चालू घडामोडी : २० ऑक्टोबर

धर्म गार्डियन: भारत आणि जपानचा संयुक्त सैन्य अभ्यास

  • भारत आणि जपानी सैन्याच्या ‘धर्म गार्डियन २०१८’ या संयुक्त सैन्य अभ्यासाच्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन मिझोराममध्ये करण्यात येणार आहे.
  • २ आठवड्यांपर्यंत चालणारा हा संयुक्त सैन्य अभ्यास १ नोव्हेंबर २०१८ पासून सुरू होईल.
  • या संयुक्त सैन्य अभ्यासात जंगली प्रदेशात युद्धाभ्यास केला जाईल. संरक्षणासंबधी आव्हानांना तोंड देण्यासाठी दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान समन्वय वाढविणे, हा या अभ्यासाचा उद्देश आहे.
  • या सरावादरम्यान दोन्ही सैन्य युद्धस्थितीचा अभ्यास, युद्ध काळात योजना आखणी आणि त्याची अंमलबजावणी याचा सराव करणार आहेत.
  • या संयुक्त सैन्य अभ्यासात भारताचे प्रतिनिधित्व ६/१ गोरखा रायफल्स करेल. तर जपानचे प्रतिनिधित्व त्यांच्या भूदलाच्या ३२ इन्फंट्री रेजिमेंटद्वारे केले जाईल.
  • या संयुक्त लष्करी सरावामुळे दोन्ही देशांमध्ये परस्पर संबंध सुधारतील. तसेच दहशतवादाविरुद्ध लढण्यास मदत होईल.
  • भारत आणि जपान यांच्यातील प्रगतीशील संबंधांमध्ये हे एक महत्त्वपूर्ण पाऊल सिध्द होईल.

सिंगापूरमध्ये एडीडीएमचे आयोजन

  • सिंगापूरमध्ये १९-२० ऑक्टोबर २०१८ रोजी १२व्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीचे (एडीडीएम) आणि ५व्या एडीडीएम-प्लसचे आयोजन करण्यात आले.
  • ही बैठक आग्नेय आशियातील संरक्षणासाठी प्रमुख मंत्रीस्तरीय मंच आहे. या मंचावर आसियान देशांद्वारे संरक्षण आणि सहकार्यावर चर्चा केली जाते.
  • या बैठकीमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, चीन, जपान, न्यूझीलँड, दक्षिण कोरिया, रशिया आणि अमेरिका या देशांचे संरक्षण मंत्री उपस्थित होते.
  • या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी केले.
  • या बैठकीत संरक्षण मंत्र्यांनी सागरी सुरक्षा, दहशतवाद विरोधी कारवाई, शांतता मोहिमा या मुद्यांवर सहमती दर्शवली.
एडीडीएम प्लस
  • ADDM: ASEAN Defence Ministers Meeting
  • एडीडीएम प्लस आसियान सदस्य देश आणि ८ भागीदार देशांचे संरक्षण मजबूत करण्यासाठी तसेच शांती व विकास निर्मितीसाठी एक मंच आहे.
  • या बैठकीचा उद्देश चर्चा आणि पारदर्शकतेसह सदस्य देशांमध्ये परस्पर विश्वास मजबूत करणे हा आहे.
  • एडीडीएम प्लसच्या पहिल्या परिषदेचे आयोजन २०१०मध्ये व्हिएतनामची राजधानी हनोई येथे करण्यात आले होते.
आसियान
  • ASEAN (आसियान) : Association of Southeast Asian Nations
  • आसियान ही आग्नेय आशियातील १० देशांची संघटना असून, याचे सचिवालय जकार्ता (इंडोनेशिया) येथे आहे.
  • ब्रुनेइ, म्यानमार, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, फिलीपाइन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम हे देश आसियानचे सदस्य आहेत.
  • ८ ऑगस्ट १९६७ रोजी रोजी ही संघटना स्थापन करण्याची घोषणा झाली, यालाच ‘बँकॉक घोषणा’ म्हणतात.
  • स्थापनेवेळी याचे इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपाइन्स, सिंगापूर, थायलंड हे पाच देश होते. त्यानंतर ब्रुनेइ हा सहावा देश जोडला गेला.
  • १९९५ साली व्हिएतनाम, १९९७ साली लाओस व म्यानमार आणि १९९९ साली कंबोडिया हे देश जोडले गेले.
  • जगाच्या एकूण जमिनक्षेत्रापैकी ३ टक्के क्षेत्र आसियान देशांनी व्यापलेले आहे. जगाच्या लोकसंख्येपैकी ८.८ टक्के लोकसंख्या आसियान देशांची आहे.
  • सर्व आसियान देशांची मिळून एक अर्थव्यवस्था मानली तर ती जगातील सातव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.

मीनल पटेल यांचा अमेरिकेत प्रेसिडेंशियल मैडलने सन्मान

  • भारतीय वंशाच्या मीनल पटेल यांना मानवी तस्करीविरुद्ध त्यांनी दिलेल्या लढ्यासाठी अमेरिकेत प्रेसिडेंशियल मैडलने गौरविण्यात आले.
  • मीनल पटेल या मानवी तस्करीवरील ह्युस्टनचे महापौर सिल्वेस्टर टर्नर यांच्या सल्लागार आहेत.
  • जुलै २०१५मध्ये त्यांना या पदावर नियुक्त करण्यात आले. या पदावर कार्य करताना त्यांनी मानव तस्करी थांबविण्यासाठी प्रशंसनीय कार्य केले.
  • सध्या त्या महापौरांच्या मानवी तस्करी विरोधी योजनेची अंमलबजावणी करीत आहेत. अमेरिकेतील अशा प्रकारची ही पहिलीच योजना आहे.
  • यापूर्वी त्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवीय शिखर संमेलनाच्या प्रवक्त्याही होत्या. त्यांनी कनेक्टिकट विद्यापीठातून एमबीए पदवी प्राप्त केली आहे.

स्टीफन हॉकिंग यांचे शेवटचे पुस्तक प्रकाशित

  • दिवंगत शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे ‘Brief Answers to the Big Questions’ हे शेवटचे पुस्तक १६ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झाले.
  • टाईम ट्रॅव्हल, ब्लॅक होल इत्यादीसारख्या अनेक विषयांवर या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे.
  • या पुस्तकात हॉकिंग यांनी परमाणु शस्त्रे, कृत्रिम बुद्धिमत्ता, जेनेटिक इंजीनियरिंग आणि ग्लोबल वार्मिंग यासारख्या विषयांवर आपले मत नोंदविले आहे.
स्टीफन हॉकिंग
  • ब्रिटनचे ख्यातनाम विश्वरचना शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ रोजी झाला. त्यांना आजच्या युगातील सर्वोत्तम शास्त्रज्ञांपैकी एक मानले जाते.
  • ते एक सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ, विश्वरचना शास्त्रज्ञ व लेखक होते. ब्लॅक होल, हॉकिंग एनर्जी, हॉकिंग्ज रेडिएशन यांसह अनेक शोधांसाठी ते प्रसिद्ध आहेत.
  • त्यासाठी त्यांना भौतिकशास्त्रातले अत्यंत मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत. कमांडर ऑफ दी ब्रिटिश एम्पायर या पुरस्कारानेही त्यांना गौरवले होते.
  • २००९मध्ये त्यांना प्रेसिडेन्शिअल मेडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले होते.
  • त्यांचे 'ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम' हे पुस्तक विशेष गाजले. या पुस्तकात त्यांनी बिग बँग आणि कृष्णविवरासंदर्भात सविस्तर विवेचन केले होते.
  • वयाच्या २१व्या वर्षी ‘मोटार न्यूरॉन डिसीज’ने त्यांना ग्रासले होते. ते फार फार तर २ वर्षे जगू शकतील अशी भीती डॉक्टरांनी वर्तवली होती.
  • परंतु असामान्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी आपल्या आजारपणावर मात करत आधुनिक काळातील न्यूटन अशी ख्याती जगभर मिळवली.
  • दुर्धर अशा आजारपणावर मात करत विज्ञान विषयात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या हॉकिंग यांचे १४ मार्च २०१८ रोजी निधन झाले.

एससीओ शिक्षण मंत्र्यांची बैठक कझाकस्तान पार पडली

  • शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) शिक्षण मंत्र्यांची ७वी बैठक कझाकस्तानची राजधानीत अस्ताना येथे आयोजित करण्यात आली होती.
  • कझाकस्तान सरकार, कझाकस्तान विज्ञान व शिक्षण मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय व एससीओ विद्यापीठाच्या रेक्टर कार्यालयाद्वारे ही बैठक आयोजित केली गेली.
  • भारत, कझाकस्तान, चीन, किरगिझस्तान, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानचे शिक्षण मंत्र्यांनी या बैठकीत भाग घेतला.
  • या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व मानव संसाधन आणि विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंग यांनी केले.
  • या बैठकीत संयुक्त संशोधन प्रकल्प, शैक्षणिक यात्रा, भाषा अभ्यास, व्यावसायिक शिक्षण आणि युवा विनिमय कार्यक्रम या क्षेत्रामध्ये बहुपक्षीय सहकार्यावर चर्चा करण्यात आली.
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन
  • शांघाय सहकार्य संघटनेची (एससीओ) स्थापना २००१मध्ये चीनच्या पुढाकाराने करण्यात आली.
  • चीन, कझाकस्तान, किर्गीझस्तान, उझबेकिस्तान, ताजिकीस्तान आणि रशिया हे या संघटनेचे संस्थापक देश आहेत.
  • या देशांपैकी उझबेकिस्तान वगळता इतर देश १९९६मध्ये स्थापन झालेल्या ‘शांघाय फाइव्ह’ या गटाचे सदस्य होते.
  • २०१७मध्ये भारत व पाकिस्तानला या संघटनेचे पूर्ण सदस्यत्व देण्यात आल्यामुळे सध्या या संघटनेचे ८ सदस्य देश आहेत.
  • हे ८ देश जगातील ४२ टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात. या देशांचे उत्पन्न हे जागतिक उत्पन्नाच्या २० टक्के आहे.
  • अफगाणिस्तान, बेलारूस, इराण व मंगोलिया हे ‘एससीओ’शी निरीक्षक देश म्हणून संलग्न आहेत.
  • दहशतवाद, फुटीरतावाद या समस्यांविरोधात लढण्यासाठी आणि उपखंडीय समृद्धीसाठी यंत्रणा निर्माण करण्याकरिता शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) स्थापन झाली.
  • मूलतत्त्ववाद व दहशतवाद या समस्यांबरोबरच व्यापार, गुंतवणूक व दळणवळण तसेच संपर्क या मुद्द्यांवर या संस्थेच्या माध्यमातून बदल घडून येणे अपेक्षित आहे.

भूटानमध्ये ड्रुक न्यामप शोगपा पक्षाला बहुमत

  • भूटानमध्ये १८ ऑक्टोंबरला पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये ड्रुक न्यामप शोगपा पक्षाला बहुमत मिळाले आहे. या पक्षाने नॅशनल असेम्बलीमध्ये ४७ पैकी ३० जागा जिंकल्या.
  • ही भूटानमधील तिसरी सार्वत्रिक निवडणूक होती. सुमारे १०० वर्षांपासून राजेशाही अस्तित्वात असलेल्या भूटानमध्ये २००८मध्ये लोकशाहीला सुरुवात झाली. येथे २००८मध्ये पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणूका झाल्या होत्या.
  • निवडणूकीमध्ये ड्रुक न्यामप शोगपा पक्षाचे प्रमुख डॉ. लोतेय शेरिंग हे भूटानचे नवे पंतप्रधान होणार आहेत.
भूटानच्या सभागृहाचे स्वरूप
  • भूटानमध्ये दोन सभागृह असतात. त्यापैकी राष्ट्रीय काउंसिल हे जेष्ठ तर नॅशनल असेम्बली हे कनिष्ट सभागृह आहे.
  • राष्ट्रीय काउंसिलमध्ये एकूण २५ जागा आहेत. यापैकी ५ सदस्यांना भूटान नरेश नामनिर्देशित करतात. तर २० सदस्य देशातील २० प्रशासनिक आणि न्यायीक जिल्ह्यांतून निवडून येतात.
  • राष्ट्रीय काउंसिलमध्ये निवडून येणाऱ्या या सदस्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसणे आवश्यक असते.
  • नॅशनल असेम्बलीमध्ये एकूण ४७ जागा असून, त्यांची निवड जनतेद्वारे केली जाते. या सभागृहात बहुमतासाठी एखाद्या पक्षाला २४ जागा जिंकणे आवश्यक असते.

इस्रायलमधील अमेरिकेच्या दूतावासांचे विलीनीकरण

  • अमेरिकेने इस्रायलमधील आपला दूतावास आणि वाणिज्य दूतावास (Consulate General) यांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • जागतिक स्तरावरील कार्यात दक्षता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे.
पार्श्वभूमी
  • जेरुसलेम आणि त्याच्या शहरी सीमांवरून इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये वाद आहेत.
  • पॅलेस्टाईनने आंतरराष्ट्रीय समर्थनासह पूर्व जेरुसलेमला आपली राजधानी बनवू इच्छितो.
  • या पूर्वेकडील भागावर इस्रायलने १९६७च्या युद्धामध्ये नियंत्रण स्थापित केले होते. इस्रायलदेखील जेरूसलेमला आपल्या देशाचा अविभाज्य भाग मानते.
  • जेरुसलेम हे इस्रायलमधील ज्यूंसाठी एक पवित्र शहर आहे. त्यांची मंदिरे-स्मारके तिथे आहेत. तर पॅलेस्टिनी अरबांसाठीही जेरुसलेमचे इस्लामिक महत्त्व आहे.
  • याआधी डिसेंबर २०१७मध्ये अमेरिकेने इस्रायलची राजधानी म्हणून जेरूसलेमला मान्यता दिली होती.
  • त्यानंतर, मे २०१८मध्ये अमेरिकेने तेल अवीवऐवजी जेरूसलेममध्ये दूतावासाची स्थापना केली होती.
  • या विलीनीकरणानंतर अमेरिका जेरूसलेममध्ये पॅलेस्टिनी मुद्द्यांसाठी युनिट स्थापन करेल, जे गाझा आणि जेरूसलेममध्ये आपले कार्यक्रम सुरु ठेवेल.

बुध ग्रहाच्या अभ्यासासाठी बेपीकोलंबो अंतराळ यान लाँच

  • जपान आणि युरोपच्या अंतराळ संघटनांनी एकत्रितपणे बुध ग्रहाच्या अभ्यासासाठी बेपीकोलंबो अंतराळ यान फ्रेंच गुयाना येथून प्रक्षेपित केले.
  • हे अंतराळ यान ७ वर्षांनंतर बुध ग्रहापर्यंत पोहोचेल आणि त्याच्या पृष्ठभागाच्या आणि वातावरणाचा अभ्यास करेल. याशिवाय ते बुध ग्रहाभोवती परिक्रमाही करेल.
  • ही मोहीम युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) आणि जपानी अवकाश संशोधन संस्थेने (JAXA) एकत्रितपणे आखली होती.
  • बेपीकोलंबो अंतराळ यान एरियन ५ रॉकेटच्या मदतीने प्रक्षेपित करण्यात आले. या मोहिमेसाठी सुमारे २ अब्ज डॉलर खर्च करण्यात आले.
  • यापूर्वी अमेरिकन अंतराळ संस्था नासाने बुध ग्रहाच्या अभ्यासासाठी मेसेंजर नावाचे अंतराळ यान पाठवले होते. ४ वर्षे कार्य केल्यानंतर २०१५मध्ये ही मोहीम संपली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा