रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने १६ नोव्हेंबर २०१४ रोजी राज्यभरात राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली आहे.
एकाच दिवशी महाराष्ट्रातील २१ शहरांमध्ये राबविण्यात आलेल्या या अभियानात ५ हजार ६४५ किलोमीटरचे रस्ते स्वच्छ करण्यात आले होते. त्यातून सुमारे तीन टन कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली होती.
या अभियानात राज्यभरातील २ लाख ५ हजार सदस्य सहभागी झाले होते. एकाच वेळी लोकसहभागातून राबवण्यात आलेले हे पहिले महास्वच्छता अभियान होते.
प्रतिष्ठानच्या वतीने या विक्रमाची नोंद घेण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. लिम्का बुक ऑफ रेकार्डसने तो स्वीकारला आणि २०१६च्या विक्रमांच्या यादीत या महास्वच्छता अभियान म्हणून नोंद केली.
‘लिम्का बुक’च्या ‘विकास’ (डेव्हलपमेंट) या भागातील रेकॉर्डमध्ये हे अभियान समाविष्ट करण्यात आले आहे.
कोहीमा शहर धुम्रपान मुक्त
नागालँडची राजधानी कोहीमा शहर धुम्रपान मुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे कोहीमामध्ये यापुढे धुम्रपानावर बंदी असेल.
कोहीमाला धुम्रपान मुक्त करण्यासाठी विविध उपायोजना करण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडून त्याची अंमलबजावणी केली जाईल.
सुधा सिंगचा रिओतील प्रवेश निश्चित
मॅरेथॉनमध्ये रिओ ऑलिम्पिकसाठी प्रवेश निश्चित झालेल्या महाराष्ट्राच्या ललिता बाबरने दिल्ली येथे सुरू असलेल्या फेडरेशन कप राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढून ३००० मीटर स्टीपलचेसचे सुवर्ण जिंकले.
ललिताने ९ मिनिटे २७.०९ सेकंद अशी वेळ दिली.
तिची सहकारी सुधा सिंगनेही रिओतील प्रवेश निश्चित केला पण तिला स्टीपलचेसमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
सुधाचा हा ऑलिम्पिक पात्रतेचा पहिला प्रयत्न होता आणि त्यात ती यशस्वी ठरली. सुधा सिंगला या कामगिरीनंतर १४ मेला होत असलेल्या शांघाय डायमंड लीगमध्ये खेळण्याची संधी देण्यात आली आहे.
'पीएफ'वर ८.८ टक्के व्याज
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफ) मिळणाऱ्या व्याज दरात केंद्र सरकारने ०.१ टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे नोकरदारांना त्यांच्या पीएफवर ८.८ टक्के इतके व्याज मिळणार आहे. आधी हा व्याज दर ८.७ टक्के इतका करण्यात आला होता.
पीएफवरील व्याज दर ८.७५ टक्क्यांवरून ८.७० टक्के केल्याने सरकारी कर्मचारी संघटनांनी त्याला तीव्र विरोध केला होता. याविरोधात आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
त्याची दखल घेऊन केंद्र सरकारने २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी पीएफवरील व्याज दर वाढवून ८.८ टक्के करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाचा देशभरातील ५ कोटीपेक्षा जास्त 'पीएफ'धारकांना लाभ मिळणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा