आयपीएसच्या १९८१च्या तुकडीतील अधिकारी सतीश माथूर यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
तसेच या विभागाचे अतिरिक्त महासंचालक संजय बर्वे यांच्याकडे राज्य गुप्तचर विभागाचे आयुक्तपद सोपविण्यात आले, संजय बर्वे १९८७च्या तुकडीचे अधिकारी आहेत.
‘एसीबी’चे प्रमुख होण्यापूर्वी माथूर महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण आणि कल्याण मंडळाचे महासंचालक होते.
नॅशनल सिक्युरिटी गार्डमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या सतीश माथूर यांनी विधी व तांत्रिक तसेच पोलीस गृहनिर्माण व कल्याण या विभागाचे महासंचालक म्हणूनही काम केले आहे.
तसेच त्यांनी केंद्रात प्रतिनियुक्तीवर असताना एअर इंडियामध्ये तसेच सीबीआयमध्येही काम केले.
सीबीआयमध्ये असताना मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोट तपासात त्यांचा सहभाग होता. ते काही काळ पुण्याचे आयुक्त होते व मुंबईत वाहतूक पोलीस सहआयुक्त हे पदही त्यांनी भूषवले आहे.
भारताचा नेमबाज मैराज खानला रौप्यपदक
भारताचा नेमबाज मैराज अहमद खानने रिओ दि जानिरो (ब्राझील) शहरात सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात रौप्यपदक प्राप्त केले.
मैराजने पुरुषांच्या स्कीट सुवर्णपदक सामन्यात स्वीडनच्या मार्कस स्वेनसनचा शूटआउट टायब्रेकरवर २-१ ने पराभव केला. ‘स्कीट’ सामन्यातील हे भारताचे पहिले पदक आहे.
अंतिम फेरीत मैराज आणि मार्कस या दोघांनी १६ पैकी १५, अशी कामगिरी करून सुवर्णपदकासाठी दावेदारी पक्की केली होती. ज्यात मार्कसने बाजी मारली.
या स्पर्धेत इटलीचा टमारो कसान्द्रो तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत मुंबई सर्वांत पुढे
केंद्रीय पर्यावरण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) अहवालानुसार ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत मुंबई सर्वांत पुढे असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईनंतर लखनौ आणि हैदराबादचा क्रमांक असून दिल्ली चौथ्या स्थानावर आहे. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावल्याने ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यात दिल्लीला यश मिळाल्याचे अहवालात म्हटले आहे.
वाहनांच्या आवाजाशिवाय, जनरेटर, कार्यालयातील यंत्रे, विमाने, औद्योगिक आणि बांधकामाच्या कामातून निर्माण होणारे आवाज आदींच्या आवाजामुळे शहरांमधील ध्वनी प्रदूषणामध्ये वाढ होत आहे.
दिवसा ५५ डेसीबल आणि रात्रीच्या वेळी ४५ डेसीबल एवढ्या आवाजाची मर्यादा ओलांडली तर मानवी आरोग्यावर त्याचे विपरित परिणाम होतात.
त्यामध्ये स्वभावातील आक्रमकता, उच्च रक्तदाब, ऐकू कमी येणे, झोपेमध्ये अडथळा आदी प्रकारच्या तक्रारी उद्भवू शकतात.
सीपीसीबीचा हा अहवाल सरकारला ध्वनी प्रदूषणासंदर्भातील धोरणे निश्चित करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
चीनचे बंडखोर नेते डोल्कन इसा यांचा व्हिसा रद्द
चीनचे बंडखोर उइघूर नेते डोल्कन इसा यांचा व्हिसा भारताने रद्द केला आहे. इसा यांना दहशतवादी संबोधत चीनने त्यांना व्हिसा देण्याच्या निर्णयावर तीव्र आक्षेप नोंदविला होता.
हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या मानवाधिकार परिषदेसाठी इसा उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस असल्याचे लक्षात आणून दिल्यावर परराष्ट्र मंत्रालयाने तो रद्द करण्याचा निर्णय घेतला.
व्हिसा रद्द होऊनही त्यांनी भारतात प्रवेश केल्यास त्यांना अटक करून चीनच्या ताब्यात दिले जाईल, असे भारताने स्पष्ट केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा