सुवर्ण रोखे (स्वर्ण बाँड) योजनेचा मसुदा जाहीर
- लोकांनी सुवर्ण रोख्यांमध्ये गुंतवणूक करावी यासाठी सरकारने सुवर्ण रोखे (स्वर्ण बाँड) जारी करण्याच्या योजनेचा मसुदा जाहीर केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१५-२०१६चा अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा केली होती.
या योजनेची वैशिष्ट्ये
- हे रोखे सोन्याच्या किमतीशी संलग्नित व डी-मॅट (कागदविरहित) स्वरूपाचे असतील.
- हे रोखे सरकारच्या माध्यमातून रिझर्व्ह बँक जारी करील. हे रोखे जारी करणारी मध्यस्थ संस्था एजन्सीला वितरणाचा खर्च आणि कमिशन अदा करील. नंतर यावर होणारा खर्च सरकारकडून दिला जाईल.
- हे रोखे भारतात राहणाऱ्या नागरिकांनाच दिले जातील. या रोख्यात किती गुंतवणूक करायची याचीही मर्यादा असेल.
- कोणतीही एक व्यक्ती एका वर्षात ५०० ग्रॅम्सपेक्षा जास्त खरेदी करू शकणार नाही. सरकार या रोख्यांवर छोटेसे व्याजही देईल व त्याचा दर सोन्याच्या कर्जावर आंतरराष्ट्रीय व्याज दराशी जोडला जाईल.
- हे रोखे २, ५, १० ग्रॅम किंवा अन्य प्रमाणाचे असतील. त्यांच्या किमान मॅच्युरिटीचा कालावधी पाच ते सात वर्षांचा असेल. रोख्यांच्या मॅच्युरिटीवर सोन्याच्या किमतीएवढे रोख पैसे दिले जातील.
- सरकारने या योजनेवर २ जुलैपर्यंत मते, सूचना मागितल्या आहेत.
- देशात वर्षाला ८००-९०० टन सोन्याची आयात होते. आयातीत वस्तूंपैकी पेट्रोलियमनंतर सोन्यावर सर्वात जास्त पैसा खर्च होतो. स्वर्ण रोख्यांमध्ये गुंतवणूक झाल्यास सोन्याची मागणी कमी होऊन व्यापार तोटा नियंत्रणात राहील.
सुलभ वाहतुकीसाठी तीन सार्क देशांशी करार
- सार्क गटातील भूतान, बांगलादेश व नेपाळ या देशांशी १६ जून रोजी भारताने वाहन करार केला. भारतीय उपखंडातील देशांमध्ये भारतीय मालाची वाहतूक सुलभरीत्या व्हावी, जेणेकरून भारताचा व्यापार-उदीम शेजारी राष्ट्रांशी वाढावा यासाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
- याचबरोबर या करारामुळे प्रवासी वाहतुकीलाही या देशांमध्ये चालना मिळणार आहे. केंद्रीय वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांनी भारतातर्फे या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी तिन्ही देशांचे वाहतूकमंत्री उपस्थित होते. हा करार भूतानची राजधानी थिंपू येथे झाला.
- वैयक्तिक, प्रवासी व मालवाहू वाहनांसाठी झालेल्या या करारामुळे प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक या दोन्हीसाठी फायदा होणार आहे.
- या तीन देशांप्रमाणेच म्यानमार व थायलंड यांच्याबरोबरही असा करार करण्याविषयी बोलणी सुरू आहेत. या देशांशी असा करार झाल्यास आशिया खंडातील देशांमध्ये आर्थिक सहकार्याचा मार्ग मोकळा होईल.
- या करारामुळे या देशांशी व्यापार करताना वाहुकीचा खर्च कमी होईल. तसेच या देशांच्या मार्गे भारतात आणण्यात येणाऱ्या मालाची वाहतूक विनाअडथळा केली जाईल. या देशांचा भारताशी संपर्क अधिक प्रभावीरीत्या वाढीस लागण्यास मदत मिळेल.
सर्बियाला २० वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे विश्वविजेतेपद
- सर्बियाने बलाढय़ ब्राझीलला हरवून २० वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पध्रेचे विजेतेपद पटकावले.
- नॉर्थ हार्बर स्टेडियमवर २० जून रोजी झालेल्या या लढतीत ९० मिनिटांचा सामना १-१ असा बरोबरीत सुटला. स्टानिसा मँडिकने ७०व्या मिनिटाला गोल साकारून सर्बियाच्या पहिल्यावहिल्या जेतेपदाच्या आशा निर्माण केल्या. परंतु तीनच मिनिटांत आंद्रेस परेराने ब्राझीलला बरोबरी साधून दिली.
- त्यानंतर नेमांजा मॅक्सिमोव्हिकने अतिरिक्त वेळेमध्ये गोल करून सर्बियाला विजेतेपद मिळवून दिले.
पाकिस्तानचे कराची शहराजवळ दोन अणुऊर्जा प्रकल्प
- विजेच्या तीव्र टंचाईवर मात करण्यासाठी पाकिस्तानने कराची शहराजवळ दोन अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यास मान्यता दिली आहे. सिंध पर्यावरण संस्थेने या प्रकल्पाला मान्यता दिली असून तो पॅराडाइज पॉइण्ट येथे उभारण्यात येणार आहे.
- सदर प्रकल्प कराची शहराच्या जवळ असल्याने विविध नागरी संस्थांनी त्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास त्यामधून बाहेर पडण्याच्या योजनांचाही अभाव असल्याचे संस्थांचे म्हणणे असले तरी त्याकडे पाकिस्तान सरकारने दुर्लक्ष केले आहे.
- कराचीच्या समुद्रकिनाऱ्याजवळ पॅराडाइज पॉइण्ट असून तो भूकंपप्रवण आणि असुरक्षित आहे. गेल्या दोन दशकांत कराचीच्या लोकसंख्येत दुपटीने वाढ झाली असून ती २० दशलक्षांहून अधिक झाली आहे.
- के-२ आणि के-३ हे प्रत्येकी ११०० मेगावॉटचे दोन अणुऊर्जा प्रकल्प चीनमधील कंपनीच्या सहकार्याने उभारण्यात येणार असून, पाकिस्तान अणुऊर्जा आयोग ही सरकार संस्था त्यामध्ये सहभागी होणार आहे.
सोमालियामध्ये अल शबाब या दहशतवादी संघटनेचा हल्ला
- आफ्रिकेतील सोमालियाची राजधानी असलेल्या मोगादिशु येथे अल शबाब या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यामध्ये सोमाली गुप्तचर विभागाचे अनेक अधिकारी ठार झाले.
- सोमाली अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण केंद्रावर हा दहशतवादी हल्ला करण्यात आला. येथून राष्ट्रीय गुप्तचर विभागाचे मुख्यालयही जवळच आहे.
- मोगादिशुमधील पाश्चिमात्य देशांचा पाठिंबा असलेले सरकार उलथवून लावण्याचा अल शबाबचा उद्देश आहे.
‘पीपली लाइव्ह’च्या दिग्दर्शकाला अटक
- टीव्ही न्यूज जगतातील ‘रिअॅलिटी’ दाखविणाऱ्या ‘पीपली लाइव्ह’ या चित्रपटाचा सह-दिग्दर्शक महमूद फारुकी याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याला सहा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
- एका अमेरिकी महिलेने फारुकीविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार फारुकीनं या महिलेवर दिल्लीतील सुखदेव विहार येथे बलात्कार केला होता. महिलेनं केलेल्या तक्रारीनंतर लगेचच पोलिसांनी फारुकीला अटक केली.
- महमद फारुकीनं पत्नी अनुषा रिजवीसोबत २०१०साली ‘पीपली लाईव्ह’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाची कथाही फारुकीनंच लिहिली होती. न्यूज जगतावर मार्मिक भाष्य करणाऱ्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.
विकिपीडिया आता पुस्तकरूपात
- कोणत्याही प्रकारची माहिती मिळवण्यासाठी विकिपीडियाचा उपयोग होत असतो. हाच विकिपीडिया आता छापील स्वरूपात उपलब्ध होणार आहे. याच्या ७,६०० खंडाचे काम पूर्ण झाले असून, त्यांची किंमत पाच लाख अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.
- न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या ग्रॅज्युएट सेंटर आणि स्टेटन आयलंड कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेल्या मायकल मँडीबर्ग यांनी इंग्रजीतील विकिपीडियावरील माहिती त्याच्या लेआऊटसह तयार केले आहे. ही छापील प्रत त्यांनी लुलू.कॉम या साइटवर उपलब्ध करून दिली आहे.
अल्ट्रा-हाय-नेट-वर्थ कुटुंबांच्या संख्येनुसार भारत जगभरात चौथ्या स्थानी
- समृद्धीचे परिमाण मानल्या जाणाऱ्या अल्ट्रा-हाय-नेट-वर्थ (यूएचएनडब्ल्यू) कुटुंबांच्या संख्येनुसार भारत जगभरात चौथ्या स्थानी असल्याची बाब एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या 'ग्लोबल वेल्थ २०१५- विनिंग ग्रोथ गेम' या अहवालात या बाबीवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
आशिया-पॅसिफिक विभाग
- चीन आणि भारत या दोन अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याने अतिसमृद्ध कुटुंबांच्या संख्येच्या बाबतीत आशिया-पॅसिफिक विभागाची घोडदौड वेगाने सुरू आहे.
- खासगी संपत्तीमध्ये २०१३च्या तुलनेत २०१४मध्ये २९ टक्के वाढ - ४७ लाख कोटी अमेरिकन डॉलर्स
- विभागांनुसार पूर्व-पश्चिम युरोपला मागे टाकून आशिया-पॅसिफिक विभागाने दुसरे स्थान मिळविले आहे.
- सध्या खासगी संपत्तीच्या निकषानुसार, जगभरातील विविध विभागांमध्ये उत्तर अमेरिका अव्वल आहे.
- मात्र, २०१६मध्ये उत्तर अमेरिकेला मागे टाकून आशिया पॅसिफिक विभाग अव्वल ठरण्याचा अंदाज आहे.
- अल्ट्रा-हाय-नेट-वर्थ कुटुंबे म्हणजे काय? : खासगी संपत्ती १०० दशलक्ष डॉलर्स किंवा त्याहून अधिक असलेल्या कुटुंबांसाठी ही संकल्पना वापरण्यात आली आहे.
हॅले ओपन टेनिस स्पर्धेत रॉजर फेडरर विजेता
- स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याने २१ जून रोजी हॅले ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. कारकिर्दीत त्याने आठव्यांदा ही स्पर्धा जिंकली.
- अंतिम फेरीच्या लढतीत त्याने इटलीच्या आंद्रेआस सेप्पीचे आव्हान ७-६, ६-४ असे परतवून लावले.
- या मोसमातील फेडररचे हे चौथे आणि ग्रास कोर्टवरील कारकिर्दीमधील पंधरावे विजेतेपद आहे.
- फेडरर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत केवळ दोन वेळा पराभूत झाला आहे. २०१०मध्ये त्याला ऑस्ट्रेलियाच्या ह्युईट आणि २०१२मध्ये जर्मनीच्या टॉमी हास याने पराभूत केले होते.
thanks sir
उत्तर द्याहटवा