देशातील पहिल्या भारत सागर परिषदेचे उद्घाटन १४ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते गोरेगाव येथील ‘एक्झिबिशन सेंटर’मध्ये झाले.
सागरी क्षेत्रातील विविध विभागात उपलब्ध असणाऱ्या मोठ्या गुंतवणूक संधीकडे संभाव्य गुंतवणुकदारांना आकर्षित करणे हे ३ दिवसीय भारत सागरी परिषदेचे लक्ष्य आहे.
देशातील ७५०० किलोमीटरचा सागरी मार्ग आणि १४ हजार किलोमीटर लांबीच्या देशांतर्गत जलमार्गाच्या विकासासाठी राबवल्या जाणाऱ्या सागरमाला प्रकल्पाचा राष्ट्रीय आराखडा यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते जाहीर करण्यात आला.
मॉस्कोमध्ये रिक परिषद
रशिया, भारत आणि चीनचा (रिक) समावेश असलेली ही परिषद १८ एप्रिलला मॉस्कोला होणार असून, यामध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासह रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लाव्हरोव्ह आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वॅंग यी उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेदरम्यान तिन्ही परराष्ट्र मंत्र्यांमध्ये विविध प्रादेशिक आणि अफगाणिस्तान, सीरिया, युक्रेनसह आंतरराष्ट्रीय मुद्यांवर त्रिपक्षीय चर्चा होणे अपेक्षित आहे.
याशिवाय स्वराज या लाव्हरोव्ह आणि वॅंग यी यांच्याबरोबर स्वतंत्रपणे द्वीपक्षीय चर्चा करतील. याशिवाय आंतरराष्ट्रीय दहशतवादाला तोंड देण्याच्या उपायांवरही तिन्ही मंत्र्यांमध्ये चर्चा होईल.
याशिवाय, संयुक्त राष्ट्रसंघ, ब्रिक्स, जी-२० आणि शांघाय सहकार्य संघटना अशा आंतरराष्ट्रीय संस्थांच्या चौकटीमध्ये एकमेकांमधील सहकार्य वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
सम-विषम प्रणालीचा दुसरा टप्पा
राजधानीतील रस्त्यावरील वाहतुकीचे नियमन करणाऱ्या ‘आप’ सरकारच्या बहुचर्चित सम-विषम प्रणालीचा दुसरा टप्पा १५ एप्रिलपासून सुरू झाला.
पुढील पंधरा दिवस सम-विषम प्रणालीनुसार वाहतुकीचे नियमन केले जाणार आहे.
वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी परिवहन विभागाने स्वयंसेवकांच्या १२० तुकड्या नेमल्या असून, त्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास दोन हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावू शकतात.
शहरातील मुख्य दोनशे ठिकाणांवर हे स्वयंसेवक नेमले जाणार असून, दोन हजार वाहतूक पोलिसांनादेखील रस्त्यावर उतरविण्यात आले आहे.
सर्वाधिक रेमिटन्स येणाऱ्या देशांच्या यादीत भारत प्रथम
मागील वर्षी विदेशातील नागरिकांकडून भारतात येणाऱ्या पैशामध्ये (रेमिटन्स) तब्बल १ अब्ज डॉलरची घट झाली आहे. रेमिटन्समध्ये २००९ पासून झालेली ही सर्वांत जास्त घट आहे.
तरीही विदेशी नागरिकांकडून सर्वाधिक पैसा (रेमिटन्स) येणाऱ्या देशांच्या यादीत भारत याही वर्षी प्रथम स्थानी राहिला आहे. जागतिक बँकेने याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
जगभरातील देशांच्या तुलनेत अधिक पैसा भारतात आला आहे. भारताने वर्ष २०१५मध्ये ६९ अब्ज डॉलर रेमिटन्ससह आंतरराष्ट्रीय पातळीवर आघाडीचे स्थान कायम राखले आहे.
भारताशिवाय गेल्या वर्षी चीन (६४ अब्ज डॉलर), फिलिपाईन्स (२८ अब्ज डॉलर), मेक्सिको (२५ अब्ज डॉलर) आणि नायजेरियामध्ये (२१ अब्ज डॉलर) सर्वाधिक रेमिटन्स दाखल झाला आहे.
सर्व देशांच्या एकुण रेमिटन्समध्येदेखील १.७ टक्क्यांची घट झाली आहे. यंदा जागतिक रेमिटन्सेसचा आकडा ५९२ अब्ज डॉलरवरुन ५८१.६ अब्ज डॉलरवर पोचला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा