क्रीडा मंत्रालयाची ‘लक्ष्य ऑलिंपिक पदक’ योजना
- रियो ऑलिंपिक २०१६ स्पर्धेत कामगिरी उंचावण्याच्या उद्देशाने क्रीडा मंत्रालयाने आखलेल्या ‘लक्ष्य ऑलिंपिक पदक’ [टार्गेट ऑलिम्पिक पोडियम (टॉप)] मोहिमेअंतर्गत ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्या अभिनव बिंद्रासह एकूण ४५ खेळाडूंना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
- ब्राझीलमधील रिओ येथे २०१६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी ही योजना तयार करण्यात आली असून, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, नेमबाजी, कुस्ती आणि नौकानयन या सहा क्रीडाप्रकारांतून ४५ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत तिरंदाजी व अॅथलेटिक्स मधील आणखी ३० खेळाडूंचा या योजनेअंतर्गत समावेश करण्यात येईल, असेही क्रीडा मंत्रालया तर्फे सांगण्यात आले.
- यासाठी क्रीडा मंत्रालयाने इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनीशी (आयआयएफसीएल) परस्पर सामंजस्याचा करार केला असून, त्यांनी राष्ट्रीय क्रीडा विकास निधीसाठी ३० कोटी रुपयांचे अर्थ सहाय दिले आहे. यातूनच हा निधी ‘लक्ष्य ऑलिंपिक पदक’ योजनेसाठी वापरला जाईल. या योजनेचा एकूण खर्च ४० ते ४५ कोटींपर्यंत आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राजपथावर कार्यक्रम
- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त (२१ जून) राजपथावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. यावेळी ४५ हजार नागरिक हजर असणार आहेत. केवळ निमंत्रितांणाच प्रवेश दिला जाणार आहे.
- मोरारजी देसाई नॅशनल इंस्न्टिट्यूट फॉर योगा या संस्थेने योगाची सीडी तयार केली आहे. सीडी पाहून ४५ हजार नागरिक योगा करणार आहेत. पंतप्रधान, गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यासह अनेक मंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत.
त्रिपुरातून १८ वर्षांनी हटविण्यात आला 'अफ्सा'
- त्रिपुरातील बंडाळी मोडून काढण्यासाठी गेल्या अठरा वर्षांपासून याठिकाणी लागू असलेला सैन्य विशेषाधिकार कायदा (अफ्सा) हटविण्याचा निर्णय त्रिपुरा सरकारने २७ मे रोजी घेतला.
- मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाने ‘अफ्सा’ हटविण्याचा निर्णय घेतला. त्रिपुरामध्ये हिंसक घटनांमुळे १६ फेब्रुवारी १९९७ मध्ये ‘अफ्सा’ लागू करण्यात आला होता.
- ‘अफ्सा‘ हटविल्यानंतर दर सहा महिन्यांनी संवेदनशील भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार असून, यानंतर त्याबाबतची चर्चा पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांशी करण्यात येईल.
- राज्यातील बंडाळीची परिस्थिती कमी झाली असल्याने, सध्या या कायद्याची गरज नसल्याची चर्चा बैठकीत करण्यात आली.
भुकेलेल्या देशांमध्ये भारत अग्रस्थानी
- संयुक्त राष्ट्रसंघाच्या रोममधील अन्न आणि कृषी संघटनेने ‘स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी इन दि वर्ल्ड-२०१५’ हा अहवाल प्रसिद्ध केला असून, यामध्ये जगातील भुकेच्या समस्येचा वेध घेण्यात आला आहे.
- या अहवालानुसार सध्या भारतामध्ये कुपोषित लोकांची संख्या १९ कोटी ४६ लाखांवर पोचली असून भारत कुपोषित लोकांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. जगाशी तुलना केली तर दर चार व्यक्तींमागे एक कुपोषित व्यक्ती भारतामध्ये आढळून येते.
- भारतामध्ये कुपोषित लोकांच्या संख्येत केवळ १५ कोटी ५ लाखांची घट झाल्याचे दिसून येते.
- भारताला संयुक्त राष्ट्रसंघाने निर्धारित केलेल्या सहस्रावधी विकास लक्ष्य आणि १९९६ मध्ये झालेल्या जागतिक अन्न संमेलनात निर्धारित ध्येय गाठण्यात अपयश आले आहे.
- बांगलादेश आणि नेपाळमधील कुपोषित लोकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. बांगलादेशने तर सहस्रावधी विकास लक्ष्यदेखील प्राप्त केले आहे. राष्ट्रीय अन्नधोरणामुळे हे लक्ष्य गाठणे शक्य झाल्याचे तेथील सरकारचे म्हणणे आहे. अन्न उपभोग आणि उत्पन्नातील यांच्यातील तफावतीमुळे भारतात कुपोषणाच्या विषमता दिसून येते.
ग्रीनपीसला दोन खात्यांचा वापर करण्यास परवानगी
- दिल्ली उच्च न्यायालयाने ग्रीनपीस इंडिया या स्वयंसेवी संस्थेला त्यांच्या दैनंदिन कार्यांकरिता निधी गोळा करणे व त्याचा वापर करता यावा यासाठी दोन खात्यांचा वापर करण्यास २६ मे रोजी परवानगी दिली.
- दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती राजीव शकधर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने संस्थेला त्यांची मुदत ठेव वापरण्याची परवानगी देताना या रक्कमेचा व नवीन मिळालेल्या निधीचा वापर कायद्यानुसार निश्चित ध्येय व उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी वापरण्याचे आदेश दिले.
- सरकारद्वारे प्रतिबंधित केलेल्या निधीचा वापर ग्रीनपीस करू शकत नाही असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
- एप्रिल २०१५मध्ये या खात्यांवर गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार बंदी घालण्यात आली होती.
- ग्रीनपीसने संबंधित प्राधिकरणाला माहिती न देता विदेशी देणग्या वापरण्यासाठी पाच खाते उघडून भारत सरकार परराष्ट्र निधी (नियमन) अधिनियम (FCRA)चे उल्लंघन केल्यामुळे ग्रीनपीसची नोंदणी रद्द करण्यात आली होती.
नेब्रास्कामध्ये मृत्युदंडाची शिक्षा रद्द
- मृत्युदंडाची शिक्षा रद्द करणारे नेब्रास्का अमेरिकेतील १९ वे राज्य बनले आहे. हा कायदा ३० विरुध्द १९ मतांनी मंजूर करण्यात आला.
- सेनेटर एर्नी चेम्बर्स गेल्या ४० वर्षांपासून मृत्युदंड रद्द व्हावा यासाठी प्रयत्न करीत होते त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे. १९९७ पासून नेब्रास्कामध्ये मृत्युदंडाच्या शिक्षेवर अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. अमेरिकेतील ३१ राज्यांमध्ये मृत्युदंड देण्यात येतो.
फिफाच्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक
- फुटबॉल सामन्यात ९६० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेच्या (फिफा) सात अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. अमेरिकन कायदा विभागाच्या निर्देशानुसार ही अटक करण्यात आली असून यात फिफाच्या उपाध्यक्षांचाही समावेश आहे.
- स्वित्झर्लंडच्या कायदा मंत्रालयाच्या माहितीनुसार झुरिचमध्ये फिफा मुख्यालयावरही छापा मारण्यात आला असून तेथून इलेक्ट्रॉनिक डाटा व काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. त्यानुसार संघटनेचे काही अधिकारी अमेरिकेत फुटबॉल स्पर्धेच्या आयोजन व मार्केटिंगमध्ये आर्थिक घोटाळे करत असल्याचे समोर आले आहे.
- अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या मते दक्षिण आफ्रिकेने २०१०मध्ये वर्ल्डकपचे यजमानपद भूषवण्यासाठी १० मिलियन डॉलर्सची लाच दिली होती. याच कारणास्तव स्वित्झर्लंडच्या तपास अधिकाऱ्यांनी फिफाच्या झ्युरिकमधील मुख्य कार्यालयावर छापे ठाकले. २०१८ व २०२२चा वर्ल्डकप अनुक्रमे रशिया व कतार येथे होतो आहे, यासाठी संबंधितांकडून पैसे घेतले असावेत, असा संशय असल्याने हे छापे टाकण्यात आले होते.
- फिफा अध्यक्ष : सेप ब्लॉटर
- फिफा उपाध्यक्ष : जेफरे वेब
भारतात प्रथमच तृतीयपंथीय व्यक्तीची महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नेमणूक
- भारतात प्रथमच मानवी बंडोपाध्याय या तृतीयपंथीय व्यक्तीची महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्या विवेकानंद सतोबार्षिकी महाविद्यालय (कोलकत्ता) येथे प्राध्यापिका आहेत.
- ९ जून रोजी त्या कृष्णानगर महिला महाविद्यालयाचा पदभार सांभाळणार आहेत. त्या उत्तम प्रशासक आहेत.
- त्यांच्या या निवडीमुळे तृतीयपंथीय समुदायाचे उत्थान होईल असे कल्याणी विद्यापीठाचे कुलगुरू रत्तन लाल हंगलू यांनी म्हटले आहे.
- प्रेसिडन्सी कॉलेज आणि जाधवपूर विद्यापीठामध्ये तृतीयपंथीयांसाठी वेगळा रकाना ठेवण्यात आला आहे.
ट्रेव्हर बेलिस इंग्लंड संघाचे नवे प्रशिक्षक
- ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हर बेलिस यांची इंग्लंड संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. बेलिस हे इंग्लंड संघाचे प्रशिक्षकपद भूषविणारे पहिले ऑस्ट्रेलियन ठरले आहेत.
- विश्वकरंडक स्पर्धेतील अपयशानंतर इंग्लंडने प्रशिक्षक पीटर मूर्स यांची हकालपट्टी केली होती. त्यांच्या जागी ही निवड करण्यात आली आहे. बेलिस यांच्यासमोर आता ऍशेस मालिकेचे सर्वांत मोठे आव्हान असेल.
- इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने बेलिस यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. बेलिस यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंका संघाने २०११ मध्ये विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.
- आयसीसी टी-२० विश्वकरंडक स्पर्धा पुढील वर्षी होणार असल्यामुळे बेलिस यांच्या निवडीला महत्त्व प्राप्त झाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा