केंद्र सरकारकडून ‘स्वस्थ भारत यात्रा’ सुरू
- १६ ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिवसांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ‘स्वस्थ भारत यात्रा’ सुरू केली.
- या राष्ट्रव्यापी मोहिमेचा उद्देश, देशभरातील लोकांना सुरक्षित भोजन घेण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी जागृत करणे आहे.
- हे अभियान राज्यांच्या सहयोगाने सुरु करण्यात आले आहे. या मोहीमेचे नेतृत्व भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) करीत आहे.
- या मोहिमेअंतर्गत देशभरात ग्राहकांना सुरक्षित आणि पौष्टिक आहार, निरोगी राहणीमान आणि खाद्य पदार्थांमधील भेसळ यांविषयी जागरुक करण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे.
- या रॅलीत सुमारे ७,५०० सायकलस्वार सहभागी होतील, जे प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात एकूण १०० दिवसांत सुमारे १८ हजार किलोमीटर प्रवास करतील.
- हे सायकलस्वार ‘इट राईट इंडिया’ (Eat Right India) असा संदेश देतील. २७ जानेवारी २०१९ रोजी राजधानी दिल्लीमध्ये या मोहिमेचा समारोप होईल.
युवा ऑलिम्पिक: प्रविण चित्रावेलला कांस्यपदक
- अर्जेन्टिनामध्ये ब्युनास आयर्स येथे आयोजित युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या प्रविण चित्रावेलने तिहेरी उडी प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.
- प्रविणने पहिल्या टप्प्यात १५.८४ मीटर आणि दुसऱ्या टप्प्यात १५.६८ मीटर उडी मारत हे पदक निश्चित केले.
- क्युबाच्या जॉर्डन फॉर्च्युन (३४.१८ मीटर) आणि नायजेरियाच्या इनेह ओरीत्सेमेयीवा (३१.८५ मीटर) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले.
ॲना बर्न्स यांना मॅन बुकर पुरस्कार
- इंग्रजी ग्रंथविश्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार उत्तर आर्यलँडच्या लेखिका ॲना बर्न्स यांना मिळाला आहे. मॅन बुकर पुरस्कारांची ही ५०वी आवृत्ती आहे.
- ॲना बर्न्स यांच्या ‘मिल्कमन’ या कादंबरीला हा बहुमान मिळाला आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकणाऱ्या त्या उत्तर आर्यलँडच्या पहिल्याच लेखिका आहेत.
- अॅना बर्न्स यांचा जन्म १९६२मध्ये बेलफास्ट येथे झाला. ‘नो बोन्स’ ही त्यांची पहिली कादंबरी होती, त्यासाठी त्यांना २००१मध्ये विनिफ्रेड होल्टबी मेमोरियल प्राइज देऊन सन्मानित करण्यात आले होते.
मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार
- मॅन बुकर पुरस्कार प्रथम बुकर-मॅक्कोनेल पुरस्कार म्हणून ओळखला जात होता. १९६९मध्ये मॅन बुकर पुरस्कार सुरू झाला.
- राष्ट्रकुल देशाच्या किंवा आयरिश नागरिकांनी लिहिलेल्या अनुवादित इंग्रजी पुस्तकांसाठी हा पुरस्कार प्रतिवर्षी दिला जातो. लेखकाबरोबरच त्या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादकालाही देण्यात येतो.
- पूर्वी हा पुरस्कार दर २ वर्षानी देण्यात येत होता. २०१६या वर्षापासून प्रत्येक वर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराच्या विजेत्याला ५०,००० पौंडाची रक्कम पुरस्कारस्वरूप देण्यात येते.
- आतापर्यंत अरविंद अडिगा, किरण देसाई, अरुंधती रॉय आणि सलमान रश्दी या ४ भारतीय लेखकांना मॅन बुकर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
१७ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मूलन दिन
- जगभरात १७ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय दारीद्र्य निर्मुलन दिन साजरा केला जातो.
- यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय दारीद्र्य निर्मुलन दिनाची संकल्पना 'Coming together with those furthest behind to build inclusive world of universal respect for human rights and dignity' ही आहे.
- संकल्पनेचा अर्थ: सर्वाधिक मागासलेल्या लोकांसह एकत्र येऊन असे जग निर्माण करणे, जेथे मानवाधिकार आणि प्रतिष्ठेला सार्वभौमिक आदर असेल.
- जगभरातील समुदायांमध्ये गरीबी हटवण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांच्या बाबतीत जागरूकता वाढवणे हा या दिनामागील उद्देश्य आहे.
- यादिवशी दारीद्र्य निर्मुलनासाठी विविध राष्ट्रांकडून केले जाणारे प्रयत्न, विविध विकास कार्ये व योजना याबाबत माहिती जाहिर केली जाते.
पार्श्वभूमी
- संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने २२ डिसेंबर १९९२ रोजी १७ ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मुलन दिवस आयोजित करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
- २०१८चा आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मूलन दिन संयुक्त राष्ट्र महासभेच्या या दिवसाच्या घोषणेचा २५वा वर्धापन दिन असेल.
- अत्यंत गरीबी, हिंसा आणि उपासमारीचे बळी पडलेल्यांच्या सन्मानार्थ १९४८ रोजी १७ ऑक्टोबर रोजी पॅरीसमध्ये १ लाखाहून अधिक लोक एकत्र आले होते.
- त्यावेळी पॅरीसमध्ये मानवाधिकार सार्वत्रिक घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या दिवसाला चिन्हांकित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने या तारखेची निवड केली.
हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी ओल्ली कासव अधिकृत शुभंकर
- पुरुष हॉकी विश्वचषक २०१८ स्पर्धेसाठी ओल्ली नावाच्या कासवाची अधिकृत शुभंकर (मॅस्कॉट) म्हणून निवड करण्यात आली आहे.
- ऑलिव्ह रिडले कासवाच्या संरक्षणासाठी जागरुकता पसरविणे हा या निर्णयामागचा उद्देश आहे. ही प्रजाती ओडिशा राज्यात गाहिरमाथा तटावर आढळते आणि ती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे.
- पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या १४व्या आवृत्तीचे आयोजन २८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर २०१८ दरम्यान ओडिशामध्ये भुवनेश्वर येथे होणार आहे.
- या स्पर्धेत १६ देश सहभागी होतील. कलिंगा स्टेडियम, भुवनेश्वर येथे ही स्पर्धा आयोजित केली जाईल.
- विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणारे संघ: भारत, इंग्लंड, चीन, मलेशिया, कॅनडा, पाकिस्तान, बेल्जियम, जर्मनी, न्यूझीलंड, स्पेन, आयर्लंड, फ्रान्स, अर्जेंटिना, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका.
आयसीआयसीआयच्या सीईओ व एमडीपदी संदीप बक्षी
- भारतीय रिझर्व बँकेने आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) पदावर संदीप बक्षी यांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे.
- ते चंदा कोचर यांची जागा घेतील. व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणात त्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे त्यांनी आपल्या सीईओ व एमडीपदाचा राजीनामा दिला होता.
- व्हिडीओकॉन समूहाला कर्ज देताना अधिकारांचा गैरवापर केल्याप्रकरणी चंदा कोचर यांची बँकेच्या अंतर्गत समितीमार्फत चौकशी होणार आहे.
- सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण या वादग्रस्त कर्ज प्रक्रियेची चौकशी करणार आहेत. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत चंदा कोचर रजेवर असतील.
- संदीप बक्षी सध्या आयसीआयसीआय प्रुडेंशिअलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते.
- बक्षी यांच्या जागी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचे सीईओ व एमडी म्हणून बँकेचे कार्यकारी संचालक एन. एस. कन्नन यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
आयसीआयसीआय बँक
- स्थापना: १९५५
- मुख्यालय: मुंबई
- आयसीआयसीआय (इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्वेस्टमेंट कारपोरेशन ऑफ इंडिया) हा भारताची बहुराष्ट्रीय बँक आहे.
- २०१४मध्ये बाजार भांडवलाच्या आधारे, आयसीआयसीआय बँक देशातील तिसरी सर्वात मोठी बँक होती.
- आयसीआयसीआय बँकेच्या एकूण ४४५० शाखा तर १३,९९५ एटीएम आहेत. ही बँक भारतासह १९ देशांमध्ये कार्यरत आहे.
- अमेरिका, सिंगापूर, बहरीन, हाँगकाँग, श्रीलंका, कतार, ओमान, चीन आणि दक्षिण अफ्रिका येथे आयसीआयसीआय बँकेच्या शाखा आहेत.
ममता कालिया यांना व्यास सम्मान
- आधुनिक हिंदी साहित्यातील प्रख्यात कथालेखिका ममता कालिया यांना त्यांच्या ‘दुक्खम-सुक्खम’ या कादंबरीसाठी प्रतिष्ठेचा व्यास सम्मान जाहीर झाला आहे.
- ममता कालिया यांचा जन्म २ नोव्हेंबर १९४० रोजी मथुरा येथे झाला. त्यांचे वडील विद्याभूषण अग्रवाल हे हिंदी साहित्यातील एक विद्वान मानले जातात.
- दिल्ली विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात ममताजींनी एम.ए. केले. नंतर मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठात त्यांनी अध्यापनाचे कार्य सुरू केले.
- सुरुवातीला काही नियतकालिकांतून त्यांनी इंग्रजीतून लिखाण केले. नंतर मात्र हिंदी लेखनावरच भर दिला.
- कथा, कविता, कादंबरी, नाटय़, अनुवाद, पत्रकारिता अशा विविध साहित्य प्रकारांत त्यांनी मुशाफिरी केली.
- बदलत्या परिस्थितीत बदललेली महिलांची मानसिकता व त्यांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून वेगळ्या धाटणीच्या कथा त्यांनी लिहिल्या.
- बेघर, मेला, मुखौटा, बोलने वाली औरत, रोशनी की मार, प्रेम कहानी, दौडक, दुक्खम-सुक्खम या त्यांच्या कादंबऱ्या वाचकप्रिय ठरल्या.
- यापूर्वी त्यांना उत्तर प्रदेश हिंदी साहित्य संस्थेचा यशपाल कथा सम्मान तसेच साहित्य भूषण सम्मान, राम मनोहर लोहिया पुरस्कार मिळाला आहे.
व्यास सन्मान
- हिंदी साहित्यामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भारतीय व्यक्तीला व्यास सन्मान दरवर्षी प्रदान करण्यात येतो.
- के.के. बिर्ला फाऊंडेशनने १९९१मध्ये या पुरस्काराची सुरुवात केली. सन्मानचिन्ह आणि ३.५० लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
बिहारच्या ‘शाही लिची’ला जीआय टॅग
- बिहारच्या ‘शाही लिची’ला विशिष्ट भौगोलिक संकेतक म्हणजे जीआय टॅग मिळाला आहे. शाही लिचीचे उत्पादन मुझफ्फरपूर, पूर्व चंपारण्य, वैशाली, समस्तीपूर आणि बेगूसराई जिल्ह्यात घेतले जाते.
- ही जीआय नोंदणी लिची ग्रोव्हर्स असोसिएशन ऑफ बिहारच्या नावावर करण्यात आली आहे. बिहारमध्ये देशातील ४० टक्के लिची उत्पादित केली जाते.
भौगोलिक संकेतक (जीआय)
- जीआय म्हणजे जिऑग्राफिकल इंडिकेशन अर्थात भौगोलिक संकेतक. हा बौद्धिक संपदा विशेष अधिकार म्हणून ओळखला जातो.
- उत्पादनास स्वामित्व म्हणजेच कायदेशीर हक्क प्राप्त करून देण्यासाठी शासनातर्फे वैयक्तिक उत्पादनासाठी पेटंटची, तर सामूहिक उत्पादनासाठी भौगोलिक संकेतक (जीआय)ची मान्यता दिली जाते.
- विशिष्ट भौगोलिक प्रदेशातली उत्पत्ती आणि त्यामुळे विशिष्ट गुणधर्म आणि लौकिक प्राप्त झालेल्या उत्पादनांना जीआय टॅग दिला जातो.
- यामुळे उत्पादनाला दर्जा आणि त्या भौगोलिक प्रदेशामुळे निर्माण झालेले वैशिष्ट्य यांची खात्री प्राप्त होते.
- एखादी संस्था, जात, जमात किंवा समूह काही विशिष्ट पदार्थांच्या निर्मितीसाठी जोडलेला असेल तर त्या समूहाला हा बौद्धिक संपदा भौगोलिक संकेतक या नावाने मिळतो.
- या माध्यमातून या सलग्नित समूहाला आपला पदार्थ अथवा वस्तू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेण्याची संधी मिळते.
- भौगोलिक संकेतक नोंदणीचा कायदा भारतात प्रस्तावित केला गेला आणि प्रत्यक्षात २००१साली आला. विशिष्ट भागातून तयार होणाऱ्या विशेष पदार्थाला भौगोलिक उपदर्शन कायद्याअंतर्गत नोंद करता येते.
- जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) बौद्धिक संपदा विषयक करारातून भारतात आलेल्या अनेक कायद्यांपैकी सदर भौगोलिक संकेतक नोंदणी कायदा हा एक आहे.
- आजवर जगातील १६० देशांनी जीआयला मान्यता दिली आहे. हे संकेतक मिळाल्यानंतर त्या त्या परिसरातील पिकांच्या गुणवैशिष्ट्यांवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जाते.
- २००४मध्ये दार्जीलिंग चहा या उत्पादनातला देशातला पहिला जीआय टॅग मिळाला. भारतात जीआय टॅग मिळालेली एकूण ३२५ उत्पादने आहेत.
- एकूण २५ जीआयसह महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक जीआय मिळविणारे राज्य आहे.
- शेतकरी, विणकर, कारागीर यांना उत्पन्नाची जोड मिळून दुर्गम भागातल्या ग्रामीण अर्थव्यवस्थांना जीआय उत्पादनामुळे लाभ होऊ शकतो.
- पारंपारिक पद्धतीद्वारे आपल्या ग्रामीण कारागीरांकडे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आगळे कौशल्य आणि कला येत असते, त्याला प्रोत्साहन देऊन या कलांचे जतनही आवश्यक आहे.
- मानांकनाचे फायदे
- जागतिक बाजारात मुल्यवर्धी.
- देशातील ब्रॅंड म्हणनू ओळख.
- देशांतर्गत बाजारातही योग्य भाव.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा