चालू घडामोडी : ६ जानेवारी


स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संमेलन

 • १० जानेवारी २०१६ रोजी सायंकाळी ४ वाजता कल्याणमध्ये मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संमेलन आयोजित करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.
 • याबरोबरच रिलायबल अकॅडमीतर्फे शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजनही करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही ९ २२२ ३३३ ९९९ या क्रमांकावर संपर्क साधु शकता.


मुद्रा बँकेच्या स्थापनेस मंजुरी

 • बिगरबँक वित्तसंस्था असलेल्या मुद्रा लिमिटेडचे रूपांतर मुद्रा बँकेत करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
 • त्याचबरोबर प्रधानमंत्री मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी (मुद्रा) योजनेअंतर्गत दिलेल्या कर्जांसाठी पतहमी निधीची उभारणी करण्यासही सरकारने मान्यता दिली आहे. यामुळे मागासवर्गीय तसेच छोटे उद्योजक यांना पतपुरवठा होणे अधिक सोपे जाणार आहे.
 • यापुढे मुद्रा लिमिटेड ही मुद्रा स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया अर्थात मुद्रा सिडबी या नावे ओळखली जाणार आहे. मुद्रा सिडबी बँक पुनर्वित्त पुरवठ्याकडे लक्ष देतानाच पूरक सेवाही पुरवणार आहे.
MUDRA
 स्टँडअप इंडिया योजना 
 • देशातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच महिला उद्योजकांसाठी केंद्र सरकारने ६ जानेवारी रोजी स्टँडअप इंडिया योजना जाहीर केली.
 • स्टँडअप इंडिया योजना ही सिडबीअंतर्गत पुनर्वित्त पुरवठा करणारी योजना असणार आहे. यासाठी १० हजार कोटी रुपये सुरुवातीला देण्यात आले आहेत.
 • या योजनेअंतर्गत सुरुवातीला प्रत्येक बँक शाखेनुसार पुनर्वित्ताचे किमान २ प्रकल्प हाती घेण्यात येतील.

उ. कोरियाची हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी

 • उत्तर कोरियाने ६ जानेवारी रोजी सकाळी पेइचिंग येथील केंद्रावर पहिल्या हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केली. याआधी उ.कोरियाने २००६, २००९ आणि २०१३ अशी तीन वेळा अणुचाचणी घेतली आहे.
 • स्फोट इतका शक्तिशाली होता की त्या भागात भूकंप झाला आणि रिश्टर स्केलवर त्याची ५.१ इतकी नोंद झाली. 
 • या घटनेनंतर या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने (यूएनएससी) तातडीची बैठक बोलावली आहे. यात १५ देशांचे सदस्य गोपनीय चर्चा करतील. 
 • अण्विक क्षमतेची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने उ.कोरियाचे हे महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे अमेरिका आणि अन्य शत्रू राष्टांच्याविरुद्ध सुरक्षेसाठी याचा वापर होऊ शकतो.
 • या चाचणीमुळे अमेरिकेसह अन्य देशांकडून उ.कोरियावर नव्याने निर्बंध लादले जाण्याची तसेच या देशांसोबतचे संबंध पुन्हा एकदा विकोपाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उ.कोरियाचे शेजारी असलेल्या द.कोरियाशी संबंध पहिल्यापासूनच बिघडलेले आहेत.
 हायड्रोजन बॉम्ब 
 • अणुबॉम्ब पेक्षा हायड्रोजन बॉम्ब अधिक क्षमतेचा आणि धोकादायक असतो. 
 • हायड्रोजन बॉम्ब अणुबॉम्बच्या तुलनेत १००० पटीने अधिक शक्तीशाली असतो. त्याला थर्मो न्युक्लिअर बॉम्बही म्हटले जाते. त्याची निर्मिती देखील अवघड असते.
 • आकारात हा बॉम्ब अणुबॉम्बपेक्षाही छोटा अशतो. त्याला क्षेपणास्त्रामध्ये वापरणे सोपे असते.
 • हायड्रोजन किंवा थर्मोन्युक्लियर बॉम्बमध्ये फ्युजन चेन रिअॅक्शन होते. त्यात हायड्रोजनच्या आयसोटोप ड्युटीरियम आणि ट्राइटिरियमचा वापर होतो.
 • न्यूक्लिअर्सच्या फ्युजन रिअॅक्शनने ब्लास्ट होतो. त्यासाठी सुमारे ५ कोटी अंश सेल्सियस तापमानाची गरज असते. फ्युजनमधून हीट आणि हाय पॉवर किरणे निघतात. ती हायड्रोजनला हेलियममध्ये परावर्तित करतात.

आशियातील सर्वात मोठा बोगदा आयआरबी इन्फ्रा बांधणार

 • आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड १४.०८ किलोमीटर लांबीचा दक्षिणपूर्व आशियातील सर्वात मोठा बोगदा बांधणार आहेत.
 • जम्मू-काश्मीरमध्ये झोझिला पास येथे हा बोगदा बांधण्यात येणार असून त्यासाठी १०,०५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
 • आयआरबी इन्फ्राला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून हे कंत्राट मिळाले आहे. यामध्ये बोगद्याचे बांधकाम, परिचालन व देखभाल यांचा समावेश आहे.
 • प्रकल्पासाठी येणारा खर्च पाहता हा देशातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प ठरला आहे. यामध्ये रचना, बांधकाम, अर्थसाह्य, परिचालन व हस्तांतरण पद्धतीवर जम्मू-काश्मीर राज्यातील राष्ट्रीय महामार्ग-१ (एनएच-१) कडे जाणारे रस्ते समाविष्ट आहेत.
 • जम्मू-काश्मीर आणि लेह-लडाख यादरम्यानचा संपर्क दरवर्षी हिवाळ्यात होणाऱ्या हिमवृष्टीमुळे तुटतो. मात्र हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर अत्यावश्यक असलेला हा संपर्क सर्व ऋतूंमध्ये साधता येणार आहे. म्हणूनच या प्रकल्पाला राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
 • आयआरबी इन्फ्राचे अध्यक्ष : वीरेंद्र म्हैसकर

अपूर्वी चंडेलाला सुवर्णपदक

 • भारताच्या अपूर्वी चंडेलाने स्विडीश कप ग्रां. प्रि. नेमबाजी स्पर्धेतील महिलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात जागतिक विक्रमासह सुवर्णपदक मिळवले.
 • अपूर्वीने दहा मीटर एअर रायफलमध्ये २११.२ गुणांची कमाई केली. यासह तिने चीनच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या यी सिलिंगचा २११ गुणांचा विक्रम मोडीत काढला.
 • या स्पर्धेत स्वीडनच्या अस्ट्रिद स्टिफन्सेनने (२०७.६ गुण) रौप्यपदक, तर स्टिन निल्सनने (१८५.० गुण) ब्राँझपदक मिळवले. 
 • गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत अपूर्वीने सुवर्णपदक मिळवले होते. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये कोरिया येथे झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेतून ती रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे.

प्रणव धनावडेच्या वैयक्तिक १००० धावा

 • कल्याणच्या प्रणव धनावडेने वैयक्तिक १००९ धावांची नाबाद झंझावाती खेळी करत आंतरशालेय क्रिकेटमधील वैयक्तिक धावसंख्येचे सर्व विश्वविक्रम मोडीत काढले आहेत. प्रणवने दोन दिवस टिच्चून फलंदाजी करताना १२९ चौकार आणि ५९ षटकार ठोकून या विक्रमाला गवसणी घातली.
 • प्रणव हा कल्याणच्या के. सी. गांधी शाळेचा विद्यार्थी आहे आणि आर्य गुरुकुल शाळेविरोधात खेळताना त्याने ही कामगिरी केली.
 • क्रिकेटच्या इतिहासात याआधी एवढी मोठी धावसंख्या करण्याची किमया कुणालाही साधता आलेली नाही. आंतरशालेय क्रिकेटमध्ये याआधी ६२८ ही सर्वोच्च धावसंख्या नोंदवण्यात आली होती.
 • या कामगिरीसाठी प्रणवला मुंबई क्रिकेट असोसिएशनने पुढची पाच वर्षं दरमहा १० हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाईल, असे एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले आहे. 

सौदीने इराणशी संबंध तोडले

 • सौदी अरेबियात शिया धर्मगुरू शेख निमर अल निमर यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर इराणची राजधानी तेहरानमध्ये सौदीच्या दूतावासावर हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर सौदीने इराणशी असलेले राजनैतिक संबंध तडकाफडकी तोडून टाकले आहेत. 
 • सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री अबेल अल जुबरी यांनी ४८ तासांत सौदीतील इराणचा दूतावास रिकामा करण्यास सांगितले आहे. जुबरी यांनी पत्रकार परिषद घेऊन इराणशी राजनैतिक संबंध तोडले जात असल्याची घोषणा केली.
 • ५६ वर्षीय निमर यांनी २०११ मध्ये सौदी अरेबियात सरकार विरोधी आंदोलनाचे नेतृत्व केले होते. या आंदोलन प्रकरणी निमर यांच्यासह ४७ जणांना ऑक्टोबर २०१४ मध्ये मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. २ जानेवारी रोजी ही शिक्षा अमलात आणण्यात आली.
 • या घटनेचे तीव्र पडसाद त्यानंतर लगेचच पश्चिम आशियाच्या अनेक भागांत उमटू लागले आहेत. इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खमेनी यांनी निमर यांच्या फाशीचा निषेध केला.
 • इराणसह पाकिस्तान, कुवेत, येमेन आणि लेबेनॉन या देशांतील शिया नेत्यांनीही सौदीला धमकी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा