भारतीय सैन्यदलाच्या पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्याची सूत्रे पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अझर आणि त्याचा भाऊ अब्दुल रौफ असघर यांच्यासह आणखी दोघांकडून (अश्फाक आणि कासीम) हलविण्यात आल्याचे गुप्तचर यंत्रणांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
या चौघांचा तपशील पाकिस्तानला कळविण्यात आल्याची आणि दोन्ही देशांदरम्यानची भविष्यातील चर्चा सुकर व्हावी, यासाठी या चौघांविरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी भारताने केली आहे.
१५ जानेवारी रोजी इस्लामाबाद येथे दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवांदरम्यान चर्चा होणार आहे.
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली
बैलगाडा शर्यतींवर असलेली बंदी उठविण्याचा निर्णय केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने घेतला आहे. या बैलगाडी शर्यतीत क्रौर्य होता कामा नये, या अटीवर ही बंदी उठविण्यात आली आहे. बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु व्हावी यासाठी साताऱ्याच्या बळीराजा प्राणी व बैलगाडी शर्यत बचाव समितीने प्रयत्न केले होते
पारंपरिक पद्धतीने ज्या जिल्ह्यांमध्ये बैलगाडा शर्यत भरवली जाते, तिथे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने बैलगाडा शर्यत पुन्हा भरविण्यात येऊ शकते, असे या संदर्भात काढण्यात आलेल्या शासकीय आदेशात म्हटले आहे.
योग्य पद्धतीने तयार केलेल्या धावपट्टीवर ही शर्यत आयोजित केली जावी. धावपट्टी दोन किलोमीटरपेक्षा जास्त लांब असू नये, असेही आदेशात म्हणण्यात आले आहे.
बैलांना दिली जाणारी क्रूर वागणूक या कारणास्तव बैलगाडा शर्यतीवर न्यायालयाने बंदी घातली होती. मात्र बैलगाडा शर्यत महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे व त्यात क्रूरता नाही, असे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले होते. त्यानंतरच बंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
पवन कपूर इस्रायलमध्ये भारताचे नवे राजदूत
वरिष्ठ मुत्सद्दी पवन कपूर यांची सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या असलेल्या इस्रायलमध्ये भारताचे नवे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते जयदीप सरकार यांची जागा घेतली.
भारतीय परराष्ट्र सेवेचे (आयएफएस) १९९०च्या तुकडीचे अधिकारी असलेले कपूर हे सध्या मोझांबिकची राजधानी मापुटो येथे भारताचे उच्चायुक्त आहेत. ते लवकर पदाची सूत्रे स्वीकारण्याची अपेक्षा आहे.
इस्रायलसोबत भारताचे संबंध अधिक दृढ होत आहेत. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात इस्रायलला भेट दिली होती. या ज्यू राष्ट्राला भेट देणारे भारताचे ते पहिले प्रमुख ठरले होते.
भारत हा इस्रायलकडून लष्करी सामग्री घेणारा सर्वात मोठा खरेदीदार आहे. गेल्या काही वर्षांत इस्रायलने भारताला अनेक शस्त्रयंत्रणा, क्षेपणास्त्रे आणि टेहळणी करणारी वैमानिकरहित विमाने (यूएव्ही) पुरवली आहेत.
इस्रायलचे पंतप्रधान : बेंजामिन नेतान्याहू
प्रजासत्ताक दिनाला फ्रांसचे सैन्यही परेड करणार
२६ जानेवारीला राजपथावर भारतीय सैन्यासोबतच यावर्षी फ्रांसचे सैन्यही परेड करणार आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात परराष्ट्राचे सैन्य भाग घेत आहे. फ्रांसचे राष्ट्रपती फ्रांस्वा ओलांद या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राहणार आहेत. गेल्यावर्षी अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा प्रमुख पाहुणे होते.
फ्रांस आर्मीची एक तुकडी राजस्थानमध्ये भारताबरोबर संयुक्त युद्धसराव करण्यासाठी आली आहे. ८ ते १६ जानेवारीदरम्यान हा युद्धसराव चालणार आहे.
यापूर्वीसुद्धा फ्रांसचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत.
१९९८ मध्ये राष्ट्रपती आणि १९७६मध्ये पंतप्रधान प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे होते. या शिवाय फ्रांसचे तत्कालीन राष्ट्रपती वॅलरी ग्रिसकार्ड हेसुद्धा १९८०च्य प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.
‘आयएनएस कदमत’ युद्धनौकेचे जलावतरण
स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस कदमत’ या पाणबुडीविरोधी युद्धनौकेचे नौदलाचे प्रमुख ऍडमिरल आर. के. धवन यांच्या हस्ते जलावतरण करण्यात आले. या युद्धनौकेमधील बहुतांश भाग हे स्वदेशी बनावटीचे आहेत, मेक इन इंडिया प्रकल्पांतर्गत या युद्धनौकेची निर्मिती करण्यात आली आहे.
ही पाणबुडी ‘कॉरवेट्टी’ श्रेणीतील असून ‘गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड’ या डॉकयार्डमध्ये तिची निर्मिती करण्यात आली आहे. या युद्धनौकेमधील जवळपास ९० टक्के भाग हे स्वदेशी बनावटीचे आहेत. नौदलाची अंतर्गत संस्था ‘डायरेक्टोरेट ऑफ नॅव्हल डिझाइन’ने या युद्धनौकेचा आराखडा तयार केला आहे.
या युद्धनौकेवर ३-डी मीडियम रेंज एअर/ सरफेस सर्व्हायलन्स रडार असून ते ‘डीआरडीओ’ने विकसित केले असून, ’भारत इलेक्ट्रॉनिक्स’ने त्याची निर्मिती केली आहे. हे रडार शेकडो किलोमीटर अंतरावर असलेले लक्ष्य अगदी सहज टिपू शकते. अँटी-सबमरिन हेलिकॉप्टर देखील या युद्धनौकेवर चोवीस तास तैनात असेल.
पुढील पंधरा वर्षांमध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ), तसेच सरकारी आणि खासगी कंपन्यांच्या सहकार्याने आपल्या देशातच युद्धनौकांची निर्मिती करण्यात येणार आहे.
महेंद्रसिंह धोनीविरोधात अजामीनपात्र वॉरंट
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्याविरोधात आंध्रप्रदेशातील न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
हिंदूच्या धार्मिक भावना दुखावल्याचा धोनीविरुद्ध आरोप आहे. आंध्रप्रदेशातील अनंतपूर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरून त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.
एप्रिल २०१३ मध्ये एका मासिकाच्या मुखपृष्ठावर धोनीचे छायाचित्र छापण्यात आले होते. या छायाचित्रामध्ये धोनीला विष्णूच्या अवतारात दाखविण्यात आले होते. त्याच्या हातामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांची उत्पादने दाखविण्यात आली होती. त्याच्या एका हातात बूटही दाखविण्यात आले होते.
यावरून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करून धोनी आणि संबंधित कंपनीविरुद्ध विश्व हिंदू परिषदेचे नेते श्याम सुंदर यांनी गेल्यावर्षी या प्रकरणी याचिका दाखल केली.
हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान विष्णूला अशा पद्धतीने दाखवणे अवमानकारक असल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा