मुंबईला विजय हजारे करंडक स्पर्धेचे जेतेपद
- कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईच्या संघाने विजय हजारे करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिल्लीवर मात करत स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.
- बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडीयमवर झालेल्या सामन्यात मुंबईने दिल्लीवर ४ गडी राखून मात करत विजय संपादन केला.
- दिल्लीने विजयासाठी दिलेले १७८ धावांचे आव्हान मुंबईने आदित्य तरे आणि सिद्धेश लाडच्या शतकी भागीदारीच्या जोरावर ६ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.
- यापूर्वी मुंबईने २००३-०४ आणि २००६-०७साली या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. यानंतर सुमारे १२ वर्षांनी मुंबईला या स्पर्धेचे विजेतेपद मिळाले आहे.
- मुंबईकडून धवल कुलकर्णी, शिवम दुबे यांनी प्रत्येकी ३-३ फलंदाजांना बाद केले. तर दुषार देशपांडेने २ आणि शम्स मुलानीने १ विकेट घेतली.
- तर आदित्य तरेने ८९ चेंडूत ७१ धावांची खेळी केली. यासाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
विजय हजारे करंडक
- विजय हजारे करंडक ही भारतात खेळली जाणारी अंतर्देशीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा आहे. या स्पर्धेची सुरुवात २००२-०३मध्ये झाली.
- या स्पर्धेत रणजी करंडक खेळणारे संघ सहभागी होतात. या स्पर्धेचे नाव महान क्रिकेटपटू विजय हजारे यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले आहे.
- तमिळनाडु संघाने आतापर्यंत सर्वाधिक ५ वेळा विजय हजारे करंडक स्पर्धा जिंकली आहे.
डॉ. अरुण बाळ मेडस्टार जॉर्जटाऊन विद्यापीठाकडून सन्मानित
- ४ दशकांहून अधिक काळ मधुमेहींच्या पायावर गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया कुशलपणे करून रुग्णांचे अवयव वाचवण्याचे काम करणाऱ्या डॉ. अरुण बाळ यांना मेडस्टार जॉर्जटाऊन विद्यापीठाकडून सन्मानित करण्यात आले आहे.
- भारतात मधुमेह वेगाने वाढतो आहे. मधुमेह झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या इतर शारीरिक अवयवांवर दुष्परिणाम होऊ नये यासाठी सातत्याने वैद्यकीय खबरदारी घ्यावी लागते.
- मात्र, मधुमेहाचा पायावर परिणाम झाल्यानंतर त्यामुळे पाय कापण्याचीही वेळ येते. त्यामुळे पायाच्या जखमा होऊ नये यासाठी अधिक काळजी घ्यायला हवी, याबद्दल डॉ. अरुण बाळ यांनी जाणीवपूर्वक काम केले.
- मधुमेह झाल्यानंतर नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी, पाय कापण्याची वेळ येऊ नये यासाठी काय केले पाहिजे, याविषयी रुग्णांमध्ये जागृती निर्माण केली.
- मधुमेहींसाठी त्यांनी मदतगटाची स्थापना केली. यामध्ये त्यांनी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या युवांनाही प्रशिक्षण दिले.
- २००१पासून कोचीन येथील अमृता इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. बाळ यांनी दहावी-बारावी इयत्ता नापास असलेल्या विद्यार्थ्यांनाही मधुमेहींच्या पायाची योग्य प्रकारे काळजी घेण्याचे प्रशिक्षण देऊन तयार केले.
- वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांच्या हक्कांसोबत रुग्णहक्कांसाठीही त्यांनी भरीव काम केले आहे. ते डायबेटिक फूट सोसायटी इंडियाचे अध्यक्ष आहेत.
- त्यांच्या कार्याची दखल घेऊन इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ डायबेटिक फूट सर्जन या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या एग्झिक्युटिव्ह बोर्डवरही त्यांची निवड झाली आहे. या समितीमधील ते पहिले भारतीय आहेत.
- १९८५पासून डॉ. बाळ हे रहेजा हॉस्पिटलमध्ये डायबेटिक फूट सर्जरी या विषयावर सातत्याने काम करत आहेत.
निधन: ज्येष्ठ साहित्यिक के. ज. पुरोहित
- ज्येष्ठ साहित्यिक के. ज. पुरोहित ऊर्फ शांताराम यांचे १७ ऑक्टोबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते.
- पुरोहित यांनी १९८९मध्ये अमरावती येथे झालेल्या ६२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. कथाकार म्हणून त्यांचा नावलौकिक मोठा होता.
- मुळचे नागपूरचे असलेले पुरोहित यांचे पूर्ण नाव केशव जगन्नाथ पुरोहित. त्यांनी ‘शांताराम’ या टोपणनावाने लेखन केले.
- नागपूर विद्यापीठातून इंग्रजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अमरावती, नागपूर, मुंबईमधील विविध महाविद्यालयांमध्ये ४० वर्षे प्राध्यापक म्हणून नोकरी केली.
- जोगेश्वरीच्या ईस्माइल युसुफ महाविद्यालयात ते प्राचार्य म्हणून कार्यरत होते. जागतिक मराठी साहित्य परिषदेचे ते उपाध्यक्ष होते.
- त्यांनी विपुल कथालेखन केले. कथांमधून त्यांनी वेगवेगळे विषय हाताळले. त्यांच्या लेखनामध्ये स्थिरता होती. तसेच ते गृहस्थी लेखक म्हणून मानले जायचे.
- पुरोहित यांना २०१३साली महाराष्ट्र सरकारतर्फे देण्यात येणारा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.
- त्यांची साहित्य संपदा: अंधारवाट, आठवणींचा पार, उद्विग्न सरोवर, काय गाववाले, चंद्र माझा सखा, चेटूक, छळ आणि इतर गोष्टी, जमिनीवरची माणसं, ठेवणीतल्या चीजा, धर्म, मनमोर, रेलाँ रेलाँ, लाटा, शांताराम कथा, शिरवा, संत्र्यांचा बाग, संध्याराग, सावळाच रंग तुझा, हेल्गेलंडचे चांचे (अनुवाद)
ग्रीन क्लायमेट फंडकडून निर्धन देशांना १ अब्ज डॉलर्सचा निधी
- ग्रीन क्लायमेट फंडने निर्धन देशांतील प्रकल्पांसाठी १ अब्ज डॉलर्सचा निधी मंजूर केला आहे. या निधीचा वापर १९ विविध योजनांसाठी केला जाईल.
- ही रक्कम विविध देशांतील भूऔष्मिक (जिओथर्मल) ऊर्जा आणि समुद्रकिनाऱ्यांच्या संवर्धनासाठी वापरली जाईल.
- ग्रीन क्लायमेट फंडाची स्थापना युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज फ्रेमवर्क कन्वेंशन (यूएनएफसीसीसी) अंतर्गत २०१०मध्ये करण्यात आली होती. त्याचे मुख्यालय दक्षिण कोरिया मधील इंचीऑन येथे आहे.
- ग्रीन क्लायमेट फंड विकसनशील देशांमध्ये प्रकल्प, कार्यक्रम, धोरणे आणि इतर क्रियांसाठी सहाय्य प्रदान करतो. तसेच हवामान बदलांचा सामना करण्यासाठी विकसनशील देशांना आर्थिक मदतही पुरवितो.
- या फंडसाठी २०२०पर्यंत लक्ष्य १०० अब्ज डॉलर्स रक्कम गोळा करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.
एफईसी २०१८चे गुजरातमध्ये आयोजन
- २७व्या फ्यूजन एनर्जी कॉन्फरन्सचे (एफईसी २०१८) आयोजन गांधीनगरमध्ये (गुजरात) करण्यात आले.
- या ६ दिवसीय परिषदेचे आयोजन आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीद्वारे केले जाते.
- अणुऊर्जा विभाग आणि गांधीनगरमधील प्लाझ्मा रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी या परिषदेचे यजमानपद भूषविले.
- केंद्रकीय (अण्विक) सम्मीलनासंबंधित भौतिकशास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या मुद्द्यांवर चर्चेसाठी एक मंच प्रदान करणे, हे एफईसी २०१८चे मुख्य उद्दिष्ट आहे.
- या परिषदेदरम्यान जगभरातील शास्त्रज्ञांनी अण्विक सम्मीलनाच्या नवीन वापराविषयी चर्चा केली.
कॅमरूनच्या राष्ट्रपतीपदी पॉल बिया
- कॅमरूनच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पॉल बिया यांनी विजय मिळविला असून, राष्ट्रपती म्हणून त्यांचा हा ७वा कार्यकाल असेल.
- या वादग्रस्त निवडणुकीत पॉल बिया यांनी एकहाती विजय संपादन केला. कॅमरूनच्या संवैधानिक परिषदेनुसार बिया यांना ७१.३ टक्के मते मिळाली.
- या निवडणुकांदरम्यान अफरातफर झाल्याचे आरोप झाले तसेच हिंसाचाराच्या घटना घडल्या.
- कॅमरूनमध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मते प्राप्त करणाऱ्या उमेदवारांला विजेते घोषित केले जाते, येथे बहुमत मिळवणे आवश्यक नाही.
- पॉल बिया आफ्रिकेमध्ये सर्वात दीर्घकाळ राज्य करणारे गैर-शाही (कोणत्याही राजघराण्याशी संबंधित नसलेले) व्यक्ती आहेत.
- नोव्हेंबर १९८२पासून ते कॅमेरूनचे राष्ट्रपती आहेत. १९७५-८२ या काळात ते कॅमेरूनचे पंतप्रधान होते.
- कॅमरून मध्य-पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. त्याची राजधानी याओंडे आणि चलन सेंट्रल अफ्रीका फ्रँक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा