चालू घडामोडी : २३ ऑक्टोबर

फली नरिमन यांना लालबहादूर शास्त्री पुरस्कार

  • देशातील प्रतिष्ठित कायदेतज्ञ आणि वकील फली नरिमन यांना लोकप्रशासनात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल १९व्या लालबहादूर शास्त्री पुरस्काराने गौरवण्यात आले.
  • त्यांना हा पुरस्कार नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
  • १० जानेवारी १९२९ रोजी रंगून येथे जन्मलेले फली नरिमन यांचे शालेय शिक्षण विविध ठिकाणी झाले. त्यांनी मुंबईतील सरकारी विधि महाविद्यालयातून सुवर्णपदकासह विधि शाखेची पदवी मिळवली.
  • मुंबई उच्च न्यायालयात १९५०पासून त्यांनी वकिली सुरू केली. २० वर्षे वकिली केल्यानंतर १९७१मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ विधिज्ञ बनले.
  • त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता लक्षात घेऊन १९७२मध्ये केंद्र सरकारने अतिरिक्त सॉलिसिटर जनरलपदी त्यांची नियुक्ती केली. १९७५पर्यंत ते या पदावर होते.
  • इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करताच त्याचा निषेध म्हणून त्यांनी लगेच आपल्या पदाचा राजीनामा दिला व खासगी वकिली सुरू केली.
  • बार असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्ष पदावरही त्यांनी कार्य केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मध्यस्तीसाठी ते एक सुप्रसिद्ध विधिज्ञ आहेत.
  • त्यांना पद्मभूषण (१९९१), ग्रूबर प्राइज फॉर जस्टिस (२००२) आणि पद्मविभूषण (२००७) पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
  • १९९९ ते २००५ या काळात राष्ट्रपतींनी त्यांना राज्यसभा सदस्य म्हणून नामांकित केले होते.
लालबहादुर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार
  • भारताचे दुसरे पंतप्रधान लाल लालबहादुर शास्त्री यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ १९९९मध्ये लालबहादुर शास्त्री व्यवस्थापन संस्थेने हा पुरस्कार सुरू केला.
  • हा पुरस्कार भारतीय व्यावसायिक नेते, व्यवस्थापन संबंधित व्यक्ती, लोकसेवक, शिक्षक इत्यादींना त्यांच्या समाजाप्रतीच्या उत्कृष्ठ योगदानासाठी दरवर्षी देण्यात येतो.
  • प्रशस्तीपत्र आणि ५ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप असून, २०१७मध्ये हा पुरस्कार सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.

जागतिक कुस्ती स्पर्धेत बजरंग पूनियाला रौप्यपदक

  • जागतिक अजिंक्यपद फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत भारतीय मल्ल बजरंग पूनियाला अंतिम सामन्यात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
  • ६५ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात जपानच्या ताकुटो ओटुगुरो याने बजरंगला १६-९ असे पराभूत करत सुवर्णपदक जिंकले.
  • जागतिक अजिंक्यपद फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत २ पदक जिंकणारा बजरंग पूनिया पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे.
  • याआधी २०१३साली फ्रीस्टाइल ६० किलो वजनीगटात बजरंगने कांस्यपदक मिळवले होते.
  • त्याने २०१४मध्ये राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक तर यंदाच्या वर्षी बजरंगने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.
  • जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताकडून आतापर्यंत केवळ सुशील कुमार यानेच सुवर्णपदक जिंकले आहे.
  • २ वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या सुशीलने २०१०साली मॉस्को येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली होती.
  • यंदाच्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी भारताच्या ३० जणांच्या पथकाचे नेतृत्व बजरंगकडे सोपविण्यात आले होते.
  • याशिवाय ताकुटो ओटुगुरोनेही विक्रमी कामगिरी करताना, ही स्पर्धा जिंकणारा जपानचा सर्वात युवा जागतिक विजेता ठरण्याचा मान मिळविला.

चीनमध्ये जगातील सर्वात लांब सागरी पुलाचे उद्घाटन

  • चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनमध्ये जगातील सर्वात लांब सागरी पुलाचे उद्घाटन केले. या पुलाचे नाव हाँगकाँग-झुहाई-मकाऊ ब्रिज आहे.
  • समुद्रात उभारण्यात आलेला हा जगातील सर्वाधिक लांबीचा पूल आहे. २० अब्ज डॉलर (१.५ लाख कोटी रुपये) खर्चून उभारण्यात आलेला हा पूल ५५ किमी लांबीचा आहे.
  • या पुलाचे काम डिसेंबर २००९मध्ये सुरू झाले आणि १४ नोव्हेंबर २०१७ रोजी पूर्ण झाले होते. तो २४ ऑक्टोबरपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
  • या पुलाचे काम सुरू असताना घडलेल्या दुर्घटनेत ७ मजुरांचा मृत्यू झाला होता, तर १२९ जण जखमी झाले होते.
  • या पुलाच्या उभारणीसाठी सुमारे ४ लाख टन स्टीलचा वापर करण्यात आला. हा पूल १२० वर्षे वापरला जाऊ शकतो.
  • या पुलाच्या खाली असलेल्या समुद्रात ६.७ किलोमीटरचा बोगदा तयार करण्यात आला आहे. हा बोगदा दोन कृत्रिम बेटांना जोडतो.
  • यामुळे हाँगकाँग ते झुहाई दरम्यानचा प्रवास अवघ्या ३० मिनिटांवर येणार आहे. याआधी या प्रवासासाठी ३ तासांचा अवधी लागायचा. 
  • समुद्रात उभारण्यात आलेला हा पूल हाँगकाँग आणि मकाऊसह दक्षिण चीनमधील ११ शहरांना जोडतो. या भागात ६.८ कोटी लोकांचे वास्तव्य आहे.
  • पर्ल नदीच्या मुखापाशी लिंगडिंगयांग उपसागरात हा पूल उभारण्यात आला आहे. या पुलामुळे व्यापार वाढणार आहे. त्याचा मोठा फायदा चीनच्या अर्थव्यवस्थेला होईल.

हरित दिवाळी-स्वस्थ दिवाळी अभियान

  • पर्यावरण मंत्रालयाने ‘हरित दिवाळी-स्वस्थ दिवाळी’ अभियान सुरू करण्याचे जाहीर केले आहे. याच प्रकारचे अभियान गेल्यावर्षीही राबविण्यात आले होते.
  • पर्यावरण आणि लोकांना हानी पोहचू नये यासाठी दिवाळीत फटक्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
  • उत्तर भारतात हिवाळ्यात धुलीकण, कचरा जाळणे यामुळे प्रदूषणात लक्षणीय वाढ होते. दिवाळीमध्ये फटक्यांमुळे या प्रदूषणात आणखी वाढ होते.
  • फटक्यांमध्ये अॅल्युमिनियम, मॅग्नेशियम, बेरियम, तांबे, सोडियम, लिथियम आणि स्ट्रॉन्टियम इत्यादी पदार्थ असतात.
  • यामुळे वृध्द व्यक्ती, लहान मुले आणि श्वसनाच्या व्याधींनी ग्रस्त व्यक्तींना खूप त्रास होतो.
  • गेल्या वर्षी या अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना कमी फटाके जाळण्याची शपथ देण्यात आली होती. तसेच पर्यावरणाची काळजी घेत दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
  • तसेच त्यांना याबाबत जागरूकता निर्माण करण्यासही सांगण्यात आले होते. परिणामी २०१६च्या तुलनेत २०१७मध्ये प्रदूषणात घट झाली होती.

विराट कोहली सर्वात जलद १० हजार धावा करणारा खेळाडू

  • भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वात जलद १० हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम केला आहे.
  • वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात विराटने ही कामगिरी केली. विराटने या सामन्यात १२९ चेंडूत १५७ धावा केल्या.
  • यापूर्वी सचिनने तेंडूलकरने सर्वात जलद म्हणजे २५९ डावांमध्ये हा टप्पा गाठला होता. मात्र विराटने केवळ २०५ डावांमध्ये हा पराक्रम केला.
  • विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३६ शतके आणि ४९ अर्धशतके झळकावली आहेत. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत आतापर्यंत ६० शतके झळकाविलेली आहेत.
  • १० हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा कोहली ५वा भारतीय आणि जगातील १३वा फलंदाज ठरला आहे.
  • यापूर्वी भारताकडून सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, राहुल द्रविड आणि महेंद्रसिंह धोनी या चारच फलंदाजांनी हा धावांचा टप्पा पार केला आहे.
  • याशिवाय विराट पदार्पणानंतर सर्वात कमी काळात १० हजार धावा करणारा फलंदाजही बनला आहे. यापूर्वी हा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर होता.
  • द्रविडने पदार्पणानंतर १० वर्षे ३१७ दिवसांत १० हजार रन पूर्ण केले होते. विराटने १० वर्षे ६७ दिवसांत हा विक्रम रचला.
  • विराट कोहली कर्णधार म्हणून ८ हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाजही बनला आहे.
  • १० हजार धावांचा पल्ला गाठणारे खेळाडू
  1. सचिन तेंडूलकर (भारत): १८ हजार ४२६ धावा
  2. कुमार संगकारा (श्रीलंका): १४ हजार २३४ धावा
  3. रिकी पॉण्टींग (ऑस्ट्रेलिया): १३ हजार ७०४ धावा
  4. सनथ जयसुर्या (श्रीलंका): १३ हजार ४३० धावा
  5. महेला जयवर्धने (श्रीलंका): १२ हजार ६५० धावा
  6. इंजमाम उल हक (पाकिस्तान): ११ हजार ७३९ धावा
  7. जॅक कॅलिस (द. आफ्रिका): ११ हजार ५७९ धावा
  8. सौरभ गांगुली (भारत): ११ हजार ३६३ धावा
  9. राहुल द्रविड (भारत): १० हजार ८८९ धावा
  10. ब्रायन लारा (वेस्ट इंडिज): १० हजार ४०५ धावा
  11. तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका): १० हजार २९० धावा
  12. महेंद्र सिंग धोनी (भारत): १० हजार १२३ धावा (निवृत्त झालेला नाही)

निष्ठा दुदेजा ठरली मिस डेफ आशिया २०१८

  • हरियाणाची निष्ठा दुदेजाने मिस डेफ (कर्णबधिर) आशिया २०१८चा किताब जिंकला आहे. ही सौंदर्य स्पर्धा प्रागमध्ये आयोजित करण्यात आली होती.
  • मिस डेफ वर्ल्ड स्पर्धेत कोणताही खिताब जिंकणारी निष्ठा पहिली भारतीय ठरली आहे.
  • २३ वर्षीय निष्ठा हरियाणाच्या पानिपत येथील रहिवासी आहे. दिल्लीच्या वेंकटेश्वर कॉलेजमधून वाणिज्य विषयात तिने पदवी मिळवली आहे.
  • सध्या ती मुंबई विद्यापीठातील मिठीबाई महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातील एमए पदवी संपादन करीत आहे.
  • यापूर्वी तिने राजस्थानमध्ये आयोजित मिस डेफ इंडिया २०१८चा किताब जिंकला होता.
  • निष्ठा सिवान्तोस इंडिया प्रा. लि. कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. ही ऐकण्यासाठी उपकरणे बनविणारी एक मोठी कंपनी आहे.

द्रुज्बा ३: पाकिस्तान आणि रशिया संयुक्त सैन्य अभ्यास

  • पाकिस्तान आणि रशिया यांच्या दरम्यान संयुक्त द्विपक्षीय सैन्य प्रशिक्षण अभ्यास ‘द्रुज्बा ३’ पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिमी डोंगराळ प्रदेशात आयोजित करण्यात आला.
  • पाकिस्तान आणि रशिया यांच्यात सैन्यदलाच्या सरावाची ही तिसरी आवृत्ती आहे. हा सैन्य अभ्यास ४ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.
  • ऑक्टोबर २०१६मध्ये पाकिस्तान आणि रशिया या लष्करी अभ्यासाची सुरुवात झाली होती. हा सराव पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आला होता.
  • २०१७मध्ये रशियामध्ये हा अभ्यास आयोजित करणायत आला होता. ‘द्रुज्बा’ हा एक रशियन शब्द असून, त्याचा अर्थ ‘मित्रत्व’ असा होतो.
  • अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे गेल्या काही वर्षांत रशिया-पाकिस्तान संबंध मजबूत झाले आहे.
  • रशियाबरोबर संरक्षण संबंध अधिक मजबूत करण्यासाठी पाकिस्तान उत्सुक आहे. गेल्या ३ वर्षांत रशियाने ४ एमआय-३५एम लढाऊ आणि मालवाहतूक हेलिकॉप्टर पाकिस्तानला दिले आहेत.

जीसीएफकडून भारताला ४३.४ दशलक्ष डॉलर्सचा निधी

  • ग्रीन क्लायमेट फंडने (जीसीएफ) भारतीय किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या समुदायांना हवामान बदलांचा सामना करण्यासाठी ४३.४ दशलक्ष डॉलर्सचा निधी मंजूर केला आहे.
  • जीसीएफद्वारे निधी दिले जाणारे हा प्रकल्प बहू-आयामी आहे. या प्रकल्पांतर्गत आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिशा राज्यांमधील संवेदनशील भागांवर लक्ष केंद्रित केले जाईल.
  • या राज्यांमध्ये हवामान बदलांनुसार तेथील समुदायांना घडविण्यासाठी आणि हरित वायू उत्सर्जनामध्ये घट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. याव्यतिरिक्त स्थानिक समुदायाच्या उपजीविकेची व्यवस्थादेखील केली जाईल.
  • या प्रकल्पाला युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामद्वारेही (यूएनडीपी) मदत करण्यात येईल.
  • या प्रकल्पाअंतर्गत १५ हजार हेक्टर क्षेत्रात मँग्रूव्ह, कोरल रीफ, सीग्रास आणि क्षारयुक्त दलदलींच्या संवार्धांसाठी कार्य करण्यात येईल. यासाठी स्थानिक युवकांना शास्त्रज्ञांसोबत काम करण्यासाठी प्रशिक्षित केले जाईल.
  • तसेच स्थानिक लोकांना हवामान बदलाबद्दल आणि याबाबतच्या धोक्यांबद्दल प्रशिक्षण आणि सार्वजनिक शिक्षण कार्यक्रमाद्वारे जागरुक केले जाईल.
  • या प्रकल्पाद्वारे स्थानिक समुदायाला हवामान-अनुकूल उपजीविकेची साधने मिळतील आणि हरित वायूंचे उत्सर्जन कमी होण्यास मदत मिळेल..
  • यामुळे पर्यावरणातील कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनामध्ये ३.५ दशलक्ष टनांची घट होईल. पॅरिस कराराचे ध्येय आणि २०३०साठीची शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरेल.
पार्श्वभूमी
  • भारताची किनारपट्टी हवामान बदलांच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे.
  • अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या क्षेत्रात हवामान बदलांच्या विपरीत परिणाम होऊन चक्रीवादळांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
  • भारतात अंदाजे ६,७४० चौकिमी मँग्रूव्ह वनाचे क्षेत्र आहे. परंतु मवणी हस्तक्षेपामुळे यात ५० टक्के घट झाली आहे. येत्या काळात वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे यात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

‘मै नही हम’ या पोर्टल आणि ॲपचे उद्‌घाटन

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत ‘मै नही हम’ या पोर्टल आणि ॲपचे उद्‌घाटन केले.
  • ‘सेल्फ फॉर सोसायटी’ या संकल्पनेवर आधारित या पोर्टलमुळे समाजाच्या सेवेसाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले व्यावसायिक आणि संस्था आपले प्रयत्न एकाच मंचावर आणू शकणार आहेत.
  • तंत्रज्ञानाचा लाभ घेत समाजातल्या दुर्बल घटकांच्या सेवेसाठी सहकार्याला चालना देण्यासाठी हे पोर्टल मदत करणार आहे.
  • समाजाच्या सेवेसाठी कार्य करु इच्छिणाऱ्या व्यक्तींचा सहभाग व्यापक करण्यासाठीही हे पोर्टल उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.

आदेल अब्दुल मेहदी इराकचे नवे पंतप्रधान

  • आदेल अब्दुल मेहदी यांची इराकचे नवे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे. यापूर्वी ते २००५ ते २०११ दरम्यान इराकचे राष्ट्रपतीही होते.
  • २०१४ ते २०१६ दरम्यान ते इराकचे तेलमंत्री होते. तसेच यापूर्वी ते देशाचे अंतरिम अर्थमंत्री देखील होते.
  • अलीकडेच इराकमध्ये राष्ट्रपतींचीही निवडणूक पार पडली, ज्यात बरहम सालिह विजय मिळवत इराकच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झाले.
  • ते पेट्रियॉटिक यूनियन ऑफ कुर्दिस्तानशी संबंधित आहेत. त्यांना निवडणुकीमध्ये २७३ मतेंपैकी २२० मते मिळाली.

विश्व शांति अहिंसा परिषदेचे नाशिकमध्ये आयोजन

  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्रातील नाशिक येथे विश्व शांति अहिंसा परिषदेचे उद्घाटन केले.
  • या ३ दिवसीय परिषदेचे आयोजन भगवान ऋषभदेव मूर्ति बांधकाम समितीने केले होते.
  • या परिषदेमध्ये राष्ट्रपतींनी देशाचा विकास आणि जगात शांततेचा संदेश प्रसारित करण्यासाठी जैन समाजाच्या योगदानांची प्रशंसा केली.
  • या परिषदेदरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ‘सर्वोच्च दिगंबर जैन प्रतिमा’ नावाचे एक पुस्तकही प्रसिद्ध केले.
  • तसेच त्यांनी उत्तर प्रदेशच्या तीर्थकर महावीर विश्वविद्यालयाला ‘भगवान ऋषभदेव पुरस्कार' दिला. हा पुरस्काराची सुरुवात २०१६मध्ये करण्यात आली होती.
  • ऋषभदेवांना जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर मानले जाते, त्यांना आदिनाथ असेही म्हणतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा