- १२ जून : जागतिक बालमजुरी निषेध दिन
अजित दोवाल म्यानमारच्या दौऱ्यावर
- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल १७ जूनला म्यानमारच्या दौऱ्यावर जाणार आहेत. म्यानमारच्या सीमेनजीक भारताने केलेल्या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा असणार आहे.
- या वेळी ते म्यानमारचे अध्यक्ष यू थेन सेन यांच्यासह इतर वरिष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांची भेट घेतील. ईशान्य भारतात वारंवार होणाऱ्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ‘संयुक्त कारवाई’ करण्यासंदर्भात ते चर्चा करणार आहेत.
- भारताने म्यानमारमध्ये केलेल्या कारवाईच्या आखणीत दोवाल यांचा मोठा सहभाग होता.
‘रॉक गार्डन’चे निर्माते नेक चंद यांचे निधन
- गेली अनेक दशके पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या चंडिगडमधील ‘रॉक गार्डन’चे निर्माते नेक चंद यांचे ११ जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.
- नेक चंद यांना मधुमेह आणि कर्करोगही होता. गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. नेकचंद यांच्या निधनानंतर चंडिगड प्रशासनाने १२ जूनला सर्व सरकारी कार्यालयांमध्ये सुटी जाहीर केली.
- १९५०च्या दशकात नेक चंद चंडिगडमधील एका बांधकाम प्रकल्पावर काम करत होते. त्यावेळी प्रख्यात आर्किटेक्ट ली कोर्बुसिएर यांच्या मार्गदर्शनाखाली चंडिगड शहराची निर्मिती सुरू होती.
- नागरिकांनी फेकून दिलेल्या वस्तूंमधून कलाकृती निर्माण करण्याची कला नेक चंद यांना साध्य झाली होती. यासाठी चंडिगडच्या उत्तर भागात त्यांनी स्वत:ची निर्मितीशाळाही तयार केली होती.
- ‘रॉक गार्डन’मध्ये त्यांनी फुटलेल्या बांगड्या, इलेक्ट्रिक बोर्डावरील बटण, प्लग, ट्युबलाईट, दगड, फुटलेल्या टाईल्स आणि अशा अनेक टाकाऊ वस्तूंपासून असंख्य कलाकृती निर्माण केल्या आहेत.
- ४० एकरामध्ये पसरलेल्या ‘रॉक गार्डन’मध्ये धबधबे, तलाव आणि ओपन एअर थिएटरही बांधण्यात आले आहे. १९७६ मध्ये ‘रॉक गार्डन’चे उद्घाटन झाले होते. हे गार्डन पाहण्यासाठी भारत आणि जगभरातील अडीच लाखपेक्षा अधिक पर्यटक दरवर्षी हजेरी लावतात आणि तिकिटविक्रीतून वर्षाला सुमारे १.८ कोटी रूपयांचा महसूल मिळतो.
- कलाकारांच्या कामाला पाठिंबा देणे आणि जगभरात सुंदर बागांची निर्मिती होण्याच्या दृष्टिकोनातून १९९७मध्ये नेक चंद फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे.
- नेक चंद यांच्या कलाकृती जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांनी निर्माण केलेल्या वास्तू पॅरिस, लंडन, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, बर्लिन आदी शहरांमध्येही आहेत. विविध भाषांमध्ये त्यांच्यावर पुस्तकेही लिहिली गेली आहेत. अनेक देशांनी त्यांना सन्माननीय नागरिकत्वही दिले होते. नेक चंद यांना १९८४ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
निगोशिएबल इन्स्ट्रमेंट अॅक्ट २०१५
- धनादेश न वटल्याचे लाखो खटले देशात सुरू आहेत. यातून संबंधीतांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ‘निगोशिएबल इन्स्ट्रमेंट अॅक्ट’मध्ये बदल करणाऱ्या अध्यादेशाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. वर्षभरात मोदी सरकारने काढेलेला हा १४ वा अध्यादेश आहे.
- या संशोधनात ज्या कक्षेत धनादेश वटण्यासाठी देण्यात आला आहे, त्याच न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात यावे, अशी तरतूद करण्यात आली आहे.
- सर्वोच्च न्यायालयाने २०१४ मध्ये दिलेल्या निर्णयात धनादेश परतण्याप्रकरणी धनादेश देण्यात आलेल्या क्षेत्रातील न्यायालयात प्रकरण दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, सरकारने याआधीच निर्णयाच्या उलट विधेयक लोकसभेत मंजूर केले आहे. त्यानुसार धनादेश ज्या क्षेत्रात वटण्यासाठी गेला, त्याच क्षेत्रातील न्यायालयात प्रकरण दाखल करावे लागणार आहे.
- तक्रार करणाऱ्यास सोयीस्कर : चेक बाउन्स प्रकरणात ज्या बँकेच्या शाखेत तो वटवण्यासाठी गेला असेल, त्याच बँकेच्या क्षेत्रातील न्यायालयात हे प्रकरण दाखल करावे लागणार आहे. धनादेश देणाऱ्या संस्थेचे कार्यक्षेत्र दुसऱ्या न्यायालयाच्या कक्षेत येत असले तरी सर्व प्रकरण एकाच न्यायालयाच्या कक्षेत येणार आहे.
पुणे-नाशिक सी प्लेन सेवा
- कामाच्या निमित्ताने अनेकांना पुणे-नाशिक प्रवास करावा लागतो; परंतु रस्त्यावरून हे अंतर कापण्यासाठी पाच तासांहून अधिक वेळ लागतो. वेळेचा हा अपव्यय टाळण्यासाठी या दोन शहरांदरम्यान पाण्यावर चालणाऱ्या आणि आकाशात उडू शकणाऱ्या ऍम्फिबियन जातीच्या सी प्लेनची सेवा १५ जूनपासून मेहेर कंपनीतर्फे सुरू होणार आहे.
- यामुळे हे पाच तासांचे अंतर केवळ ५० मिनिटांत पार करता येणार आहे. नाशिकजवळील ओझर व पुण्याजवळील लोहगाव येथून ही सेवा उपलब्ध होणार आहे.
- यानंतरच्या टप्प्यात मुंबई-नाशिक उड्डाणांचा देखील समावेश करण्यात येणार आहे.
- मेहेर प्रमुख : सिद्धार्थ वर्मा
‘ट्विटर’चे सीईओ राजीनामा देणार
- ‘ट्विटर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डिक कोस्टोलो हे एक जुलैला आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या मानाने ट्विटरची मंदावलेली वाढ आणि जाहिरातदारांना आकर्षित करण्यास असमर्थ ठरल्यामुळे कोस्टोलो यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
- गेल्या काही वर्षांत ट्विटरच्या वापरकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे कंपनीच्या नफ्यात घट झाल्याने कंपनीला गुंतवणूकदारांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे.
- सीईओ पदाचा राजीनामा दिल्यानंतरदेखील कोस्टोलो संचालक मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहत राहणार आहेत. कंपनीला नवीन सीईओ मिळेपर्यंत जॅक डोरसी (ट्विटरचे सहसंस्थापक) प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतील.
स्मार्टफोन्सवर ‘गुगल सर्च’ची गती वाढणार
- ऍड्रॉईडबेस्ड स्मार्टफोनवर ‘गुगल सर्च’ची सुविधा अधिक वेगाने उपलब्ध होणार असून यासाठी गुगलने ऑप्टिमाईज्ड वेबपेजेसची सुविधा सुरु केली आहे.
- स्मार्टफोन्सवरून क्रोम अथवा ऍड्रॉइड ब्राऊजरमधून वेगाने आणि कमी खर्चात इंटरनेट सुविधा वापरण्यासाठीचे हे नवे फिचर सुरु करण्यात आले आहे.
- यापूर्वी गुगलने असा प्रयोग इंडोनेशियामध्ये सुरु केला होता. तेथे पूर्वीपेक्षा चारपट अधिक वेगाने युजर्सना वेबपेजेस पाहता येत आहेत. तसेच पूर्वीपेक्षा ८० टक्के कमी डेटा खर्च होत आहे. या सुविधेशिवाय युजर्स पूर्वीप्रमाणे अनऑप्टिमाईज्ड पेजेसलाही भेट देऊ शकणार आहे. येत्या दोन आठवड्यात ही सेवा भारतामध्ये सुरू होणार आहे.
नायजेरियात दहशतवाद्यांचा हल्ला
- नायजेरियामधील बोको हराम या दहशतवादी संघटनेने येथील सहा गावांवर हल्ला करत ३७ नागरिकांची हत्या केली.
- या दहशतवाद्यांनी सहाही गावांना आग लावल्याने बहुतांश घरे भस्मसात झाली. मृतांमध्ये सर्व जण शेतकरी होते.
- गेल्या वर्षी या भागातून सैन्याने दहशतवाद्यांना हाकलून लावल्यानंतर येथील सर्व जण काही दिवसांपूर्वीच पुन्हा गावामध्ये राहायला आले होते. आता त्यांना पुन्हा स्थलांतर करावे लागणार आहे.
भारतातील पहिली समलैंगिक जाहिरात ‘व्हायरल’
- समलैंगिक महिलांवर चित्रीत केलेली भारतातील पहिली जाहिरात सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. ही जाहिरात इंटरनेटवर ‘व्हायरल’ झाली असून, या जाहिरातीमुळे भारतीयांचा समलैंगिकतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होईल अशी आशा जाहिरात निर्मात्यांना आहे.
- अनौक एथनिक ऍपेरल या कपड्यांच्या ब्रँडची ही जाहिरात आहे. ‘द व्हिजिट’ असे या व्हिडिओचे शीर्षक आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या विविध माध्यमांतून आतापर्यंत ३० लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
- भारतीय दंडविधान कलम ३७७ नुसार समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांस दहा वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्याची तरतूद भारतात आहे. उच्च न्यायालयाने हे कलम रद्दबातल ठरविले होते, मात्र सर्वोच्च न्यायालयाने २०१३ मध्ये पुन्हा ते पूर्ववत लागू केले.
वीरप्पा मोईलींवर चोरीचा लेख लिहिण्याचा आरोप
- कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखातील काही परिच्छेद हे चोरीचे आहेत, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
- मोईली यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रामध्ये ११ जून रोजी ‘From welfare to patternlism’ या नावाने लेख लिहिला होता. शिवाय, लेखक जी. संपत यांनीही २६ मे रोजी एका वृत्तपत्रात लेख लिहिला होता. मोईली यांच्या लेखामधील अनेक परिच्छेद हे संपत यांनी लिहिलेल्या लेखातील आहेत, असा आरोप करण्यात आला आहे.
- या घटनेनंतर संबंधित वृत्तपत्राच्या संकेतस्थळावरून हा लेख काढण्यात आला आहे.
अभिनेते ख्रिस्तोफर ली कालवश
- ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ मालिकेमधील ‘सारूमॅन द व्हाईट’, ‘ड्रॅक्युला’ भयपटांतील काऊंट ड्रॅक्युला आणि ‘द मॅन विथ द गोल्डन गन’ या मधील ‘स्कॅरामँगा’ यासारख्या आपल्या भूमिकांतून दर्जेदार अभिनयाचा ठसा उमटविणारे मातब्बर ब्रिटिश अभिनेते ख्रिस्तोफर ली यांचा वयाच्या ९३व्या वर्षी मृत्यू झाला.
- ली यांनी चित्रपट क्षेत्रातील कारकीर्दीची सुरुवात बाराव्या शतकातील शिल्पकलेवर आधारित ‘कॉरिडॉर ऑफ मिरर’ (१९४७) या प्रणयपटातून केली होती. मात्र त्यांना वयाच्या पन्नाशीपर्यंत प्रसिद्धी मिळाली नव्हती.
- ‘हॅमर हॉरर’ स्टुडिओच्या चित्रपटांनी ते प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांची ‘ड्रॅकुला’ची भूमिका खूप गाजली. तसेच त्यांनी ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’मध्ये केलेल्या जादूगर सारूमॅनच्या भूमिकेमुळे २००९ मध्ये नाइटहूड व २०११ मध्ये बाफ्ता फेलोशिपने गौरविण्यात आले.
पाकिस्तानात ‘सेव्ह द चिल्ड्रन’ला टाळे
- पाकिस्तानविरोधी प्रकल्प राबविले जात असल्याच्या आरोपावरून पाकिस्तानने ‘सेव्ह द चिल्ड्रन’ या स्वयंसेवी संस्थेचे इस्लामाबाद येथील मुख्यालय बंद केले. या संस्थेचे आंतरराष्ट्रीय मुख्यालय लंडन येथे आहे.
- इस्लामाबादमधील कार्यालयामध्ये संस्थेच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली असून, सरकारने त्यांची देशातून हकालपट्टी करण्याचाही निर्णय घेतला आहे.
- मात्र येथील सर्व कर्मचारी पाकिस्तानचेच नागरिक आहेत. तसेच त्यांनी पाकिस्तान सरकारच्या या कृतीचा निषेध केला आहे.
- आतापर्यंत देशातील चाळीस लाखांहून अधिक मुलांना आणि कुटुंबांना मदत करणाऱ्या या संस्थेला अचानक टाळे लावले गेल्याने त्यांचे कामकाज ठप्प झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा