनंदला उपविजेता म्हणून घोषित करण्यात आले.
- उपविजेतेपदाबरोबरच या स्पर्धेत आनंदने १२ एलो गुणांची कमाई केली. पुढील फिडे यादीत २८१६ एलो गुणांसह आनंद जागतिक क्रमवारीत पुन्हा दुसऱ्या स्थानी आरूढ झालेला असेल.
- विजेत्या टोपालोवला ७५ हजार, उपविजेत्या आनंदला ५० हजार आणि नाकामुराला ४० हजार डॉलरचे बक्षीस मिळाले.
- या स्पर्धेत नॉर्वेच्या हॅमरने बुद्धिबळ विश्वाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. स्पर्धेत २६७७ एलो गुणांचे सर्वांत शेवटचे मानांकन असलेल्या हॅमरने शांतपणे व एकाग्रतेने जगज्जेत्या कार्लसनला पराभूत केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा