पहिल्या वीस स्मार्ट सिटींची यादी जाहीर
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेत निवड झालेल्या ९७ शहरांच्या प्रस्तावांच्या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात २० शहरांची यादी केंद्रीय शहरी विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी जाहीर केली आहे.
- या विजेत्या शहरात मध्य प्रदेशातल्या तीन; महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थानमधल्या प्रत्येकी दोन तर ओदिशा, केरळ, दिल्ली, आसाम आणि पंजाबमधल्या प्रत्येकी एका शहराचा समावेश आहे.
- या यादीत भुवनेश्वरने सर्वाधिक गुण मिळवले आहेत. त्याखालोखाल पुण्याचा क्रमांक आहे. तर सोलापूर नवव्या क्रमांकावर आहे.
- २०१६-१७ या वित्तीय वर्षात आणखी ४० स्मार्ट सिटींची निवड होणार असून त्यानंतरच्या २०१७-१८ या वित्तीय वर्षात उर्वरित शहरांची निवड होईल.
- या शहरांना पहिल्या दोन वर्षांत दोनशे कोटी तर पुढील तीन वर्षांत शंभर कोटी रुपये विकास कामांसाठी दिले जाणार आहेत.
- देशात शंभर स्मार्ट सिटींची निर्मिती करण्याचे आश्वासन लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपने दिले होते. पण जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश राज्यांनी एक-एक शहराचे नाव न दिल्यामुळे प्रस्तावित स्मार्ट सिटींची संख्या ९८ झाली आहे.
पहिल्या यादीतील शहरे | ||
---|---|---|
क्र. | शहर | राज्ये |
१ | भुवनेश्वर | ओदिशा |
२ | पुणे | महाराष्ट्र |
३ | जयपूर | राजस्थान |
४ | सूरत | गुजरात |
५ | कोची | केरळ |
६ | अहमदाबाद | गुजरात |
७ | जबलपूर | मध्य प्रदेश |
८ | विशाखापट्टणम | आंध्र प्रदेश |
९ | सोलापूर | महाराष्ट्र |
१० | दावणगिरी | कर्नाटक |
११ | इंदोर | मध्य प्रदेश |
१२ | नवी दिल्ली म्युनसिपल कॉन्सिल | दिल्ली |
१३ | कोइम्बतूर | तामिळनाडू |
१४ | काकीनाडा | आंध्र प्रदेश |
१५ | बेळगावी | कर्नाटक |
१६ | उदयपूर | राजस्थान |
१७ | गुवाहाटी | आसाम |
१८ | चेन्नई | तामिळनाडू |
१९ | लुधियाना | पंजाब |
२० | भोपाळ | मध्य प्रदेश |
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१६
- माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन चित्रपटांसाठीच्या १४व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ‘मिफ्फ २०१६’चे माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केले.
- ज्येष्ठ चित्रपट निर्माते श्याम बेनेगल आणि मिफ्फचे ब्रँड ॲम्बॅसिडर जॅकी श्रॉफ यांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे उद्घाटन झाले.
‘डब्ल्यूईएफ’च्या विशेष कार्यदलात रघुराम राजन
- इंग्लंडच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर मार्क कार्नी यांच्यासह भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासह एक विशेष कार्यदलात सामील झाले आहेत. जागतिक आर्थिक मंच (डब्ल्यूईएफ)ने जगभरातील वित्तीय व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी या कार्यदलाची स्थापना केली आहे.
- या कार्यदलात वित्तीय क्षेत्रातील काही बडय़ा नाममुद्रांचे प्रमुखही आहेत. बँक ऑफ अमेरिकाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन मॉयनिहान आणि एचएसबीसीचे अध्यक्ष डग्लस फ्लिंट यांचाही समावेश आहे.
- जागतिक आर्थिक मंचाकडून स्थापित हे कार्यदल तंत्रज्ञानात्मक नावीन्यता व त्यांची वित्तीय स्थिरता आणि वाढीच्या दृष्टीने भूमिका, देशोदेशींची नियामक व्यवस्था आणि पतधोरणांचा कल आणि मुख्यत: वित्तीय सेवा क्षेत्राची विश्वासार्हता या मुद्दय़ांबाबत अभ्यास करेल.
अरिंदम सेनगुप्ता यांचे निधन
- टाइम्स ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संपादक अरिंदम सेनगुप्ता यांचे २८ जानेवारी २०१६ रोजी निधन झाले. गेले अनेक दिवस ते कॅन्सरशी झुंज देत होते.
- सेनगुप्ता १९८८ ते १९९० या काळात टाइम्स ग्रुपमध्ये कार्यरत होते. १९९१ मध्ये ते पुन्हा ग्रुपमध्ये सहभागी झाले. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या समन्वय संपादक या पदावर काही काळ काम केल्यानंतर सेनगुप्ता यांनी वर्तमान पत्राच्या दिल्ली आवृत्तीचे संपादक म्हणूनही काम पाहिले. पुढे मार्च २००४ मध्ये ते टाइम्स ऑफ इंडियामध्ये कार्यरत झाले.
- टाइम्स ग्रुपमधील आपल्या संस्मरणीय कारकिर्दी दरम्यान सेनगुप्ता यांनी राजकारण, आंतरराष्ट्रीय मुद्दे, चित्रपट आणि संगीताबरोबर इतर अनेक विषयांवर केलेले लिखाण गाजले.
टीबॉक्समध्ये रतन टाटांची वैयक्तिक गुंतवणूक
- चहा व्यवसायातील नवउद्यमी टीबॉक्समध्ये रतन टाटा यांनी आपली नवी वैयक्तिक गुंतवणूक केली आहे.
- २०१२ ची स्थापना असलेली टीबॉक्स ही कंपनी भारतातील दार्जिलिंग, आसाम, निलगिरी तसेच नेपाळमधील चहा जगभरात निर्यात करते. कंपनीद्वारे विविध ९३ देशांमध्ये चहाची पोच होते.
- रतन टाटा यांनी यापूर्वी स्नॅपडील, कार्याह, उर्बन लॅडर, ब्ल्युस्टोन, कारदेखो, सबसे टेक्नॉलॉजिज, शिओमी, ओला आदी नवउद्यमी कंपन्यांमध्ये वैयक्तिक गुंतवणूक केली आहे.
- कलारी कॅपिटल, जंगल व्हेंचर्ससारख्या ई-कॉमर्समधील कंपन्यांच्या संचालक मंडळावर रतन टाटा हे सल्लागार म्हणूनही आहेत.
- टीबॉक्सचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी : कौशल दुगर
मोहित कम्बोज पुन्हा ‘आयबीजेए’चे अध्यक्ष
- सराफ उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए)’मध्ये सर्व घटकांचे व्यापक प्रतिनिधित्व मिळविण्याच्या दृष्टीने अलीकडेच झालेल्या निवडणुकीत २० सदस्यीय कार्यकारी मंडळाने माजी राष्ट्रीय अध्यक्ष मोहित कम्बोज यांची पुढील पाच वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून फेरनिवड केली.
- डिसेंबर २०१५मध्ये सराफाव्यतिरिक्त सोन्याचे व्यापारी, हिरे व्यापार, दळणवळण, बिगरबँकिंग वित्तीय संस्था, आभूषणांचे निर्माते असे या व्यवसायाशी निगडित अन्य घटक आणि या क्षेत्रात कार्यरत विविध मंडळांचे प्रतिनिधित्व मिळविण्यासाठी आयबीजेएचे कार्यकारी मंडळ बरखास्त करण्यात आले होते. तत्पश्चात २०१६ ते २०२१ सालच्या कार्यकारी मंडळासाठी निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात आली.
हीना सिधू व क्यान चेनाईचा रिओ ऑलिम्पिकमधील प्रवेश निश्चित
- भारताची दिग्गज नेमबाजपटू हीना सिधूने दिल्लीत सुरू असलेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावून रिओ ऑलिम्पिकमधील प्रवेश निश्चित केला.
- रिओ ऑलिम्पिकमध्ये स्थान निश्चित करणारी ती नववी नेमबाजपटू ठरली आहे. हीनाने संपूर्ण स्पर्धेत वर्चस्व गाजवताना ११९.४ गुणांची कमाई केली.
- ट्रॅप नेमबाज क्यान चेनाईने देखील आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरी स्पर्धेद्वारे रिओ ऑलिम्पिकमधील प्रवेश निश्चित केला आहे. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा क्यान दहावा नेमबाज ठरला आहे.
वेमुला आत्महत्या प्रकरणासाठी न्यायिक आयोगाची स्थापना
- हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अशोककुमार रूपनवाल यांच्या नेतृत्वाखालील एक सदस्यीय न्यायिक आयोगाकडे सोपविली आहे.
- निवृत्त न्यायाधीश रूपनवाल हे घटनाक्रमाचा, स्थितीचा आढावा घेतील आणि वस्तुस्थिती जाणून घेतील. या आयोगाला तीन महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
- मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सत्यशोधन समितीने याआधीच आपला अहवाल सरकारला सादर केला आहे.
इंद्रजीत सिंह रेयत यांची कारागृहातून सुटका
- एअर इंडिया कनिष्कमध्ये १९८५मध्ये झालेल्या स्फोटातील एकमेव दोषी इंद्रजीत सिंह रेयत हे कारागृहाबाहेर आले आहेत.
- या विमानस्फोटात सर्व ३२९ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. एअर इंडियाचे हे विमान माँट्रियल (कॅनडा) येथून लंडनमार्गे भारताकडे जात होते.
- या स्फोटाप्रकरणी रिपुदमन सिंह मलिक आणि अजायबसिंह बागरी यांच्यावरील सुनावणी दरम्यान न्यायालयात चुकीची माहिती दिल्याप्रकरणी २०१० मध्ये इंद्रजीतसिंह रेयत यांना दोषी ठरविण्यात आले होते. त्यांना दहा वर्षांची शिक्षा सुनाविण्यात आली होती.
- रेयत हे पंजाबहून कामासाठी कॅनडात आले होते. त्यांनी डायनामाईट, डिटोनेटर्स आणि बॅटरी खरेदी केल्या होत्या. त्यांच्या मदतीने विमानात स्फोट घडवून आणण्यात आले होते.
अमेरिकेत 'जिका' या विषाणूचे थैमान
- एडिस डासांद्वारे फैलावणाऱ्या 'जिका' या विषाणूने कॅरेबियनसह उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत थैमान घातले आहे. कॅरेबियन, तसेच उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील २१ देशांत या विषाणूचा प्रसार झाला आहे.
- उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील सर्व देशांमध्ये त्याचा फैलाव होऊ शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
- 'जिका' विषाणूची लागण झालेल्या रुग्णामध्ये ताप, डोकेदुखी अशी लक्षणे दिसून येतात. या विषाणूची लागण झालेल्या गर्भवती महिला सामान्य आकारापेक्षा लहान डोके असलेल्या बाळांना जन्म देत असल्याचे समोर आले आहे.
- या पार्श्वभूमीवर अल साल्वाडोर या देशाने २०१८पर्यंत महिलांनी गर्भवती राहू नये, अशा सूचना दिल्या आहेत. कोलंबिया, जमैका, होंडुरास या देशांनीही महिलांनी काही महिन्यांपर्यंत गर्भवती राहू नये, अशा सूचना दिल्या आहेत.
- ब्राझिलमध्ये आतापर्यंत सुमारे दहा लाख जणांना या 'जिका' विषाणूची लागण झाली आहे. येथे ३८९३ बालकांमध्ये मायक्रोसेफॅली हा विकार आढळला आहे. या रोगामुळे चेतासंस्थेच्या वाढीत बाधा उत्पन्न होऊन बालकाच्या डोक्याचा आकार लहान राहतो. याचा विपरीत परिणाम मेंदूच्या विकासावर होतो.
- जगात 'जिका' विषाणूची लागण किती जणांना झाली आहे याची आकडेवारी उपलब्ध नाही. परंतु त्याविरोधात तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.
उत्तर प्रदेशच्या लोकायुक्तपदी न्या. संजय मिश्रा
- १६ डिसेंबर २०१५ला दिलेला स्वत:चा आदेश मागे घेत सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती संजय मिश्रा यांना उत्तर प्रदेशचे नवे लोकायुक्त नेमले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा