होशंगाबाद येथे नोट करन्सी पेपर फॅक्ट्री
- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी होशंगाबाद जिल्ह्यात ४९५ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या पेपर फॅक्ट्रीचे ३० मे २०१५ रोजी उद्घाटन केले. होशंगाबाद येथील नोट करन्सी पेपर फॅक्ट्रीत सध्या १ हजार रुपयांच्या नोटांचा कागद तयार केला जाणार आहे.
- या कारखान्याच्या उद्घाटनानंतर या नोटांचा पहिला टप्पा नाशिकला पाठविण्यात आला आहे. या पेपर कारखान्यामुळे आता नोटांसाठी विदेशातून पेपर आयात करण्याची गरज भासणार नाही.
- नवी पेपर फॅक्ट्री सेक्युरिटी प्रिंटिंग अॅण्ड मिटिंग को-ऑपरेशन ऑफ इंडिया लि.च्या वतीने सुरू केलेले बँक नोट पेपर देशीकरणचा एक भाग आहे.
- सध्या विदेशातून आयात केलेल्या कागदावरच या नोटा छापल्या जातात. परंतु यासाठी जी शाई वापरली जाते, ती भारतातच तयार होते. कागद उत्पादन करणाऱ्या या कारखान्याची वार्षिक कागद उत्पादन क्षमता ६ हजार टन इतकी आहे.
- आणखी कारखान्यांच्या माध्यमातून कागद उत्पादन क्षमता वाढविण्यात येणार आहे. म्हैसूरमध्ये चलनी नोटांच्या कागदाची उत्पादन क्षमता १२ हजार टनपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न आहे. या वर्षीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत ती चालू करण्यात येणार आहे.
- या दोन कारखान्यांमुळे भविष्यात किमान १ हजार ५०० कोटी रुपयांच्या विदेशी चलनाची बचत होण्यास मदत मिळणार आहे.
- विशेष म्हणजे विदेशातून कागद आयात केल्यामुळे बनावट नोटांना आळा घालणे कठीण होते. परंतु आता या नोटांसाठी देशातच कागद तयार होत असल्याने आता आपोआपच बनावट नोटांना आळा घालणे शक्य होणार आहे.
रेल्वेतील सुधारणांसाठी ‘आयटी व्हिजन’ योजना
- रेल्वेसाठी ‘इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी व्हिजन’ तयार करण्याची योजना रेल्वे मंत्रालयाने आखली असून, त्यासाठी एका सल्लागार मंडळाची स्थापनाही मंत्रालयातर्फे करण्यात आली आहे.
- रेल्वेच्या एकंदर कारभारातील वर्तमान माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग, त्याची व्याप्ती वाढविणे आणि रेल्वेशी निगडित मुद्द्यांच्या सोडवणुकीसाठी एक कायमस्वरूपी यंत्रणेची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
- ‘नॅसकॉम’चे माजी अध्यक्ष सोम मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली हे सल्लागार मंडळ काम करणार असून, यामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अग्रगण्य तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. एकंदर बारा जणांचे हे मंडळ असेल व दिल्लीतच त्यांचे मुख्य कार्यालय राहणार आहे.
- सल्लागार मंडळाच्या कार्यकक्षेत पुढील मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे
- १) रेल्वेच्या एकंदर उद्दिष्टांशी सुसंगत अशा सर्वसमावेशक माहिती तंत्रज्ञान भविष्यदर्शी योजना तयार करणे.
- २) यामध्ये माहिती तंत्रज्ञान, संज्ञापन (कम्युनिकेशन), दूरसंचार यांचा समावेश. वर्तमान माहिती तंत्रज्ञानाच्या वापराचा आढावा घेऊन त्याचा नव्या भविष्यदर्शी (व्हिजन) योजनेत समावेश.
- ३) प्रामुख्याने प्रवासी सेवा, मालवाहतूक, रेल्वे मालमत्ता व्यवस्थापन, रेल्वेगाड्यांची वाहतूक, सुरक्षा व प्रवाशांची सुरक्षा व एकंदर रेल्वे व्यवस्थापन यावर विशेष भर.
- ४) या भविष्यदर्शी योजनेची अंमलबजावणी आणि त्याचे पूर्णत्व याचे वेळापत्रक आणि त्याबद्दलची रणनीती सुचविणे.
- ५) रेल्वेच्या क्षमतेत वाढ करण्याबरोबरच व्यवस्थापन बदल आणि आयटी कारभार यांची परिणामकारक योजना सुचविणे.
- ६) रेल्वेच्या मुद्द्यांबाबत माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तोडगे सुचविणारे कायमस्वरूपी पोर्टलची निर्मिती करणे. या माध्यमातून नवनव्या संकल्पनाही सुचविल्या जाणे अपेक्षित राहील.
ईशान्येकडील युवक महोत्सवाचे उद्घाटन
- २९ मे २०१५ रोजी चौथ्या ईशान्येकडील युवक महोत्सवाचे उद्घाटन माजुली (आसाम) येथे केंद्रीय रसायन आणि खते मंत्री अनंत कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.
- भारत सरकारच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन नेहरू युवा केंद्र संघटनेद्वारे (NYKS) करण्यात आले आहे.
- आठ ईशान्येकडील राज्य, एनव्हायकेएसचे स्वयंसेवक, खाद्य महोत्सवासाठी प्रतिनिधी तसेच शेजारील जिल्ह्यांमधील युवा प्रतिनिधींसह सुमारे २१०० तीन दिवसीय उत्सवाला उपस्थित रहाणार आहेत.
- ईशान्येकडील युवा महोत्सवाचे मुख्य घटक :
- स्पर्धात्मक उपक्रम : लोकनृत्य, लोकगीते, एकांकिका, गिटार आणि रॉक बँड स्पर्धा
- गैर-स्पर्धात्मक उपक्रम : सांस्कृतिक, संगीत आणि मार्शल आर्ट्स शो
- खाद्य महोत्सव आणि युवा कृती
- तरुणांशी संबंधित विषयांवर सेमिनार
- या महोत्सवाचे आयोजन राष्ट्रीय एकता आणि ईशान्येकडील राज्यांच्या व विभिन्न जातीजमातीच्या समृध्द सांकृतिक वारशाला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात येते.
यदुवीर वाडियार म्हैसूरचे नवे राजे
- म्हैसूरचे २७वे महाराजा म्हणून यदुवीर वाडियार यांचा राज्याभिषेक करण्यात आला आहे. त्यांच्या रूपाने म्हैसूरला दोन वर्षांनंतर नवीन राजा मिळाला.
- २३ वर्षीय यदुवीर यांचे शिक्षण अमेरिकेत झाले आहे. महाराजापदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांना आता यदुवीर कृष्णदत्ता चामराजा वाडियार म्हणून संबोधण्यात येणार आहे. म्हैसूरच्या पर्यटन विकासाकडे लक्ष देणार असल्याचे यदुवीर यांनी म्हटले आहे.
- १३९९ पासून म्हैसूरमध्ये वाडियार राजघराण्याचा इतिहास आहे. यापूर्वी यदुवीर यांचे चुलते श्रीकांतदत्ता नरसिंहाराजा वाडियार यांचा राज्याभिषेक झाला होता. २०१३ मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर महाराजा पद रिक्त होते.
सर्वोच्च न्यायालयाकडून दिल्ली सरकारला नोटीस
- सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या-नियुक्त्यांसंदर्भात नायब राज्यपालांना सर्वाधिकार बहाल करण्यासंबंधी जारी केलेल्या अधिसूचनेवरून केंद्र सरकारशी संघर्ष करणाऱ्या दिल्ली सरकारला सर्वोच्च न्यायालयाने नोटीस जारी करून सहा आठवड्यांत आपली भूमिका मांडण्याचे निर्देश दिले.
- दिल्ली सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार नसतील, ही केंद्र सरकारची अधिसूचना संशयास्पद असल्याचा दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने निराधार असल्याचे नमूद केले आहे.
- केंद्र सरकारच्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या दिल्ली सरकारच्या नव्या याचिकेवर उच्च न्यायालयाने स्वतंत्रपणे आणि यापूर्वीच्या निकालातील निरीक्षणांनी प्रभावित न होता सुनावणी करावी, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
मॅगीच्या जाहिरातीमुळे माधुरी दिक्षित अडचणीत
- उत्तर प्रदेशातील अन्न व औषध प्रशासनाने मॅगीच्या काही नमुन्यांची तपासणी केली असता, त्यात परवानगीपेक्षा अधिक प्रमाणात मोनो सोडिअम ग्लुटॅमेट (एमएसजी) आणि शिसे असल्याचे आढळून आले.
- त्यामुळे नेस्ले इंडिया कंपनीला मॅगीशी संबंधित बॅचचे उत्पादन बाजारातून मागे घेण्याचा आदेश उत्तर प्रदेश प्रशासनाने दिला होता.
- मॅगी ही आरोग्यासाठी हितकारक आहे, असे दावे मॅगीच्या जाहिरातीतून केले आहेत.
- मॅगीच्या ‘दो मिनीट नूडल्स’ या जाहिरातीमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षितने मॅगीच्या पोषण मूल्यांबाबत दावे केले होते. त्यामुळे माधुरीला या दाव्यांबाबत पंधरा दिवसांत उत्तर द्यावे अशी नोटीस हरिद्वार अन्न व औषध प्रशासनाने पाठविली आहे.
- उत्तर प्रदेशच्या खाद्य आणि सुरक्षा विभागाने बाराबंकी येथील स्थानिक न्यायालयात नेस्ले इंडियाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच अभिनेते अमिताभ बच्चन, माधुरी दिक्षित आणि प्रिती झिंटा यांच्याविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
‘स्पेलिंग बी’मध्ये पुन्हा भारताचा झेंडा
- सलग दुसऱ्यांदा वॉशिंग्टन येथे आयोजित ‘स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी’ या स्पर्धेत भारताने आपला झेंडा फडकावला असून, वान्या शिवशंकर (वय १३) आणि गोकूळ व्यंकटचलम (वय १४) या दोघांनी या स्पर्धेत बाजी मारली आहे.
- या दोघांनाही सहविजेते घोषित करण्यात आले. सुवर्णचषक आणि ३७ हजार डॉलरचा रोख असा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. या स्पर्धेत दोन लहान मुले सहविजेते ठरण्याची पहिलीच वेळ आहे.
- या स्पर्धेतील तिसरे स्थानदेखील भारतीय-अमेरिकी वंशाच्या कोल शेफर-रे या ओकाहोमा मधील मुलाने पटकावले.
- वान्याची बहीण काव्यानेदेखील २००९मध्ये या स्पर्धेत बाजी मारली होती.
- अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येशी तुलना करता अनिवासी भारतीयांची लोकसंख्या केवळ १ टक्के एवढी आहे. पण या स्पर्धेमध्ये पूर्वीपासून असलेले अनिवासी भारतीयांचे वर्चस्व या वर्षीही कायम राहिले.
जपानमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक
- जपानमधील कुशिनोराबू या बेटावरील ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने येथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
- उद्रेकानंतर ज्वालामुखीतून निघालेल्या राखेचे लोट ९ कि.मी. उंचापर्यंत आकाशात पसरले होते.
- राख अंगावर पडल्याने एक जण जखमी झाला आहे. बहुतेक नागरिकांना बोटीने दुसरीकडे हलविण्यात आले. ज्वालामुखीतून बाहेर पडलेली राख समुद्रात पडल्याने पाणीही प्रदूषित झाले आहे.
टोनी ब्लेअर यांचा मध्य-पूर्व गट विशेष राजदूत पदाचा राजीनामा
- ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी मध्य-पूर्व गट विशेष राजदूत पदाचा २७ मे २०१५ रोजी राजीनामा दिला.
- टोनी ब्लेअर यांनी २७ जून २००७ रोजी या पदाचा कारभार स्वीकारला होता. याच दिवशी त्यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता.
- मध्य-पूर्व गट
- या गटाची स्थापना २००२मध्ये माद्रिद (स्पेन) येथे करण्यात आली होती.
- या गटात संयुक्त राष्ट्र, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, युरोपियन युनियन आणि रशिया हे चार सदस्य संयुक्तपणे इस्रायल-पॅलेस्टाइन संकटातून एक शांततापूर्ण उपाय शोधण्यासाठी कार्य करत आहेत.
फुटीरतावाद्यांच्या सभेत पुन्हा पाकिस्तानचे झेंडे
- फुटीरतावादी नेता शाबीर शाह याने दक्षिण काश्मिरमध्ये आयोजित केलेल्या सभेत पाकिस्तानचे झेंडे फडकाविले गेले.
- हुर्रियत कॉन्फरन्सच्या सभेमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकाविले गेल्याने निर्माण झालेला वाद शमला नसतानाच पुन्हा एकदा असाच प्रकार घडल्याने तणाव निर्माण झाला आहे.
- या घटनेनंतर पोलिसांनी शाबीर शाह आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
- गेल्या दीड महिन्यात जम्मू काश्मिरमधील सभेत पाकिस्तानचे झेंडे फडकाविले जाण्याचा हा चौथा प्रकार आहे. या प्रकरणी फुटीरतावादी नेता मसरत आलम याला आधीच अटक करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा