भारताचा ६७वा प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. यानिमित्त राजपथावर भारताची ताकद आणि संस्कृतीची झलक पहायला मिळाली.
यंदा फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रांस्वा ओलांद प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमात सहभागी झाले होते.
६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताची राज्यघटना स्वीकारण्यात आली, तर २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना अमलात आणली गेली. हाच दिवस भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. राजपथावरील संचलन प्रजासत्ताक दिनाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते.
कर्नल संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्यचक्र
काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या कर्नल संतोष महाडिक यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मरणोत्तर शौर्यचक्र जाहीर करण्यात आले. लष्करी सेवेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जवानांना दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
कुपवाडा जिल्ह्यतील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हाजी नाका परिसरातील दाट जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या ४१ राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते.
महाडिक हे मूळचे सातारा जिल्ह्यातील पोगरवाडी गावचे रहिवासी आहेत. महाडिक यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात झाले.
१९९८ मध्ये ते लष्करात विशेष दलात दाखल झाले. अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना याआधी सेना पदकाने गौरविण्यात आले आहे.
भारताच्या स्टील उत्पादनात वाढ
जगातील अनेक देशांमध्ये स्टीलच्या उत्पादनात घट झाली असताना चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि अमेरिका या आघाडीच्या स्टील उत्पादक देशांच्या तुलनेत भारताच्या स्टील उत्पादनात उल्लेखनीय वाढ झाली आहे.
वर्ल्ड स्टील असोसिएशनने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारताचे २०१४ मधील स्टील उत्पादन ८.७३ कोटी टन होते. हे उत्पादन २०१५ मध्ये वाढले आणि ८.९६ कोटी टन एवढ्यावर जाऊन पोहोचले.
स्टील पायाभूत विकासाकरिता लागणारा एक महत्त्वाचा धातू आहे. ही बाब लक्षात घेऊन स्टीलच्या उत्पादनाकडे बघितल्यास देशाच्या विकासाचा वेग वाढला आहे, असे म्हणता येईल.
जगाचा विचार केल्यास २०१५ मध्ये स्टीलचे उत्पादन १६२ कोटी २८ लाख टन एवढेच होते. स्टीलच्या उत्पादनात २००९ नंतर आलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी मंदी आहे.
या मंदीच्या काळातही विकासाचा वेग वाढल्यामुळे भारताच्या स्टीलच्या उत्पादन आणि विक्रीत वाढ दिसत आहे. २००९ मध्ये जगाचे स्टीलचे उत्पादन १२३.८८ कोटी टन एवढ्यावर पोहोचले होते आणि २००८ मध्ये स्टीलच्या उत्पादनाने १३४.३४ कोटी टन एवढी मजल मारली होती.
भारत-फ्रान्स राफेल जेट खरेदी करारावर स्वाक्षऱ्या
भारत-फ्रान्स यांच्यातील राफेल जेट विमाने खरेदीच्या आंतर सरकारी करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. असे असले तरी या कराराला अंतिम स्वरूप देता आलेले नाही. यात काही आर्थिक बाबींच्या अडचणी असून त्या दोन दिवसांत दूर केल्या जातील.
ओलांद व पंतप्रधान मोदी यांनी एकूण चौदा करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. दोन्ही देशांत ३६ रफाल विमानांच्या खरेदीचा करार झाला असून त्याची घोषणा एप्रिलमध्ये मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यातच करण्यात आली होती.
साठ हजार कोटी रुपये किमतीची ही विमाने असून फ्रान्सचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ वाटाघाटी करीत आहे. संरक्षण सहकार्याशिवाय दोन नेत्यांनी दहशतवादाच्या मुकाबल्यावर भर दिला आहे.
खालिदा झिया यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांच्यावर ढाका येथील न्यायालयात देशद्रोहाची फिर्याद दाखल करण्यात आली.
१९७१ च्या बांगलादेशमुक्ती युद्धातील हुतात्म्यांबाबत अवमानकारक विधाने केल्याने गृहमंत्रालयाने परवानगी दिल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
संक्षिप्त सुनावणीनंतर दंडाधिकाऱ्यांनी झिया यांना ३ मार्च रोजी न्यायालयापुढे हजर राहण्याचा आदेश दिला आहे.
२१ डिसेंबर २०१५ला खालिदा झिया यांनी एका कार्यक्रमात बांगलादेश मुक्ती युद्धात नेमके किती लोक हुतात्मे झाले याबाबत शंका व्यक्त केली होती. झिया यांचा बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी हा पक्ष मूलतत्त्ववादी जमाते इस्लामीचा मित्र पक्ष असून त्यांचा बांगलादेशच्या स्वातंत्र्यास विरोध होता.
गुजरातमध्ये सापडले डायनोसॉरचे जीवाश्म
गुजरातमध्ये जर्मन पुरातत्त्व वैज्ञानिकांसह दोन भारतीयांनी केलेल्या उत्खननात डायनोसॉरचे जीवाश्म सापडले आहेत.
कच्छ जिल्ह्यात कासदुनगर टेकडय़ांच्या परिसरात हे उत्खनन करण्यात आले असून तेथे सापडलेले जीवाश्म १६ अब्ज वर्षांपूर्वीचे आहेत.
गुजरातमध्ये आणखी १५० भूगर्भीय स्थळे शोधण्यात आली आहेत. जेथे आणखी जीवाश्म सापडू शकतात किंबहुना तेथे प्राचीन अवशेषही मिळण्याची शक्यता आहे.
द. आफ्रिकेच्या गुलाम बोदीवर २० वर्षांची बंदी
सामनानिश्चितीची कबुली देणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या गुलाम बोदीवर दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने २० वर्षांची बंदी घातली आहे.
दक्षिण आफ्रिकेतील रॅम स्लॅम स्थानिक ट्वेन्टी-२० स्पर्धेदरम्यान लढतींचे निकाल निश्चित केल्याप्रकरणी दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने केलेल्या चौकशीत बोदी दोषी असल्याचे स्पष्ट झाले.
बोदीवरील बंदी तात्काळ लागू झाली असून, त्याला कोणत्याही आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच स्थानिक लढतीत सहभागी होता येणार नाही. मात्र या कालावधीत गैरप्रकार रोखण्यासाठी आयोजित अभ्यास शिबिरात सहभागी होणे बोदीसाठी अनिवार्य असेल.
३७ वर्षीय भारतीय वंशाच्या बोदीने दोन एकदिवसीय आणि एकमेव ट्वेन्टी-२० लढतीत दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले असून, २०१२ मध्ये इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा भाग होता. गुजरातमधील हथुरान हे बोदीचे जन्मस्थान आहे.
लैंगिक अत्याचारप्रकरणी योगा गुरू बिक्रम चौधरींना दंड
भारतीय वंशाचे अमेरिकी गुरू बिक्रम चौधरी यांना न्यायालयाने महिला वकिलाचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी ९.२४ लाख डॉलर्सची नुकसानभरपाई ठोठावली आहे.
चौधरींसाठी काम करताना, लैंगिक भेदभाव, चुकीच्या पद्धतीने काम काढून घेणे आणि लैंगिक छळ या गोष्टींना सामोरे जावे लागल्याचा आरोप मिनाक्षी जफा बोडेन यांनी केला होता.
चौधरींवर एका विद्यार्थिनीने बलात्काराचा आरोपही केला होता. यासह चौधरींविरोधात असलेल्या अन्य मुलींच्या तक्रारीची चौकशीही मिनाक्षी करत होत्या.
१९७१ मध्ये कॅलिफोर्नियाला गेल्यानंतर बिक्रम चौधरींनी योगाच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून साम्राज्य उभं केलं. त्यांच्या पद्धतीमध्ये १०४ अंश सेल्सियस एवढं तापमान असलेल्या खोलीत ९० मिनिटांमध्ये योगाचे २६ प्रकार करण्यात येतात. या चौधरींविरोधात लैंगिक अत्याचारासी संबंधित आणखी प्रकरणेही सुरू आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा