रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने १६ नोव्हेंबर २०१४ रोजी राज्यभरात राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली आहे.
एकाच दिवशी महाराष्ट्रातील २१ शहरांमध्ये राबविण्यात आलेल्या या अभियानात ५ हजार ६४५ किलोमीटरचे रस्ते स्वच्छ करण्यात आले होते. त्यातून सुमारे तीन टन कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली होती.
या अभियानात राज्यभरातील २ लाख ५ हजार सदस्य सहभागी झाले होते. एकाच वेळी लोकसहभागातून राबवण्यात आलेले हे पहिले महास्वच्छता अभियान होते.
प्रतिष्ठानच्या वतीने या विक्रमाची नोंद घेण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. लिम्का बुक ऑफ रेकार्डसने तो स्वीकारला आणि २०१६च्या विक्रमांच्या यादीत या महास्वच्छता अभियान म्हणून नोंद केली.
‘लिम्का बुक’च्या ‘विकास’ (डेव्हलपमेंट) या भागातील रेकॉर्डमध्ये हे अभियान समाविष्ट करण्यात आले आहे.
कोहीमा शहर धुम्रपान मुक्त
नागालँडची राजधानी कोहीमा शहर धुम्रपान मुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे कोहीमामध्ये यापुढे धुम्रपानावर बंदी असेल.
कोहीमाला धुम्रपान मुक्त करण्यासाठी विविध उपायोजना करण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडून त्याची अंमलबजावणी केली जाईल.
सुधा सिंगचा रिओतील प्रवेश निश्चित
मॅरेथॉनमध्ये रिओ ऑलिम्पिकसाठी प्रवेश निश्चित झालेल्या महाराष्ट्राच्या ललिता बाबरने दिल्ली येथे सुरू असलेल्या फेडरेशन कप राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढून ३००० मीटर स्टीपलचेसचे सुवर्ण जिंकले.
ललिताने ९ मिनिटे २७.०९ सेकंद अशी वेळ दिली.
तिची सहकारी सुधा सिंगनेही रिओतील प्रवेश निश्चित केला पण तिला स्टीपलचेसमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
सुधाचा हा ऑलिम्पिक पात्रतेचा पहिला प्रयत्न होता आणि त्यात ती यशस्वी ठरली. सुधा सिंगला या कामगिरीनंतर १४ मेला होत असलेल्या शांघाय डायमंड लीगमध्ये खेळण्याची संधी देण्यात आली आहे.
'पीएफ'वर ८.८ टक्के व्याज
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफ) मिळणाऱ्या व्याज दरात केंद्र सरकारने ०.१ टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे नोकरदारांना त्यांच्या पीएफवर ८.८ टक्के इतके व्याज मिळणार आहे. आधी हा व्याज दर ८.७ टक्के इतका करण्यात आला होता.
पीएफवरील व्याज दर ८.७५ टक्क्यांवरून ८.७० टक्के केल्याने सरकारी कर्मचारी संघटनांनी त्याला तीव्र विरोध केला होता. याविरोधात आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
त्याची दखल घेऊन केंद्र सरकारने २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी पीएफवरील व्याज दर वाढवून ८.८ टक्के करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाचा देशभरातील ५ कोटीपेक्षा जास्त 'पीएफ'धारकांना लाभ मिळणार आहे.
भारताची संपूर्ण स्वदेशी बनावटीची स्थितिदर्शक यंत्रणा (जीपीएस : ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम) २८ एप्रिल रोजी पूर्णत्वास गेली.
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) श्रीहरीकोटातील सतीश धवन स्पेस सेंटरवरून ‘इंडियन रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिम’ (आयआरएनएसएस) मालिकेतील सातवा उपग्रह अवकाशात यशस्वीरीत्या सोडला.
‘इस्रो’ने आयआरएनएसएस-१जी या उपग्रहाचे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक ‘पीएसएलव्ही सी-३३’द्वारे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले. सात उपग्रहांच्या मालिकेतील हा शेवटचा उपग्रह आहे.
हा उपग्रह साधारण महिन्याभराच्या कालावधीत पूर्णपणे कार्यान्वित होईल. भारताची स्थितिदर्शक यंत्रणा अगोदरच कार्यान्वित झाली आहे. मात्र, या सातव्या उपग्रहामुळे ती अधिक कार्यक्षम होणार आहे.
आता सर्व उपग्रह, जमिनीवरील रिसिव्हर यंत्रणा, नियंत्रण कक्ष यांच्या चाचण्या येत्या काही दिवसांत पूर्ण होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सिस्टीमला ‘नाविक’ असे नाव बहाल केले आहे.
उपग्रहांचे प्रक्षेपण
आयआरएनएसएस-१ए
जुलै २०१३
आयआरएनएसएस-१बी
एप्रिल २०१४
आयआरएनएसएस-१सी
ऑक्टोबर २०१४
आयआरएनएसएस-१डी
मार्च २०१५
आयआरएनएसएस-१ई
२० जानेवारी २०१६
आयआरएनएसएस-१एफ
१० मार्च २०१६
आयआरएनएसएस-१जी
२८ एप्रिल २०१६
गुजरातमध्ये सामान्य वर्गाला आरक्षण
गुजरात सरकारने सामान्य वर्गातील आर्थिक दृष्ट्या मागासांसाठी १० टक्के आरक्षणाची २९ एप्रिल रोजी घोषणा केली.
आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला आरक्षण देणारे गुजरात हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या निर्णयाने सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेचे उल्लंघन होणार आहे.
यामुळे सामान्य वर्गातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्यांना सरकारी नोकरी व उच्च शिक्षणासाठी या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.
पाटीदार समाजासह ब्राम्हण, क्षत्रिय व लोहना समाजासह इतर सामान्य वर्गातील वार्षिक उत्पन्न ६ लाखांपेक्षा कमी असणाऱ्यांना या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.
गुजरात दिनाच्या दिवशी म्हणजे एक मे रोजी आरक्षणाची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.
राज्यात पाटीदार समाजाने हार्दिक पटेलच्या नेतृत्वाखाली आरक्षणासाठी आंदोलन सुरू केले होते. यामुळे या समाजाला याचा लाभ घेता येणार आहे.
एससी, एसटी आणि ओबीसीसाठी जे ४९ टक्के आरक्षण आहे त्याला हात न लावता हे आरक्षण दिले जाणार आहे.
अमेरिकन काँग्रेससमोर मोदींचे भाषण
अमेरिकेतील काँग्रेसच्या संयुक्त परिषदेत भाषण देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजचे अध्यक्ष पॉल रायन यांनी मोदींना निमंत्रण दिले आहे.
राजीव गांधी, पीव्ही नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहनसिंग यांना यापूर्वी अमेरिकन काँग्रेससमोर भाषण देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. येथे निमंत्रित करण्यात आलेले मोदी हे भारताचे पाचवे पंतप्रधान आहेत.
हा कार्यक्रम ८ जून रोजी होणार असून, मोदी यांचा हा सत्तेवर आल्यापासून चौथा अमेरिका दौरा ठरेल.
मादाम तुसाँ संग्रहालयात मोदींचा पुतळा स्थानापन्न
आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित मादाम तुसाँ संग्रहालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे २८ एप्रिल रोजी अनावरण करण्यात आले.
संग्रहालयातील प्रमुख आकर्षणांपैकी एक असलेल्या ‘वर्ल्ड लीडर्स’ या विभागात हा पुतळा बसविण्यात आला आहे.
महात्मा गांधी, विन्स्टन चर्चिल यांच्यापासून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन, जर्मनीच्या अँजेला मार्केल, फ्रान्सचे फ्रँकाईज ओलाँद या जागतिक नेत्यांच्या बरोबरीने मोदींचा पुतळा ठेवण्यात आला आहे.
उत्तेजकविरोधी नियमांच्या उल्लंघनात भारत तिसरा
जागतिक उत्तेजकविरोधी संघटनेने (वाडा) २०१४च्या उत्तेजकविरोधी नियमांच्या उल्लंघनासंदर्भात तयार केलेल्या अहवालात भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. रशिया आणि इटली हे देश भारतापुढे आहेत.
उत्तेजकविरोधी नियमांच्या उल्लंघनाची ९६ प्रकरणे भारतीय खेळाडूंच्या नावे नोंदली गेली असून रशिया (१४८) यात अग्रेसर आहे. त्यानंतर इटलीचा (१२३) क्रमांक लागतो.
भारतापाठोपाठ बेल्जियम (९१), फ्रान्स (९१), तुर्की (७३), ऑस्ट्रेलिया (४९), चीन (४९), ब्राझिल (४६) आणि दक्षिण कोरिया (४३) यांचे क्रमांक पहिल्या १०मध्ये लागतात.
भारतातील ९६ प्रकरणांमध्ये ७९ खेळाडू (५६ पुरुष व २३ महिला) हे प्रत्यक्ष स्पर्धेदरम्यान दोषी आढळले आहेत तर १३ खेळाडू (९ पुरुष व ४ महिला) हे स्पर्धाबाह्य चाचणीत दोषी ठरले आहेत.
भारताची ऑलिम्पिकमधील पदकसंख्या पाहिली तर ती १९२०पासून अवघी २४ भरते पण गेल्या काही वर्षांत उत्तेजकांच्या बाबतीत मात्र भारत आघाडीवर असल्याचे हा अहवाल सांगतो.
जे भारतीय खेळाडू उत्तेजक नियम उल्लंघनात सापडले आहेत त्यात अॅथलेटिक्समधील खेळाडूंचा सर्वाधिक समावेश आहे. ती २९ प्रकरणे आहेत. यातही भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. रशिया (३९) पहिल्या स्थानावर आहे.
युद्धजर्जर अफगाणिस्तानमध्ये गुंतवणूक वाढवून विकासप्रक्रिया वेगाने करण्यासाठी‘हार्ट ऑफ एशिया’ ही परिषद २७ एप्रिलपासून सुरू होत असून, या परिषदेचे यजमानपद भारताकडे आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एझाझ अहमद चौधरी यांच्यासह अनेक देशांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
दहशतवाद आणि मूलतत्त्ववाद या दोन आव्हानांचा सामना करण्याबाबत या परिषदेत चर्चा अपेक्षित आहे.
अफगाणिस्तानमध्ये कायमस्वरूपी विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याच्या प्रक्रियेला वेग आणणे आणि त्यासाठी विविध उपाययोजना करणे, हा परिषदेचा गाभा असणार आहे.
अफगाणिस्तानच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांच्याबरोबर ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीचे करार करण्याबाबतही उपस्थित देशांमध्ये चर्चा होईल.
सचिन तेंडुलकर यांची खासदार निधीतून सोलापूर जिल्ह्याला मदत
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी खासदार निधीतून सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावला आहे. या जिल्ह्यातील तीन गावांना विकासासाठी ५६ लाख रुपयांचा निधी दिला आहे.
बार्शी तालुक्यातील इर्लेवाडी येथील माध्यमिक शाळेला वर्ग खोल्या बांधण्यासाठी तेंडुलकर यांनी ४ वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी १९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कोन्हाळी गावातील अंगणवाडी, रस्ते, पाण्याची टाकी व पथदिव्यांसाठी तेंडुलकर यांनी १२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
करमाळा तालुक्यातील पोमलवाडी व पसिरातील रस्त्यांच्या कामांसाठी तेंडुलकर यांनी २५ लाख रुपयांचा निधी दिला आहे.
ई-कॉमर्समध्ये अॅमेझॉन इंडिया दुसऱ्या स्थानी
ई-कॉमर्स क्षेत्रासंदर्भातील मार्च महिन्यातील आकडेवारीनुसार, अॅमेझॉन इंडिया ही स्नॅपडीलला मागे टाकत सर्वाधिक उत्पादनांची विक्री करणारी दुसऱ्या क्रमांकाची कंपनी ठरली आहे.
पहिल्या क्रमांकावर अद्यापही फ्लिपकार्टचे वर्चस्व कायम आहे. त्यामुळे परदेशातील अॅमेझॉनचे भारतीय बाजारपेठेत वाढणारे महत्त्व अधोरेखित होत आहे.
गेल्या महिन्यात माल वितरणाचा विचार केला असता, फ्लिपकार्टची बाजारपेठेत ३७ टक्के हिस्सेदारी होती. तर अॅमेझॉन इंडिया व स्नॅपडीलची हिस्सेदारी अनुक्रमे २४ व १५ टक्के होती.
गेल्या महिन्यात ऑनलाईन किरकोळ विक्री करणाऱ्या कंपन्यांनी दिवसाला ८ ते ९ लाख वस्तूंचे वितरण केले आहे.
अॅमेझॉनने भारतीय व्यवसायात जानेवारी महिन्यापासून ६,७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. गेल्यावर्षी अॅमेझॉन इंडियाची २५० टक्के दराने वाढ झाली आहे.
सुदर्शन पटनाईक यांना आंतरराष्ट्रीय वाळूशिल्प स्पर्धेत सुवर्णपदक
प्रख्यात भारतीय वाळू शिल्पकारसुदर्शन पटनाईक यांनी मॉस्कोमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय वाळूशिल्प स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
त्यांनी या स्पर्धेत अहिंसा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींची १५ फुटांची कलाकृती साकरली होती.
या यशानंतर रशियातील भारताचे राजदूत पंकज सारन यांनी पटनाईक यांचे अभिनंदन केले. या स्पर्धेत जगभरातील २० वाळू शिल्पकार सहभागी झाले होते.
कन्हैया कुमारचा ‘बिहार ते तिहार’ प्रवास
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार आता पुस्तकरूपाने आपला जीवनप्रवास मांडणार आहे. ‘बिहार ते तिहार’ असे या पुस्तकाचे नाव आहे.
हैदराबादमधील वेमुला प्रकरणानंतर जेएनयूमधील विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कन्हैयाची सुटका झाल्यानंतर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात तो आपल्या भाषणात जोरदार टीकास्त्र सोडत आहे.
बिहारमधील एका छोट्या खेड्यातून पुढे आलेल्या या विद्यार्थी नेत्याचा जीवनप्रवास देशातील विद्यार्थ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न जुग्गरनॉट प्रकाशन करणार आहे.
आयपीएसच्या १९८१च्या तुकडीतील अधिकारी सतीश माथूर यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
तसेच या विभागाचे अतिरिक्त महासंचालक संजय बर्वे यांच्याकडे राज्य गुप्तचर विभागाचे आयुक्तपद सोपविण्यात आले, संजय बर्वे १९८७च्या तुकडीचे अधिकारी आहेत.
‘एसीबी’चे प्रमुख होण्यापूर्वी माथूर महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण आणि कल्याण मंडळाचे महासंचालक होते.
नॅशनल सिक्युरिटी गार्डमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या सतीश माथूर यांनी विधी व तांत्रिक तसेच पोलीस गृहनिर्माण व कल्याण या विभागाचे महासंचालक म्हणूनही काम केले आहे.
तसेच त्यांनी केंद्रात प्रतिनियुक्तीवर असताना एअर इंडियामध्ये तसेच सीबीआयमध्येही काम केले.
सीबीआयमध्ये असताना मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोट तपासात त्यांचा सहभाग होता. ते काही काळ पुण्याचे आयुक्त होते व मुंबईत वाहतूक पोलीस सहआयुक्त हे पदही त्यांनी भूषवले आहे.
भारताचा नेमबाज मैराज खानला रौप्यपदक
भारताचा नेमबाज मैराज अहमद खानने रिओ दि जानिरो (ब्राझील) शहरात सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात रौप्यपदक प्राप्त केले.
मैराजने पुरुषांच्या स्कीट सुवर्णपदक सामन्यात स्वीडनच्या मार्कस स्वेनसनचा शूटआउट टायब्रेकरवर २-१ ने पराभव केला. ‘स्कीट’ सामन्यातील हे भारताचे पहिले पदक आहे.
अंतिम फेरीत मैराज आणि मार्कस या दोघांनी १६ पैकी १५, अशी कामगिरी करून सुवर्णपदकासाठी दावेदारी पक्की केली होती. ज्यात मार्कसने बाजी मारली.
या स्पर्धेत इटलीचा टमारो कसान्द्रो तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत मुंबई सर्वांत पुढे
केंद्रीय पर्यावरण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) अहवालानुसार ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत मुंबई सर्वांत पुढे असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईनंतर लखनौ आणि हैदराबादचा क्रमांक असून दिल्ली चौथ्या स्थानावर आहे. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावल्याने ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यात दिल्लीला यश मिळाल्याचे अहवालात म्हटले आहे.
वाहनांच्या आवाजाशिवाय, जनरेटर, कार्यालयातील यंत्रे, विमाने, औद्योगिक आणि बांधकामाच्या कामातून निर्माण होणारे आवाज आदींच्या आवाजामुळे शहरांमधील ध्वनी प्रदूषणामध्ये वाढ होत आहे.
दिवसा ५५ डेसीबल आणि रात्रीच्या वेळी ४५ डेसीबल एवढ्या आवाजाची मर्यादा ओलांडली तर मानवी आरोग्यावर त्याचे विपरित परिणाम होतात.
त्यामध्ये स्वभावातील आक्रमकता, उच्च रक्तदाब, ऐकू कमी येणे, झोपेमध्ये अडथळा आदी प्रकारच्या तक्रारी उद्भवू शकतात.
सीपीसीबीचा हा अहवाल सरकारला ध्वनी प्रदूषणासंदर्भातील धोरणे निश्चित करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
चीनचे बंडखोर नेते डोल्कन इसा यांचा व्हिसा रद्द
चीनचे बंडखोर उइघूर नेते डोल्कन इसा यांचा व्हिसा भारताने रद्द केला आहे. इसा यांना दहशतवादी संबोधत चीनने त्यांना व्हिसा देण्याच्या निर्णयावर तीव्र आक्षेप नोंदविला होता.
हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या मानवाधिकार परिषदेसाठी इसा उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस असल्याचे लक्षात आणून दिल्यावर परराष्ट्र मंत्रालयाने तो रद्द करण्याचा निर्णय घेतला.
व्हिसा रद्द होऊनही त्यांनी भारतात प्रवेश केल्यास त्यांना अटक करून चीनच्या ताब्यात दिले जाईल, असे भारताने स्पष्ट केले आहे.
केंद्रीय पुनर्गुंतवणूक विभागाचे नामकरण करण्यात आले आहे. हा विभाग आता 'डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंट' अर्थात 'दीपम' म्हणून ओळखला जाईल.
यंदाच्या अर्थसंकल्पात नमूद केल्याप्रमाणे चालू आर्थिक वर्षात पुनर्गुंतवणुकीच्या माध्यमातून ५६ हजार ५०० कोटी रुपये उभारणीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे.
एकूण रकमेपैकी ३६००० कोटी रुपये सरकारी कंपन्यांच्या अल्प हिस्साविक्रीतून तर, उर्वरित २०,५०० कोटी रुपये नफ्यात आणि तोट्यात असणाऱ्या कंपन्यांच्या विक्रीतून उभारण्यात येतील.
दत्तू भोकनळ रिओ ऑलिंपिकसाठी पात्र
भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेला दत्तू भोकनळ याने रिओ (ब्राझील) ऑलिंपिकसाठी नौकानयन (रोइंग) क्रीडा प्रकारात पात्रता मिळविली आहे.
कोरिया येथे २०१६ ‘फिसा’ (FISA) आशिया अँड ओसेनिया कॉन्टिनेंटल ऑलिंपिक पात्रता स्पर्धेमध्ये एकेरी पुरुष (सिंगल स्कल) त्याने हे यश मिळविले आहे.
सैन्यदलात भरती झाल्यानंतर दत्तूने रोइंगचे प्रशिक्षण घेतले. या दरम्यान त्याने विविध स्पर्धांमध्ये पदकांची कमाई केलेली आहे.
२०१५मध्ये बीजिंग (चीन) येथे झालेल्या आशियाई नौकानयन आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये ७:१८:४१ अशी वेळ नोंदवत रौप्य पदकाची कमाई केली होती.
दत्तू भोकनळ हा पुण्यात द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त इस्माईल बेग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
संदीप तोमर रिओ ऑलिंपिकसाठी पात्र
आशियाई विजेत्या संदीप तोमरने पहिल्या ऑलिंपिक पात्रता कुस्ती स्पर्धेत ब्राँझपदकावर कब्जा करताना रिओ ऑलिंपिकसाठी पात्रताही मिळविली.
संदीप हा ऑलिंपिक कोटा जिंकलेला भारताचा चौथा कुस्तीगीर आहे. संदीपने हा पराक्रम फ्रीस्टाइल प्रकारातील ५७ किलो गटात केला.
मंगोलियातील उलनबटोर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रत्येक गटात पहिले तीन कुस्तीगीर ऑलिंपिकसाठी पात्र ठरले.
उपांत्य लढतीत संदीपचा अझरबैझानच्या हसान झादा याच्याकडून पराभव झाला. परंतु ऑलिंपिक कोट्यासाठी झालेल्या लढतीत संदीपने मोल्दोवाच्या अलेक्झांड्रू चिर्तोका याचा १०-० असा सहज पाडाव केला.
सबसिडीचा त्याग करण्यात महाराष्ट्र अग्रेसर
घरगुती गॅस सिलिंडरवर देण्यात येणाऱ्या शासकीय अनुदानाचा (सबसिडी) त्याग करण्याबाबतच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला देशात सर्वाधिक प्रतिसाद महाराष्ट्रातून मिळाला आहे.
महाराष्ट्रातील एकूण १६,४२,८१४ नागरिकांनी या अनुदानाचा त्याग केला आहे.
घरगुती गॅसच्या वापरासाठी नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सिलिंडरवर शासनातर्फे अनुदान देण्यात येते. त्यापोटी केंद्र सरकारला मोठा वित्तीय भार सहन करावा लागतो.
या अनुदानाची गरज नसलेल्या नागरिकांनी अनुदानाचा त्याग करावा, असे आवाहन करताना देशाचे प्रधानमंत्री मोदी यांनी देशभरात ‘गिव्ह इट अप’ मोहीम राबविली होती.
देशात एकूण १४.५४ कोटी नागरिक एलपीजी गॅसधारक आहेत. त्यापैकी १ कोटीहून अधिक नागरिकांनी या अनुदानाचा त्याग केला आहे.
महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश (१२,५३,२४२), दिल्ली (७,२७,३७४), कर्नाटक (६,९७,७१०) आणि तामिळनाडू (६,४७,९८५) याप्रमाणे पहिल्या पाच राज्यांची क्रमवारी आहे.
राधिका आपटे आंतरराष्ट्रीय सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
मराठी व बॉलीवूड इंडस्ट्री गाजविणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे हिला न्यूयॉर्कमधील ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये आंतरराष्ट्रीय श्रेणीतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
सहा दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मॅडली’ या शॉर्टफिल्ममधील भूमिकेसाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे.
'ट्रिबेका' फिल्म फेस्टिव्हलमध्ये एखाद्या भारतीय अभिनेत्रीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
डॉ. नरेंद्र जाधव, मेरी कोम यांची राज्यसभेवर नियुक्ती
प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, ऑलिम्पिक पदकविजेती खेळाडू मेरी कोम, माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू, ज्येष्ठ पत्रकार स्वपन दासगुप्ता, मल्याळम चित्रपट अभिनेते सुरेश गोपी आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांची राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नियुक्ती केली आहे.
राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त १० पैकी ७ सदस्यांच्या जागा रिक्त झाल्याने त्यापैकी ६ जागांवर ही नियुक्ती करण्यात आली आहे.
सातव्या जागेसाठी इंडिया टीव्हीचे रजत शर्मा, झी टीव्हीचे सुभाषचंद्र आणि ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान यांच्या नावांची चर्चा सुरू होती.
राष्ट्रपती नियुक्त १० सदस्यांपैकी दोन खासदार नोव्हेंबर २०१५मध्ये, तर पाच सदस्य २ एप्रिल रोजी निवृत्त झाले. तसेच उरलेले तिघे सदस्य २०१८ साली निवृत्त होत आहेत.
भूपेंद्र कैंथोला यांची एफटीआयआयच्या संचालकपदी नियुक्ती
१९८९च्या तुकडीचे भारतीय माहिती सेवेचे (आयआयएस) अधिकारीभूपेंद्र कैंथोला यांची पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) एका आदेशाद्वारे त्यांची नियुक्ती केली असून, ती तीन वर्षांसाठी असेल.
सध्या प्रेस इन्फर्मेशन ब्युरोचे संचालक प्रशांत पाठराबे यांच्याकडे एफटीआयआयच्या प्रभारी संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार होता.
संस्थेच्या निमायक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान व इतर सदस्यांच्या निवडीच्या विरोधात विद्यार्थ्यांनी १३९ दिवस संप पुकारला होता. त्यादरम्यान, संस्थेच्या संचालक पदाची जबाबदारी पाठराबे यांच्याकडे देण्यात आली होती.
अजित जोशी यांना सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार
मूळचे महाराष्ट्रातील सोलापूरचे व सध्या चंडिगडचे जिल्हाधिकारी असलेल्या अजित जोशी यांना ‘जनधन’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी’ म्हणून पुरस्कार देण्यात आला.
एक लाख रुपये रोख, सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
राष्ट्रीय स्तरावर लोकप्रशासनात उत्कृष्ट व नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना दरवर्षी २१ एप्रिल रोजी ‘नागरी सेवादिनी’ ‘पंतप्रधान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते.
केंद्र शासनाच्या ‘जनधन’, ‘स्वच्छ भारत अभियान’, ‘स्वच्छ विद्यालय’ आणि ‘मृदा परीक्षण पत्र’ (सॉईल हेल्थ कार्ड) अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना विविध श्रेणींमध्ये पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मनोज वाजपेयीला दादासाहेब फाळके पुरस्कार
अभिनेता मनोज वाजपेयी याला हंसल मेहता दिग्दर्शित अलिगड या चित्रपटामधील अभिनयासाठी सर्वोत्तम अभिनेता श्रेणीतील दादासाहेब फाळके पुरस्काराने (समीक्षकांची निवड) गौरविण्यात येणार आहे.
अलिगड चित्रपटामधील प्राध्यापक रामचंद्र सिरस यांची मध्यवर्ती भूमिका साकारल्याबद्दल वाजपेयी याला दादासाहेब फाळके पुरस्काराने भूषविण्यात येणार आहे.
हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आता ‘ट्रॅफिक’ या आगामी चित्रपटामध्ये एका पोलिस हवालदाराची भूमिका साकारत आहे.
गुलाम अली यांना हनुमंत पुरस्कार प्रदान
पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांना संगीत क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल गुजरातमधील एका कार्यक्रमात हनुमंत पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
वास्तविक गुलाम अली यांच्या गायनाच्या कार्यक्रमाने या पर्वाचे उद्घाटन होणार होते, पण त्यांचा कार्यक्रम ऐन वेळी काही अपरिहार्य कारणांनी रद्द करण्यात आला होता.
गुलाम अली आणि अन्य पाच जणांना न्यासातर्फे हनुमंत पुरस्कार देण्यात आले. तर बॉलीवूड कलाकार धर्मेद्र यांच्यासह तिघांना नटराज पुरस्कार देण्यात आला.
सिंहस्थ कुंभमेळ्यास उज्जैनमध्ये सुरवात
विविध आखाड्यांच्या साधू-महंतांनी ‘जय श्रीराम’चा जयघोष करीत क्षिप्रा नदीत २२ एप्रिल रोजी शाही स्नान केले आणि महिनाभर चालणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यास उज्जैनमध्ये २२ एप्रिलपासून सुरवात झाली.
बारा वर्षांनी येणाऱ्या सिंहस्थ कुंभपर्वासाठी देश व परदेशांतूनही भाविक प्राचीन उज्जैननगरीत दाखल झाले आहेत.
तृतीयपंथींचा सहभाग हे यंदाच्या कुंभमेळ्यात वैशिष्ट्य म्हणता येईल. त्यांनी आखाड्याची स्थापना केली असून, क्षिप्रा नदीवरील गंधर्व घाटावर ९ मेच्या पर्वणीला शाही स्नानाचा लाभ घेणार असल्याचे जाहीर केले आहे.
विजय मल्ल्या यांचा पासपोर्ट रद्द
विविध बॅंकांनी कर्जापोटी दिलेले ९,४०० कोटी बुडविणाऱ्या ‘किंगफिशर एअरलाइन्स’चा मालक विजय मल्ल्या यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे.
पीएमएलए कायदा २००२ नुसार अजामीनपात्र वॉरंटचा विचार करता परराष्ट्र मंत्रालयाने मल्ल्या यांचा पासपोर्ट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
मल्ल्या यांच्यावर व्यवहारातील अनियमितता आणि बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचा आरोप आहे. मल्ल्या यांचा राजकीय पासपोर्ट अंमलबजावणी संचालनालयाच्या शिफारशीनंतर निलंबित केला होता.
विजय मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये असून अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर राहण्यास ते टाळाटाळ करत आहेत.
सलमान खान रिओसाठी सदिच्छा दूत
भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) रिओ ऑलिंपिकसाठी सदिच्छा दूत म्हणून अभिनेता सलमान खान याची निवड केली.
सलमान ५० वर्षांचा असून, देशभरात बॉडीबिल्डिंग करणाऱ्यांसाठीही तो प्रेरणास्थान आहे.
सुलतान या आगामी चित्रपटात त्याने कुस्तीपटूची भूमिका केली आहे. लहान गावातून आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळविणाऱ्या स्पर्धकाची कथा यात आहे.
परकीय गुंतवणूक खेचून आणण्याच्या स्पर्धेत भारताने चीनला मागे टाकले आहे. २०१५मध्ये भारतात विविध क्षेत्रातील ६३ अब्ज डॉलर्सच्या एफडीआय गुंतवणूकीच्या प्रकल्पांची घोषणा झाली आहे.
भारतातील एफडीआय प्रकल्पांची संख्या ८ टक्क्यांनी वाढून ६९७ झाली आहे. फॉक्सकॉन आणि सन एडीसन या कंपन्यांनी भारतामध्ये मोठया प्रमाणात गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली आहे.
फॉक्सकॉन भारतामध्ये ५ अब्ज डॉलर्स आणि सन एडीसन ४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. कोळसा, तेल, नैसर्गिक वायू आणि अपारंपारिक ऊर्जा या क्षेत्रांमध्ये मोठया प्रमाणावर एफडीआय येणार आहे.
२०१५ मध्ये संपूर्ण जगामध्ये भारताने पहिल्यांदा एफडीआय गुंतवणूकीत आघाडी घेतली होती. भारताने त्यावेळी अमेरिका आणि चीनपेक्षा जास्त एफडीआय गुंतवणूक खेचून आणली होती.
२०१५मधील एफडीआय गुंतवणूकीच्या दहा सर्वोत्तम ठिकाणांमध्ये पाच ठिकाणे भारतातील आहेत.
परकीय गुंतवणूकदारांनी गुजरातमध्ये १२.४ अब्ज तर महाराष्ट्रामध्ये ८.३ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूकीची तयारी दाखवली आहे.
उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट बरखास्त
उत्तराखंडमधील लोकनियुक्त सरकार राष्ट्रपती राजवट लागू करून खाली खेचण्याचा केंद्र सरकारचा निर्णय तेथील उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला.
न्यायालयाने कॉंग्रेस नेते हरीश रावत यांना उत्तराखंड सरकारचा कार्यभार सांभाळण्यास सांगताना २९ एप्रिलला सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचे निर्देशही दिले.
उत्तराखंडमध्ये २७ मार्चला लागू करण्यात आलेली राष्ट्रपती राजवट सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निर्णयांच्या विरोधात असल्याचेही उत्तराखंड उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयाला कॉंग्रेसचे नेते हरीश रावत यांनी आव्हान दिले होते.
९ बंडखोर कॉंग्रेस आमदारांच्या अपात्रतेविषयी न्यायालयाने सांगितले, की एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे हे घटनात्मक पाप आहे. आमदारांना सदस्यत्व गमावून या पापाची किंमत मोजावी लागेल. बंडखोर आमदारांच्या याचिकेवर आता २३ एप्रिलला सुनावणी होणार आहे.
शी जिनपिंग चीनचे लष्करप्रमुखही
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे आता चीनचे लष्करप्रमुखही (कमांडर इन चीफ) झाले आहेत.
शी यांच्याकडे याआधीच कम्युनिस्ट पक्षाचे महासचिवपद (जनरल सेक्रेटरी) आणि ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’मधील लष्करी अधिकाऱ्यांची सर्वोच्च संस्था असलेल्या सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्षपद आहे.
दक्षिण चिनी समुद्रामधील बेटांच्या मालकीहक्कावरुन सुरु असलेला राजनैतिक संघर्ष अधिकाधिक आक्रमक होण्याची चिन्हे असतानाच शी यांनी लष्करप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारण्यासंदर्भात घेतलेल्या या निर्णयाचे जागतिक राजकारणामध्ये मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
सर्वात सुंदर महिला म्हणून जेनिफर अॅनिस्टनची निवड
पीपल मॅगझिनने २०१६ या वर्षातील सर्वात सुंदर महिला म्हणून हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर अॅनिस्टनची निवड केली आहे.
पीपलच्या कव्हरपेजवर ४७ वर्षीय जेनिफरचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. अमेरिकन टेलिव्हीजनवरील 'फ्रेंडस' या शो मधील रेचल हे तिचे पात्र गाजले. या शो मधील भूमिकेमुळे जेनिफरला नाव, प्रसिद्धी मिळाली.
राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाच्या अंमलबजावणीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. सुमारे ३६८० कोटी रुपयांची ही केंद्रीय योजना आहे.
दोन टप्प्यात हा प्रकल्प लागू केला जाईल. जलसंसाधन, नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयाच्या अखत्यारीत स्वतंत्र संस्था म्हणून एनडब्ल्यूआयसीच्या निर्मितीची यात तरतूद आहे.
राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पामुळे जल-हवामान-विषयक माहिती एकत्रित करण्यासाठी मदत होईल. वास्तव काळाच्या आधारावर त्याचे विश्लेषणही केले जाईल.
याआधीचा जलविज्ञान प्रकल्प १३ राज्यांपुरताच मर्यादित होता मात्र आता या प्रकल्पाची व्याप्ती देशभर आहे.
प्रकल्पाच्या ५० टक्के रक्कम म्हणजे १८४० कोटी रुपये जागतिक बँकेकडून कर्ज रुपात मिळणार आहे. केंद्र सरकार हे कर्ज फेडणार आहे. उर्वरित ५० टक्के रक्कम केंद्रीय सहाय्यतेच्या रुपात मिळेल.
सुधा मूर्ती यांना ‘सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील’ पुरस्कार
रयत शिक्षण संस्थेच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा ‘रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील’ पुरस्कार शिक्षण आणि विविध क्षेत्रांत मोठे योगदान देणाऱ्या सुधा मूर्ती यांना जाहीर झाला आहे.
सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, सचिव प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी जाहीर केला.
दरवर्षी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला लक्ष्मीबाई पाटील यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण केले जाते. अडीच लाख रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
मितसुबिशी मोटर्सच्या अडचणीत वाढ
मितसुबिशी मोटर्सने मोटारींच्या इंधनक्षमतेची खोटी आकडेवारी जाहीर केल्याचे मान्य केल्यानंतर जपानी अधिकाऱ्यांनी कंपनीच्या प्रमुख कार्यालयावर छापा टाकला आहे.
कंपनीच्या ओकाझाकी कार्यालयाची तपासणी करण्यात आली आहे. कंपनीमधील कर्मचाऱ्यांनी ६ लाखांपेक्षा जास्त मोटारींच्या इंधनक्षमतेची खोटी आकडेवारी ग्राहकांना सांगितली आहे.
कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना मोटारींच्या चार मॉडेल्सची इंधनक्षमता ५ ते १० टक्क्यांनी वाढवून सांगितल्याचे कंपनीने मान्य केले आहे.
आपली चूक मान्य करीत मितसुबिशीचे अध्यक्ष तेत्सुरो आईकावा यांनी पत्रकार परिषदेत जपानी पद्धतीनुसार मान वाकवून माफी मागितली.
या बातमीनंतर कंपनीचे शेअर १५ टक्क्यांनी कोसळून दशकभराच्या नीचांकी पातळीवर पोचले आहेत. याविषयी जपान सरकारने मितसुबिशीकडून संपुर्ण अहवाल मागविला आहे.
काही महिन्यांपुर्वी दुसरी आंतरराष्ट्रीय कंपनी फोक्सवॅगनच्या मोटारींमधील उत्सर्जन चाचणीचा गैरव्यवहार समोर आला होता.
ग्रेट बॅरियर रीफ धोक्यात
दरवर्षी पर्यटनाच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे ३.९० अब्ज डॉलरची कमाई करून देणारे ग्रेट बॅरियर रीफ (प्रवाळांचे थर) पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
कॉरल समुद्रातील हा रीफसमूह निम्मा नष्ट झाला असून केवळ सात टक्के प्रवाळांचाच रंग कायम असल्याचे ऑस्ट्रेलियन संशोधकांनी म्हटले आहे.
समुद्राचे तापमान वाढत असल्यामुळे रीफसमूहाला धोका निर्माण झाला आहे. हे तापमान कमी झाले नाही तर रीफसमूह पूर्णपणे नष्ट होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
संशोधकांनीच्या अंदाजानुसार सद्यस्थितीत जवळपास ५० टक्के रीफसमूह यापूर्वीच नष्ट झाला आहे किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
समुद्राचे पाणी गरम होणे, प्रदूषण यामुळे प्रवाळामध्ये राहणारे जीव बाहेर येतात. परिणामी प्रवाळांचा रंग बदलतो. काही आठवड्यांत प्रवाळांमध्ये राहणारे जीव नष्ट होऊ शकतात.
त्यामुळे प्रवाळ पांढरे पडतात. प्रवाळांमधील रंग उडण्याच्या प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणात ते नष्ट होऊ शकतात.
ग्रेट बॅरियन रीफ ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्यावर २३०० किलोमीटर अंतरावर पसरला आहे.
क्रीडा क्षेत्रातील ‘ऑस्कर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १६व्या लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कार सोहळ्यात टेनिसपटूंनी बाजी मारली.
वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला क्रीडापटूचा पुरस्कार सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि अमेरिकेची सेरेना विल्यम्सने पटकावला. दोघांनी तिसऱ्यांदा या पुरस्कारावर नाव कोरले.
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन ओपनसह विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या जोकोविचने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा (२०१२, २०१५ आणि २०१६) लॉरियस पुरस्कार मिळवला.
२०१५मध्ये तीन ग्रँडस्लॅम मिळलेल्या सेरेनाने यापूर्वी २००३ व २०१० हा पुरस्कार मिळविला आहे.
‘ऑल ब्लॅक्स’ या न्यूझीलंडच्या जगज्जेत्या रग्बी संघाने सर्वोत्कृष्ट संघाचा पुरस्कार पटकावला. सर्वोत्कृष्ट पुनरागमनासाठीचा पुरस्कार न्यूझीलंडचा रग्बीपटू डॅन कार्टरला मिळाला.
तीन वेळचे माजी फॉर्म्युला वन जगज्जेते ऑस्ट्रियाचे निकी लॉड यांना लॉरियस जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.
व्यावसायिक फुटबॉलपटू हॉलंडचे जोहान क्रीफ यांना मरणोत्तर ‘स्पिरीट ऑफ स्पोर्ट्स’ पुरस्काराने गौरविण्यात आले. क्रीफ यांचे मार्च महिन्यात निधन झाले.
अन्य खेळांमध्ये जागतिक क्रमवारीतील द्वितीय गोल्फर अमेरिकेचा जॉर्डन स्पीथ याला ‘ब्रेक थ्रू ऑफ द इयर’ आणि ऑलिम्पिक ट्रायथलन सुवर्णविजेता जर्मनीचा जैन फ्रोडैनोला ‘अॅक्शन स्पोर्ट्स अॅवॉर्ड’ प्रदान करण्यात आला.
पुलित्झर पुरस्कार जाहीर
अमेरिकी पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्यासाठी देण्यात येणाऱ्या पुलित्झर पुरस्कार विजेत्यांमध्ये यंदा ‘द असोसिएटेड प्रेस’ (एपी) व ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्था तसेच ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या वृत्तपत्राचा समावेश आहे.
पुरस्कारांचे हे १००वे वर्ष असून न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
आग्नेय आशियाई देशांतून अमेरिकी बाजारात येणाऱ्या मासे आणि अन्य सागरी अन्नाच्या व्यापारात मोठय़ा प्रमाणात कामगारांना वेठीला धरले जाते. त्या गैरप्रकारांवर एपीने १० लेखांच्या मालिकेतून प्रकाश टाकला होता.
त्यानंतर २००० कामगारांची सुटका होऊन ही यंत्रणा सुधारण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. या कार्याबद्दल एपीला पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला. आहे.
तर युरोपीय देशांतील निर्वासितांचे प्रश्न छायाचित्रणाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडल्याबद्दल रॉयटर्स आणि न्यूयॉर्क टाइम्सला पुरस्कार मिळाला.
पश्चिम आफ्रिकेतील इबोलाच्या साथीबद्दलच्या वृत्तांकनासाठी न्यूयॉर्क टाइम्सला आंतरराष्ट्रीय वृत्तांकनाचा पुरस्कार मिळाला.
लॉबींच्या दबावाचा आढावा घेणाऱ्या वार्तांकनासाठी न्यूयॉर्क टाइम्सच्याच एरिक लिप्टन या पत्रकाराने पटकावला.
तर याच वृत्तपत्रासाठी फ्रीलान्सर फोटोग्राफर म्हणून काम करणाऱ्या डॅनियल बेरेहुलक याने इबोलासंदर्भातील फ्युचर फोटोग्राफीबद्दल या पुरस्कारावर मोहोर उमटवली.
न्यूयॉर्क टाइम्सला आजवर त्यांच्या पत्रकारितेच्या उज्ज्वल परंपरेबद्दल ११७ पुलित्झर पारितोषिके मिळाली आहेत. यंदा त्यात आणखी तीन पुरस्कारांची भर पडली.
कॅलिफोर्नियातील सॅन बर्नार्डिनो येथे इस्लामी दहशतवाद्यांनी केलेल्या हत्याकाडांच्या वृत्तांकनासाठी ‘लॉस एंजल्स टाइम्स’ला पुलित्झर पुरस्कार मिळाला.
लॉस एन्जल्स टाइम्सने लेख तसेच टीकात्मक लेखाबद्दल दोन पारितोषिके पटकावली, याशिवाय अमेरिकेतील दि वॉल स्ट्रीट जर्नल आणि वॉशिंग्टन पोस्टलाही प्रत्येकी एक पारितोषिक मिळाले.
‘द बोस्टन ग्लोब’, ‘टॅम्पा बे’ आणि ‘द न्यूयॉर्कर’ या नियतकालिकांनाही प्रत्येकी दोन पुरस्कार मिळाले.
कादंबरीसाठीच्या पुलित्झर पुरस्कार अँटोनी डोएर यांना ('ऑल दि लाइट वुई कॅननॉट सी' या कादंबरीसाठी) मिळाला.
तर, चरित्रासाठीचा पुलित्झर पुरस्कार डेव्हिड कर्टझर यांना त्यांच्या 'द पोप अँड मुसोलिनी: दि सिक्रेट ऑफ पायस इलेवन्थ अँड दि राइज ऑफ फॅसिझम इन युरोप'या पुस्तकासाठी जाहीर झाला.
जितेंद्र आणि अनिल कपूर यांना राज्य सरकारचे पुरस्कार
ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांना राज्य सरकारचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तर विशेष योगदान पुरस्कार अभिनेते अनिल कपूर यांना घोषित करण्यात आला आहे.
हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतित केले. तसेच चित्रपट सृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन गुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली, अशा ज्येष्ठ व्यक्तीला राजकपूर जीवनगौरव व राजकपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये तर विशेष योगदान पुरस्कारासाठी ३ लाख रुपयांची रक्कम देण्यात येते.
सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने जितेंद्र आणि अनिल कपूर यांची पुरस्कारासाठी निवड केली.
व्यंगचित्रकार शि. द. फडणीस आणि वसंत सरवटे यांना ‘जीवनगौरव’
‘व्यंगदर्शन २०१६’ या व्यंगचित्रकारांच्या संमेलनात ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस आणि वसंत सरवटे यांना व्यंगचित्रकलेतील अमूल्य योगदानाबाबत ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सन्मानचिन्ह, मानपत्र, ५० हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते हे दोन्ही पुरस्कार प्रदान करण्यात आले.
ज्येष्ठ व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या अखिल भारतीय व्यंगचित्रकार संस्था ‘कार्टूनिस्ट कम्बाईन’ संस्थेतर्फे हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या हस्ते होणार झाले.
विजय मल्ल्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी
९ हजार कोटींचे कर्ज थकवलेल्या ‘किंगफिशर‘चे प्रमुख विजय मल्ल्या यांना विशेष न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे.
याआदेशामुळे मल्ल्या यांच्या विरोधात इंटरपोलचा रेड कॉर्नर ऍलर्ट जारी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आयडीबीआय बॅंकेकडून मिळालेल्या कर्जातील ४३० कोटी रुपये मल्ल्या यांनी परदेशात संपत्ती खरेदी करण्यासाठी वापरल्याचा ‘ईडी‘चा आरोप किंगफिशरने फेटाळून लावला.
या ‘ईडी‘च्या दाव्याला किंगफिशर एअरलाईन्सने आव्हान दिले होते. मात्र न्यायालयाने किंगफिशरची याचिका फेटाळून लावली आहे.
आतापर्यंत १८ मार्च, २ एप्रिल आणि ९ एप्रिल अशा तीन वेगवेगळ्या तारखा देऊनही चौकशीला मल्ल्या उपस्थित राहिले नाहीत.
सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्या यांना ते व त्यांच्या कुटुंबीयांच्या देशात आणि परदेशात असलेल्या सर्व मालमत्तेचे तपशील २१ एप्रिलपर्यंत जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रतिष्ठेच्या अझलन शाह हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये खेळ उंचावण्यात भारताला अपयश आल्याने अखेरीस उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले.
ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य संघाने सामन्याच्या पहिल्या मिनिटापासूनच भारतीय संघावर वर्चस्व राखले आणि ४-० असा दणदणीत विजय मिळविला.
यजमान मलेशियाविरुद्ध गोलांचा धडाका लावत भारतीय संघाने ६-१ असा एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती.
टाटाच्या दोन कंपन्यांना ९४ कोटी डॉलरचा दंड
टाटा समूहाच्या दोन कंपन्यांना अमेरिकेच्या ‘ग्रँड ज्युरी‘ने ९४ कोटी डॉलरचा (६२०० कोटी रुपये) दंड ठोठावला आहे.
अमेरिकेतील एपिक सिस्टम्सने दाखल केलेल्या ‘ट्रेड सिक्रेट’ खटल्यात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि टाटा अमेरिका इंटरनॅशनलला कॉर्पोरेशनविरोधात निकाल दिला आहे.
टाटा समूहाच्या दोन्ही कंपन्यांना एपिक सिस्टम्सच्या सॉफ्टवेअरची चोरी केल्याच्या आरोपाखाली २४ कोटी डॉलरची नुकसान भरपाई व ७० कोटी डॉलरचे दंडात्मक नुकसान देण्याचा आदेश ग्रँड ज्युरीने दिला आहे.
ऑक्टोबर २०१४ मध्ये एपिक सिस्टम्सने टाटा समुहाच्या कंपन्यांविरोधात एपिकचे ट्रेड सिक्रेट्स, गोपनीय माहिती, कागदपत्रे आणि डेटा चोरल्याचा आरोप करत खटला दाखल केला होता.
दीपा कर्माकरचा टॉप्स योजनेमध्ये समावेश
ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने सर्वांगीण कामगिरी करीत आर्टिस्टिक गटात स्थान मिळवले.
रिओ येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दीपाने तिच्या आवडत्या व्हॉल्ट प्रकारात सर्वांत खडतर मानला जात असलेला प्रोदुनोवा प्रकारात १५.०६६ गुण मिळवले.
अनइव्हन बारमध्ये तिने ११.७०० आणि फ्लोअर प्रकारात १२.५६६ गुण अशी माफक प्रगती केली. तिने एकंदर ५२.६९८ गुण मिळवले.
दोन वर्षांपूर्वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ब्रॉंझपदक जिंकत दीपाने इतिहास घडवला होता. त्याचबरोबर जागतिक स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेली पहिली भारतीय स्पर्धक ठरण्याचाही मान मिळवला होता.
भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या टॉप्समध्ये (टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्कीम) दीपाचा समावेश तातडीने करण्यात आला आहे.
तिला प्रशिक्षणासाठी लगेचच ३० लाख रुपयेही देण्याचे ठरले आहे. टॉप्सअंतर्गत केंद्रीय क्रीडा खाते २०१६ तसेच २०२०च्या ऑलिंपिकमधील संभाव्य पदकविजेत्यांना साह्य करीत आहे.
ऑलिंपिकला पात्र ठरलेली दीपा पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट आहे. ऑलिंपिकच्या जिम्नॅस्टिक स्पर्धेत दीपाच्या निमित्ताने ५२ वर्षांनंतर भारतीय सहभागी होणार आहे.
१९५२च्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये दोन, १९५६च्या तीन तर १९६४च्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये सहा भारतीयांचा सहभाग होता.
तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या ‘गुगल’ने रेल्वेच्या ‘रेलटेल’च्या सहकार्याने आणखी नऊ रेल्वे स्थानकांवर वेगवान आणि मोफत वाय-फाय सेवा सुरू केली आहे.
पुणे, भुवनेश्वर, भोपाळ, रांची, रायपूर, विजयवाडा, काचिगुडा (हैदराबाद), एर्नाकुलम जंक्शन (कोची) आणि विशाखापट्टण या स्थानकांवर आता ही सेवा मिळेल.
मुंबई सेंट्रल स्थानकावर प्रथम ही सेवा सुरू झाली आणि आता आणखी नऊ स्थानके त्यात सामील करण्यात आली आहेत. त्यामुळे सुमारे १५ लाख प्रवाशांना या सेवेचा दररोज फायदा मिळेल.
रेल्वेच्या सुमारे शंभर अतिगर्दीच्या स्थानकांवर अशी वाय-फाय सेवा सुरू करण्याचा गुगलचा प्रयत्न आहे.
सुशीला कर्की नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश
नेपाळच्या अध्यक्षपदी आणि संसदेच्या सभापतिपदी महिलांची निवड झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांनंतर सुशीला कर्की यांनी नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून सूत्रे स्वीकारली.
नेपाळचे मावळते मुख्य न्यायाधीश कल्याण श्रेष्ठा हे निवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागी कर्की यांची निवड करण्यात आली आहे.
कर्की यांनी अद्याप पद आणि गोपनीयतेची शपथ घेतलेली नाही. कर्की यांनी वाराणसीतील बनारस हिंदू विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे.
ऑक्टोबर २०१५मध्ये विद्यादेवी भंडारी यांची नेपाळच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड झाली होती, तर नेपाळच्या संसदेच्या सभापतिपदी माओवादी नेत्या ओन्सारी घार्ती मगर यांची निवड करण्यात आली होती.
राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या नव्या सरकारतर्फे ही निवड करण्यात आली.
विजय मल्ल्या यांचा पासपोर्ट स्थगित
मनी लॉंडरिंगप्रकरणी चौकशी सुरू असलेल्या उद्योगपती विजय मल्ल्या यांचा पासपोर्ट (डिप्लोमॅटिक पासपोर्ट) सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) विनंतीवरून केंद्र सरकारने चार आठवड्यांसाठी स्थगित केला आहे.
‘ईडी‘कडून तीन वेळा समन्स बजावूनही मल्ल्या हजर झालेले नाहीत, त्यामुळे मल्ल्यांचा पासपोर्ट रद्द करण्याची मागणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केली होती.
त्याशिवाय पासपोर्ट ॲक्ट १९६७ नुसार पासपोर्ट रद्द का करू नये याबाबत एका आठवड्यात खुलासा देण्याचे आदेश मल्ल्यांना देण्यात आले आहेत.
दोन मार्च रोजी लंडनला जाताना मल्ल्या यांनी राज्यसभा खासदार असल्याने मिळालेल्या डिप्लोमॅटिक पासपोर्टचा वापर केल्याचा संशय आहे.
पासपोर्ट कायद्यानुसार, डिप्लोमॅटिक पासपोर्ट असणाऱ्या व्यक्तीच्या नेहमीच्या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आवश्यक कागदपत्रे जमा केली जातात व ज्यावेळी तो रद्द करण्याची मागणी केली जाते, तेव्हा पासपोर्ट आणि कागदपत्रे रद्द केली जातात.
दक्षिण जपानला जोरदार भूकंपाचा धक्का
दक्षिण जपानला १६ एप्रिल रोजी बसलेल्या जोरदार भूकंपाच्या धक्क्यामुळे अनेक ठिकाणी घरे कोसळली असून, ढिगाऱ्यांखाली गाडले गेलेल्यांच्या शोधासाठी मोठी मोहीम उघडण्यात आली आहे.
या मोठ्या भूकंपाच्या धक्क्यात नऊ जण मृत्युमुखी पडले असून, शेकडो जण जखमी झाले आहेत. भूकंपामुळे अनेक ठिकाणी आग लागली, तर अनेक रस्ते बंद झाले आहेत.
माशिकी शहराजवळ या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.५ एवढी होती.
जपानमधील अतिवेगवान रेल्वेगाडी या भूकंपाच्या धक्क्यामुळे लोहमार्गावरून घसरली असून, कुमामोटो शहरातील अनेक प्रसिद्ध इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे.
भूकंपामुळे नुकसान झालेल्या भागात मोठ्या प्रमाणात मदतकार्य सुरू असून, मृत्युमुखी पडलेल्यांच्या आणि जखमी झालेल्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
देशातील पहिल्या भारत सागर परिषदेचे उद्घाटन १४ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते गोरेगाव येथील ‘एक्झिबिशन सेंटर’मध्ये झाले.
सागरी क्षेत्रातील विविध विभागात उपलब्ध असणाऱ्या मोठ्या गुंतवणूक संधीकडे संभाव्य गुंतवणुकदारांना आकर्षित करणे हे ३ दिवसीय भारत सागरी परिषदेचे लक्ष्य आहे.
देशातील ७५०० किलोमीटरचा सागरी मार्ग आणि १४ हजार किलोमीटर लांबीच्या देशांतर्गत जलमार्गाच्या विकासासाठी राबवल्या जाणाऱ्या सागरमाला प्रकल्पाचा राष्ट्रीय आराखडा यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते जाहीर करण्यात आला.
मॉस्कोमध्ये रिक परिषद
रशिया, भारत आणि चीनचा (रिक) समावेश असलेली ही परिषद १८ एप्रिलला मॉस्कोला होणार असून, यामध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासह रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लाव्हरोव्ह आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वॅंग यी उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेदरम्यान तिन्ही परराष्ट्र मंत्र्यांमध्ये विविध प्रादेशिक आणि अफगाणिस्तान, सीरिया, युक्रेनसह आंतरराष्ट्रीय मुद्यांवर त्रिपक्षीय चर्चा होणे अपेक्षित आहे.
याशिवाय स्वराज या लाव्हरोव्ह आणि वॅंग यी यांच्याबरोबर स्वतंत्रपणे द्वीपक्षीय चर्चा करतील. याशिवाय आंतरराष्ट्रीय दहशतवादाला तोंड देण्याच्या उपायांवरही तिन्ही मंत्र्यांमध्ये चर्चा होईल.
याशिवाय, संयुक्त राष्ट्रसंघ, ब्रिक्स, जी-२० आणि शांघाय सहकार्य संघटना अशा आंतरराष्ट्रीय संस्थांच्या चौकटीमध्ये एकमेकांमधील सहकार्य वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
सम-विषम प्रणालीचा दुसरा टप्पा
राजधानीतील रस्त्यावरील वाहतुकीचे नियमन करणाऱ्या ‘आप’ सरकारच्या बहुचर्चित सम-विषम प्रणालीचा दुसरा टप्पा १५ एप्रिलपासून सुरू झाला.
पुढील पंधरा दिवस सम-विषम प्रणालीनुसार वाहतुकीचे नियमन केले जाणार आहे.
वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी परिवहन विभागाने स्वयंसेवकांच्या १२० तुकड्या नेमल्या असून, त्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास दोन हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावू शकतात.
शहरातील मुख्य दोनशे ठिकाणांवर हे स्वयंसेवक नेमले जाणार असून, दोन हजार वाहतूक पोलिसांनादेखील रस्त्यावर उतरविण्यात आले आहे.
सर्वाधिक रेमिटन्स येणाऱ्या देशांच्या यादीत भारत प्रथम
मागील वर्षी विदेशातील नागरिकांकडून भारतात येणाऱ्या पैशामध्ये (रेमिटन्स) तब्बल १ अब्ज डॉलरची घट झाली आहे. रेमिटन्समध्ये २००९ पासून झालेली ही सर्वांत जास्त घट आहे.
तरीही विदेशी नागरिकांकडून सर्वाधिक पैसा (रेमिटन्स) येणाऱ्या देशांच्या यादीत भारत याही वर्षी प्रथम स्थानी राहिला आहे. जागतिक बँकेने याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
जगभरातील देशांच्या तुलनेत अधिक पैसा भारतात आला आहे. भारताने वर्ष २०१५मध्ये ६९ अब्ज डॉलर रेमिटन्ससह आंतरराष्ट्रीय पातळीवर आघाडीचे स्थान कायम राखले आहे.
भारताशिवाय गेल्या वर्षी चीन (६४ अब्ज डॉलर), फिलिपाईन्स (२८ अब्ज डॉलर), मेक्सिको (२५ अब्ज डॉलर) आणि नायजेरियामध्ये (२१ अब्ज डॉलर) सर्वाधिक रेमिटन्स दाखल झाला आहे.
सर्व देशांच्या एकुण रेमिटन्समध्येदेखील १.७ टक्क्यांची घट झाली आहे. यंदा जागतिक रेमिटन्सेसचा आकडा ५९२ अब्ज डॉलरवरुन ५८१.६ अब्ज डॉलरवर पोचला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीच्या मुहुर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नाम’ या ई-ट्रेडिंग मंचाचे उद्घाटन झाले.
राष्ट्रीय कृषी बाजारपेठ (नाम) योजनेंतर्गत देशातील ८ राज्यांमधील २१ घाऊक कृषी बाजारपेठांचा/मंडई एकत्रित ऑनलाईन मंच स्थापन करण्यात आला आहे.
सरकारच्या राष्ट्रीय कृषी योजनेंतर्गत मार्च २०१८पर्यंत देशातील ५८५ नियंत्रित बाजारपेठांचे एकत्रीकरण केले जाणार आहे.
मंचासाठी सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर गुजरात, तेलंगणा, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हरियाना, झारखंड आणि हिमाचल प्रदेश या आठ राज्यांची निवड करण्यात आली आहे.
एकत्रित ऑनलाईन मंचामुळे शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळेल आणि ग्राहकांनादेखील स्थिर दराने उत्पादने उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच यामुळे विक्री प्रक्रिया व किंमत प्रक्रिया पारदर्शक होईल.
ऑनलाईन बाजारपेठ स्थापन झाल्यानंतरदेखील कृषी उत्पादनांची बाजारपेठेत किंवा मंडईत विक्री सुरु राहील, परंतु ऑनलाईन बाजारपेठेमुळे व्यवहार खर्च कमी होईल.
शिवाय, सर्व बाजारपेठांसाठी एकच परवाना मिळेल, गुणवत्ता चाचणी सुरु राहील आणि देशभरात एकच कर आकारला जाईल.
सर्व बाजार समित्यांना जोडण्याच्या ‘नाम’ प्रकल्पाची घोषणा गेल्या वर्षी जुलैमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर यंदाच्या अर्थसंकल्पात त्यासाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली.
शेतकऱ्यांना या ई-ट्रेडिंग व्यासपीठावरून तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, मसाल्याचे पदार्थ २१ उत्पादनांची विक्री करता येणार आहे.
‘ग्रामोदय से भारत उदय’ मोहिमेचा शुभारंभ
भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महू येथील एका जाहीर सभेत ‘ग्रामोदय से भारत उदय’ मोहिमेचा शुभारंभ केला.
१४ ते २४ एप्रिल २०१६ दरम्यान होणाऱ्या ‘ग्रामोदय से भारत उदय’ मोहिमेत गावात करायच्या विकास कामांवर लक्ष केंद्रीत करण्यात येईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.
या वर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प शेतकरी आणि खेडेगावांना समर्पित असल्याचे ते म्हणाले. विकास उपक्रमांचा केंद्रबिंदू ग्रामीण विकास असला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
भारत आणि बांगलादेश दरम्यान सामंजस्य करार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत, भारत आणि बांगलादेश दरम्यान, सप्टेंबर २०११मध्ये मत्स्य व्यवसाय आणि संबंधित क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्याबाबत, सामंजस्य करारावर झालेल्या स्वाक्षऱ्याबाबत माहिती देण्यात आली.
या सामंजस्य करारामुळे भारत आणि बांगलादेशमधील मैत्रीपूर्ण संबंध मजबूत झाले असून मत्स्यव्यवसाय तसेच संबंधित क्षेत्रात सहमतीने निश्चित केलेल्या कार्यपध्दतीद्वारे सहकार्य विकासाला चालना मिळाली आहे.
हा सामंजस्य करार पाच वर्ष अंमलात राहणार आहे. हा करार रद्द करण्याच्या हेतूबाबत दोन्ही बाजू किमान ६ महिने आधी पूर्व लेखी सूचना देत नाहीत तोवर दोन्ही बाजूंच्या संमतीने हा सामंजस्य करार आणखी कालावधीसाठी वाढवता येऊ शकेल.
आयजीएनसीएचे संचालक मंडळ बरखास्त
राजधानीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय कला केंद्राचे (आयजीएनसीए) संचालक मंडळ केंद्र सरकारने तडकाफडकी बरखास्त करून वीस सदस्यांच्या नव्या संचालक मंडळाची नियुक्ती केल्याची घोषणा केली.
ज्येष्ठ पत्रकार राम बहादूर राय यांची संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राय यांच्या अध्यक्षतेखालील संस्थेचे संचालक मंडळ प्रथमच संपूर्णपणे बदलण्यात आले आहे.
तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी नोव्हेंबर १९८५ मध्ये भारतीय कलांना प्रोत्साहन देण्यासाठी ही संस्था स्थापन केली व तिला इंदिरा गांधी यांचे नाव दिले.
चिन्मय घरेखान यांच्या अध्यक्षतेखालील बरखास्त संचालक मंडळात कपिला वात्स्यायन, नमिता गोखले, फिरोज गुजराल, कुलभूषण खरबंदा, शोभना नारायण, सलमान हैदर, सुभाष पाणी, नयनज्योत लाहिरी आदी संचालक होते.
हल्ले, सीमेवरील घुसखोरी, तस्करी आणि अकस्मात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना रोखण्यासाठी केंद्र सरकारने भारत-पाक सीमेवर पाचस्तरीय सुरक्षा योजना(कॉम्प्रिहेन्सिव्ह बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टिम) लागू करण्यास मंजुरी दिली आहे.
अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने वर्षभर २४ तास सीमेवर कडक नजर ठेवणारी ही योजना भारत पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवर कच्छपासून काश्मीरपर्यंत २९०० किलोमीटर परिसरासाठी असेल.
सीमेतून भारतात घुसखोरी होऊ नये यासाठी प्रत्येक ५ ते ६ किलोमीटर अंतरावर कंट्रोल रूम स्थापन केली जाणार आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास या कंट्रोल रूममधून सीमा सुरक्षा दलांना लगेच अलर्ट संदेश जारी होईल.
युद्धक्षेत्रात पहारा ठेवणाऱ्या रडार यंत्रणेचा वापर करण्याबरोबरच सीमेवर जागोजागी अंडरग्राऊंड सेन्सर्सही बसवले जाणार आहेत.
सीसीटीव्ही कॅमेरे तर सज्ज असतीलच, त्याचबरोबर ज्या भागात तारांचे कुंपण नाही, अशा ठिकाणी लेजर अवरोधक उपकरणेही वापरली जाणार आहेत.
पाचस्तरीय नव्या व्यवस्थेचे वैशिष्ट्य असे की एका यंत्रणेच्या नजरेतून एखादी बाब सुटली तरी पर्यायी यंत्रणेच्या देखरेखीतून ती सुटणे शक्य नाही असे या योजनेचे सूत्र आहे.
सीमेवर कडक देखरेखीची ही नवी योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रत्येक किलोमीटर अंतराला किमान १ कोटी रुपये खर्च होणार आहेत.
वारंवार होणारी घुसखोरी आणि दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी यापेक्षा दुसरा प्रभावी उपाय सरकारकडे उपलब्ध नाही. जम्मू व पंजाबमधे प्रस्तुत योजनेचे दोन पायलट प्रकल्प पूर्वीच सुरू झाले आहेत.
येत्या दोन वर्षांत पश्चिम सीमेवर हे काम पूर्ण करण्याचा सरकारचा विचार आहे. योजना वेळेत पूर्ण व्हावी म्हणून ५० ते ६० खाजगी कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.
लॉजिस्टिक एक्स्चेंज करारास मान्यता
दोन्ही देशांच्या सैन्याला दुरुस्ती आणि साहित्याच्या पुरवठ्यासाठी एकमेकांच्या लष्करी तळांचा वापर करण्याची परवानगी देण्याचा करार (लॉजिस्टिक एक्स्चेंज) करण्यास भारत आणि अमेरिकेन तत्त्वत: मान्यता दिली आहे.
भारत दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे संरक्षण मंत्री ऍश्टन कार्टर यांनी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर असा करार करण्याचे निश्चित करण्यात आले.
मात्र अमेरिकेचे सैन्य भारतीय भूमीवर उतरून तळ ठोकेल, असा या कराराचा अर्थ नसल्याचेही दोघांनी या वेळी स्पष्ट केले.
केरळमध्ये आवाज करणाऱ्या फटाक्यांवर बंदी
पुट्टींगल मंदिरातील दुर्घटनेनंतर केरळ उच्च न्यायालयाने सूर्यास्त ते सूर्योदय या दरम्यान आवाज करणाऱ्या फटाक्यांवर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे.
परवानगीशिवाय असे फटाके वाजविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
पुट्टींगल मंदिरामध्ये महोत्सवादरम्यान सर्व मार्गदर्शक सूचनांचा भंग करण्यात आला होता, तसेच सुरक्षेबाबत कोणतीही काळजी घेण्यात आली नव्हती.
मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन अब्दुल गयूम यांच्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यात भारत आणि मालदीव यांच्यामध्ये विविध सहा करार करण्यात आले.
संरक्षण सहकार्यासह करांची पुनरुक्ती टाळणे, करांबाबत माहिती देणे, अवकाश सहकार्य, ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि पर्यटन अशा क्षेत्रांमध्ये हे करार करण्यात आले.
पंतप्रधान मोदी आणि गयूम यांच्यात विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा झाली. मालदीवच्या परराष्ट्र धोरणात भारताला प्रथम प्राधान्य असल्याचे गयूम यांनी मोदींना सांगितले.
जगातील वाघांच्या संख्येत वाढ
वन्यजीन संवर्धन गटाच्या जगभरात करण्यात आलेल्या व्याघ्रगणनेत शतकामध्ये पहिल्यांदाच वाघांची संख्या वाढली आहे.
रशियापासून ते व्हिएतनामच्या जंगलामध्ये ही व्याघ्रगणना करण्यात आली असून वाघांची संख्या ३८९० वर पोहोचली आहे. २०१०मध्ये करण्यात आलेल्या व्याघ्रगणनेत वाघांची संख्या ३२०० होती.
संवर्धन गट आणि प्रत्येक देशाच्या सरकारने व्याघ्रगणनेत सहभाग घेतला होता आणि त्याच आधारे ही आकडेवारी समोर आली आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे वाघांची संख्या वाढण्यामध्ये भारताचं खूप मोठे योगदान असून अर्ध्यापेक्षा जास्त वाघ भारतामध्येच आहे. भारतामधील जंगलांमध्ये एकूण २२२६ वाघ आहेत.
२०१०मध्ये वाघांची संख्या कमी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सर्व देशांनी संवर्धन गटाशी हातमिळवणी करुन २०२२पर्यंत वाघांची संख्या वाढवण्याची शपथ घेतली होती.
या पाहणीमध्ये भारत, रशिया, भुतान, नेपाळमध्ये वाघांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. २०१४मध्ये करण्यात आलेल्या गणनेच्या आधारावर ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
विश्वनाथन आनंदला हदयनाथ जीवन गौरव पुरस्कार
हदयेश आर्टस या संस्थेतर्फे दिला जाणारा यंदाचा हदयनाथ जीवन गौरव पुरस्कार आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदला दिला जाणार आहे.
राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते विश्वनाथन आनंदला १२ एप्रिल २०१६ रोजी सांयकाळी ७ वाजता दिनानाथ मंगेशकर नाटयगृह, विलेपार्ले (प), मुंबई येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, अमिताभ बच्चन व ए आर रेहमान यांना यापूर्वी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
कॅमेरॉन यांच्या प्राप्तिकराची माहिती सार्वजनिक
ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी आपल्या प्राप्तिकराची माहिती सार्वजनिक केली. असे करणारे ते ब्रिटनचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.
‘पनामा पेपर्स’च्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे पाऊल उचलले असून, या करचुकवेगिरीची चौकशी करण्यासाठी त्यांनी कृती समितीचीही स्थापना केली आहे.
‘पनामा पेपर्स’ प्रकरण उघडकीस येताच, काही विरोधकांनी कॅमेरॉन यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर कॅमेरॉन यांनी गेल्या सहा वर्षांतील प्राप्तिकराची माहिती जाहीर केली आहे.
२०१४-१५ या काळात त्यांचे उत्पन्न दोन लाख पौंडापेक्षा अधिक होते आणि यावर त्यांनी ७६ हजार पौंड कर भरला आहे.
अश्विन मन्ना फुड्सचा ‘ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर’
आरोग्य क्षेत्रातील अत्पादनांमध्ये आघाडीवर असणाऱ्या मन्ना फुड्सने ‘ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर’ म्हणून अश्विनची निवड केली आहे.
गोलंदाजीत सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी केल्याने आर. अश्विनने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविले आहे. अश्विन हा मुन्ना फूड्स ब्रँडचा पहिलाच बँड अँबॅसेडर आहे.
मुन्ना फूड्सने पुदुचेरीसह दक्षिण भारतात सक्षमपणे आपले पाय रोवले आहेत. मागील वर्षी त्यांनी ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्येही विस्तार केला.
तसेच, संयुक्त अरब अमिराती, कतार, ओमान, सौदी अरेबियासह संपूर्ण मध्य-पूर्वेत ‘मन्ना’ची उत्पादने निर्यात केली जातात.
सिंगापूर, मलेशिया, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत जिथे भारतीय लोकसंख्या जास्त आहे अशा देशांमध्ये ‘मन्ना’चा चांगला व्यवसाय आहे.
मूळचा चेन्नईचा असलेला आर. अश्विन सर्वांत वेगाने बळी घेणारा भारतीय गोलंदाज आहे. त्याने सर्वांत कमी कसोटी सामन्यांमध्ये बळींचे दीड शतक पूर्ण केले आहे.
अजंता मेंडिसनंतर ‘कॅरम बॉल’ टाकणारा अश्विन हा एकमेव गोलंदाज आहे. याशिवाय, २ शतके आणि ५ अर्धशतके नावावर असणारा अश्विन अष्टपैलू गोलंदाज आहे.