कोस्टल रोडला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी
- मुंबईकरांच्या वाहतुकीचा प्रचंड ताण कमी करण्यासाठी लक्षणीयरीत्या उपयुक्त ठरणाऱ्या मुंबई किनारपट्टी रस्त्याला (कोस्टल रोड) केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
- सीआरझेड नियमांचे अडथळे पार करणारे परिपत्रक केंद्रीय पर्यावरण खात्याकडून १५ जून काढण्यात येईल. अंतिम परिपत्रकासाठी १५ ऑगस्टपर्यंतची मुदत निश्चित करण्यात आली आहे.
- किनारपट्टी रस्त्याच्या (कोस्टल रोड) निर्मितीदरम्यान ९१ हेक्टर जागेवर ‘हरित पट्टा’ उभारण्यात येणार आहे. या जागेचा बांधकाम व्यावसायिकांकडून दुरूपयोग होणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना दिली आहे. ही जागा केवळ नागरीकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठीच वापरावी लागेल, अशी सूचना जावडेकर यांनी फडणवीस यांना केली.
पर्यावरण मंत्रालयाच्या अटी
- किनारट्टीपासून १६० हेक्टर क्षेत्रावर जो भराव (रेक्लेमेशन) टाकला जाणार आहे, त्याचा खासगी व व्यापारी बांधकामांसाठी दुरुपयोग होऊ नये याची राज्य सरकारने काटेकोर काळजी घ्यावी.
- प्रकल्पामुळे होणारी पर्यावरणाची हानी भरून काढण्यासाठी दुप्पट झाडे लावावी.
- यासाठीची हायटाईड नियंत्रण रेषा ५०० मीटरपर्यंत कायम ठेवावी.
दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्र सिंह तोमर यांना अटक
- दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्र सिंह तोमर यांना दिल्ली पोलीसांनी अटक केली आहे. तोमर यांनी निवडणूक अर्ज भरतेवेळी बनावट प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी पोलीसांनी कारवाई करीत त्यांना अटक केली.
- आम आदमी पक्षाने या कृतीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना तोमर यांना अटक कशी करण्यात आली, असा प्रश्न पक्षाने उपस्थित केला आहे.
- तोमर यांचे पदवीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे स्पष्टीकरण बिहार विद्यापीठाने दिल्ली उच्च न्यायालयात दिले होते. त्यानंतर लगेचच कॉंग्रेससह इतर विरोधकांनी तोमर यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
- बिहारमधील तिलक मांझी भागलपूर विद्यापीठात कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्याचा दावा तोमर यांनी केला होता. मात्र, निवडणूक अर्जात तोमर यांनी समाविष्ट केलेले प्रमाणपत्र बनावट असल्याची पुष्टी खुद्द दिल्ली न्यायालयाने दिली आहे.
योग दिन कार्यक्रमाचे १५२ देशांच्या दूतावासांना निमंत्रण
- संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जाहीर केला असून त्यामध्ये सहभागी होण्यासाठी भारताने देशातील १५२ देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना निमंत्रण दिले आहे.
- दिल्लीतील राजपथावर सकाळी ७.३० ते सायंकाळी ७.३५ वाजेपर्यंत कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक दूतावासात तीन प्रवेशपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
- तथापि, पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे प्रत्येक उच्चपदस्थ राजनैतिक अधिकारी या कार्यक्रमात सहभागी होण्याची अपेक्षा नाही.
- या कार्यक्रमात ३५ ते ४० हजार जण सहभागी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सशस्त्र दलातील पाच हजार कर्मचारीही सहभागी होणार आहेत.
योगदिनाचे प्रसारण टाईम्स स्क्वेअरमध्ये
- संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यूयॉर्क येथील कार्यालयामध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या पहिल्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण येथील प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअर येथे केले जाणार आहे. या कार्यक्रमास विक्रमी संख्येने विविध देशांमधील नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
- राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून व आमसभा अध्यक्ष सॅम कुतेसा यांच्या उपस्थितीमध्ये येत्या २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिनाचा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. भारताच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये ‘आर्ट ऑफ लीव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर हे एक प्रात्यक्षिकपूर्ण व्याख्यान देणार आहेत.
तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध आंध्र प्रदेशात गुन्हा दाखल
- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांचे दूरध्वनी बेकायदेशीरपणे टॅप करण्याच्या आरोपावरून आंध्र प्रदेश पोलिसांनी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या विरोधात गुन्हा नोंदविल्याने 'कॅश फॉर व्होट' प्रकरणाला निराळेच वळण लागले आहे.
- विधान परिषदेच्या निवडणुकीत नामनियुक्त सदस्याचे मत मिळण्यासाठी नायडू यांनी ज्या सदस्याला दूरध्वनी केला होता ते संभाषण स्थानिक माध्यमांनी प्रसारित केले. राव यांनी पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून तेलुगू देसम पक्षाच्या नेत्यांनी या प्रकरणात राज्यपाल ईएसएल नरसिंहन यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
- सत्तारूढ तेलंगण राष्ट्र समितीचे नेते तेलुगू देसम पक्षाच्या नेत्यांवर पाळत ठेवत असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. नायडू आणि नामनियुक्त आमदार एल्व्हिस स्टीफन्सन यांच्यातील संभाषण स्थानिक दूरचित्रवाणी वाहिनीने प्रसारित केले. त्यामुळे तेलुगू देसम पार्टी आमदारांना लाच देण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या प्रकरणाला खतपाणी घातले गेले.
दिल्ली पोलिसांना मोसादकडून प्रशिक्षण
- भारतासह जगभरात फोफावलेल्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने इस्रायलची गुप्तहेर यंत्रणा ‘मोसाद’ची मदत घेतली आहे.
- अत्यंत आक्रमक कार्यपद्धती, तंत्रशुद्ध प्रशिक्षण व आधुनिक साधने वापरणाऱ्या मोसादच्या चार सदस्यांचे पथक दिल्ली पोलिसांना प्रशिक्षण देण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहे.
- या प्रशिक्षण कार्यक्रमात दिल्ली पोलिसांचे विशेष पथक (स्पेशल सेल), बॉम्ब निकामी करणारे पथक व फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळेतील सुमारे २५ वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.
- तब्बल बारा दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत अत्यंत गुप्तता पाळली जात आहे. दिल्ली पोलिसांना विदेशी संस्थेकडून पहिल्यांदाच असे प्रशिक्षण दिले जात आहे.
- या प्रशिक्षण कार्यक्रमास 'पोस्ट लास्ट इन्व्हेस्टिगेशन अॅण्ड मॅनेजमेंट' असे नाव देण्यात आले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानेच या प्रशिक्षणासाठी पुढाकार घेतला होता.
भारताचा विरोध डावलून गिलगीटमध्ये निवडणुका
- पाकिस्तानने भारताचा विरोध झुगारून गिलगीट व बाल्टिस्तान येथे विधानसभा निवडणुका घेतल्या. पाकिस्तानने या निवडणुकीसाठी कडक बंदोबस्त ठेवला होता. या भागात दुसऱ्यांदा निवडणुका घेण्यात आल्या.
- २००९ मध्ये पाकिस्तानने अधिकारांचे विकेंद्रीकरण करतानाच विधानसभेची निवडणूक घेतली होती. त्यावेळी या भागाचे नाव उत्तर भाग असे काढून गिलगीट बाल्टीस्तान असे करण्यात आले.
- गिलगीट व बाल्टिस्तान हे आमचेच भाग असून पाकिस्तान तेथे जबरदस्तीने निवडणुका घेत आहे असा आरोप भारताचे परराष्ट्र प्रवक्ते विकास स्वरूप यांनी केला होता. या भागातील लोकांना राजकीय अधिकार नाकारले जात असून पाकिस्तानने आमचा प्रदेश बळकावला आहे असा भारताचा आरोप आहे.
- पाकिस्तानने हा आरोप फेटाळला असून भारताने आमच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करू नये असे म्हटले होते.
नितीशकुमार मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार
- बिहारमधील आगामी विधानसभेची निवडणूक संयुक्त जनता दल व राष्ट्रीय जनता दल एकत्रिपणे लढवणार आहेत. जागावाटपासाठी सहा जणांच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांचे प्रत्येकी तीन सदस्य या समितीमध्ये असतील.
- बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हेच बिहारमध्ये जद(यू)-राजदचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील.
तटरक्षक दलाचे डॉर्नियर टेहळणी विमान बेपत्ता
- किनारा रक्षक दलाचे डॉर्नियर टेहळणी विमान ८ जूनच्या रात्रीपासून बेपत्ता असून, त्यातील तीन कर्मचारी बेपत्ता आहेत.
- सीजी ७९१ हे विमान गेल्याच वर्षी तैनात करण्यात आले होते. उड्डाणानंतर ते तिरूचिरापल्ली केंद्राच्या संपर्कात होते व नंतर चिदंबरमच्या किनारी भागात ते १६ नाविक मैलांवर दिसले. कडलोर व करायकल दरम्यान ते विमान होते.
- गोव्यात अलिकडेच नौदलाचे डॉर्नियर टेहळणी विमान कोसळून दोन अधिकारी मृत्युमुखी पडले होते.
- ही विमाने १० हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवरून उडू शकत नाहीत. पण, सागरी सर्वेक्षणासाठी कमी उंचीवरून टेहळणी करू शकतात.
- हे विमान चेन्नई येथून सायंकाळी साडेपाच वाजता सुटले व अतिशय अनुभवी वैमानिक ते चालवीत होते. रात्री ९.२३ वाजता विमानाचा संपर्क तुटला. विविध विभागांमध्ये समन्वय असून, ते विमान शोधण्यात यश येईल, अशी आशा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
- जीवरक्षक पॅराशूट व इतर उपकरणे विमानात उपलब्ध होती. किनारा रक्षक दलाची पाच व नौदलाची चार जहाजे या विमानाचा शोध घेत आहेत.
मँचेस्टर युनायटेडला सर्वाधिक ‘ब्रँड व्हॅल्यू’
- फुटबॉल जगतात सर्वाधिक बाजारमूल्य असलेल्या क्लबमध्ये मँचेस्टर युनायटेडने रिअल माद्रिद आणि बायर्न म्युनिक यांना पिछाडीवर टाकून अव्वल स्थान पटकावले आहे.
- २०१४-१५च्या सत्रात एकही जेतेपद पदरी नसलेल्या युनायटेडला १.२ अब्ज डॉलर इतकी ‘ब्रँड व्हॅल्यू’ मिळाली आहे आणि अब्जावधी डॉलरचा टप्पा पार करणारा तो पहिला क्लब आहे.
- ‘दी ब्रँड फायनान्स फुटबॉल’ने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली. या यादीत म्युनिक दुसऱ्या, तर माद्रिद तिसऱ्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ इंग्लिश क्लब मँचेस्टर सिटी आणि चेल्सी यांचा क्रमांक येतो.
- यंदाचे सत्र गाजवणाऱ्या बार्सिलोनाच्या ‘ब्रँड व्हॅल्यू’मध्ये २८ कोटी डॉलरची वाढ झाली असली तरी या यादीत त्यांना सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा