सचिन तेंडुलकर स्कील इंडिया योजनेचा ब्रँड अँम्बेसेडर
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला केंद्र सरकारने ‘स्कील इंडिया’ (कौशल्य विकास) योजनेचा ब्रँड अँम्बेसेडर बनवले आहे.
जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोहोचता यावे तसे कौशल्य विकासाप्रती तरूणांमध्ये जागरुकूता निर्माण करता यावी यासाठीच सरकारने सचिनला आपल्या ‘I Support Skill India’ या कॅम्पेनचा ‘चेहरा बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
देशात कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे, तरुणांना आपल्या पायावर उभे राहता यावे व रोजगारनिर्मितीचे प्रमाण वाढावे यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय कौशल्य विकास योजना सुरू केली आहे.
या योजनेंतर्गत २०२२पर्यंत देशातील ४० कोटींहून अधिक तरूणांना कुशल बनवण्याचे लक्ष्य मंत्रालयासमोर आहे.
हे कॅम्पेन समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच कुशल भारत बनवण्याच्या लक्ष्यातील एक महत्वपूर्ण पाऊल आहे.
मीरा बोरवणकर पोलीस संशोधन आणि विकास महासंचालकपदी
महाराष्ट्र कॅडरच्या आयपीएस अधिकारी मीरा सी. बोरवणकर यांची पोलीस संशोधन आणि विकास (बीपीआर अॅन्ड डी) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्या १९८१च्या तुकडीतील अधिकारी आहेत. मुंबई गुन्हेशाखेच्या पहिल्या महिला आयुक्त होण्याचा मानही त्यांनी पटकावला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अखत्यारितील कार्मिक विभागाने बोरवणकर यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला.
पदभार स्वीकारतील त्या दिवसांपासून ३० सप्टेंबर २०१७ रोजी निवृत्त होईपर्यंत त्या पदभार सांभाळतील.
आसाम रायफल्समध्ये महिलांना संधी
देशातील सर्वांत जुने निमलष्करी दल असलेले आसाम रायफल्सने प्रथमच नव्याने सेवेत रूजू झालेल्या २१२ जवानांमध्ये १०० महिलांना संधी दिली आहे.
नागालँडमधील शोखुवी येथील आसाम रायफल्स प्रशिक्षण केंद्रामध्ये वर्षभर प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना सेवेमध्ये रुजू करून घेण्यात आले.
आसाम रायफल्स हे केंद्रीय गृह आणि संरक्षण मंत्रालयाच्या संयुक्त अखत्यारीत येते. गेल्या वर्षी मार्च महिन्यात दिमापूर येथील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी रायफल्सने १२७ महिलांची निवड केली होती.
त्यासाठी देशभरातून निवडचाचणी घेण्यात आली होती. यापैकी २७ महिला वैद्यकीय चाचणी; तसेच प्राथमिक चाचण्यांमध्ये अनुत्तीर्ण झाल्याने १०० महिलांना पुढील प्रशिक्षणासाठी निवडण्यात आले.
या महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी लष्करातील तीन महिला अधिकाऱ्यांची मार्च २०१४ पासून प्रशिक्षण संस्थेमध्ये नियुक्ती करण्यात आली होती.
नव्याने सेवेत रूजू झालेल्या महिला जवानांचा विविध बटालियनमध्ये समावेश करण्यात येईल. महिलांची चौकशी, गर्दीवर नियंत्रण मिळवणे, जमावाला पांगवणे, आंदोलने हाताळणे यांसारखी कामे त्यांना देण्यात येतील.
‘फिनमेकानिका ग्रुप’च्या माजी प्रमुखांना तुरुंगवास
इटलीमधील संरक्षण आणि हवाई क्षेत्रामध्ये कार्यरत असलेला सर्वांत मोठ्या ‘फिनमेकानिका ग्रुप’चे माजी प्रमुख जुसेप्पे ओरसी यांना साडेचार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
तसेच, ‘ऑगस्टा वेस्टलँड’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ब्रुनो स्पॅग्नोलिनी यांनाही कोर्टाने चार वर्षांचा तुरुंगवास ठोठावला आहे. इटलीच्या कंपनीला त्यामुळे मोठा धक्का बसला आहे.
भारताला विक्री करण्यात आलेल्या ३,६०० कोटी रुपयांच्या १२ व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टरमध्ये चुकीचा हिशेब आणि भ्रष्टाचारप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
कोर्टाने यापूर्वी या दोघांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये निर्दोष ठरवले होते. सरकारी वकिलांनी या दोघांना सहा आणि पाच वर्षांच्या तुरुंगवासाची मागणी केली होती.
व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टरमधील भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर भारताने १ जानेवारी २०१४ रोजी ‘ऑगस्टा वेस्टलँड’बरोबरील कंत्राट रद्द केले.
हवाई दलाचे माजी प्रमुख एस. पी. त्यागी आणि त्यांचे चुलतभाऊ यामध्ये लाभार्थी असल्याच्या आरोपावरून सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांच्याकडून त्यांची चौकशी सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा