चालू घडामोडी : ०९ ऑक्टोबर

स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुपच्या अध्यक्षपदी अजित डोवाल

  • केंद्र सरकारने भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुपच्या (एसपीजी) अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
  • या नव्या जबाबदारीमुळे ते गेल्या २० वर्षांतील सर्वात शक्तिशाली सरकारी अधिकारी बनले आहेत.
  • अजित डोवाल यांच्यावर नवी जबाबदारी टाकल्याने ते आता एसपीजीच्या बैठकांचे संयोजन करतील.
  • त्याचबरोबर कॅबिनेट सचिवांनी घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणी संदर्भात विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये समन्वय राखण्याचे काम करतील.
अजित डोवाल
  • निवृत्त आयपीएस अधिकारी असलेले अजित कुमार डोवाल भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. ३० मे २०१४पासून ते या पदावर कार्यरत आहेत.
  • अजित डोवाल भारताचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. यापूर्वी शिवशंकर मेनन भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते.
  • १९४५मध्ये उत्तराखंडमधील गढवाली कुटुंबात अजित डोवाल यांचा जन्म झाला. त्यांनी अजमेरच्या मिलिटरी स्कूलमधून प्रारंभिक शिक्षण पूर्ण केले.
  • त्यानंतर त्यांनी आग्रा विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयातील एमए केले आणि पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी आयपीएससाठी तयारी करण्यास सुरवात केली.
  • १९६८मध्ये त्यांची केरळ कॅडरमधून आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली. २००५मध्ये ते इंटेलिजंस ब्यूरोचे (आयबी) प्रमुख म्हणून निवृत्त झाले.
स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुप (एसपीजी)
  • एप्रिल १९९९मध्ये स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुप (एसपीजी) तयार करण्यात आला. यापूर्वी कॅबिनेट सचिवांकडेच एसपीजीचे अध्यक्षपद असायचे. सरकारमधील हे सर्वात वरिष्ठ सरकारी अधिकारी असतात.
  • विदेशी, देशांतर्गत आणि आर्थिक सुरक्षा प्रकरणांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या (एनएससी) मदतीसाठी एसपीजीची स्थापना करण्यात आली आहे.
  • यापूर्वी एसपीजीमध्ये १६ सदस्य होते. ती आता वाढवून १८ करण्यात आली आहे. यामध्ये कॅबिनेट सचिव आणि नीति आयोगाचे उपाध्यक्ष यांना २ नव्या सदस्यांच्या रुपात समाविष्ट करण्यात आले आहे.
  • एसपीजीच्या इतर सदस्यांमध्ये तीनही सैन्यदलांचे प्रमुख, रिझर्व्ह बँकेचे प्रमुख, गृह सचिव, वित्त सचिव, संरक्षण सचिव, परराष्ट्र सचिव आणि इंटेलिजन्स ब्युरोच्या प्रमुखांचा समावेश आहे.

जेरेमीला युवा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक

  • युवा जागतिक आणि युवा राष्ट्रकुल स्पर्धेत अनुक्रमे रौप्य व सुवर्णपदक जिंकणाऱ्या जेरेमी लालरीनुंगाने भारताला युवा ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.
  • मिझोरमच्या या वेटलिफ्टिंगपटूने ६४ किलो वजनी गटात त्याने एकूण २७४ किलो वजन उचलून सुवर्णपदक नावावर केले.
  • भारताची नेमबाज मेहुली घोषने युवा ऑलिम्पिक स्पर्धेत १० मीटर एअर रायफल गटात रौप्यपदक जिंकले. २०१८मधील तिचे हे तिसरे पदक ठरले.
  • यापूर्वी तिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत १० मीटर एअर रायफल सांघिक आणि राष्ट्रकुल स्पर्धेत १० मीटर एअर रायफल अशा दोन्ही स्पर्धांमध्ये रौप्यपदक जिंकले होते.

एफ-१५ विमानांच्या कार्यक्रमाची सूत्रे प्रत्युष कुमार यांच्याकडे

  • हवाई उद्योग क्षेत्रातील आघाडीची अमेरिकन कंपनी बोईंगने एफ-१५ या फायटर विमानांच्या कार्यक्रमाची सूत्रे प्रत्युष कुमार या भारतीय व्यक्तीकडे सोपवली आहेत.
  • प्रत्युष कुमार हे बोईंगचे भारतातील प्रमुख आहेत. आता ते एफ-१५च्या अमेरिकेतील आणि जागतिक व्यवसायावर लक्ष केंद्रीत करणार आहेत.
  • बोईंगचे भारतातील प्रमुख या नात्याने त्यांच्या नेतृत्वाखाली मागच्या ५ वर्षात बोईंगने भारतात चांगला व्यावसायिक विस्तार केला.
  • प्रत्युष कुमार यांच्या कार्यकाळात बंगळुरुमध्ये नवीन शोध आणि कल्पकतेला प्रोत्साहन देण्यासाठी इंजिनिअरिंग आणि टेक्नोलॉजी सेंटर उभारण्यात आले.
  • हैदराबादमध्ये टाटा कंपनीसोबत संयुक्त प्रकल्पातून अपाचे या लढाऊ हेलिकॉप्टरसाठी डिझाईन तयार करण्याचा कारखाना स्थापन केला.
  • त्यांच्याच कारकिर्दीत बोईंगने अपाचे, चिनूक आणि पी-८आय टेहळणी विमानांच्या विक्रीचे भारताबरोबर महत्वाचे करार केले.
  • संरक्षण व्यवसायात बोईंगला भारतात स्थापित करण्यात प्रत्युष कुमार यांनी महत्वाची भूमिका बजावली.

९ ऑक्टोबर: जागतिक टपाल दिन

  • जगभरात ९ ऑक्टोबर हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर ९ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत टपाल सप्ताहाचे आयोजन केले जाते.
  • ९ ऑक्टोबर १८७४ रोजी स्वित्झर्लंडमधील बर्न येथे ‘युनिव्हर्सल पोस्टल युनियन’ची (युपीयु) स्थापना करण्यात आली.
  • हि घटना दळण-वळणाची जागतिक क्रांती मानली जाते. या माध्यमातून लोकांना जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पत्राद्वारे संपर्क साधण्याचा अधिकार प्राप्त झाला.
  • १९६९साली टोकियो (जपान) येथे भरलेल्या युपीयु काँग्रेसमध्ये ९ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक टपाल दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.
  • तेव्हापासून हा दिवस टपाल खात्याचे महत्व अधोरेखित करण्यासाठी जागतिक स्तरावर साजरा केला जातो.
भारतातील टपाल व्यवस्था
  • भारतामध्ये पहिल्या टपालाच्या तिकिटाची सुरुवात सिंध जिल्ह्यामध्ये १८५२मध्ये झाली. तर १८५४पर्यंत सगळीकडे एका प्रकारच्या तिकिटांचे प्रचलन सुरू झाले.
  • १९३१साली भारतातील पहिले रंगीत तिकीट छापण्यात आले. पहिले स्वातंत्र्योत्तर तिकीट १९४७मध्ये निघाले आणि त्यावर भारतीय झेंडा होता.
  • त्यानंतर भारतामध्ये टपाल तिकिटांची रेलचेल झाली. काही वर्षांपूर्वी आपल्या निवडीनुसार तिकिटे छापण्याची सुरुवात टपाल खात्याने प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे.

हरियाणा सरकारचे दहशतवाद विरोधी दल ‘कवच’

  • हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी हरियाणा सरकार दहशतवाद विरोधी दल (एटीएफ: अँटी टेररिस्ट फोर्स) स्थापन करणार असल्याची घोषणा केली.
  • या दलाचे नाव ‘कवच’ असे ठेवण्यात येणार असून, हे दल राज्याच्या सध्याच्या सुरक्षा आव्हानांचा सामना करेल.
  • यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा गार्डकडून (एनएसजी) प्रशिक्षित करण्यात आलेल्या हरियाणा पोलिस दलातील निवडक कर्मचाऱ्यांचा समावेश असेल.
  • या दलाचे मुख्यालय गुरग्राममध्ये असेल. यात एकूण १५० जवान असतील आणि ५०-५०च्या टप्प्यात त्यांची भरती होईल.
  • गुरग्राम आणि फरीदाबादसारख्या शहरांमधील आवश्यकता लक्षात घेऊन, हे दल तयार करण्याचे निर्णय घेण्यात आला आहे.
  • या दलाच्या नवनियुक्त सुरक्षा रक्षकांना मानेसर येथील राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (एनएसजी) शिबिरात १४ आठवड्यांचे प्रशिक्षण देण्यात येईल.
  • दहशतवाद आणि इतर प्रमुख धोक्यांचा सामना करण्यासाठी या दलाला प्रशिक्षित केले जाईल.

ओडिशा सरकारची निर्माण कुसुम योजना

  • ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ६ ऑक्टोबर रोजी ‘निर्माण कुसुम’ योजनेला सुरुवात केली.
  • या योजनेद्वारे बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना तांत्रिक शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाईल.
  • याअंतर्गत आयटीआय विद्यार्थ्यांना २३,६०० रुपये वार्षिक आर्थिक सहाय्य आणि डिप्लोमा विद्यार्थ्यांना २६,३०० रुपये वार्षिक आर्थिक सहाय्य प्रदान केले जाईल.
  • या योजनेसाठी १.०९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सुमारे १८७८ विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा होईल.
  • मुलींसाठी सरकारने या प्रोत्साहनपर रक्कमेमध्ये २० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलींसाठी आर्थिक सहाय्य इयत्ता सहावीपासून पदवीपर्यंत दिले जाईल.
  • याव्यतिरिक्त सरकारने कामगारांच्या मृत्यूपश्चात देण्यात येणारी रक्कम १ लाख रुपयांहून वाढवून २ लाख रुपये केली आहे.
  • त्याचप्रमाणे अपघात झाल्यास मिळणारे मदत २ लाख रुपयांहून वाढवून ४ लाख रुपये केली आहे.

महाराष्ट्राच्या सुनीत जाधवला ‘मि. एशिया’ किताब

  • महाराष्ट्राच्या सुनीत जाधवने ५२व्या आशियाई बॉडीबिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये ‘मि. एशिया’ हा किताब पटकावला.
  • तीनवेळचा ‘मि. इंडिया’ असलेल्या सुनीतचे आशियाई स्तरावरील हे पहिलेच विजेतेपद ठरले.
  • भारतात पार पडलेल्या या स्पर्धेत यजमान भारताने पुरूष शरीरसौष्ठव गटामध्ये ५ सुवर्ण, ६ रौप्य आणि ४ कांस्य अशी एकूण १५ पदके तर जिंकली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा