अंदमान-निकोबार बेटांना दक्षिणपूर्व आशिया, चीन, जपान आणि इतर पूर्वेकडचे देश यांचे समुद्री मार्ग आहेत. त्यामुळे या बेटांचे भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे.
त्यामुळे याठिकाणी भारताने पोसिएडोन-८१ विमानासोबत ड्रोन तैनात केले आहेत. शिवाय नौसेना आणि भारतीय वायू दल येथे इस्राएल बनावटीचे सर्चर-२ कॅटेगरीचे विमानसुद्धा अस्थायी स्वरूपात उतरवणार आहे.
चीन याठिकाणी न्यूक्लिअर आणि कन्वेंशनल पाणबुड्या वाढवत आहे. यामुळे समुद्री क्षेत्राला धोका निर्माण झाला आहे. चीनच्या अशा हालचाली पाहता भारताने येथे पोसिएडोन-८१ आणि स्पाय ड्रोन यांना तैनात केले आहेत.
तेजस विमान आंतराष्ट्रीय एअर शोमध्ये सहभागी होणार
संपूर्ण भारतीय बनावटीचे तेजस हे विमान प्रथमच आंतराष्ट्रीय एअर शोमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज आहे. २१ जानेवारी रोजी बहारिन येथे साखिर हवाई तळावर हा एअर शो आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने तेजस विमान प्रथमच परदेशी भूमीवर उतरणार आहे.
बहारिनमध्ये आयोजित हा एअर शो २३ जानेवारीपर्यंत चालणार असून या निमित्ताने भारतीय बनावटीच्या या वजनाने हलक्या पण शक्तिशाली लढाऊ विमानाची जगाला ओळख होणार आहे. या एअर शोमध्ये तेजस विमान आपली कौशल्ये व शक्ती दाखवून देईल.
एनएसईचा बनारस हिंदु विश्वविद्यालयाशी करार
आर्थिक क्षेत्रासाठी दोन नवे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) पुढाकार घेतला आहे. यासाठी एनएसईने बनारस हिंदु विश्वविद्यालयाशी करार केला आहे. या करारांतर्गत बी.कॉम हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करताना वित्त बाजार व्यवस्थापन यामध्ये ही पदवी घेता येईल. त्याचप्रमाणे एमबीए करताना ते वित्त व्यवस्थापन या विषयात करता येईल.
१९१५मध्ये विशेष कायद्यांतर्गत स्थापन झालेले बनारस हिंदु विश्वविद्यालय चालू आर्थिक वर्षापासूनच वरील दोन्ही अभ्यासक्रम राबवणार आहे.
व्यावसायिकदृष्ट्या कुशल व्यवस्थापक व उद्योजक तयार करणे, त्याद्वारे येत्या काही वर्षांत उद्योगजगताकडून येणारी या प्रकारच्या मनुष्यबळाची मागणी पूर्ण करणे हा यामागचा उद्देश आहे. या अभ्यासक्रमांमुळे कौशल्य उणीव भरून काढणे शक्य होईल.
क्रिस गेलचे वेगवान अर्धशतक
विंडीजचा स्फोटक फलंदाज क्रिस गेलने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याच्या युवराज सिंगच्या विश्वविक्रमाची बरोबरी साधली आहे.
त्याने युवीसारखेच १२ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विक्रम अद्यापही युवराजच्या नावे आहे. टी-२० क्रिकेटमध्ये हा विक्रम आता युवराज सिंग आणि क्रिस गेलच्या नावे संयुक्तपणे आहे.
गेलने लीगमध्ये मेलबर्न रेनेगेड्सकडून अॅडिलेड स्ट्राइकविरुद्ध हा विक्रम केला.
ज्येष्ठ नेते डॉ. दौलतराव आहेर यांचे निधन
राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. दौलतराव आहेर यांचे १९ जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.
१९८९ साली ते भाजप पक्षाकडून नाशिक मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. युती सरकारच्या काळात त्यांनी महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्रिपदाचा कारभार सांभाळला.
दौलतराव यांनी त्यांच्या कार्यकाळात वसंतदादा सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा, असा आग्रह धरला होता. याशिवाय, आहेर यांनी आमदारकीपासून खासदार, मंत्री, तापी खोरे महामंडळाचे अध्यक्ष ही महत्त्वपूर्ण पदे भूषविली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा