डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीच्या मुहुर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नाम’ या ई-ट्रेडिंग मंचाचे उद्घाटन झाले.
राष्ट्रीय कृषी बाजारपेठ (नाम) योजनेंतर्गत देशातील ८ राज्यांमधील २१ घाऊक कृषी बाजारपेठांचा/मंडई एकत्रित ऑनलाईन मंच स्थापन करण्यात आला आहे.
सरकारच्या राष्ट्रीय कृषी योजनेंतर्गत मार्च २०१८पर्यंत देशातील ५८५ नियंत्रित बाजारपेठांचे एकत्रीकरण केले जाणार आहे.
मंचासाठी सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर गुजरात, तेलंगणा, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हरियाना, झारखंड आणि हिमाचल प्रदेश या आठ राज्यांची निवड करण्यात आली आहे.
एकत्रित ऑनलाईन मंचामुळे शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळेल आणि ग्राहकांनादेखील स्थिर दराने उत्पादने उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच यामुळे विक्री प्रक्रिया व किंमत प्रक्रिया पारदर्शक होईल.
ऑनलाईन बाजारपेठ स्थापन झाल्यानंतरदेखील कृषी उत्पादनांची बाजारपेठेत किंवा मंडईत विक्री सुरु राहील, परंतु ऑनलाईन बाजारपेठेमुळे व्यवहार खर्च कमी होईल.
शिवाय, सर्व बाजारपेठांसाठी एकच परवाना मिळेल, गुणवत्ता चाचणी सुरु राहील आणि देशभरात एकच कर आकारला जाईल.
सर्व बाजार समित्यांना जोडण्याच्या ‘नाम’ प्रकल्पाची घोषणा गेल्या वर्षी जुलैमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर यंदाच्या अर्थसंकल्पात त्यासाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली.
शेतकऱ्यांना या ई-ट्रेडिंग व्यासपीठावरून तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, मसाल्याचे पदार्थ २१ उत्पादनांची विक्री करता येणार आहे.
‘ग्रामोदय से भारत उदय’ मोहिमेचा शुभारंभ
भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महू येथील एका जाहीर सभेत ‘ग्रामोदय से भारत उदय’ मोहिमेचा शुभारंभ केला.
१४ ते २४ एप्रिल २०१६ दरम्यान होणाऱ्या ‘ग्रामोदय से भारत उदय’ मोहिमेत गावात करायच्या विकास कामांवर लक्ष केंद्रीत करण्यात येईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.
या वर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प शेतकरी आणि खेडेगावांना समर्पित असल्याचे ते म्हणाले. विकास उपक्रमांचा केंद्रबिंदू ग्रामीण विकास असला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
भारत आणि बांगलादेश दरम्यान सामंजस्य करार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत, भारत आणि बांगलादेश दरम्यान, सप्टेंबर २०११मध्ये मत्स्य व्यवसाय आणि संबंधित क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्याबाबत, सामंजस्य करारावर झालेल्या स्वाक्षऱ्याबाबत माहिती देण्यात आली.
या सामंजस्य करारामुळे भारत आणि बांगलादेशमधील मैत्रीपूर्ण संबंध मजबूत झाले असून मत्स्यव्यवसाय तसेच संबंधित क्षेत्रात सहमतीने निश्चित केलेल्या कार्यपध्दतीद्वारे सहकार्य विकासाला चालना मिळाली आहे.
हा सामंजस्य करार पाच वर्ष अंमलात राहणार आहे. हा करार रद्द करण्याच्या हेतूबाबत दोन्ही बाजू किमान ६ महिने आधी पूर्व लेखी सूचना देत नाहीत तोवर दोन्ही बाजूंच्या संमतीने हा सामंजस्य करार आणखी कालावधीसाठी वाढवता येऊ शकेल.
आयजीएनसीएचे संचालक मंडळ बरखास्त
राजधानीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय कला केंद्राचे (आयजीएनसीए) संचालक मंडळ केंद्र सरकारने तडकाफडकी बरखास्त करून वीस सदस्यांच्या नव्या संचालक मंडळाची नियुक्ती केल्याची घोषणा केली.
ज्येष्ठ पत्रकार राम बहादूर राय यांची संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राय यांच्या अध्यक्षतेखालील संस्थेचे संचालक मंडळ प्रथमच संपूर्णपणे बदलण्यात आले आहे.
तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी नोव्हेंबर १९८५ मध्ये भारतीय कलांना प्रोत्साहन देण्यासाठी ही संस्था स्थापन केली व तिला इंदिरा गांधी यांचे नाव दिले.
चिन्मय घरेखान यांच्या अध्यक्षतेखालील बरखास्त संचालक मंडळात कपिला वात्स्यायन, नमिता गोखले, फिरोज गुजराल, कुलभूषण खरबंदा, शोभना नारायण, सलमान हैदर, सुभाष पाणी, नयनज्योत लाहिरी आदी संचालक होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा