चालू घडामोडी : १ एप्रिल
देशातील पहिला हरित मेट्रो प्रकल्प
- देशातील पहिला हरित मेट्रो प्रकल्प म्हणून नागपूर मेट्रो प्रकल्पाचा विकास करण्यासाठी जर्मनीच्या केएफडब्ल्यू बॅंक आणि केंद्र सरकारदरम्यान करार करण्यात आला.
- या करारानुसार नागपूर मेट्रोच्या कामांसाठी केएफडब्ल्यू बॅंकेने २० वर्षे मुदतीसाठी ३,७५० कोटी रुपये (५०० दशलक्ष युरो) कर्ज स्वरूपात दिले आहे.
- या प्रकल्पांतर्गत सौर ऊर्जेच्या माध्यमातून दोन तृतीयांश ऊर्जा निर्मिती करण्यात येणार आहे.
- पहिल्या ५ वर्षांत एकूण रकमेवरील व्याज तर उर्वरीत १५ वर्षांत मुद्दलीसह व्याज स्वरूपात कर्ज परतावा करण्यात येणार आहे.
- या रकमेतून नागपूर मेट्रोचे डबे, मेट्रो मार्ग, वीजपुरवठा, ट्रॅक्शन, बांधकाम आदी कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी नागपूर मेट्रोरेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि केएफडब्ल्यू बॅंक यांच्यात दरम्यान प्रकल्प करार होईल.
सिगारेट कंपन्यांनी उत्पादन थांबवले
- सिगारेटच्या पाकिटांवरील वैधानिक इशारा दर्शनी भागाच्या ८५ टक्के करण्याच्या सरकारी अधिसूचनेचा निषेध करण्यासाठी देशातील प्रमुख सिगारेट कंपन्यांनी उत्पादन थांबवले आहे.
- सिगारेटच्या पाकिटांवरील वैधानिक इशाऱ्याबाबतची केंद्र सरकारची अधिसूचना १ एप्रिलपासून अंमलात आली.
- सिगारेटसह तंबाखूजन्य पदार्थांच्या वेष्टणाच्या दर्शनी भागात तंबाखूच्या दुष्परिणामांचा इशारा किती प्रमाणात असावा, यासाठी सरकारने एक संसदीय समिती नेमली होती.
- तंबाखू उत्पादन पाकिटांच्या दर्शनी भागाच्या ५० टक्के हा वैधानिक इशारा असावा, अशी शिफारस या समितीने केली होती.
- मात्र सरकारने हा इशारा दर्शनी भागाच्या ८५ टक्के असावा, असा निर्णय घेत २४ सप्टेंबर २०१५ला त्याबाबत अधिसूचना काढली.
- या निर्णयाचा निषेध करत आयटीसी, गॉडफ्रे फिलिप्स आणि व्हीएसटी या प्रमुख सिगारेट उत्पादक कंपन्यांनी उत्पादन थांबवले. या कंपन्या टोबॅको इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सदस्य असून एकूण सिगारेट विक्रीत त्यांचा वाटा ९८ टक्के आहे.
बिहारमध्ये दारूबंदी
- बिहारमधील देशी दारूच्या विक्रीवर १ एप्रिलपासून पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जाहीर केला होता. त्यानुसार त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
- राज्यातील सर्व आमदारांनी दारू न पिण्याची शपथ घेतली असून, त्यांना साथ देण्यासाठी एक कोटी नागरिकांनीही तशीच शपथ घेतली आहे.
- या निर्णयामुळे राज्यातील देशी दारूची विक्री पूर्णपणे बंद करण्यात आली असून शहरी भागात विदेशी दारू मिळेल.
- संपूर्ण बिहारमध्ये विदेशी दारूची ६५० दुकाने असून, त्यातील ९० पाटण्यात आहेत. ‘स्टेट बिव्हरेजेस कॉर्पोरेशन’ या दुकानांवर नियंत्रण ठेवणार आहे.
- बिहारमध्ये दोन टप्प्यांत दारू बंदी लागू केली जाणार असून, त्यातील पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून सुरू झाली.
- दारूच्या विरोधात सरकारने कडक धोरण स्वीकारले असून, बेकायदा दारू विक्री, विषारी दारूमुळे पडणारे बळी तसेच सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यावर कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत.
- हे निर्बंध मोडणाऱ्यांना मृत्युदंडापासून पाच लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद या संदर्भातील विधेयकात करण्यात आली असून, हे विधेयक विधानसभेत संमत झाले आहे.
‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जीची आत्महत्या
- ‘बालिका वधू’ या गाजलेल्या मालिकेतील ‘आनंदी’ची भूमिका करणारी अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिचा मृतदेह तिच्या घरात सापडला. तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- दुपारी घरात एकटीच असताना तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन मित्रांनी तिला कोकीलाबेन अंबानी रूग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला उपचारांपूर्वीच मृत घोषित केले.
- मूळच्या झारखंडच्या असलेल्या प्रत्युषाने यापूर्वी ‘झलक दिखला जा’ या मालिकेत काम केले होते. याशिवाय, ‘प्यार तूने क्या किया?’ ही मालिका, ‘बिग बॉस’चा सातवा सीझन या कार्यक्रमांमध्येही तिने काम केले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा