चालू घडामोडी : २१ ऑक्टोबर

कोप इंडिया या हवाई सरावात जपानचा समावेश

  • भारत आणि अमेरिका दरम्यानच्या ‘कोप इंडिया’ या हवाई सरावात जपानला समाविष्ट करण्यास सहमती झाली आहे. यापुढे हा सराव त्रिपक्षीय असेल.
  • या युद्धाभ्यासाची पुढील आवृत्ती डिसेंबर २०१८मध्ये आयोजित केली जाणार आहे. यासाठी पश्चिम बंगालमधील कलाईकुंडा येथे परिषद आयोजित केली जाईल.
  • ऑगस्ट २०१८मध्ये भारत आणि आणि जपानच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
  • या बैठकीत जपानने कोप इंडिया युद्ध सरावासाठी पर्यवेक्षकांना पाठविण्यास सहमती दर्शविली होती.
  • कोप इंडियामध्ये सुरुवातीला लहान स्तरावरील युद्ध अभ्यास केला जाईल. त्यात वाहतूक विमानांचा समावेश असेल.
  • त्यानंतरच्या आवृत्तीत हळूहळू स्तर वाढविण्यात येतील. यावेळी या सरावात जपान पर्यवेक्षक पाठवेल.
  • भारत, अमेरिका आणि जपान हे ३ देश ‘मलबार’ या नौदल युद्ध सरावामध्ये संयुक्तपणे सहभागी होतात.
कोप इंडिया
  • भारतीय आणि अमेरिकेद्वारे आयोजित हा एक आंतरराष्ट्रीय वायुसेना अभ्यास आहे. हा अभ्यास भारतात आयोजित केला जातो.
  • फेब्रुवारी २००४मध्ये ग्वाल्हेर येथे प्रथमच या युद्ध सरावाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर २००५, २००६ व २००९मध्ये या अभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते.

२१ ऑक्टोबर: आझाद हिंद सेनेच्या स्थापनेला ७५ वर्ष पूर्ण

  • २१ ऑक्टोबर २०१८ रोजी आझाद हिंद सेनेच्या स्थापनेला ७५ वर्ष पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रसंगी लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज फडकावला.
  • आझाद हिंद सेनेची स्थापना २१ ऑक्टोबर १९४३ रोजी सिंगापुर येथे झाली. लढाईमध्ये शरण आलेल्या भारतीय सैन्याच्या मदतीने या सेनेची स्थापना करण्यात आली होती.
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांनी प्रेरित होऊन ही फौज स्थापन करण्यात आली होती. यात रासबिहारी बोस यांची भूमिका फार महत्वाची होती.
  • ही एक सशस्त्र सेना होती, जिचा उद्देश भारताला ब्रिटीशांपासून स्वातंत्र्य मिळवून देणे होते. सुभाषचंद्र बोस या सेनेचे सर्वोच्च कमांडर होते.
  • ‘कदम कदम बढाये जा’ ही आझाद हिंद सेनेचे प्रेरणागीत होते. याची रचना रामसिंह ठाकूर यांनी केली होती.
  • या सेनेने सिंगापूरमध्ये आझाद हिंद सरकारची स्थापना केली. या सरकारला जर्मनी, जपान, फिलिपाईन्स, चीन, इटली आणि आयर्लंडसारख्या देशांना मान्यता दिली.
  • जपानने आझाद हिंद सरकारला अंदमान व निकोबार बेटे दिली. नंतर या बेटांचे नाव बदलून शहीद (अंदमान) आणि स्वराज्य (निकोबार) असे ठेवले गेले.
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेल्या ‘चलो दिल्ली’ या प्रसिद्ध नाऱ्यासह आझाद हिंद फोज २१ मार्च १९४४रोजी भारतात दाखल झाली.
  • आझाद हिंद सेनेने इंफाळच्या दिशेने आझाद हिंद सेनेने कूच करत, इंग्रज सैन्याशी निकराने लढा दिला.
  • परंतु डोंगराळ व जंगली प्रदेश आणि प्रतिकूल हवामान यामुळे नोव्हेंबर १९४४ ध्ये सीमेवरच्या लढाईत आझाद हिंद सेनेला पराभवाला तोंड द्यावे लागले.
  • इम्फाळच्या पराभवानंतर आझाद हिंद सैन्यातील शिस्त बिघडली आणि सैन्यातील अधिकारी व शिपाई आपल्या जागा सोडून पलायन करु लागले.
  • रंगून शहर इंग्रजांच्या ताब्यात गेले आणि नेताजींना आपल्या सहकाऱ्यां उत्तरेकडे सह पलायन करावे लागले.
  • ऑगस्ट १९४५मध्ये तैवानला जात असताना नेताजींचे विमान अपघातामध्ये निधन झाले आणि सशस्त्र क्रांतीद्वारे भारताला स्वतंत्र करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला.
  • नेताजींनी प्रचंड धैर्य, साधनसामग्री गोळा करण्याचे कौशल्य आणि प्रेरक नेतृत्व यांच्या साह्याने एक सुसज्ज अशी आझाद हिंद सेना उभी केली.
  • आझाद हिंद सेनेमध्ये एकूण ५० हजारापेक्षा जास्त सैनिक होते. शहानवाझ खान, धिल्लाँ, कॅप्टन लक्ष्मी, अय्यर हे त्यांचे सहकारी होते.
  • आधुनिक भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या सशस्त्र लढ्याच्या इतिहासामध्ये आझाद हिंद सेनेने महत्त्वाची भूमिका बजावली.

चीनच्या पहिल्या उभयचर विमानाची यशस्वी चाचणी

  • चीनने आपले पहिले उभयचर (Amphibious) विमान ‘एजी६००’चे (सांकेतिक नाव: कुनलॉन्ग) यशस्वीपणे पाण्यावर उड्डाण आणि लँडिंग केले.
  • हे जगातील सर्वात मोठे उभयचर विमान मानले जात आहे. या विमानाने हुबेई प्रांतातील झान्ग्हे जलाशयातून उड्डाण केले. ते १५ मिनिटे हवेमध्ये होते.
  • या विमानाची निर्मिती एविएशन इंडस्ट्री कारपोरेशन ऑफ चाइनाद्वारे (AVIC) करण्यात आली आहे. या विमानाने आपले पहिले उड्डाण डिसेंबर २०१७मध्ये केले होते.
  • एजी६०० हे चीनच्या मोठ्या विमानांच्या दलातील तिसरे विमान आहे. (इतर दोन विमाने: मालवाहु विमान वाय-२० आणि प्रवासी विमान सी९१९)
  • एजी६०० हे विमान पाण्यावरून उड्डाण करू शकते यासेच पाण्यावर उतरूही शकते. याच्या पंखांची लांबी ३८.८ मीटर आहे.
  • यात ४ टर्बोप्रोप इंजिन्स आहेत. यात ५० लोक वाहून नेण्याची क्षमता असून, ते १२ तास उड्डाण करू शकते.
  • या विमानाचा वापर लष्करी कामांसाठी केला जाऊ शकतो. त्याव्यतिरिक्त त्याचा वापर अग्निशमनासाठी आणि समुद्रात बचाव कार्यांसाठीही केला जाऊ शकतो.
  • या विमानाचा पल्ला ४५०० किमीचा असून, ते दक्षिण चीन सागरात बनविलेल्या चीनच्या कृत्रिम बेटांपर्यंत पोहचू शकते.

२१ ऑक्टोबर: पौलीस हुतात्मा दिन

  • १९५९मध्ये लडाखमध्ये हॉट स्प्रिंग येथे चिनी सैनिकांशी दोन हात करताना बलिदान दिलेल्या पोलिसांच्या स्मृत्यर्थ २१ ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी देशभर पौलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.
  • त्याचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पोलीस स्मारक देशाला समर्पित केले.
  • याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलीस आणि अर्धसैनिक दलांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने पुरस्कार देण्याचीही घोषणा केली.
पार्श्वभूमी
  • २१ ‍ऑक्टोबर १९५९ रोजी गस्त घालत असलेल्या सीआरपीएफच्या १० जवानांवर अक्साईचीनच्या दुर्गम भागात हॉट स्प्रिंग येथे चिनी सैनिकांनी अचानक हल्ला चढवला.
  • या हल्ल्यात आपल्या १० जवानांना वीरमरण आले. आपले कर्तव्य बजावत असताना या जवानांनी अतिशय शौर्याने शत्रूंविरोधात लढा दिला.
  • या जवानांच्या हौतात्म्याचे स्मरण म्हणून दरवर्षी २१ ‍ऑक्टोबरला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्यांना आदरांजली वाहिली जाते.
राष्ट्रीय पोलीस स्मारक
  • हे स्मारक दिल्लीतील चाणक्यपुरी येथे ६.१२ एकर जमिनीवर उभारण्यात आले आहे. ते देशातील सर्व राज्यांच्या तसेच केंद्र सरकारच्या पोलीस दलांचे प्रतिनिधित्व करते.
  • हे स्मारक २३८ टन वजनाच्या ग्रॅनाईटच्या तुकड्यांपासून बनविण्यात आले आहे. त्यावर ३४,८४४ पोलीस कर्मचाऱ्यांची नावे कोरण्यात आली आहेत.
  • कर्तव्य बजावत असताना देशासाठी प्राणाहुती दिलेल्या केंद्रीय व राज्यांच्या पोलीस दलांमधील ३४,८४४ कर्मचाऱ्यांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी केंद्र सरकारने हे स्मारक उभारले आहे.
  • हे राष्ट्रीय स्मारक देशभरातील पोलीस दलांची यशोगाथा चिरंतन ठेवेल व भावी पिढ्यांना स्फूर्ती देत राहील.
नेताजी सुभाषचंद्र बोस
  • महान स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी ब्रिटिश भारतातील कटक येथे झाला.
  • १९३८-३९ या कालावधीत ते काँग्रेसचे अध्यक्ष होते. नंतर मतभेदांमुळे त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली.
  • त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना करून फौजने देशाला इंग्रंजांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
  • १९४४मध्ये अमेरिकन पत्रकार लुई फिशर यांच्याशी चर्चा करताना महात्मा गांधींनी नेताजींचा देशभक्तांचा देशभक्त असा उल्लेख केला होता.

डेन्मार्क ओपनमध्ये सायना नेहवालला रौप्यपदक

  • डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत सायना नेहवालला तैपेईच्या ताय त्झु यिंगने पराभूत करत स्पर्धेचे जेतेपद (सुवर्णपदक) पटकावले.
  • सलग ११ सामन्यांत यिंगने सायनावर विजय मिळवण्याचा पराक्रम केला. त्यामुळे सायनाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
  • यापूर्वी सायनाने २०१२मध्ये डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे पहिले आणि एकमेव जेतेपद पटकावले होते.
सायना नेहवाल
  • सायना नेहवालचा जन्म १७ मार्च १९९० रोजी हिस्सार (हरयाणा) येथे झाला. ती आघाडीची भारतीय बॅडमिंटनपटू आहे.
  • ऑलिंपिक खेळात उपांत्यपूर्व फेरी गाठणारी तसेच जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी सायना ही पहिली भारतीय महिला आहे.
  • जून २००९ मध्ये झालेल्या इंडोनेशियन खुल्या स्पर्धांमध्ये अजिंक्यपद पटकावणारी सायना ही पहिलीच भारतीय महिला खेळाडू आहे.
  • ऑलिंपिक (लंडन ऑलिंपिक २०१२) खेळात बॅडमिंटनमध्ये कांस्य जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे.
  • सायनाला २००९-१०मध्ये भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
  • ती २०१५मध्ये बॅडमिंटनमध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी होती. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहे.
  • तिने आपल्या कारकिर्दीत २३ आंतरराष्ट्रीय खिताब जिंकले आहेत. त्यात १० सुपरसिरीज विजेतेपदांचादेखील समावेश आहे.

अमेरिकेच्या फोर्सकॉमचे नेर्तृत्व एका महिलेकडे

  • लेफ्टनंट जनरल लॉरा जे रिचर्डसन यांची अमेरिकन सैन्यातील यूएस आर्मी फोर्सेज कमांडचे (फोर्सकॉम) नेतृत्व करण्यासाठी निवड करण्यात अली आहे.
  • एका महिला अधिकाऱ्याला इतकी मोठी जबाबदारी देण्याची अमेरिकेच्या सैन्यदलाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.
  • यूएस आर्मी फोर्सेज कमांडमध्ये ७,७६,००० सैनिक व ९६,००० सैनिकेतर कर्मचारी आहेत.
  • सैन्य अधिकारी म्हणून लॉरा यांनी आपल्या कारकीर्दीत उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. १९८६मध्ये त्या अमेरिकेच्या सैन्यदलात सहभागी झाल्या.
  • त्यानंतर २०१२मध्ये फर्स्ट कॅवलरी डिव्हिजनचे डेप्यूटी कमांडिग जनरल पद सांभाळणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी बनल्या. कॅवलरी डिव्हिजन ‘अमेरिका फर्स्ट टीम’ या नावानेही ओळखली जाते.
  • २०१७मध्ये लॉरा जनरल रॉबर्ट बी अब्राम्स यांच्या कमांडमध्ये दुसऱ्या स्थानावर होत्या. त्यावेळी त्या उत्तर कॅरोलिनाच्या फोर्ट ब्रॅग येथील फॉरस्कॉममध्ये डेप्यूटी जनरलपदी होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा