चालू घडामोडी : १६ जानेवारी


तेल व वायू संवर्धनात महाराष्ट्र सर्वोत्तम

  • तेल व वायू संवर्धन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट्राला देशातील सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
  • केंद्रीय पेट्रोलियम व गॅस मंत्रालयांतर्गत कार्य करणाऱ्या पेट्रोलियम संवर्धन संशोधन मंडळाच्या वतीने केंद्रीय पेट्रोलियम व गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते हा पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय आणि अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांनी स्वीकारला.
  • या कार्यक्रमात राज्यातील उरण येथील तेल व वायू महामंडळाच्या प्रकल्पाला तेल व वायू संवर्धनासाठी देशातील सर्वोत्तम आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त संस्थेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • गेल्या वर्षभरात तेल व वायू संवर्धनासाठी उत्तम प्रकारे कार्य करणाऱ्या राज्यांचा अभ्यास करून हा पुरस्कार महाराष्ट्राला प्रदान करण्यात आला.
  • केंद्र सरकराच्या मार्गदर्शनाखाली जानेवारी २०१५मध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये तेल व वायू संवर्धनाच्या दिशेने कामास सुरवात झाली.
  • तेल व वायू संवर्धनाबाबत एका वर्षात राज्यात एकूण २०,४१७ संवर्धन कार्यक्रम यशस्वीपणे राबविले म्हणून मोठ्या राज्यांच्या गटात महाराष्ट्राची सर्वोत्तम राज्य म्हणून निवड झाली.

फिल्मफेअर पुरस्कार २०१६

  • बॉलिवूडमधील प्रतिष्ठेचे समजल्या जाणाऱ्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळा मुंबईमध्ये पार पडला.
  • यावेळी रणवीरसिंग, दीपिका पदुकोण व प्रियांका चोप्रा यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले.
  • ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाला एकूण नऊ पुरस्कार मिळाले. यापाठोपाठ पिकू चित्रपटाने सर्वाधिक म्हणजे पाच पुरस्कार मिळाले.
फिल्मफेअर पुरस्कार विजेते
सर्वोत्कृष्ट अभिनेतारणवीरसिंग (बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीदीपिका पदुकोण (पिकू)
सर्वोत्कृष्ट चित्रपटबाजीराव मस्तानी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकसंजय लीला भन्साळी (बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख दिग्दर्शकनीरज घेवान (मसान)
सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख अभिनेत्रीभूमी पेडणेकर (दम लगा के हैशा)
सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख अभिनेतासुरज पांचोली (हिरो)
समीक्षकांनी निवडलेला सर्वोत्कृष्ट चित्रपटपिकू
समीक्षकांनी निवडलेला सर्वोत्कृष्ट अभिनेताअमिताभ बच्चन (पिकू)
समीक्षकांनी निवडेलली सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीकंगना राणावत (तनू वेड्स मनू रिटर्न्स)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीप्रियांका चोप्रा (बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेताअनिल कपूर (दिल धडकने दो)
जीवनगौरव पुरस्कारमौसमी चॅटर्जी
सर्वोत्कृष्ट संगीतअंकित तिवारी, मीत ब्रॉस, अंजान आणि अमाल मलिक (रॉय)
सर्वोत्कृष्ट गायिकाश्रेया घोषाल (दिवानी मस्तानी)
सर्वोत्कृष्ट गायकअर्जित सिंग (सुरज डुबा है)
सर्वोत्कृष्ट कथाविजयेंद्र प्रसाद (बजरंगी भाईजान)


सिडनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सानिया-मार्टिना विजयी

    Saniya-Martina Wins Sydney International
  • सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस या जोडीने सातत्यपूर्ण खेळ करताना सिडनी आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले. याबरोबरच त्यांनी सलग ३० सामन्यांत अपराजित राहण्याचा विक्रम प्रस्थापित केला.
  • सानिया-मार्टिनाने अंतिम सामन्यात कॅरोलीन गार्सिया आणि क्रिस्टीना मॅलडेनोव्हिक या फ्रान्सच्या जोडीवर १-६, ७-५, १०-५ असा विजय मिळवला.
  • सानिया-मार्टिना जोडीने २०१५च्या हंगामातील स्वप्नवत वाटचाल कायम राखताना २०१६मध्ये ब्रिस्बेन स्पर्धेपाठोपाठ सिडनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेचेही जेतेपद पटकावले. या जोडीचे हे अकरावे जेतेपद आहे.
  • याबरोबरच सानिया मिर्झा आणि स्वीत्झर्लंडची मार्टिना हिंगीस महिला गटातील दुहेरीच्या जागतिक मानांकनात संयुक्तरीत्या अव्वल क्रमांकावर विराजमान झाल्या आहेत. सध्या डब्ल्यूटीएच्या रँकिंगमध्ये सानिया आणि मार्टिना यांचे प्रत्येकी ११,३९५ गुण आहेत.
  • प्युअटरे फर्नाडिझ व नताशा व्हेराव्हा जोडीने १९९४ मध्ये सलग २८ सामन्यांत अपराजित राहण्याचा विक्रम केला होता. २२ वर्षांनंतर सानिया-मार्टिना जोडीने हा विक्रम मोडला आहे.

संपत्ती व्यवस्थापन सेवा क्षेत्रात स्टेट बँकेचे पदार्पण

  • संपत्ती व्यवस्थापन सेवा क्षेत्रात शिरकाव करणारी स्टेट बँक ही देशातील पहिली सार्वजनिक बँक ठरली आहे. एरवी खासगी तसेच विदेशी कंपन्यांमार्फत हे क्षेत्र हाताळले जाते.
  • दक्षिण भारतातून बँकेच्या संपत्ती व्यवस्थापन सेवा व्यवसायाचा शुभारंभ करताना बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी, बँकेच्या आघाडीच्या धोरणात्मक प्राधान्य क्षेत्रामध्ये संपत्ती व्यवस्थापनाचाही आता समावेश असेल, असे यावेळी नमूद केले.
  • ‘एसबीआय एक्स्लुझिफ’ या उत्पादनाद्वारे ही सेवा स्टेट बँक तिच्या ग्राहकांना पुरवेल. तिच्या ‘इ-वेल्थ सेंटर’मधून बँक गुणवत्ता संपर्क व्यवस्थापन सेवा देईल.
  • तर भारतातील गेल्या काही महिन्यांमधील नव उद्यमी (स्टार्ट अप) क्षेत्राचा विस्तार लक्षात घेता स्टेट बँकेने या क्षेत्रासाठी स्वतंत्र शाखा सुरू केली आहे. अशा शाखेचे उद्घाटनही भट्टाचार्य यांच्या हस्ते १४ जानेवारी रोजी झाले.
  • ‘एसबीआय इनक्युब’ नावाच्या या शाखेद्वारे नव उद्यमींना व्यवसाय सहकार्य हेतू सर्वप्रकारचे बँकिंग पाठबळ उभे करण्यात येणार आहे. कंपनी उभारणीतील कायदेशीर, कर आदी अडचणीही या अंतर्गत सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा