चालू घडामोडी : १३ जानेवारी


मुळा-मुठा शुद्धीकरणासाठी ‘जायका’शी करार

  • पुण्यातील मुळा व मुठा नदीच्या शुद्धीकरणासाठी केंद्र सरकारने जपानमधील जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (जायका) या कंपनीशी सांमजस्य करार केला आहे. 
  • केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकरजपानचे भारतातील राजदूत केंजी हिरामत्सु यांनी या करारावर सह्या केल्या.
  • केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या देशातील प्रदूषित ३०२ नद्यांमधे पुण्यातून वाहणाऱ्या मुळा-मुठा या दोन्ही नद्यांचा समावेश आहे.
  • महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय नदी संरक्षण योजनेअंतर्गत (एनआरसीपी) या नद्यांच्या शुद्धीकरणासाठी प्रस्ताव पाठविला होता.
 करारातील महत्वाचे मुद्दे 
  • केंद्र सरकार आणि जायका कंपनी दरम्यान झालेल्या या करारानुसार या नद्यांच्या शुद्धीकरणासाठी जपानची जायका कंपनी एक हजार कोटींचे कर्ज देणार आहे. हे कर्ज फेडण्यासाठी ४० वर्षांची मुदत देण्यात आली आहे.
  • करारांतर्गत ११ नवीन मल-जल शोधन यंत्राचे निर्माण केले जाणार आहे. यामुळे नदीचे प्रदूषण रोखण्यास मोठी मदत होईल.
  • या नद्यांच्या शुद्धीकरणावर ९९०.२६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पैकी केंद्र सरकारचा वाटा ८४१.७२ कोटी आणि पुणे महानगरपालिकेचा वाटा १४८.५४ कोटींचा असणार आहे.
  • ही शुद्धीकरणाची योजना जानेवारी २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे करारात नमूद करण्यात आलं आहे.

लेफ्टनंट जनरल जेकब यांचे निधन

  • बांगलादेशच्या निर्मितीला कारणीभूत ठरलेल्या १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धाचे हिरो लेफ्टनंट जनरल जेकब (निवृत्त) यांचे १३ जानेवारी रोजी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.
 लष्करी कारकीर्द 
  • जेकब यांचे पूर्ण नाव जेकब फर्ज राफेल जेकब असे होते. त्यांचा जन्म १९२३ साली कोलकात्यातील एका बगदादी ज्यू कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण दार्जिलिंग येथील शाळेत झाले.
  • १९४२ साली जेकब यांनी महू येथील आफीसर्स ट्रेनिंग स्कूलमधून लष्करी शिक्षण पूर्ण केले. तसेच अमेरिका व इंग्लंड येथेही त्यांनी लष्करी शिक्षण घेतले होते. त्यानंतर त्यांनी इराक तसेच ब्रह्मदेश, सुमात्रा येथे लष्करी मोहिमांमध्ये सहभाग घेतला. 
  • १९६३ साली ते ब्रिगेडीयर झाले, तर १९६७ साली त्यांना मेजर जनरलपदी पदोन्नती मिळाली. १९६५ च्या युद्धात त्यांनी राजस्थान येथे उत्तम कामगिरी बजावली होती. 
  • १९६९ साली त्यांची जनरल सॅम माणेकशा यांनी ईस्टर्न कमांडच्या चिफ ऑफ आर्मी स्टाफपदी नियुक्ती केली. मणिपूर, नागालँडमधील बंडखोरांशी लढण्यामध्येही त्यांचा सहभाग होता. भारत सरकारने त्यांचा परमविशिष्ट सेवा पदकाने गौरव केला होता.
 बांगलादेश युद्धातील कामगिरी 
  • जेकब यांच्या कारकीर्दीचा उच्चबिंदू म्हणजे बांगलादेश युद्धातील त्यांची कामगिरी. या युद्धामुळेच जेकब यांना विशेष ओळख मिळाली. युद्धकौशल्याच्या जोरावर केवळ तीन हजार भारतीय सैनिकांच्या मदतीने त्यांनी ढाक्याला स्वतंत्र केले.
  • पाकिस्तानचे त्याच शहरात २६, ४०० सैनिक उपस्थित असूनही हा विजय त्यांनी मिळविल्यामुळे सर्व जगाने आश्चर्य व्यक्त केले होते. त्यानंतर पाकिस्तानचे ए.ए.के. नियाझी यांनी शरणागती पत्करली आणि पाकिस्तानचे ९०,००० सैनिकही शरण आले.
  • त्यांचे बांगलादेश युद्धावरील ‘बांगलादेश स्ट्रगल- अ‍ॅन ओडेसी इन वॉर अँड पीस अँड सरेंडर अ‍ॅट ढाका’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. 
  • १९७१ साली बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या जेएफआर जेकब यांचा २०१२ साली बांगलादेशने कृतज्ञतापूर्वक सन्मान केला.
  • तत्कालीन पूर्व पाकिस्तानचे जनरल नियाझी यांच्याशी चर्चा करुन पाकिस्तानी सैन्याच्या शरणागतीची प्रक्रिया ठरवण्यात लेफ्टनंट जनरल जेकब यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
  • जेकब दुसरे महायुद्ध, १९६५चे भारत-पाकिस्तान युद्ध आणि ७१चे बांगलादेश निर्मितीचे युद्ध यांचे साक्षीदार होते.
  • १९९८ ते १९९९ या वर्षभराच्या कालावधीसाठी ते गोव्याचे व त्यानंतर २००३ पर्यंत ते पंजाबचे राज्यपाल होते.

पठाणकोट हल्ल्याचे सिनेटमध्ये पडसाद

    F-16 Planes
  • पठाणकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकन काँग्रेसने पाकिस्तानला निर्यात करण्यात येणाऱ्या आठ एफ-१६ या लढाऊ विमानांची विक्री तात्पुरती रोखली आहे.
  • पाकिस्तान या लढाऊ विमानांचा नेमका कशासाठी वापर करेल, याची अमेरिकी खासदारांना चिंता आहे. कारण, अमेरिकेकडून मिळालेली शस्त्रास्त्रे पाकने आतापर्यंत भारताविरुद्धच वापरलेली आहेत.
  • विक्रीला स्थगिती दिली असली तरी सरकारच्या इच्छेनुसार ती कधीही उठवता येऊ शकते. परंतु पाकिस्तानला अत्याधुनिक एफ-१६ ही लढाऊ विमानं विकण्यासाठी रिपब्लीकन गटाचे वर्चस्व असलेल्या काँग्रेसची मंजुरी मिळवणं ओबामा प्रशासनाला आवश्यक आहे.

बिहारमध्ये लक्झरी कर

  • दारुबंदीच्या निर्णयामुळे राज्याच्या महसुलाचे झालेले हजारो कोटींचे नुकसान भरून काढण्याकरिता बिहारमधील नितीशकुमार सरकारने काही वस्तूंवर लक्झरी कर लावण्याचा निर्णय घेतला आहे.
  • मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक लक्झरी सामानांवरील कर वाढवून १३.५ टक्के करण्याला मंजुरी देण्यात आली.
  • प्रति किलो ५०० रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या मिठार्इंवरही हा कर लागेल. यापूर्वी या मिठाई करमुक्त होत्या. 
  • याशिवाय ब्रँडेड आणि नमकीन खाद्यपदार्थ, चनाचोर, भुजिया डालमोट कराच्या चौकटीत आले आहेत.
  • सुक्या मेव्यावरील कर ५ टक्क्यांवरून वाढवून १३.५ टक्के करण्यात आला आहे.
  • याशिवाय ५०० रुपये मीटरपेक्षा अधिक किमतीचे कापड आणि २००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या साड्यांवर ५ टक्के कर द्यावा लागणार आहे. यापूर्वी यावर कर द्यावा लागत नव्हता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा