चालू घडामोडी : १० ऑक्टोबर

परराष्ट्र मंत्रालयाचा ‘इंडिया फॉर ह्यूमॅनिटी’ उपक्रम

  • ९ ऑक्टोबर २०१८ रोजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी ‘इंडिया फॉर ह्यूमॅनिटी’ या उपक्रमाला सुरुवात केली. महात्मा गांधींच्या १५०व्या जयंतीच्या निमित्त हा उपक्रम सुरू करण्यात आला.
  • या उपक्रमांतर्गत जगभरातील दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अंग मोफत वितरित केले जातील. त्यासाठी वर्षभर जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी कृत्रिम अंग फिटिंग शिबिरे आयोजित केली जातील.
  • दिव्यांग लोकांना शारीरिक, आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसनासाठी मदत करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
  • हा उपक्रम ‘भगवान महावीर अपंग सहाय्यता समिती’ नावाच्या संस्थेच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे.
भगवान महावीर अपंग सहाय्यता समिती
  • स्थापना: १९७५
  • या समितीला जयपूर फुट या नावानेही ओळखले जाते. या ना-नफा तत्वावर काम करणाऱ्या संस्थेची स्थापना डी. आर. मेहता यांनी केली होती.
  • कृत्रिम अंग फिटिंगच्या बाबतीत ही जगातील सर्वात मोठी संस्था आहे. आजपर्यंत १.७३ दशलक्ष दिव्यांग लोकांना या संस्थेने मदत केली आहे.
  • हे संस्था दिव्यांग लोकांना विविध कृत्रिम अंग, व्हील चेअर इत्यादी गोष्टी मोफत प्रदान करते.

तुषार मेहता भारताचे नवे महाधिवक्ता

  • ज्येष्ठ विधिज्ञ तुषार मेहता यांची भारताचे नवे महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून कार्यरत आहेत.
  • डिसेंबर २०१७मध्ये रंजीतकुमार यांनी राजीनामा दिल्यापासून गेले ११ महिने हे पद रिक्त होते.
  • तुषार मेहता हे गुजरातचे आहेत. भाजपाची केंद्रात सत्तेत आल्यानंतर २०१४मध्ये मेहता यांना अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून नेमण्यात आले होते.
  • मेहता यांनी माहिती अधिकार कायदा कलम ६६-अ प्रकरणी केंद्र सरकारची बाजू मांडली आहे.

पॅरा आशियाई खेळांमध्ये हरविंदर सिंहला सुवर्णपदक

  • जकार्ता येथे सुरु असलेल्या पॅरा आशियाई खेळांमध्ये भारताचा तिरंदाज हरविंदर सिंहने सुवर्णपदकाची कमाई केली.
  • हरविंदर सिंहने अंतिम फेरीत चीनच्या झाओ लिक्स्युचा ६-०ने पराभव करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरले.
  • तसेच मोनु घांगसने थाळीफेकमध्ये रौप्य तर मोहम्मद यासिरने गोळाफेकीमध्ये कांस्यपदकाची कमाई केली.
  • दुसरीकडे थाळीफेक प्रकारात भारताच्या मोनु घांगसने अंतिम प्रयत्नात ३५.८९ मी. लांब थाळी फेरत रौप्यपदकावर नाव कोरले.
  • गोळाफेकीत मोहम्मद यासिरने १४.२२ मी. लांब गोळा फेकत कांस्यपदकावर नाव कोरले.

चीन पाकिस्तानला लष्करी ड्रोन विकणार

  • चीनने पाकिस्तानला ४८ विंग-लुंग लष्करी ड्रोन विकण्यास मंजुरी दिली आहे. चीनचा कोणत्याही देशासोबतचा हा ड्रोन निर्यातीचा सर्वात मोठा करार आहे.
  • हे ४८ ड्रोन चीनच्या चेंग्दू एयरक्राफ्ट कॉर्प आणि पाकिस्तानच्या एरोनॉटिकल कॉम्प्लेक्सद्वारे तयार संयुक्तपणे केले जातील.
  • चीनने यापूर्वी संयुक्त अरब अमीरात आणि इजिप्तला १ दशलक्ष डॉलर प्रति ड्रोनच्या दराने हे ड्रोन विकले आहेत.
विंग लूंग II
  • हे अत्याधुनिक मानवरहित ड्रोन आहे, जे हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या शस्त्रांच्या वापरासाठी वापरले जाऊ शकते.
  • या ड्रोनची निर्मिती चेंग्दू एअरक्राफ्ट इंडस्ट्रियल (ग्रुप) कंपनीने केली आहे. या ड्रोनची पहिली चाचणी फेब्रुवारी २०१७मध्ये करण्यात आली होती.
  • हे ड्रोन विंग लूंग I या मानवरहित ड्रोनची सुधारित आवृत्ती आहेत. हे ड्रोनचा वापर टेहळणी आणि हल्ला करण्यासाठी केला जाऊ शकतो.
  • याड्रोनची लांबी ११ मीटर आहे. तर पंखांची लांबी २०.५ मीटर आहे. यामध्ये ४८० किलो पेलोड वाहून नेण्याची क्षमता आहे.
  • यामध्ये १२ लेसर-मार्गदर्शित क्षेपणास्त्रे किंवा YJ-9E लष्करी जहाज नष्ट करणारी क्षेपणास्त्रे बसविता येऊ शकतात.
  • हे ड्रोन २० तासांपर्यंत १५० ते ३७० किमी प्रतितास वेगाने उड्डाण करू शकते. हे ९००० मीटर उंचीवर उडू शकते. हे ड्रोन स्थिर आणि हलत्या लक्ष्याला नष्ट करण्यास सक्षम आहे.
  • परंतु अमेरिकेचे एमक्यू-१ प्रेडेटर आणि एमक्यु-९ रिपर हे ड्रोन या चीनी ड्रोनपेक्षा तांत्रिकदृष्ट्या अधिक प्रगत आहेत.
चीन-पाकिस्तान संरक्षण संबंध
  • चीन पाकिस्तानचा सर्वात मोठा शस्त्र पुरवठादार देश आहे.
  • २०१३-१७ या काळात पाकिस्तानच्या ७० टक्के संरक्षण सामग्रीची खरेदी चीनकडून झाली आहे. गेल्या ५ वर्षांच्या तुलनेत यामध्ये ४५ टक्के वाढ झाली आहे.
  • चीन आणि पाकिस्तानमध्ये संयुक्तपणे जेएफ-थंडर विमान तयार करण्यासही सहमती झाली आहे.
  • २०१५मध्ये पाकिस्तानने ‘बराक’ नावाच्या ड्रोनची निर्मिती केली होती. हा ड्रोन चीनच्या मध्यम पल्ल्याच्या सीएच-३ ड्रोन सिस्टमवर आधारित होता.

बांगलादेशमध्ये ग्रेनेड हल्ल्याप्रकरणी १९ जणांना फाशी

  • २००४साली झालेल्या ग्रेनेड हल्ल्याप्रकरणी बांगलादेशमधील न्यायालयाने १९ जणांना फाशी तर माजी पंतप्रधान बेगम खलिदा झिया यांच्या मुलासह अन्य १९ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
  • याप्रकरणी शिक्षा झालेल्यांमध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (बीएनपी) वरिष्ठ उपाध्यक्ष रेहमान आणि माजी गृहराज्यमंत्री लुत्फोजमन बाबर यांचाही समावेश आहे.
  • बीएनपीच्या नेतृत्वाखालील सरकारमधील प्रभावी गटाने हरकत उल जिहाद अल इस्लामी या दहशतवादी संघटनेला हाताशी धरून हा हल्ला करण्याची योजना आखली होती, असे तपासात निष्पन्न झाले होते.
पार्श्वभूमी
  • २४ ऑगस्ट २०१४ रोजी अवामी लीगने काढलेल्या शांतता रॅलीवर दहशतवाद्यांनी १३ ग्रेनेड फेकले होते.
  • यामध्ये अवामी लीगचे २४ नेते, कार्यकर्ते आणि त्यांचे सहकारी यात ठार झाले होते. मृतांमध्ये दिवंगत राष्ट्रपती झिल्लूर रेहमान यांच्या पत्नीचाही समावेश होता.
  • तर इतर ५०० जण गंभीर जखमी झाले होते. यांपैकी अनेक जण कायमचे जायबंदी झाले आहेत.
  • तत्कालीन विरोधी पक्षनेत्या शेख हसीना यांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात शेख हसीना या बचावल्या असल्या तरी त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला होता.
  • या हल्ल्यानंतर बांगलादेशच्या राजकारणात मोठे बदल झाले. हा हल्ला झाला तेव्हा शेख हसिना या विरोधी पक्षनेत्या होत्या. तर बेगम खलिदा झिया पंतप्रधानपदी होत्या.

आयपीसीसी हवामान बदलविषयक विशेष अहवाल प्रसिध्द

  • आयपीसीसी (इंटरगव्हर्न्मेंटल पॅनेल ऑन क्‍लायमेट चेंज)चा हवामान बदलविषयक विशेष अहवाल दक्षिण कोरियातील इंचीयोन येथे प्रसिद्ध केला.
  • वैश्विक तापमानवाढ रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांना निष्प्रभ ठरवित किती तीव्रतेने तापमानवाढ होत आहे, यावर या अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे.
  • भविष्यातील पर्यावरणीय हानी टाळण्यासाठी काही उपाययोजनाही जगभरातील राज्यकर्त्यांना सुचविण्यात आल्या आहेत.
  • पोलंडमधील कॅटोवाइस येथे डिसेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांची हवामान बदलविषयक २४वी परिषद भरणार आहे. त्यावेळी सदर अहवाल व तापमानवाढ रोखण्याच्या उपाययोजनांवर चर्चा होणार आहे. 
अहवालातील ठळक मुद्दे
  • जगाचा विनाश टाळायचा असल्यास समाजात तातडीने आमूलाग्र बदल घडवावे लागतील. तसेच पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठी जगभरात प्रचंड प्रमाणात गुंतवणूक करावी लागेल.
  • तापमानवाढीचे परिणाम अपेक्षेपेक्षा लवकर दिसून येत आहेत आणि त्याची परिणामकारकताही अपेक्षेहून अधिक गंभीर आहे.
  • सध्या वैश्विक तापमान १ अंशाने वाढले आहे. त्यामुळे समुद्राची पाणीपातळी वाढत असून, वादळे, पूर आणि दुष्काळ यांचेही प्रमाण वाढले आहे. ही तापमानवाढ ३ ते ४ अंशांच्या घरात जाण्याच्या वाटेवर आहे.
  • सध्याच्याच गतीने कार्बन उर्त्सजन सुरू राहिल्यास २०३०पर्यंत सरासरी वैश्विक तापमानवाढ १.५ अंशांचा टप्पा गाठेल.
उपाययोजना
  • मोठ्या प्रमाणावर जैविक इंधन (बायोफ्युएल) पुरविणारी झाडे लावणे.
  • जैव इंधनांना तातडीने पर्यायी इंधन शोधणे आणि २०२०पासून जैव इंधनांचा वापर कमी करणे.
  • जागतिक ढोबळ उत्पादनाच्या (जगाचा जीडीपी) २.५ टक्के रक्कम म्हणजे सुमारे २.४ अब्ज डॉलरची गुंतवणूक स्वच्छ ऊर्जेसाठी करावी लागेल.
  • वैश्विक तापमानवाढ १.५ अंशांच्या मर्यादेत राखायची असल्यास जगाला किमान २०५०पर्यंत तरी कार्बन उर्त्सजन सम पातळीत ठेवावे लागेल. 
  • याचा अर्थ जेवढा कार्बन डाय ऑक्साइड वर्षभरात वातावरणात उर्त्सजित केला जाईल, तेवढाच वातावरणातून बाहेर काढला गेला पाहिजे.
  • तसे झाल्यासच तापमानवाढ १.५ अंशांच्या मर्यादेत ठेवणे शक्य होईल.
इंटरगव्हर्न्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेंट चेंज (आयपीसीसी)
  • स्थापना: १९८८
  • सदस्य: १९५ देश
  • मुख्यालय: जिनीव्हा, स्वित्झर्लंड
  • हवामान बदलाचे मूल्यांकन करण्यासाठी आयपीसीसी एक प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्था आहे.
  • संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (युएनईपी) आणि जागतिक हवामान संस्था यांनी १९८८ साली ही संस्था स्थापना केली.
  • यात जगभरातील वेगवेगळ्या देशांतील शास्त्रज्ञांचे गट काम करतात आणि हवामान बदलांचे नियमित आकलन करतात.
  • आयपीसीसी हवामाना बदलाचे निरीक्षण करते आणि त्याबाबत कोणतेही संशोधन करीत नाही. हवामान बदलाशी संबंधित नवीन वैज्ञानिक, सामाजिक, आर्थिक व तांत्रिक माहितीचे ती विश्लेषण करते.
  • आईपीसीसीला तिच्या चौथ्या मूल्यांकन अहवालाकरिता २००७मध्ये शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यावेळी आर. के. पचौरी आयपीसीसीचे अध्यक्ष होते.

बांगलादेशमध्ये वादग्रस्त डिजिटल सुरक्षा विधेयक मंजूर

  • बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल हमीद यांनी वादग्रस्त डिजिटल सुरक्षा विधेयक २०१८ला मंजूरी दिल्यामुळे त्याचे रुपांतर आता कायद्यात झाले आहे.
  • या नवीन कायद्यामध्ये एखाद्या व्यक्तीला विनापरवाना अटक करण्याची तरतूदही करण्यात आली आहे. 
  • पंतप्रधान शेख हसीना सरकारने सायबर गुन्ह्यास रोखण्यासाठी या कायद्याची आवश्यकता असल्याचे सांगत, या कायद्याचे समर्थन केले आहे.
  • बांगलादेश संसदेने, सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी तसेच १९७१चा स्वातंत्र्य संग्राम व शेख मुजीबुर्रहमान (बंगबंधू) यांच्याबद्दल चुकीची माहिती पसरविण्याच्या घटना थांबविण्यासाठी हे विधेयक मंजूर केले होते.
  • या कायद्यात बेकायदेशीर ई-व्यवहार आणि आक्षेपार्ह माहितीच्या प्रचाराचा देखील समावेश आहे.
  • या कायद्यात किमान ७ वर्षे आणि कमाल १४ वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. याव्यतिरिक्त यात किमान २५ लाख टका ते कमाल १ कोटी टका इतक्या आर्थिक दंडाचीही तरतूद आहे.
  • हा कायदा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात असल्याचे सांगत अनेक संघटना व पत्रकारांनी या कायद्याचा विरोध केला आहे.
  • त्यांच्या मते, या कायद्यामुळे देशात भयाचे वातावरण निर्माण होईल आणि त्यामुळे शोध पत्रकारितेसारखी कार्ये करता येणार नाहीत.

हरियाणामध्ये सर छोटूराम यांच्या पुतळ्याचे अनावरण

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील रोहतक येथे शेतकरी नेते दीनबंधू सर छोटू राम यांच्या मूर्तीचे त्यांच्या सांपला या जन्मगावी अनावरण केले.
  • ही मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार पद्मविभूषण राम सुतार यांनी तयार केली आहे. या मूर्तीच्या उभारणीसाठी हरियाणातील सुमारे ५,५०० शेतकऱ्यांनी लोखंड दान केले. या मूर्तीची उंची ६४ फूट आहे.
सर छोटू राम
  • सर छोटू राम यांचा जन्म २४ नोव्हेंबर १८८१ रोजी रोहतक येथे झाला. त्यांचे मूळ नाव राम रिचपाल होते. ९ जानेवारी १९४५ रोजी पंजाबमध्ये त्यांचा मृत्यू झाला.
  • त्यांना शेतकऱ्यांचा तारणहार म्हणून ओळखले जाते. त्यांनी शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी कार्य केले आणि शेतकऱ्यांच्या हिताचे कायदेही पारित करून घेतले.
  • ब्रिटिश राज्यातील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी लढा दिला. १९३७मध्ये त्यांना ‘सर’ ही उपाधी देण्यात आली.
  • स्वातंत्र्यापूर्वी त्यांनी नॅशनल यूनियनिस्ट पक्षाची स्थापना केली होती. हा पक्ष काही काळ संयुक्त पंजाब प्रांतात सत्तेतही होता.
  • सर छोटू राम यांना दीनबंधु आणि रहबरे आझम या नावांनी देखील ओळखले जाते.

युवा ऑलिम्पिक स्पर्धेत मनू भाकेरला सुवर्णपदक

  • अर्जेंटीनातील ब्युनास आयर्स येथे सुरु असलेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारोत्तोलक जेरेमी लालरिनुंगाने भारताला पहिले सुवर्णपदक पटकावून दिले.
  • पुरुषांच्या ६२ किलो वजनी गटात २७४ किलो वजन उचलत त्याने सुवर्णपदकावर नाव कोरले. यापूर्वी त्याने विश्व युथ चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकावले होते.
  • याशिवाय भारताची युवा नेमबाजपटू मनू भाकेरने १० मी. एअर पिस्तुल प्रकारात २३६.५ गुणांची कमाई करत सुवर्णपदकाची कमाई केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा