विराट कोहलीला पॉली उम्रीगर पुरस्कार
- भारतीय संघाचा कसोटी क्रिकेटमधील कर्णधार म्हणून जोमाने सुरवात करणारा विराट कोहली या वर्षीचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू ठरला आहे. बीसीसीआयच्या वतीने विराटला पॉली उम्रीगर पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. महिला क्रिकेटमध्ये या पुरस्काराचा मान मिताली राज हिला मिळाला आहे.
- २७ वर्षांच्या विराट कोहलीने यंदा १५ कसोटींमध्ये ४२.६७ सरासरीने ६४० धावा केल्या आहेत. २० वनडेंमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना कोहलीने ३६.६५च्या सरासरीने ६२३ धावा केल्या.
- मितालीने यावर्षी वनडेमध्ये पाच हजार धावांचा पल्ला पूर्ण केला. अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिली, तर जागतिक क्रिकेटमधील दुसरी महिला फलंदाज ठरली. मितालीला एम. ए. चिदंबरम ट्रॉफी देऊन गौरवण्यात येणार आहे.
- सय्यद किरमाणी यांना त्यांच्या भारतीय क्रिकेटमधील योगदानासाठी सी. के. नायडू जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
- रणजी ट्रॉफी, इराणी कप व विजय हजारे ट्रॉफी जिंकणाऱ्या कर्नाटक क्रिकेट असोसिएशनला सर्वोत्तम क्रिकेट असोसिएशनचा पुरस्कार दिला जाणार आहे.
- उथप्पाला पुरस्कार कर्नाटकच्या रॉबिन उथप्पाने गेल्या रणजी मोसमात ५०.६६च्या सरासरीने ११ सामन्यांमध्ये ९१२ धावा केल्या होत्या. याबद्दल त्याला माधवराव शिंदे पुरस्कारने गौरवण्यात येणार आहे.
- गेल्या रणजी मोसमात सर्वाधिक विकेट्स टिपणारा कर्नाटकचा विनयकुमार व मुंबईचा शार्दूल ठाकूर (प्रत्येकी ४८ मोहरे) यांनाही गौरवण्यात येईल.
ट्विटर वरील चर्चेत नरेंद्र मोदी आघाडीवर
- सोशल मीडिया अॅनालिटिक्स फर्म ब्लूओशियन मार्केट इंटेलिजेंसच्या अहवालानुसार वर्ष २०१५मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख करून सर्वात जास्त ट्वीट झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर सलमान खान आहे तर भारत-पाकिस्तानच्या विश्वचषकातील सामन्याची चर्चा तिसऱ्या क्रमांकाची ठरली आहे.
- अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा आणि प्रजासत्ताक दिन समारंभासाठी त्यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती ट्विटरवर सर्वाधिक चर्तेत राहिली.
हे मुद्दे होते आघाडीवर | |
---|---|
नाव | एकूण किती ट्वीटमध्ये चर्चा (लाख) |
नरेंद्र मोदी | ३४,१६,००० |
सलमान खान | २७,२९,००० |
इंडिया-पाक ICC वर्ल्ड कप २०१५ मॅच | १७,००,००० |
इंडियन प्रीमियर लीग (IPL) | १४,९८,००० |
इन्टॉलरेन्स | ८,००,००० |
कनिष्ठ पदांच्या मुलाखती बंद
- नव्या वर्षातील पहिल्या दिवसापासून कनिष्ठ पदांच्या सरकारी नोकरीसाठी मुलाखती रद्द करण्याचे निर्देश केंद्र सरकारने सर्व मंत्रालयांना, तसेच सर्व शासकीय आस्थापनांना दिले आहेत.
- १ जानेवारीपासून ‘क’ संवर्गासह, ‘ब’ संवर्गातील अराजपत्रित पदांसह अन्य समान दर्जाच्या पदांसाठीच्या मुलाखती रद्द करण्यात येणार आहेत. पुढील दोन दिवसांमध्ये पदांची भरती आणि मुलाखतींचा संबंध काढून टाकण्यासाठीची प्रक्रिया करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- ज्या पदांची भरती करताना आवश्यक ती कौशल्य तसेच शारीरिक चाचणी पूर्ववत सुरु ठेवण्याबाबतही सांगण्यात आले आहे. पदांच्या भरतीसाठीची यापुढील सर्व प्रक्रिया मुलाखतीशिवाय राबविण्यात येणार आहेत.
- भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवून पदांच्या भरतीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखती रद्द करण्याची अलिकडेच घोषणा केली होती.
हरविलेल्या मुलांसाठी ‘ऑपरेशन स्माइल-२’
- हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी तसेच त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी ओडिशा सरकारने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन स्माइल’ या मोहिमेला पहिल्या टप्प्यात चांगले यश आल्याने या मोहिमेचा दुसरा टप्पा नव्या वर्षात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- गुन्हे शाखेच्या कटक येथील मुख्यालयामध्ये झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस विविध जिल्ह्यांमधील शंभर पोलिस अधिकारी उपस्थित होते. या मोहिमेसाठी दहा पोलिसांची पथके स्थापन करण्यात आली आहेत.
बराक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
- जहाजाच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करण्याची क्षमता असलेल्या बराक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ‘आयएनएस कोलकता’ या विनाशिकेवरून घेण्यात आली.
- नौदलाच्या जहाजाच्या पृष्ठभागावरून हवेतील लक्ष्याचा वेध घेणाऱ्या बराक क्षेपणास्त्राची मारक क्षमता सुमारे ७० किलोमीटर एवढी आहे. नौदलाकडे असलेल्या क्षेपणास्त्रांच्या ताफ्यात लवकरच ‘बराक’चा समावेश केला जाणार आहे.
- अरबी समुद्रात सध्या नौदलाचा सराव सुरू आहे. या सरावादरम्यान ‘बराक’ची चाचणी घेण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारतीय नौदलाने इस्राईलच्या मदतीने ही चाचणी घेतली.
- इस्राईल एरोस्पेस इंडस्ट्रीज आणि हैदराबाद येथील ‘डीआरडीओ’च्या प्रयोगशाळेने संयुक्तपणे ‘बराक’ची निर्मिती केली आहे.
गिनी देश इबोला व्हायरसमुक्त
- जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गिनी देश इबोला व्हायरसमुक्त झाल्याचे ३० जानेवारी रोजी जाहीर केले. गेली दोन वर्षे देशात इबोलाने २५०० लोकांचे प्राण घेतले.
- इबोलामुळे सिएरा लिओन व लायबेरियात ९ हजारपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले. यापैकी सिएरा लिओन नोव्हेंबरमध्ये व्हायरसमुक्त जाहीर झाला. परंतु लायबेरियात सप्टेंबरमध्ये इबोला मुक्त जाहीर होऊनही काही रुग्ण आढळले आहेत.
- इबोलाचे वरील तीन देशांवर सामाजिक परिणाम खूप झाले आहेत. बीबीसीच्या वृत्तानुसार जवळपास ६ हजार मुलांनी आपले पालक, एक वा दोन्ही गमावले आहेत. सुमारे शंभरावर आरोग्य कर्मचारी इबोलाला बळी पडले. आजही बरे झालेले हजारो रुग्ण त्याच्या दहशतीखाली व संभाव्य परिणामांच्या छायेखाली जगत आहेत.
- इबोलामुळे २० डिसेंबर पर्यंत झालेले मृत्यू : १३३१५
असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी स्मार्ट कार्ड
- असंघटित क्षेत्रातील ४० कोटी कामगारांना जानेवारीअखेरपासून टप्प्याटप्प्यात यू-विन (असंघटित कामगार ओळख क्रमांक) हे स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे.
- कामगारांना या कार्डद्वारे राष्ट्रीय आरोग्य विमा, आम आदमी विमा आणि पेन्शन योजनेसह विविध कल्याणकारी योजनांचा फायदा घेता येईल. त्यामुळे कामगारांना सामाजिक सुरक्षा कवच मिळेल.
- पहिल्या टप्प्यात बांधकाम कामगार, ऑटोरिक्षा आणि सायकलरिक्षा या क्षेत्रांचा समावेश होईल.
- केंद्रीय कामगारमंत्री : बंडारू दत्तात्रेय
IAS सालोदिया यांनी स्वीकारला इस्लाम
- राजस्थानचे वरिष्ठ IAS अधिकारी उमराव सालोदिया यांनी हिंदू धर्माचा त्याग करत इस्लाम धर्म स्वीकारला, सालोदियाऐवजी आता त्यांनी खान हे अडनाव धारण केले आहे. सहा महिन्यानंतर ते भारतीय सेवेतून निवृत्त होणार आहेत.
- ‘दलित असल्याने हिंदू धर्मात त्यांच्यावर अन्याय केला गेला. त्यांना मुख्य सचिव बनवले गेले नाही. मुस्लीम धर्मात असा भेदभाव नाही,’ या कारणामुळे त्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा