चालू घडामोडी : २५ एप्रिल
पुनर्गुंतवणूक विभागाचे नामकरण
- केंद्रीय पुनर्गुंतवणूक विभागाचे नामकरण करण्यात आले आहे. हा विभाग आता 'डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंट' अर्थात 'दीपम' म्हणून ओळखला जाईल.
- यंदाच्या अर्थसंकल्पात नमूद केल्याप्रमाणे चालू आर्थिक वर्षात पुनर्गुंतवणुकीच्या माध्यमातून ५६ हजार ५०० कोटी रुपये उभारणीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे.
- एकूण रकमेपैकी ३६००० कोटी रुपये सरकारी कंपन्यांच्या अल्प हिस्साविक्रीतून तर, उर्वरित २०,५०० कोटी रुपये नफ्यात आणि तोट्यात असणाऱ्या कंपन्यांच्या विक्रीतून उभारण्यात येतील.
दत्तू भोकनळ रिओ ऑलिंपिकसाठी पात्र
- भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेला दत्तू भोकनळ याने रिओ (ब्राझील) ऑलिंपिकसाठी नौकानयन (रोइंग) क्रीडा प्रकारात पात्रता मिळविली आहे.
- कोरिया येथे २०१६ ‘फिसा’ (FISA) आशिया अँड ओसेनिया कॉन्टिनेंटल ऑलिंपिक पात्रता स्पर्धेमध्ये एकेरी पुरुष (सिंगल स्कल) त्याने हे यश मिळविले आहे.
- सैन्यदलात भरती झाल्यानंतर दत्तूने रोइंगचे प्रशिक्षण घेतले. या दरम्यान त्याने विविध स्पर्धांमध्ये पदकांची कमाई केलेली आहे.
- २०१५मध्ये बीजिंग (चीन) येथे झालेल्या आशियाई नौकानयन आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये ७:१८:४१ अशी वेळ नोंदवत रौप्य पदकाची कमाई केली होती.
- दत्तू भोकनळ हा पुण्यात द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त इस्माईल बेग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
संदीप तोमर रिओ ऑलिंपिकसाठी पात्र
- आशियाई विजेत्या संदीप तोमरने पहिल्या ऑलिंपिक पात्रता कुस्ती स्पर्धेत ब्राँझपदकावर कब्जा करताना रिओ ऑलिंपिकसाठी पात्रताही मिळविली.
- संदीप हा ऑलिंपिक कोटा जिंकलेला भारताचा चौथा कुस्तीगीर आहे. संदीपने हा पराक्रम फ्रीस्टाइल प्रकारातील ५७ किलो गटात केला.
- मंगोलियातील उलनबटोर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रत्येक गटात पहिले तीन कुस्तीगीर ऑलिंपिकसाठी पात्र ठरले.
- उपांत्य लढतीत संदीपचा अझरबैझानच्या हसान झादा याच्याकडून पराभव झाला. परंतु ऑलिंपिक कोट्यासाठी झालेल्या लढतीत संदीपने मोल्दोवाच्या अलेक्झांड्रू चिर्तोका याचा १०-० असा सहज पाडाव केला.
सबसिडीचा त्याग करण्यात महाराष्ट्र अग्रेसर
- घरगुती गॅस सिलिंडरवर देण्यात येणाऱ्या शासकीय अनुदानाचा (सबसिडी) त्याग करण्याबाबतच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला देशात सर्वाधिक प्रतिसाद महाराष्ट्रातून मिळाला आहे.
- महाराष्ट्रातील एकूण १६,४२,८१४ नागरिकांनी या अनुदानाचा त्याग केला आहे.
- घरगुती गॅसच्या वापरासाठी नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सिलिंडरवर शासनातर्फे अनुदान देण्यात येते. त्यापोटी केंद्र सरकारला मोठा वित्तीय भार सहन करावा लागतो.
- या अनुदानाची गरज नसलेल्या नागरिकांनी अनुदानाचा त्याग करावा, असे आवाहन करताना देशाचे प्रधानमंत्री मोदी यांनी देशभरात ‘गिव्ह इट अप’ मोहीम राबविली होती.
- देशात एकूण १४.५४ कोटी नागरिक एलपीजी गॅसधारक आहेत. त्यापैकी १ कोटीहून अधिक नागरिकांनी या अनुदानाचा त्याग केला आहे.
- महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश (१२,५३,२४२), दिल्ली (७,२७,३७४), कर्नाटक (६,९७,७१०) आणि तामिळनाडू (६,४७,९८५) याप्रमाणे पहिल्या पाच राज्यांची क्रमवारी आहे.
राधिका आपटे आंतरराष्ट्रीय सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
- मराठी व बॉलीवूड इंडस्ट्री गाजविणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे हिला न्यूयॉर्कमधील ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये आंतरराष्ट्रीय श्रेणीतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
- सहा दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मॅडली’ या शॉर्टफिल्ममधील भूमिकेसाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे.
- 'ट्रिबेका' फिल्म फेस्टिव्हलमध्ये एखाद्या भारतीय अभिनेत्रीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा