युद्धजर्जर अफगाणिस्तानमध्ये गुंतवणूक वाढवून विकासप्रक्रिया वेगाने करण्यासाठी‘हार्ट ऑफ एशिया’ ही परिषद २७ एप्रिलपासून सुरू होत असून, या परिषदेचे यजमानपद भारताकडे आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एझाझ अहमद चौधरी यांच्यासह अनेक देशांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
दहशतवाद आणि मूलतत्त्ववाद या दोन आव्हानांचा सामना करण्याबाबत या परिषदेत चर्चा अपेक्षित आहे.
अफगाणिस्तानमध्ये कायमस्वरूपी विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याच्या प्रक्रियेला वेग आणणे आणि त्यासाठी विविध उपाययोजना करणे, हा परिषदेचा गाभा असणार आहे.
अफगाणिस्तानच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांच्याबरोबर ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीचे करार करण्याबाबतही उपस्थित देशांमध्ये चर्चा होईल.
सचिन तेंडुलकर यांची खासदार निधीतून सोलापूर जिल्ह्याला मदत
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी खासदार निधीतून सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावला आहे. या जिल्ह्यातील तीन गावांना विकासासाठी ५६ लाख रुपयांचा निधी दिला आहे.
बार्शी तालुक्यातील इर्लेवाडी येथील माध्यमिक शाळेला वर्ग खोल्या बांधण्यासाठी तेंडुलकर यांनी ४ वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी १९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कोन्हाळी गावातील अंगणवाडी, रस्ते, पाण्याची टाकी व पथदिव्यांसाठी तेंडुलकर यांनी १२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
करमाळा तालुक्यातील पोमलवाडी व पसिरातील रस्त्यांच्या कामांसाठी तेंडुलकर यांनी २५ लाख रुपयांचा निधी दिला आहे.
ई-कॉमर्समध्ये अॅमेझॉन इंडिया दुसऱ्या स्थानी
ई-कॉमर्स क्षेत्रासंदर्भातील मार्च महिन्यातील आकडेवारीनुसार, अॅमेझॉन इंडिया ही स्नॅपडीलला मागे टाकत सर्वाधिक उत्पादनांची विक्री करणारी दुसऱ्या क्रमांकाची कंपनी ठरली आहे.
पहिल्या क्रमांकावर अद्यापही फ्लिपकार्टचे वर्चस्व कायम आहे. त्यामुळे परदेशातील अॅमेझॉनचे भारतीय बाजारपेठेत वाढणारे महत्त्व अधोरेखित होत आहे.
गेल्या महिन्यात माल वितरणाचा विचार केला असता, फ्लिपकार्टची बाजारपेठेत ३७ टक्के हिस्सेदारी होती. तर अॅमेझॉन इंडिया व स्नॅपडीलची हिस्सेदारी अनुक्रमे २४ व १५ टक्के होती.
गेल्या महिन्यात ऑनलाईन किरकोळ विक्री करणाऱ्या कंपन्यांनी दिवसाला ८ ते ९ लाख वस्तूंचे वितरण केले आहे.
अॅमेझॉनने भारतीय व्यवसायात जानेवारी महिन्यापासून ६,७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. गेल्यावर्षी अॅमेझॉन इंडियाची २५० टक्के दराने वाढ झाली आहे.
सुदर्शन पटनाईक यांना आंतरराष्ट्रीय वाळूशिल्प स्पर्धेत सुवर्णपदक
प्रख्यात भारतीय वाळू शिल्पकारसुदर्शन पटनाईक यांनी मॉस्कोमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय वाळूशिल्प स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
त्यांनी या स्पर्धेत अहिंसा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींची १५ फुटांची कलाकृती साकरली होती.
या यशानंतर रशियातील भारताचे राजदूत पंकज सारन यांनी पटनाईक यांचे अभिनंदन केले. या स्पर्धेत जगभरातील २० वाळू शिल्पकार सहभागी झाले होते.
कन्हैया कुमारचा ‘बिहार ते तिहार’ प्रवास
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार आता पुस्तकरूपाने आपला जीवनप्रवास मांडणार आहे. ‘बिहार ते तिहार’ असे या पुस्तकाचे नाव आहे.
हैदराबादमधील वेमुला प्रकरणानंतर जेएनयूमधील विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कन्हैयाची सुटका झाल्यानंतर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात तो आपल्या भाषणात जोरदार टीकास्त्र सोडत आहे.
बिहारमधील एका छोट्या खेड्यातून पुढे आलेल्या या विद्यार्थी नेत्याचा जीवनप्रवास देशातील विद्यार्थ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न जुग्गरनॉट प्रकाशन करणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा