आयआयटी मद्रासमध्ये देशातील पहिला स्वदेशी मायक्रोप्रोसेसर विकसित
- इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी पहिला स्वदेशी बनावटीचा मायक्रोप्रोसेसर विकसित केला आहे. या मायक्रोप्रोसेसरला ‘शक्ती’ असे नाव देण्यात आले आहे.
- या मायक्रोप्रोसेसरचा उपयोग मोबाइल कम्प्युटिंग उपकरणे, कमी उर्जा वापरणाऱ्या वायरलेस प्रणाली आणि नेटवर्किंग प्रणाली यामध्ये करता येणार आहे.
- या मायक्रोप्रोसेसरचे डिझाइनपासून सर्व काही आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे.
- या मायक्रोप्रोसेसरची मायक्रोचीप चंदीगड येथील सेमी-कंडक्टर प्रयोगशाळेत तयार करण्यात आली आहे. ही प्रयोगशाळा भारताच्या अंतराळ विभागांतर्गत कार्य करते.
- ही प्रयोगशाळा देशाच्या सामरिक गरजा पूर्ण करण्यासाठी मायक्रोइलेक्ट्रॉनिक्सच्या संशोधन आणि विकासासाठी कार्य करते.
- भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील हे महत्वपूर्ण यश असून, यामुळे परदेशी मायक्रोप्रोसेसरवरील अवलंबित्व कमी होणार असून सायबर हल्ल्याचा धोकाही कमी होईल.
- भारतात बनलेला मायक्रोप्रोसेसर १८० एनएमचा आहे. तर अमेरिकेत बनवला जाणारा प्रोसेसर २० एनएमचा आहे.
- १८० एनएमचा मायक्रोप्रोसेसर कालबाह्य झाला असला तरी आजही जगातील अनेक अॅप्लिकेशन्समध्ये आवश्यक आहे. पारंपारिक ऊर्जा उपलब्ध असलेल्या प्रत्येक अॅप्लिकेशनमध्ये ही चीप उपयोगात येऊ शकते.
- अमेरिकेत बनवलेल्या मायक्रोप्रोसेसरला कमी ऊर्जा लागते तसेच ते मोबाइलमध्ये वापरता येऊ शकतात.
- आयआयटी मद्रासने बनवलेल्या शक्ती मायक्रोप्रोसेसरने भारतीय उद्योजकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
- आयआयटी मद्रास ही चेन्नई (तमिळनाडू) येथे स्थित भारतातील एक नामांकित तंत्रशिक्षण संस्था आहे. तिची स्थापना १९५९मध्ये पश्चिम जर्मनीच्या सहाय्याने करण्यात आली होती.
निधन: ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव
- मराठी संगीत विश्वावर आधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांचे ३० ऑक्टोबर रोजी वयाच्या ९१व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले.
- मराठी चित्रपटगीत, अभंग, गजल, भावगीत, समूहगीत, लोकगीत, युगलगीतांना त्यांनी संगीतबद्ध केले होते. चित्रपटाबरोबरच अनेक नाटकांसाठीही त्यांनी संगीत दिले होते.
- यशवंत देव यांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ साली झाला होता. वडिलांकडूनच त्यांना संगीताचे सुरुवातीचे धडे मिळाले. तेच त्यांचे पहिले गुरू होते.
- जी.एन. जोशी आणि गजाननराव वाटवे यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले.
- भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, असेन मी नसेन मी, अखेरचे येतील माझ्या, दिवस तुझे हे फुलायचे अशा शेकडो गीतांना संगीतसाज चढवून यशवंत देव यांनी भावसंगीताचे विश्व समृद्ध केले होते.
- आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली होती. त्यामुळे संगीतकार, गायक आणि कवी ही त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली.
- आकाशवाणीवर त्यांनी सादर केलेला ‘भावसरगम’ हा कार्यक्रम चांगलाच गाजला. त्याद्वारेच, संगीतकार, गायक आणि कवी ही त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली.
- भावसरगम, असे गीत जन्मा येते, शब्दप्रधान गायकी, रियाजाचा मंत्र असे कार्यक्रम यशवंत देव यांनी दीर्घकाळ सादर केले.
- शब्दप्रधान गायकीचे उद्गाते अशी त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केली. त्यांनी संगीतकार म्हणून अनेक अविस्मरणीय गाणी दिलीच, पण याबरोबरच गीतकार-कवी म्हणून त्यांची ओळखही रसिकांना भावली.
- ग. दि. माडगुळकरांच्या सचिन शंकर बॅले ग्रुपने सादर केलेल्या ‘कथा ही रामजानकीची’ या नृत्यनाटिकेला यशवंत देव यांनी संगीत दिले होते.
- त्यांना गदिमा पुरस्कार, गासम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, राम कदम कलागौरव पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.
- त्यांच्या निधनाने मराठी संगीत क्षेत्रावर अधिराज्य गाजविणारे एक प्रयोगशील व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले.
यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी
- या जन्मावर या जगण्यावर
- जीवनात ही घडी अशीच राहु दे
- भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
- दिवस तुझे हे फुलायचे
- येशिल येशिल येशिल राणी
- अशी पाखरे येती आणिक
- असेन मी नसेन मी
- कुठे शोधिसी रामेश्वर
- ठुमकत आल्या किती गौळणी
- काही बोलायाचे आहे
- डोळ्यात सांजवेळी आणू
- गणपती तू गुणपती तू
यशवंत देव यांनी लिहिलेली काही गाणी
- जीवनात ही घडी अशीच राहू दे
- कोटि कोटि रूपे तूझी कोटी सूर्य चंद्र तारे
- माणसांच्या गर्दीत माणूस माणसाला शोधत आहे
- कामापुरता मामा
- स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी
- अरे देवा तुझी मुले अशी
- दिवाळी येणार अंगण सजणार
- मने दुभंगली म्हणून जोडता येत नाही
- रात्रिच्या धुंद समयाला
ओडिशामध्ये नैसर्गिक आपत्तींची धोक्याची सूचना देणारी प्रणाली
- ओडिशा सरकारने चक्रीवादळ, त्सुनामी, महापूर इत्यादी या नैसर्गिक आपत्तींची धोक्याची सूचना नागरिकांना देण्यासाठी एक प्रणाली सुरू केली आहे.
- ‘क्विक वॉर्निंग ट्रान्समिशन सिस्टम’ क्षेत्रामध्ये या प्रकारची ही पहिली प्रणाली आहे. जागतिक बँकेच्या मदतीने ८२ कोटी रुपये खर्च करून ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
- आपत्कालीन स्थितीत सायरनसाठी ओडीशाच्या ४८० किमी लांब किनारपट्टीवर १२२ टॉवर्स उभारण्यात आले आहेत.
- या टॉवरमधून १.५ किलोमीटरच्या परिसरात धोक्याच्या सूचनेसाठी सायरनचा आवाज पोहचविला जाऊ शकतो.
- ही प्रणाली राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम निम्नीकरण प्रकल्पाचा भाग आहे. याद्वारे लोकांचे चक्रीवादळांपासून संरक्षण होणार आहे. तसेच मच्छीमारांसाठीही ही यंत्रणा उपयोगी ठरेल.
ओडिशामधील नैसर्गिक आपत्ती
- ओडिशा राज्याला चक्रीवादळ, त्सुनामी, पूर इत्यादि अनेक आपत्तींचा धोका आहे. ओडिशाचा एक मोठा भाग भूकंप जोखीम क्षेत्र II मध्ये येतो.
- ओडिशामध्ये १९९९ साली १० हजार लोक चक्रीवादळाने मरण पावले. २०१३मध्ये ओडिशाच्या किनाऱ्यावर फुलिन चक्रीवादळाने थैमान घातले.
- २०१४मध्ये हुधुद चक्रीवादळ आणि अलीकडे बटरफ्लाय नावाचे चक्रीवादळ ओडिशामध्ये आढळून आले.
गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी ए. एस. बोपन्ना
- न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना यांनी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. आसामचे राज्यपाल जगदीश मुखी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
- बोपन्ना यांनी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायाधीश ए. के. गोस्वामी यांच्याकडून कार्यभार स्वीकारला.
- न्यायमूर्ती बोपन्ना यांचा जन्म १९५९मध्ये झाला. १९८४मध्ये त्यांनी वकील म्हणून कारकीर्दीस प्रारंभ केला.
- कर्नाटक उच्च न्यायालयात त्यांनो नागरी, संवैधानिक, सेवा आणि श्रमविषयक बाबींशी संबंधित क्षेत्रामध्ये सेवा केली.
- त्याशिवाय केंद्रीय सार्वजनिक उपक्रम आणि केंद्र सरकारचे अतिरिक्त स्थायी सल्लागार म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे.
गुवाहाटी उच्च न्यायालय
- हे भारताच्या २४ उच्च न्यायालयांपैकी एक आहे. याची स्थापना १ मार्च १९४८ रोजी करण्यात आली.
- या उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत ईशान्य भारताची आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालॅंड व मिझोराम ही राज्ये येतात.
- गुवाहाटी उच्च न्यायालयाचे कामकाज गुवाहाटी येथून चालते. तर इटानगर, कोहिमा व ऐजवाल येथे या न्यायालायाची ३ खंडपीठे आहेत.
- १९४८मध्ये स्थापन झाल्यानंतर ईशान्य भारतातील सर्व ७ राज्यांसाठी हे एकमेव उच्च न्यायालय होते.
- परंतु मार्च २०१३मध्ये मेघालय, मणिपूर व त्रिपुरा या राज्यांना प्रत्येकी स्वतंत्र उच्च न्यायलये मिळाली व गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत ४ राज्ये राहिली.
मायकल हिग्गिंस आयर्लंडचे नवे राष्ट्रपती
- मायकल हिग्गिंस यांची आयर्लंडचे राष्ट्रपती म्हणून पुनर्नियुक्ती झाली आहे. राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीत त्यांना ५६ टक्के मते मिळाली. हिग्गिंस यांचा राष्ट्रपती म्हणून हा सलग दुसरा कार्यकाळ असेल.
- या निवडणुकीत आयर्लंडचे व्यावसायिक पीटर कैसे दुसऱ्या स्थानी राहिले. त्यांना २३.१ टक्के मते मिळाली. इतर ४ उमेदवारांपैकी कोणालाही १० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली नाहीत.
- या निवडणुकीत मायकल हिग्गिंस यांनी एकतर्फी विजय मिळवला. ते ११ नोव्हेंबर २०१८ रोजी राष्ट्रपती पदाचा कार्यभार स्वीकारतील.
- हिग्गिंस यांचा जन्म १८ एप्रिल १९४१ रोजी आयर्लंडमध्ये झाला. नोव्हेंबर २०११मध्ये ते आयर्लंडचे ९वे राष्ट्रपती झाले.
- जुलै १९९० ते मे १९९१ दरम्यान ते गॅलवेचे मेयर होते. १९९४ ते १९९७ दरम्यान ते कला व सांस्कृतिक मंत्री होते. तर २००३ ते २०११ दरम्यान लेबर पार्टीचे अध्यक्ष होते.
- हिग्गिंस हे एक कवी आणि लेखकही असून, द बिट्रेयल, द सीजन ऑफ फायर, ॲन एरिड सीजन, न्यू अँड सिलेक्टेड पोयम्स, द प्रोफेट्स आर वीपिंग, कॉजेज फॉर कंसर्न, रिन्यूइंग द रिपब्लिक इत्यादी त्यांच्या साहित्यकृती आहेत.
जपानकडून आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या करारास पाठींबा
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौऱ्यादरम्यान जपानने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या करारास पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
- याबरोबरच जपान आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या कराराला पाठींबा देणारा ४८वा देश बनला आहे.
- तसेच जपान आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होण्याच्या करारावर स्वाक्षरी करणारा ७१वा देश ठरला आहे.
आंतरराष्ट्रीय सौर आघाडी
- इंग्रजी: International Solar Alliance (ISA)
- भारताचा उपक्रम असलेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची सुरुवात पॅरिस येथे आयोजित युनायटेड नेशन्स क्लाइमेट चेंज कॉन्फरन्स (COP 21) दरम्यान नोव्हेंबर २०१५मध्ये करणायत आली.
- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले होते.
- याचे मुख्यालय गुरूग्राम, हरियाणा येथे राष्ट्रीय सौर उर्जा संस्थेमध्ये (NISE) स्थित आहे. भारतात मुख्यालय असलेली ही पहिली आंतरराष्ट्रीय अंतर-सरकारी संस्था आहे.
आयएसएची उद्दिष्टे
- कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या दरम्यानच्या सौर ऊर्जेच्या दृष्टीने समृद्ध असलेल्या १२१ देशांना या पर्यायी ऊर्जेच्या शाश्वत विकासासाठी उपयोग करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
- एकत्रित प्रयत्नांद्वारे सौर उर्जेच्या उत्पादनासाठी लागणारी उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा खर्च कमी करणे.
- मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा निर्मितीसाठी २०३०पर्यंत या क्षेत्रात १,००० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणे.
भारतात वायू प्रदूषणामुळे १.२५ लाख लहान मुलांचा बळी
- भारतात वायू प्रदूषणामुळे २०१६मध्ये सुमारे १.२५ लाख लहान मुले दगावली आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालातून समोर आले आहे.
- जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातील वायू प्रदूषण, बाल आरोग्य आणि स्वच्छ हवा या मुद्द्यांच्या संदर्भांत हा अहवाल सादर केला आहे.
- कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये वायू प्रदूषणामुळे मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचा या निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे.
- दारिद्र्यरेषेखालील अणि मध्यमवर्गीय देशांमध्ये ५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या सुमारे ९८ टक्के मुलांना वायू प्रदूषणातून निर्माण झालेल्या हवेतील सूक्ष्म कणांमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.
- जागतिक आरोग्य संघटनेच्या या अहवालात जगातील एकूण ५ देशांची नावे आहेत. या ५ देशांमध्ये भारताचेदेखील नाव आहे.
- भारतात प्रदुषणाचे प्रमाण अधिक आहे. मुख्यतः राजधानी दिल्लीत प्रदूषणाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
- भारतात विशेषतः स्वयंपाकघरात आणि घराबाहेर निर्माण होणारे वायूचा गंभीर परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर दिसून येत आहे.
- भारतात वायू प्रदूषणामुळे दरवर्षी सरासरी २० लाख लोक मृत्यूमुखी पडतात. त्यात लहान मुलांच्या मृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.
- जगातील वायू प्रदूषणाचे २५ टक्के बळी हे भारतातच जातात. तेव्हा येत्या काळात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी भारताने प्रयत्न करायला हवेत असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
- भारताच्या खालोखाल नायजेरियामध्ये दरवर्षी ४७ हजार लहान मुले वायू प्रदूषणाचे बळी ठरतात.
- जागतिक वायू प्रदूषणाबाबत ग्रीनपीसनेही १ अहवाल सादर केला आहे. ग्रीनपीस यांनी जारी केलेल्या अहवालात भारताच्या प्रदूषण पातळीची स्थिती खूपच भयानक असल्याचे म्हटले आहे.
- सर्वोच्च न्यायालयाने जागतिक आरोग्य संघटनेचा हा वायू प्रदूषणाबाबतचा अहवाल सादर झाल्यानंतर दिल्ली आणि देशातील क्षेत्रांत प्रदूषणांची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे म्हणत तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.
जागतिक आरोग्य संघटना
- इंग्रजी: World Health Organization (WHO)
- स्थापना: ७ एप्रिल १९४८
- मुख्यालय: जिनेव्हा, स्वित्झर्लंड
- सदस्य: १९३ देश
- जागतिक आरोग्य संघटना ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात सुसंवादाचे कार्य करणारी संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे.
- जागतिक स्तरावर लोकांच्या आरोग्याचा स्तर उंचावणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
निधन: उर्दू साहित्यिक काझी अब्दुल सत्तार
- उर्दू साहित्यातील एक दिग्गज व्यक्तिमत्व, विख्यात कादंबरीकार आणि साहित्यिक काझी अब्दुल सत्तार यांचे २९ ऑक्टोबर रोजी वयाच्या ८५व्या वर्षी निधन झाले.
- उत्तर प्रदेशात १९३३साली जन्मलेले अब्दुल सत्तार, विद्यापीठातील शिक्षण पूर्ण केल्यावर अध्यापनाकडे वळले.
- अलिगढ मुस्लिम विद्यापीठात ते उर्दूचे ते प्राध्यापक बनले. प्रदीर्घ सेवा बजावून ते १९९१मध्ये तेथूनच निवृत्त झाले.
- त्यांनी लिहिलेल्या प्रमुख कादंबऱ्यांमध्ये दारा शिकोह, सलाहुद्दीन अयुबी, खालिद इब्न अल वलिद व गालिब या कादंबऱ्यांचा समावेश आहे.
- अनेक ऐतिहासिक वाचनीय कादंबऱ्यांनी साहित्यात मोलाची भर घातल्याबद्दल त्यांना विविध सन्मान आणि पुरस्कार प्राप्त झाले होते. त्यांच्या साहित्याचा विविध जागतिक भाषांमध्ये अनुवादही झाला आहे.
- साहित्य क्षेत्रातील भरीव कामाबद्दल त्यांना १९७४मध्ये वयाच्या ४१व्या वर्षीच पद्मश्री किताबाने सन्मानित करण्यात आले होते.
- १९७८मध्ये त्यांना गालिब अकादमी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिलेच व्यक्ती होते.
- याशिवाय त्यांना उर्दूतील मीर सन्मानही प्रदान करण्यात आला होता. पश्चिम आशियातील कतारनेही त्यांचा सन्मान केला होता.
- साहित्य अकादमीसह अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांनीही त्यांच्या जीवन व कार्यावर माहितीपट बनवले.
वर्ध्यामध्ये गांधीवादी विचारसरणी आणि स्वच्छतेवर संमेलनाचे आयोजन
- केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने २०१९-२०पर्यंत देशाला ‘स्वच्छ भारत’ बनविण्यासाठी गांधीवादी विचारसरणी आणि स्वच्छतेवर संमेलनाचे आयोजन केले.
- या संमेलनाचे आयोजन महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात करण्यात आले. यामध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता क्षेत्रातील प्राप्तींवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
- ग्रामीण स्वच्छतेमध्ये योग्य तंत्राचा वापर, जैविक कचरा व्यवस्थापन आणि निवारक स्वच्छता ही या संमेलनातील चर्चेचे मुख्य मुद्दे होते.
- गांधीजींचे ‘स्वच्छ आणि स्वावलंबी संकुल’ ही या संमेलनाची मुख्य संकल्पना होती. या संमेलनाचा समारोप सेवाग्राम आश्रमच्या भेटीने झाला. गांधीजींच्या जीवनातून अनुभव प्राप्त करणे, हा त्यामागील उद्देश होता.
स्वच्छ भारत अभियान
- भारत सरकारद्वारे सुरू करण्यात आलेला हा राष्ट्रीय पातळीवरील उपक्रम आहे. या अभियानाचे घोषवाक्य ‘एक कदम स्वच्छता की ओर’ हे आहे.
- २०१९पर्यंत गांधीजींचे स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधींच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबर २०१४ रोजी या मोहिमेची सुरूवात केली.
- स्वच्छ भारत अभियान ग्रामीण आणि शहरी अशा दोन टप्प्यांत विभागण्यात आले आहे.
- ग्रामीण भागात या अभियानाची अंमलबजावणी केंद्रीय पेंयजल व स्वच्छता मंत्रालयाव्दारे तर शहरी भागात केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाव्दारे करण्यात येते.
- भारताच्या शहरांच्या, रस्त्यांच्या व भारतातील विविध नद्यांच्या स्वच्छतेसाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
- सार्वजनिक शौचालय निर्मिती, घनकचरा व्यवस्थापन, जनजागृती, क्षमता निर्माण हे या अभियानाचे मुख्य भाग आहेत.
- हे एक प्रकारे जन आंदोलन असून, हे अभियान सुरु झाल्यानंतर देशातील स्वच्छतेचा स्तर उंचावला आहे.
- स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात ही पूर्वीच्या निर्मल भारत अभियानाची पुनर्रचना करून करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा