चालू घडामोडी - १४ जून २०१५


१५०० कोटी रुपयांच्या आण्विक विमा संचयाची घोषणा
  • अणू ऊर्जा प्रकल्पांचे संचालन करताना अपघात झाल्यास होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्याची जबाबदारी त्या प्रकल्पाची यंत्रसामुग्री पुरविणाऱ्या परकीय पुरवठादारावर पडू नये यासाठी भारत सरकारने १,५०० कोटी रुपयांचा विमानिधी संचय (इन्श्युरन्स पूल) स्थापन केला. अशा प्रकारे ‘सिव्हिल लायएबिलिटी फॉर न्युक्लियर डॅमेज अ‍ॅक्ट’ (सीएलएनडी) या कायद्याची पूर्तता करण्यात आली आहे.
  • अशा प्रकारच्या विमानिधीची तरतूद नसल्याने गोरखपूर हरियाणा अणुविद्युत परियोजनेसारखे अणूऊर्जा प्रकल्प दीर्घकाळ अडकून पडले होते. मात्र आता ते मार्गी लागू शकतील.
  • अणूऊर्जा प्रकल्प चालवीत असताना अपघात झाल्यास त्याचे संचालन करणारी संस्था त्या प्रकल्पाची यंत्रसामुग्री पुरविणाऱ्या पुरवठादारावर भरपाईसाठी दावा ठोकू शकेल, अशी तरतूद (सीएलएनडी) कायद्यात आहे. हा बोजा अंगावर पडू नये यासाठी परदेशी पुरवठादार भारताला यंत्रसामुग्री व तंत्रज्ञान देताना हात आखडता घेत होते. आता अणू प्रकल्पांचा अपघातविरोधी विम्याची देशातच सोय झाल्याने ही अडचण दूर होईल.
  • जनरल इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया व न्यू इंडिया, ओरिएंटल इन्शुरन्स, नॅशनल इन्शुरन्स, युनायटेड इंडिया इन्शुरन्स अशा ११ कंपन्यांना यात सहभागी केले आहे.
  • या विमा निधीचा वापर आकस्मिक निधीसारखा केला जाणार आहे, अणुदुर्घटना घडल्यास भरपाई द्यावी लागेल, त्यासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे.
  • अणुशक्ती आयोगाचे सचिव : आर.के.सिन्हा

आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये विंडीजच्या वेस्ली हॉलचा समावेश
    Wesley Winfield Hall
  • वेस्ट इंडीजच्या अव्वल वेगवान गोलंदाजांच्या ताफ्यातील माजी कसोटीवीर वेस्ली हॉल यांच्या कामगिरीचा गौरव करताना आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
  • विंडीजचे माजी वेगवान गोलंदाज आणि कर्णधार कोर्टनी वॉल्शच्या हस्ते वेस्ली हॉल यांना कॅप देऊन गौरव करण्यात आला. या समारंभाला आयसीसीचे संचालक तसेच विंडीज क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष कॅमेरुन, माजी कर्णधार क्लाईव्ह लॉईड, सर एव्हर्टन विक्स हे उपस्थित होते.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूचा आयसीसीतर्फे हॉल ऑफ फेममध्ये समावेश करून गौरव केला जातो. या वर्षी हॉल ऑफ फेममध्ये चार क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी बेटी विल्सन, अनिल कुंबळे आणि मार्टिन क्रो यांनाही हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले आहे.
  • आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये आतापर्यंत एकूण ८० क्रिकेटपटूंचा समावेश असून त्यात विंडीजचे १८ खेळाडू आहेत.
  • १९५८ ते १९६९ या कालावधीत वेस्ली हॉल यांनी ४८ कसोटीत १९२ बळी घेतले आहेत. क्रिकेट क्षेत्रातील निवृत्तीनंतर बार्बाडोस शासनामध्ये हॉल यांच्याकडे पर्यटन व क्रीडा खात्याचे मंत्रिपद सोपविण्यात आले होते. २००१ साली विंडीज क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा हॉल यांनी सांभाळली होती.

राज्याचे माहिती आयुक्त देशपांडेंच्या घरावर छापा
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र सदन बांधकाम विभागातील गैरव्यवहारप्रकरणी राज्याचे माहिती आयुक्त दीपक देशपांडे यांच्या घरावर छापा टाकला. देशपांडे यांच्या घरात मोठ्या प्रमाणात संपत्ती सापडली आहे.
  • माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर देशपांडेंचे नाव समोर आले होते. दीपक देशपांडे हे तत्कालीन बांधकाम सचिव होते.
  • देशपांडे यांच्या मुंबई आणि औरंगाबादमधील घरांवर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या छाप्यात त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती असल्याचे उघड झाले आहे.
  • दीपक देशपांडे हे १९७४ मध्ये एमपीएससी स्पर्धात्मक परिक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. मुंबई येथील आयआयटीमधून एमटेक पोस्ट ग्रॅज्युएशन केले. महाराष्ट्र शासनाची सरळसेवा प्रवीष्ट सेवा (Class-I) सुरु केली व सचिव पदावरुन ते २००९ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. निवृत्तीच्या वेळी काही काळ ते नियोजन विभागामध्ये सचिव या पदावर कार्यरत होते.
  • त्यांनी इतर विविध पदावर काम केले आहे. देशपांडे यांचे नावे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण २१ तांत्रिक शोध निबंधक प्रसिध्द झाले आहेत. महाराष्ट्रातील कित्येक मोठे प्रकल्प त्यांचे हस्ते यशस्वी पार पाडले आहेत. त्यांची १५ ऑक्टोबर, २०१० पासून राज्य माहिती आयुक्त या पदावर नियुक्ती झाली असून ते औरंगाबाद विभागाचा कार्यभार सांभाळत आहेत.

चीनची ‘वू-१४’ या अण्वस्त्रवाहू वाहनाची यशस्वी
  • चीनच्या संरक्षण मंत्रालयाने स्वनातीत (सुपरसॉनिक) ‘वू-१४’ या अण्वस्त्रवाहू वाहनाची यशस्वी चाचणी घेण्यात आल्याची घोषणा केली.
  • दक्षिण चिनी समुद्रामधील सागरी सीमारेषा व बेटसमूहांच्या मालकी हक्कांवरुन सध्या अत्यंत तणावग्रस्त वातावरण असताना चीनने केलेली ही चाचणी मोठे लष्करी शक्तिप्रदर्शन असल्याची टीका अमेरिकेने केली आहे.
  • ‘वू-१४’ क्षेपणास्त्र प्रणालीसंदर्भातील चीनची अशा स्वरुपाची गेल्या १८ महिन्यांमधील ही चौथी चाचणी आहे.
  • दक्षिण पूर्व आशिया भागामधील चीनच्या सीमारेषेसंदर्भातील वादामध्ये अमेरिका सतत हस्तक्षेप करत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘प्रत्युत्तर’ म्हणून ही चाचणी करण्यात आल्याचे म्हंटले जात आहे.
  • या नव्या अण्वस्त्रवाहू प्रणालीमध्ये अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांना चुकविण्याची क्षमता आहे. वू-१४ हे ध्वनिच्या दहापट वेगाने (ताशी ७,६८० मैल) मार्गक्रमण करु शकणारे अण्वस्त्र आहे.

महिलांच्या सुरक्षेसाठी दिल्लीत बसमध्ये कॅमेरे
  • राजधानी दिल्लीमध्ये बसमधील सुरक्षेसाठी विशेषत: महिला प्रवाश्‍यांच्या सुरक्षेसाठी आम आदमी पक्षाच्या सरकारने ५ हजार बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांच्या नियुक्तीसह सुरक्षेच्या उपाययोजनेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • दिल्लीच्या परिवहन मंडळाच्या (डीटीसी) आणि ऑरेंज कलर क्लस्टर बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच त्यासाठी १०० कोटी रुपयांची  तरतूदही करण्यात येणार आहे.

ट्विटरने आता वैयक्तिक मेसेज लिहिण्यासाठीची मर्यादा वाढविली
    Twitter Logo
  • लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइट असलेल्या ट्विटरने आता वैयक्तिक मेसेज लिहिण्यासाठीची मर्यादा वाढविली आहे. पूर्वी केवळ २५० अक्षरांची (कॅरेक्टर) असलेली मर्यादा काढून टाकण्यात आली असून, वैयक्तिक मेसेजेससाठी कोणतीही मर्यादा ठरविण्यात आलेली नाही. या नव्या सुविधेची अंमलबजावणी जुलैपासून करण्यात येणार आहे.
  • ट्विटरने याबाबत एका पोस्टद्वारे ही माहिती प्रसिद्ध केली आहे. यामुळे नेहमीच्या ट्विटरवरील मेसेजमध्ये कोणताही फरक पडणार नसून पूर्वीप्रमाणेच केवळ १४० कॅरेक्टरमध्येच ट्विट करता येणार आहे. नियमित युजर्सना यामुळे काहीही फरक पडणार नाही. मात्र ट्विटरद्वारे चॅट करणाऱ्या युजर्ससाठी या नव्या सुविधेचा लाभ होऊ शकतो.

स्पेनच्या युवराज्ञीला केले पदभ्रष्ट
  • भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे स्पेनचे राजे फिलीप (सहावे) यांनी त्यांची बहीण युवराज्ञी क्रिस्टिना यांची डचेस ऑफ पालमा दी मॅलोर्का ही पदवी काढून घेतली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपापासून राजघराण्याला दूर ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे राजघराण्याच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
  • क्रिस्टिना यांच्याविरुद्ध करचुकवेगिरी केल्याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. १९७५मध्ये स्पेनमध्ये राजघराण्याला पुन्हा मान्यता मिळाल्यानंतर गंभीर आरोप होणारी क्रिस्टिना ही पहिली व्यक्ती आहे.

माजी केंद्रीय मंत्री शीला कौल यांचे निधन
  • माजी केंद्रीय मंत्री शीला कौल (वय १०१) यांचे १३ जून रोजी निधन झाले.
  • त्या माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या त्या मेहुणी असून, सर्वांत ज्येष्ठ माजी संसद सदस्या होत्या. कौल या हिमाचल प्रदेशच्या माजी राज्यपाल होत्या.
  • पाच वेळा खासदार राहिलेल्या कौल यांचा जन्म ७ फेब्रुवारी १९१५ मध्ये झाला होता. कौल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यासह कॉंग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते.

जितेंद्रसिंह तोमर यांची पदवी बोगस
  • दिल्लीचे माजी कायदामंत्री जितेंद्रसिंह तोमर यांची बीएस्सी आणि कायद्याची पदवी बोगसच असल्याचे निदर्शनास आले आहे.
  • पोलिसांनी तोमर यांना अवध विद्यापीठात नोंदी तपासण्यासाठी नेले होते. तसेच, इतर तीन ठिकाणीही त्यांना नेण्यात आले. मात्र, १९८६-८७ला पदवी मिळविल्याच्या तोमर यांच्या दाव्याला पुरावा मिळाला नाही.
  • तसेच, अवध विद्यापीठानेही जितेंद्रसिंह तोमर या नावाने आपल्याकडे कोणत्याही विद्यार्थ्याने पदवी घेतली नसल्याचे पोलिसांजवळ स्पष्ट केले आहे.
  • बीएस्सीच्या बनावट पदवीच्या आधारे तोमर यांनी कायद्यासाठी कसा प्रवेश मिळविला, याचा तपास करण्यावर पोलिसांनी सध्या लक्ष केंद्रित केले आहे.
  • तोमर यांनी सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याने त्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी वेळ मागितल्यानंतर दिल्ली न्यायालयाने तोमर यांच्या पोलिस कोठडीमध्ये दोन दिवसांची वाढ केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा