चालू घडामोडी : २१ जानेवारी


अर्थमंत्री अरुण जेटलींचा इंग्लंड दौरा

    Arun Jaitley
  • भारत आणि इंग्लंडमध्ये पायाभूत सोयीसुविधा आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील आर्थिक सहकार्य दृढ करण्यावर सहमती झाली आहे. या शिवाय दोन्ही देशांनी करचुकवेगिरीप्रकरणी संयुक्त चौकशी करण्यावरही सहमती दर्शवली आहे.
  • अर्थमंत्री अरुण जेटली व इंग्लंडचे अर्थमंत्री जॉर्ज ओसबॉर्न यांच्यात आठव्या इंडिया-यूके आर्थिक आणि वित्तीय परिषदेदरम्यान चर्चा झाली.
  • या चर्चेत दोन्ही देशांतील वित्तीय मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी, मध्यवर्ती बँकांचे प्रतिनिधी आणि नियामकांनी भाग घेतला.
  • आर्थिक सहकार्य दृढ करण्याबरोबरच दोन्ही देशांतील व्यापार आणि गुंतवणूक वाढविण्यासंदर्भातही जेटली आणि ओसबॉर्न यांच्यात चर्चा झाली.
  • जगभरातील अर्थव्यवस्था बिकट अवस्थेतून जात असताना, भारतीय अर्थव्यवस्था मात्र निर्धारित विकासदराकडे मार्गक्रमण करीत आहे.

मृणालिनी साराभाई यांचे निधन

  • सुप्रसिद्ध नृत्यांगणा मृणालिनी साराभाई अहमदाबाद येथील रुग्णालयात वृद्धापकाळानं निधन झाले. त्या ९७ वर्षांच्या होत्या.
  • भारतीय अंतराळ संशोधन मोहिमेचे जनक दिवंगत शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या त्या पत्नी होत.
 कारकीर्द 
  • केरळमधील स्वामिनाथन या प्रतिष्ठित कुटुंबात मृणालिनी साराभाई यांचा जन्म झाला. त्यांची मोठी बहीण लक्ष्मी सेहगल या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील ‘राणी झाशी’ तुकडीच्या प्रमुख होत्या.
  • शांतिनिकेतनमध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्या मार्गदर्शनाखाली शिकण्याचे भाग्य मृणालिनी साराभाई यांना मिळाले. ‘अमेरिकन ऍकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्टस’मध्ये काही काळ शिक्षण घेतल्यानंतर त्या भारतात परतल्या.
  • येथे त्यांनी भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली. भरतनाट्यम आणि कथकली या शास्त्रीय नृत्यात त्या निपुण होत्या. नृत्यांगना, नृत्यदिग्दर्शक, मार्गदर्शक म्हणून त्यांनी नृत्यसेवा केली.
  • त्यांनी ३००हून अधिक नृत्यनाटकांचे दिग्दर्शन केले होते. तसेच अनेक पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत. कविता, नाटकांचे लेखन आणि लहान मुलांसाठी त्या गोष्टी लिहीत असत.
  • गुजरात राज्य हातमाग व हस्तकला विकास महामंडळाच्या त्या अध्यक्षा होत्या. सर्वोदय आंतरराष्ट्रीय ट्रस्ट आणि नेहरू फाउंडेशन फॉर डेव्हलपमेंटचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
  • नृत्य प्रशिक्षणासाठी १९४८मध्ये त्यांनी दर्पण अकादमीची स्थापना केली. या अकादमीतून हजारो विद्यार्थी त्यांनी घडविले आहेत.
 पुरस्कार व आत्मचरित्र 
  • नृत्यातील योगदानासाठी त्यांना १९६५मध्ये ‘पद्मश्री’, तर १९९२मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ब्रिटनमधील नॉर्विच येथील ईस्ट अंजेलिया विद्यापीठाने ‘डी.लिट’ देऊन त्यांचा सन्मान केला.
  • ‘मृणालिनी साराभाई : द व्हॉइस ऑफ द हार्ट’ या नावाचे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.

अमिताभ बच्चन आणि प्रियांका चोप्रा 'अतुल्य भारत'चे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर

  • केंद्र सरकारच्या 'अतुल्य भारत' अभियानासाठी महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
  • हे दोघेही वेगवेगळ्या जाहिरातींमध्ये दिसणार असून पुढील तीन वर्षांसाठी त्यांना करारबद्ध करण्यात आले आहे.
  • अभिनेता आमीर खान अतुल्य भारत मोहिमेचा ब्रॅंड अॅम्बेसिडर होता. मात्र त्यांच्याशी करण्यात आलेला करार संपुष्टात आल्यानंतर संबंधित कंपनीने त्याचे नुतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला.
  • ‘अतिथी देवो भव’ या मोहिमेसाठी ‘मॅक कॅन वर्ल्डवाइड’ या एजन्सीशी पर्यटन विभागाने करार केला होता. या एजन्सीने आमीर खानला ब्रॅंड अॅम्बेसिडर म्हणून निवडले होते.
  • मॅक कॅनशी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात २ कोटी ९६ लाख रुपयांचा हा करार झाला होता. तो आता संपुष्टात आला आहे.

विराट कोहली सर्वाधिक शतकांच्या यादीत चौथ्या स्थानी

  • भारताच्या विराट कोहलीने श्रीलंकेच्या कुमार संगकाराला मागे टाकत सर्वाधिक शतकांच्या यादीत चौथे स्थान पटकावले. याचबरोबर कोहली सर्वाधिक जलद २५ शतके पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे.
  • कोहली आणि संगकारा यांची प्रत्येकी २५ वन-डे शतके झाली आहेत. मात्र, कोहलीने १६२ डावांत ही कामगिरी केली आहे, तर संगकाराने ३८० डावांत २५ शतके झळकावली आहेत.
  • सर्वाधिक शतकांचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या नावावर आहे. सचिनने ४५२ डावांत ४९ शतके ठोकली आहेत. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया रिकी पाँटिंग दुसऱ्या (३० शतके) आणि श्रीलंकेचा सनथ जयसूर्या तिसऱ्या (२८ शतके) क्रमांकावर आहे.

महामना एक्सप्रेस

  • वाराणसी-नवी दिल्लीदरम्यान येत्या २२ जानेवारीपासून ‘महामना एक्सप्रेस’ ही नवी गाडी धावणार आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी पं. मदनमोहन मालवीय यांच्या नावाने सुरू होणाऱ्या या गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ तारखेला हिरवा झेंडा दाखवतील.
  • नव्या स्वरूपाचे डबे आणि प्रवाशांसाठी अधिक सुविधा असलेली ही गाडी आठवड्यातून तीनदा धावेल. नवी ‘महामना एक्सप्रेस’ नवी दिल्लीहून दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सुटेल. वारणसीहून ही गाडी दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सुटेल.
  • नवी दिल्ली-वाराणसीदरम्यानचे सुमारे आठशे किलोमीटरचे अंतर ही गाडी तेरा तास पन्नास मिनिटांत पार करेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा