चालू घडामोडी : २४ जानेवारी


भाजपच्या अध्यक्षपदी अमित शहा यांची बिनविरोध फेरनिवड

  Amit Shah
 • भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्तमान अध्यक्ष अमित शहा यांची बिनविरोध फेरनिवड झाली. पुढील तीन वर्षांसाठी अमित शाह यांच्याकडेच अध्यक्षपदाची धुरा राहणार आहे.
 • भाजपच्या पक्षघटनेनुसार एका व्यक्तीला दोनवेळेसच अध्यक्ष होता येते. अमित शहा यांची हे दुसऱ्यांदा अध्यक्ष होणार असले तरी, त्यांची आधीची अध्यक्षपदाची कारकीर्द पूर्ण मानता येणार नाही. कारण, याआधीचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी केंद्रात गृहमंत्री झाल्यानंतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आणि ९ जुलै २०१४ रोजी अमित शहा यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती व ते त्यांचा कार्यकाळ पूर्ण करत होते.
 • जुलै २०१४ मध्ये राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अमित शहा व नरेंद्र मोदी या जोडीने २०१४मध्ये झालेली प्रत्येक विधानसभा निवडणूक जिंकली. यामध्ये महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर, हरियानात स्वबळावर, झारखंडमध्ये स्थानिक गटांबरोबर आणि जम्मू-काश्मीरमध्ये ‘पीडीपी’ या स्थानिक पक्षाबरोबर आघाडी करून भाजपने या राज्यात आपली सरकारे स्थापन केली.
 • त्यानंतर २०१५मध्ये मात्र शहा यांची विजयी वाटचाल दिल्ली विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुकीत रोखली गेली. त्यानंतर या वर्षात दुसरी निवडणूक बिहारमध्ये झाली. तेथेही भाजपला अत्यंत दारुण पराभव सहन करावा लागला.
 • २०१६मध्ये त्यांच्यापुढे आसाम, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, पुद्दुचेरी व केरळ या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे आव्हान आहे.

अमेरिकेत ‘स्नोझिला’ नावाचे प्रलयकारी हिमवादळ

 • अमेरिकेत अतिशय प्रलयकारी हिमवादळ आले असून, या वादळाने आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच्या तडाख्याने १ लाख २० हजार घरातील वीज पुरवठा खंडित झाला असून दैनंदिन जीवनही विस्कळित झाले आहे.
 • अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याला या वादळाने फटका दिला असून उत्तर कॅरोलिना, टेनिसी, मेरीलँड, व्हर्जिनिया, फिलाडेल्फिया, न्यूजर्सी, न्यूयॉर्क या राज्यात आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे. येथे ३० इंच जाडीचा हिमाचा थर बसण्याची शक्यता आहे.
 • गेल्या काही वर्षांतील हे प्रचंड हिमवादळ असल्याने त्याला ‘स्नोझिला’ असे नाव देण्यात आले आहे. या हिमवादळामुळे वाहतूक आणि जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे.
 • तसेच गेल्या दोन दिवसांत हजारो विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. बर्फामुळे रस्ते निसरडे झाल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

पी.व्ही.सिंधूला मलेशियन ओपनचे जेतेपद

 • भारताची बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूने मलेशिया मास्टर्स ग्रांपी सुवर्ण बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. या वर्षातील पहिले विजेतेपद मिळविताना सिंधूने अंतिम फेरीत किर्से ग्लिमोरचा २१-१५, २१-०९ असा सहज पराभव केला. 
 • सिंधूने उपांत्य फेरीत अव्वल मानांकित कोरियाच्या जि ह्यून सुंगचा चुरशीच्या सामन्यात पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती.
 • या विजयामुळे सिंधूचे ग्रांपी सुवर्ण स्पर्धेतील हे पाचवे विजेतेपद ठरले आहे. या अगोदर तिने मलेशियातील ही स्पर्धा २०१३ मध्ये जिंकली होती, तर मकाऊ स्पर्धेत २०१३, २०१४ व २०१५ अशी हॅटट्रिक केली आहे.
 • जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत दोनदा ब्रॉंझपदकाची कमाई करणारी सिंधू जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी आहे.

अरुणाचल प्रदेशामध्ये राष्ट्रपती राजवट

 • अरुणाचल प्रदेशातील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अरुणाचल प्रदेशामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे.
 • गेल्या दोन महिन्यांपासून अरुणाचल प्रदेशमध्ये राजकीय अस्थिरता आहे. ६० आमदारांच्या विधानसभेत सत्तारूढ कॉंग्रेसकडे ४७ पैकी २१ आमदारांनी मुख्यमंत्री नबाम तुकी यांना हटविण्याची मागणी केली होती. त्याचवेळी अविश्वास ठराव आणला आणि त्यात राज्य सरकारचा पराभव झाला.
 • राजकीय संकट पाहता राज्याची विधानसभाही सील केली होती. अरुणाचल प्रदेशातील राजकीय प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचल्यानंतर ही बाब घटनापीठाकडे सोपविण्यात आली आहे.
 • त्याचबरोबर कॉंग्रेस वारंवार केंद्र सरकार आणि अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालांवर टीका करत असताना राष्ट्रपतींकडून हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे.

राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार

 • २४ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील चौघांसह देशभरातील २५ शूरवीर मुलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.
 • यापैकी नागपूरच्या गौरव सहस्रबुद्धे याला मरणोत्तर 'भारत पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. त्याचा पुरस्कार त्याच्या पालकांनी स्वीकारला.
 • पुरस्कार स्वीकारणा‍ऱ्यांमध्ये मुंबईचा मोहित दळवी, जळगावचा निलेश भील, वर्ध्याचा वैभव घांगरे यांचा समावेश होता.
 • याविषयी अधिक माहितीसाठी १८ जानेवारीच्या चालू घडामोडी अभ्यासा.

स्वीडनच्या ‘पीएमओ’च्या सल्लागारपदी नीला विखे यांची नियुक्ती

 • राज्याच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात नाव कमाविलेल्या नगर जिल्ह्यातील विखे पाटील परिवारातील नीला विखे यांची स्वीडनच्या पंतप्रधानांच्या कार्यालयात (पीएमओ) सल्लागारपदी नियुक्ती झाली आहे.
 • भारतीय वंशाच्या नीला या महाराष्ट्रातील आघाडीचे शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे पाटील यांची कन्या आहेत. नीला या माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांची नात असून, राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची पुतणी आहे.
 • स्वीडनचे पंतप्रधान केल स्टेफन लोफवेन यांच्यासोबत २०१४पासून नीला काम करत आहेत. स्वीडनमध्ये जन्म झालेल्या नीला यांचे सुरवातीला काही काळ नगरमध्ये (प्रवरा) वास्तव्य होते.
 • स्वीडनमधील गोथेनबर्ग विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र आणि कायदा या विषयांत पदवी संपादन केली असून, माद्रिद येथील कॉम्प्लूटेन्स विद्यापीठातून ‘एमबीए’ पूर्ण केले आहे.
 • नीला या सध्या स्वीडनमधील ग्रीन पार्टीच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्या आहेत. स्वीडनची राजधानी असलेल्या स्टॉकहोम महानगरपालिकेच्या निवडणूक समितीच्या कार्यकारी मंडळाच्या नीला या सदस्य असून, स्टॉकहोम जिल्हा न्यायालयात न्यायाधीश म्हणूनही त्या कार्यरत आहेत.
 • स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून काम करताना कर पद्धती, लिंग समानतेशी संबंधित धोरणे आणि विकासाशी निगडित विषय त्या हाताळतात.

प्रिन्स नरूला ‘बिग बॉस : ९’चा विजेता

 • कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस’ डबल ट्रबलचा विजेता प्रिन्स नरूला ठरला आहे. प्रिन्सने मंदना करिमी व ऋषभ सिन्हा या स्पर्धकांना हरवत नवव्या पर्वाचे विजेतेपद पटकावले.
 • प्रिन्स नरूला हा एक मॉडेल असून, त्याने एम टीव्हीचे शो ‘रोडीज एक्स टू’ आणि ‘स्प्लिट्‌स व्हिला ८’चे विजेतेपद पटकावले आहे. तो २०१४ मध्ये प्रिन्स मिस्टर पंजाब स्पर्धेत सेकंड रनर अप ठरला होता. 
 • या स्पर्धेत ऋषभ सिन्हा रनरअप ठरला आहे. ऋषभ हा छोट्या पडद्यावरील कलाकार असून, त्याने झी वाहिनीवरील ‘कबूल है’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्याने बिग बॉसमध्ये वाइल्ड कार्डने एन्ट्री केली होती. 

प्रसिद्ध तबलावादक शंकर घोष निधन

 • प्रसिद्ध तबलावादक शंकर घोष यांचे २४ जानेवारी रोजी निधन झाले ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व पतियाळा घराण्याच्या गायिका संयुक्ता घोष, मुलगा पंडित बिक्रम घोष व सून जया घोष तसेच दोन नातू असा परिवार आहे.
 • पंडित ग्यानप्रकाश घोष, उस्ताद फिरोज खान, पंडित अनंतनाथ बोस, पंडित सुदर्शन अधिकारी यांनी पंडित शंकर घोष यांना तबल्याचे शिक्षण दिले होते. त्यांच्या निधनाने कलेच्या वर्तुळात शोकाकुल वातावरण निर्माण झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा