युवा संघ प्रशिक्षकपदी राहुल द्रविड
- शैलीदार आणि भक्कम फलंदाजीच्या जोरावर कारकीर्द गाजविलेल्या राहुल द्रविडची भारत ‘अ’ आणि युवा (१९ वर्षांखालील) संघांच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- ‘बीसीसीआय’च्या सल्लागार समितीच्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या समितीत सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश आहे.
- द्रविड ४२ वर्षांचे आहेत. १६४ कसोटी व ३४४ वन-डेचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. सुरवातीला वरिष्ठ संघासाठीच त्यांचे नाव चर्चेत होते, पण कौटुंबिक कारणांमुळे त्यांनी नकार दिला. युवा संघासाठी काम करण्यास मात्र ते इच्छुक होते आणि ते ‘अ’ संघाबरोबर दौरा करण्याचीही अपेक्षा आहे.
- बीसीसीआय अध्यक्ष : जगमोहन दालमिया
- बीसीसीआय सचिव : अनुराग ठाकूर
हवामान बदल, दहशतवादावर 'जी-७' परिषदेत चर्चा होणार
- ७ व ८ जूनला जी-७ देशांची शिखर बैठक बावरिया (जर्मनी) येथे रशियाविना होत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे अमेरिकी शिष्टमंडळाचे नेतृत्व या शिखर बैठकीत करतील.
- जी-७ देशांमध्ये जगातील औद्योगिकदृष्टय़ा पुढारलेल्या ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान व अमेरिका यांचा समावेश आहे. रशियाचा समावेश या गटात १९९८ मध्ये करण्यात आला होता पण क्रिमियावर आक्रमणामुळे त्या देशाला काढून टाकण्यात आले.
- हवामान बदल, त्यातील भारत व चीनची भूमिका, जागतिक अर्थव्यवस्था व दहशतवादविरोधी उपाययोजना या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर जी-७ देशांच्या जर्मनीतील शिखर बैठकीत चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
'स्वच्छ महाराष्ट्र'साठी पहिला आंतरराष्ट्रीय करार
- राज्यातील शहरांच्या गरजेनुसार घनकचरा, कचरा गोळा करण्याचे व्यवस्थापन आणि डंपिंग ग्राउंडची क्षमता कशाप्रकारे वाढविता येईल, याचा शास्त्रोक्त अभ्यास करण्यासाठी पहिल्या आंतरराष्ट्रीय सामंजस्य करारावर नेदरलॅंड आणि महाराष्ट्र राज्य सरकारने स्वाक्षऱ्या केल्या. त्यामुळे राज्यातील शहरांना भेडसावणाऱ्या घनकचऱ्याच्या समस्येवर तोडगा निघण्यास मदत होणार आहे.
- स्वच्छ भारत अभियानांतर्गत १५ मेपासून स्वच्छ महाराष्ट्र अभियानास सुरवात झाली. या पार्श्वभूमीवर नेदरलॅंड सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय सामंजस्य कराराला महत्त्व प्राप्त झाले आहे.
- राज्यातील शहरांमधील घनकचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नेदरलॅंडमधील वेस्ट २ व्हॅल्यू कन्सॉल्टीयमच्या तज्ज्ञांकडून अभ्यास केला जाणार आहे. या अभ्यासासाठी सरकारच्या तिजोरीवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही.
- नेदरलॅंड पंतप्रधान : मार्क रूट
इरेडाला मिनीरत्न दर्जा
- नवीन आणि नुतनीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या शिफारशीवरून सार्वजनिक उपक्रम विभागाने भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्था समितीला (इरेडा) २ जून २०१५ रोजी ‘मिनीरत्न’ दर्जा देण्यात आला.
- या दर्जामुळे सार्वजनिक उपक्रम विभाग मार्गदर्शक तत्वांअंतर्गत सरकारी उपक्रम ‘इरेडा’ला अधिक आर्थिक स्वायत्तता व अधिकार प्राप्त होतील.
भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्था समिती (इरेडा)
- Indian Renewable Energy Development Agency Ltd. (IREDA) हा केंद्र सरकारचा सार्वजनिक उपक्रम असून तो नवीन आणि नुतनीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करतो.
- याची स्थापना कंपनी कायदा १९५६ नुसार सार्वजनिक मर्यादित सरकारी कंपनी म्हणून ११ मार्च १९८७ रोजी करण्यात आली.
- इरेडाचा उद्देश अक्षय ऊर्जा आणि उर्जा कार्यक्षमता आणि संवर्धन योजनांना प्रोत्साहन देणे, त्यांचा विकास करणे आणि त्याकरिता आर्थिक सहाय्य करणे आहे. ‘शाश्वत उर्जा’ हे इरेडाचे ध्येय आहे.
- ‘मिनीरत्न’साठी अनिवार्य अटी : कंपनीने मागील सलग तीन वर्ष नफा मिळविलेला असावा अथवा मागील तीनपैकी कोणत्याही एका वर्षात ३० कोटीपेक्षा अधिक नफा प्राप्त केलेला असावा.
- ‘मिनीरत्न’ दर्जाचे फायदे : ५०० कोटी रुपयांपर्यंत गुंतवणुकीसाठी सरकारच्या परवानगीची आवश्यकता नाही.
अच्युत सामंत यांना 'इसा' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार
- समाजसुरक्षा आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल भारतातील प्रसिद्ध समाजसेवक आणि सुधारणावादी नेते अच्युत सामंत यांना बाहरीन राजवटीने 'इसा' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले.
- मानपत्र, सुवर्णपदक आणि १० लाख डॉलरची रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप असून सामंत यांना ३ जून रोजी बाहरीनचे राजे हमीद बिन इसा अल खलिफा यांच्या हस्ते एका विशेष समारंभात हा पुरस्कार देण्यात आला. बाहरीनचे पंतप्रधान राजपुत्र खलिफा बिन सलमान अल खलिफा, आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.
- प्रा. सामंत यांनी केलेल्या कार्यामुळे आशिक्षितपणा, भुकेची समस्या, गरिबी यांचे उच्चाटन होण्यास मदत होणार असल्याचे त्यांच्या मानपत्रात म्हटले आहे.
सेरेना विलियम्सने फ्रेंच ओपन तिसऱ्यांदा जिंकली
- फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत ल्युसी साफारोव्हावर मात करत सेरेना विलियम्सने कारकीर्दीतील २०व्या तर फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या तिसऱ्या जेतेपदाची कमाई केली. सेरेनाने ही लढत ६-३, ६-७ (२-७), ६-२ अशी जिंकली.
- या जेतेपदासह सेरेना एकेरीच्या सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपद विजेत्या महिला खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. स्टेफी ग्राफच्या नावावर २२ ग्रँडस्लॅम जेतेपदे असून मार्गारेट कोर्टच्या नावावर २४ ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत.
- या विजयासह फ्रेन ओपन स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद पटकावणारी ती सर्वात बुजुर्ग टेनिसपटू ठरली आहे. याआधीचा विक्रमही सेरेनाच्याच नावावर आहे. दोन वर्षापूर्वी वयाच्या ३१व्या वर्षी सेरेनाने ही स्पर्धा जिंकून नवा विक्रम केला होता.
ललिता बाबर आणि विकास गौडाला सुवर्णपदक
- महाराष्ट्राच्या ललिता बाबरने वुहान येथे सुरू असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. ३००० मीटर स्टीपलचेस शर्यत ललिताने ९ मिनिटे, ३४ सेकंदांत पूर्ण केली.
- सुवर्णपदकासह ललिता पुढील वर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिक तसेच यावर्षी बीजिंगमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघातर्फे आयोजित जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.
- गेल्या वर्षी इन्चॉन, दक्षिण कोरिया येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत याच प्रकारात ललिताने कांस्यपदकाची कमाई केली होती. पदकासह ललिताने सुधा सिंगचा ९ मिनिटे आणि ४७ सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम मोडला होता. ललिताने ९ मिनिटे आणि ३५ सेकंदात शर्यत पूर्ण केली होती.
- जबरदस्त फॉर्मात असलेल्या विकास गौडाने थाळीफेक प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले. विकासने ६२.०३ अंतरावर थाळी फेकत अव्वल स्थान मिळवले.
- २०१३मध्ये पुणे येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत ६४.९० मीटर अंतरासह विकास सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता. शांघाय येथे झालेल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत विकासने ६३.९० मीटर अंतरावर थाळी फेकत कांस्यपदक पटकावले होते.
- सॅन डिएगो येथे झालेल्या स्पर्धेत विकासने ६५.७५ मीटर अंतरावर थाळी फेकण्याचा विक्रम केला होता. या दिमाखदार कामगिरीसह विकास पुढील वर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला होता.
सौम्यजीत-हरमीत जोडीला उपविजेतेपद
- आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघातर्फे आयोजित जागतिक ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत भारताच्या हरमीत देसाई आणि सौम्यजीत घोष जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
- अंतिम लढतीत चौथ्या मानांकित क्वान किट आणि लाम सियू हांग जोडीने सौम्यजीत-हरमीत जोडीवर ११-४, ११-४, ८-११, ११-४ अशी मात केली.
व्हिसा नाकारल्याच्या निषेधार्थ भारताची स्पर्धेतून माघार
- अमेरिकन दूतावासाने ३१ जणांच्या पथकातील २१ सदस्यांना व्हिसा नाकारल्याच्या निषेधार्थ भारतीय तिरंदाजी असोसिएशनने (एएआय) जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेतली आहे.
- साऊथ डाकोटा येथे ८ ते १४ जून या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेसाठी ३१ सदस्यांचा भारतीय संघ नवी दिल्लीतून अमेरिकेला रवाना होणार होता.
- संघातील दोन प्रशिक्षक, सात खेळाडू व भारतीय क्रीडा प्राधिकरणाचा एक अधिकारी यांनाच व्हिसा देण्यात आला आहे. परंतु दक्षिण कोरियन प्रशिक्षक चेई वोम लिम यांच्यासह उर्वरित २१ जणांना व्हिसा नाकारण्यात आला आहे.
ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक यांचे निधन
- माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक (वय ७५) यांचे शनिवारी (६ जून) मध्यरात्री १२ वाजता बॉम्बे हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
- आपल्या कर्तुत्वाने ठसा उमटवलेले आदिक ४५ वर्षे राज्याच्या राजकारणात सक्रीय होते.
- गेल्या वर्षी त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली होती. विधी शाखेचे ते पदवीधर होते. आदिक यांनी १९६६ ते १९७० च्या दरम्यान त्यांनी मुंबई न्यायालयात वकीली केली. मुंबई येथील महाविद्यालयात काही काळ ते कायद्याचे प्राध्यापक होते. वकीली सुरु असताना ते तालुका कॉंग्रेसचे सरचिटणीस झाले.
- राजकारणात पक्षसंघटनेत त्यांनी विविध पदे भुषविली. नगर जिल्हा कॉंग्रेस सोशालीस्ट फोरमचे अध्यक्ष, कॉंग्रेसचे सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिले.
- श्रीरामपूरातून दोनदा तर वैजापूरातून एकदा ते आमदार म्हणून निवडून आले. विधानपरिषद व राज्यसभेवर प्रत्येकी दोनदा निवड झाली. पुलोद सरकारमध्ये १९७८ ते १९७९ या कालावधीत ते पाटबंधारे, विधी, माहिती व जनसंपर्क खात्याचे मंत्री होते.
- १९८९ ते १९९२ पर्यंत परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तर २००३ ते २००४ या कालावधीत कृषी व विधी खात्याचे मंत्री होते. मुळा प्रवरा विजसंस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष होते. सात वर्षे अशोक साखर कारखान्याची सुत्रे त्यांच्याकडे होती.
- कामगार चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग होता. ते राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे १९९५ पासून अध्यक्ष होते. इंटकचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद व नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे जनरल सेक्रेटरी होते. शेतमजूरांच्या ट्रेड युनियनची त्यांनी राज्यात पहिली नोंदणी केली. कृषक समाजाची त्यांनी स्थापना केली. राष्ट्रीय किसान सभेचे ते अध्यक्ष होते. शेतकरी व शेतमजूरांच्या प्रश्नांसाठी त्यांनी राज्यभर संघटन उभे केले.
बार्सिलोना पाचव्यांदा चॅंपियन्स लीगचे विजेते
- इटलीच्या युव्हेंट्स क्लबचा ३-१ असा सहज पराभव करत स्पेनच्या बार्सिलोना क्लबने पाचव्यांदा यूएफा चॅंपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळविले आहे.
- बर्लिनमधील ऑलिंपिक स्टेडियमवर अंतिम सामना झाला. गेल्या सहा वर्षांत तिसऱ्यांदा बार्सिलोनाने हे विजेतेपद पटकाविले आहे.
- सामन्याच्या चौथ्या मिनिटालाच इवान रैकिटिकने गोल करत बार्सिलोनाला आघाडी मिळवून दिली. पहिल्या हाफमध्ये बार्सिलोना आघाडीवर राहिले, पण युव्हेंट्सच्या अल्वारो मोराटाने गोल करत बरोबरी केली.
- अखेर ६८व्या मिनिटाला लुईस सुआरेझने आणि शेवटी नेमारने गोल करत बार्सिलोनाला ३-१ अशी विजयी आघाडी मिळवून दिली.
- लिओनेल मेस्सी, नेमार आणि सुआरेझ या तिघांच्या खेळाने बार्सिलोनाला विजेतेपद मिळवून दिल्याचे स्पष्ट होते. बार्सिलोनाने आतापर्यंत स्पर्धेत केलेल्या ३१ गोलपैकी १० गोल मेस्सी, १० गोल नेमार आणि ७ गोल सुआरेझने केले आहेत.
- बार्सिलोनाने ‘ला लिगा’ आणि ‘कोपा डेल रेय’ असे देशातील अव्वल साखळी आणि करंडक जिंकले आहेत. आता चॅंपियन्स लीगचे विजेतेपद मिळवून त्यांनी तिहेरी मुकुट मिळविला आहे.
अभिनेत्री आरती अगरवालचे शस्त्रक्रियेनंतर निधन
- दक्षिण भारतातील आघाडीच्या चित्रपट अभिनेत्री आरती अगरवाल यांचा अमेरिकेतील न्यूजर्सी येथे शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाला.
- आरती यांच्यावर न्यूजर्सी येथील रुग्णालयात लठ्ठपणा (चरबी) कमी करण्याची (लिपोसक्शन) शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या श्वसनक्रियेत अडथळा आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
- आरती यांचा जन्म ५ मार्च १९८५ रोजी न्यूजर्सी येथे झाला. वयाच्या १६ व्या वर्षी आरती यांनी पागलपन या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.
- आरती यांचे नशीब दाक्षिणात्य चित्रपटांत खऱ्या अर्थाने उजळले. तेथील 'नुव्वू नाकू नाचव' या चित्रपटाने त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यांचा रणम-२ हा चित्रपट (५ जून रोजी) प्रदर्शित झाला होता.
फेसबुक लाईट
- ४ जून २०१५ रोजी फेसबुक ने ‘फेसबुक लाईट’ हे नवीन फेसबुक अॅप लाँच केले.
- फेसबुक लाईट हे अण्ड्राईड अॅप असून ते जगभरातील अशा स्मार्टफोन धारकांसाठी बनविले गेले आहे ज्यांंच्या स्मार्टफोनवरील इंटरनेट स्पीड हा अत्यंत कमी असतो. म्हणजेच हे अॅण्ड्राईड अॅप टु जी इंटरनेट धारकांसाठीसुद्धा अगदी व्यवस्थित काम करेल.
- फेसबुक लाईट या अण्ड्राईड अॅपची साईज एक एमबी पेक्षा कमी असून, हे अॅप सुरुवातीला आशिया तसेच लॅटीन अमेरिका, आफ्रिका व काही दिवसांतच युरोपात सुरु होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा