मुफ्ती मोहम्मद सईद यांचे निधन
- जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचे ७ जानेवारी रोजी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये निधन झाले. २२ डिसेंबर पासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.
- गेल्या वर्षी मार्चमध्ये राज्यात पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)-भाजप सत्तेत आल्यानतंर ते मुख्यमंत्री झाले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांची कन्या आणि पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार आहेत.
एचएमटी कंपनी बंद
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने घड्याळ बनवणाऱ्या कंपन्या एचएमटी वॉचेस आणि एचएमटी चिनार वॉचेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
- याच समूहाची आणखी एक कंपनी एचएमटी बेअरिंग्जदेखील बंद होणार आहे. या तीनही कंपन्या अनेक दिवसांपासून तोट्यात आहेत. या कंपन्यांना पुन्हा सुरू करणे शक्य नसल्याचे सरकारने म्हटले आहे.
- या निर्णयामुळे सुमारे एक हजार कामगार बेरोजगार होणार आहेत. या कर्मचाऱ्यांसाठी चांगले व्हीआरएस पॅकेज देण्यात येत असल्याचा दावा सरकारच्या वतीने करण्यात आला आहे.
- कंपनी बंद करणे आणि व्हीआरएसचे पैसे देण्यासाठी मंत्रीमंडळाने ४२७ कोटी ४८ लाख रुपयांना मंजूरी दिली आहे. तसेच कंपनीची चल-अचल मालमत्ता सरकारी धोरणाप्रमाणे विक्री होणार आहे.
- अवजड उद्योग विभागाअंतर्गत उत्पादन, कंसल्टेंस आणि कॉन्ट्रॅक्टिंग करण्यात आलेले ३१ केंद्रीय उपक्रम आहेत. यातील १२ नफ्यात तर उर्वरीत १९ उद्योग तोट्यात सुरु आहे.
- सप्टेंबर २०१४ मध्येच सरकारने एचएमटीला बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच तुंगभद्रा स्टील आणि हिंदुस्तान केबल्स या कंपन्या बंद करण्यास मंत्रीमंडळाने या पूर्वीच तत्वत: मंजूरी दिली आहे.
औरंगाबादमधील कंपनी चालू राहणार
- एचएमटीच्या औरंगाबादेतील कंपनीत दूध डेअरीसाठीचे युनिट इतर मशीन टूल्स बनतात. येथे सध्या ८० कर्मचारी आहेत. केंद्राची आर्थिक मदत घेता कर्मचाऱ्यांनी कंपनी नफ्यात आणली. त्यामुळेच ही कंपनी बंद होणार नाही.
इंधनासाठी एप्रिल २०२० पासून बीएस-६ मानक
- सरकारने गाड्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी एप्रिल २०२० पासून बीएस-५ (भारतीय मानक) ऐवजी थेट बीएस-६ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे मानक गाड्यांतून उत्सर्जित होणाऱ्या प्रदूषण घटकांशी संबंधित आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने एक एप्रिल २०२० पासून देशभरात बीएस-६ इंधनाच्या पुरवठ्याचे आश्वासन दिले आहे.
- केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते.
- मंत्रालयाने याआधी जारी अधिसूचनेत एप्रिल २०२१ पासून बीएस-६ लागू करणार असल्याचे म्हटले आहे. २०१९ पासून बीएस-५ लागू होणार होते.
- सध्या देशातील उत्तर राज्यात आणि उर्वरित भागातील ३३ शहरांमध्ये केवळ बीएस-४ इंधन पुरवठा केला जातो. उर्वरित देशात बीएस-३ श्रेणीचे इंधन दिले जाते. एप्रिल २०१७ पासून संपूर्ण देशात बीएस-४ श्रेणीतील इंधन मिळेल.
नमामि गंगे योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण प्रकल्प सुरु
- केंद्राच्या नमामि गंगे योजनेअंतर्गत खासगी आणि सरकारी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. याद्वारे शुद्ध करण्यात आलेल्या पाण्याची खरेदी रेल्वे विभाग करणार आहे.
- कंपनी कायद्यानुसार सुरु होणारा हा विशेष प्रकल्प आहे. त्यासाठी सरकारने यंत्रणेचे स्वरूप, नियामक मंडळ, बाजारपेठ इत्यादी सर्व मुद्द्यांचा विचार करून त्याची उभारणी करण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू केले जाणार आहेत.
- गंगा नदीच्या पाण्यावर ही प्रक्रिया केली जाणार आहे. जलस्रोत मंत्रालयाने अगोदरच रेल्वेशी करार केला आहे. त्यानुसार रेल्वे अशा प्रकल्पातील शुद्धीकरण केलेले पाणी खरेदी करेल. रेल्वेप्रमाणेच ऊर्जा, पेट्रोलियम आणि उद्योग मंत्रालयाशीदेखील काही करार होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबईत हेली-टुरिझमला प्रारंभ
- महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने ‘पवन हंस लिमिटेड’ या कंपनीबरोबर सहकार्य करार करून मुंबईत हेली-टुरिझमला प्रारंभ केला आहे. भारतात अशाप्रकारे राबवण्यात आलेला हा पहिलाच उपक्रम आहे.
- राज्याचे प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते या हवाई पर्यटनाचा शुभारंभ करण्यात आला. १० मिनिटांच्या या आनंदयात्रेसाठी जुहू विमानतळावरून दररोज हे हेलिकॉप्टर उपलब्ध असतील.
- ‘हेली-टुरिझममुळे पर्यटकांना अधिकाधिक चांगला अनुभव मिळावा, अशी मूळ संकल्पना असणाऱ्या या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातल्या पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे.
- हेलिकॉप्टर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांना करांसहित प्रतिव्यक्ती ३२,००० रुपये शुल्क भरावे लागेल.
- सुरुवातीच्या टप्प्यात केवळ मुंबई दर्शन यात्रा पर्यटकांना घडवली जाईल. पुढे त्यात एलिफंटा बेट, अजिंठा आणि वेरूळची लेणी, शिर्डी या ठिकाणांचाही समावेश केला जाणार आहे.
अमिताभ बच्चन “अतुल्य भारत” या मोहिमेचे सदिच्छादूत
- गेल्या दहा वर्षांपासून “अतुल्य भारत” या मोहिमेच्या ब्रॅण्ड अॅम्बेसडरपदी आमिर खान होता. परंतु आता अतुल्य भारत मोहिमेच्या जाहिरातील अभिनेता आमिर खानऐवजी अमिताभ बच्चन दिसणार आहेत. आमिर खानबरोबरचा करार संपल्यानंतर आता पर्यटन मंत्रालयाने अमिताभ बच्चन यांची नियुक्ती केली आहे.
- यापूर्वी, नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना, अमिताभ बच्चन हे गुजरात पर्यटन खात्याच्या 'खुशबू गुजरात की' या मोहिमेचे ब्रँड अॅम्बेसिडर होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा