एम. एस. स्वामीनाथन पहिला विश्व कृषी पुरस्कार जाहीर
- कृषी वैज्ञानिक प्राध्यापक एम. एस. स्वामीनाथन यांना भारतीय अन्न व कृषी परिषदेचा पहिला विश्व कृषी पुरस्कार जाहीर झाला आहे.
- त्यांना हा पुरस्कार जेनेटिक्स, सायटो जेनेटिक्स, किरणोत्सर्ग, रासायनिक म्युटाजेनेसिस, अन्न आणि जैवविविधतेचे संवर्धन या विषयांमधील संशोधनाकरिता देण्यात येणार आहे.
- या पुरस्काराची सुरुवात भारतीय अन्न आणि कृषी परिषदेद्वारे (ICFA) करण्यात आली आहे.
- कृषी क्षेत्रात मोलाचे कार्य करून मानवता व देशाच्या कल्याणासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना सन्मानित करण्यासाठी हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे.
- हा एक वार्षिक पुरस्कार असेल, जो व्यक्ती किंवा संस्थेला प्रदान करण्यात येईल. पुरस्कार विजेत्याला १ लाख डॉलर्सची रक्कम पुरस्कारस्वरूप देण्यात येईल.
एम. एस. स्वामीनाथन
- एम. एस. स्वामीनाथन भारतातील अग्रगण्य कृषी शास्त्रज्ञ आहेत. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९२५ रोजी झाला. भारतात पहिली हरितक्रांती घडवून आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
- त्यांनी कृषि क्षेत्रातील संशोधनासाठी 'एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन'ची स्थापना केलेली आहे.
- १९७२ ते १९७९ दरम्यान ते भारतीय कृषी संशोधन परिषदेचे अध्यक्ष होते. १९७९-८०मध्ये ते कृषी मंत्रालयाचे मुख्य सचिव होते.
- १९८२-८८ ते आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचे महासंचालक होते. १९८८मध्ये ते आंतरराष्ट्रीय निसर्ग आणि नैसर्गिक संसाधन संवर्धन संघटनेचे अध्यक्ष झाले.
- भारत सरकारने २००४मध्ये डॉ. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली स्वामीनाथन आयोग किंवा राष्ट्रीय शेतकरी आयोगची स्थापना केली होती.
- स्वामिनाथन यांना टाईम मासिकाने २०व्या शतकातील २० सर्वाधिक प्रभावशाली आशियाई व्यक्तींमध्ये स्थान दिले आहे.
- याशिवाय भारतातील २०व्या शतकातील ३ सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश केला आहे. (अन्य दोन महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर)
- त्यांना मिळालेले पुरस्कार: पद्मश्री (१९६७), पद्मभूषण (१९७२), पद्मविभूषण (१९८९), रेमन मॅगसेसे पुरस्कार (१९७१), बोरलॉग पुरस्कार, अल्बर्ट आईन्स्टाईन जागतिक विज्ञान पुरस्कार, जागतिक अन्न पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार. दी टायलर पुरस्कार इत्यादी
२०२०पासून भारतात बीएस-४ वाहनांची विक्री बंद
- सर्वोच्च न्यायालयाने १ एप्रिल २०२०पासून भारतात भारत स्टेज-४ म्हणजेच बीएस-४ या वाहनांची विक्री बंद करण्याचा आदेश दिला आहे.
- या वाहनांना पर्याय म्हणून १ एप्रिल २०२०नंतर बीएस-६ प्रकारच्या इंजिनाचा वापर करावा लागणार आहे.
- बीएस-६ इंजिन असलेली वाहने पर्यावरणासाठी कमी हानिकारक असतात. यांच्या वापरासाठी देशभरात बीएस-६ इंधनही उपलब्ध करून दिले जाणार आहे.
भारत स्टेज उत्सर्जन मानक
- इंग्रजी: Bharat Stage Emission Standards (BSES)
- बीएस अर्थात भारत स्टेज हे भारत सरकारद्वारे निश्चित करण्यात आलेले वाहनांमधील इंधनाचे एक उत्सर्जन मानक आहे.
- या उत्सर्जन मानकांमध्ये वाहनांमुळे होणाऱ्या वायू प्रदुषणाच्या प्रमाणाची निश्चित व्याख्या करण्यात आली आहे.
- भारतात सन २०००मध्ये पहिल्यांदाच हे मानक लागू करण्यात आले होते. भारत स्टेज लागू झाल्यानंतर सर्व वाहनांना या मानकांच्या आधीन राहणे बंधनकारक आहे.
- ऑक्टोबर २०१०मध्ये देशात भारत स्टेज-३ लागू करण्यात आले होते. तर बीएस-४ मानक २०१७मध्ये संपूर्ण देशात लागू करण्यात आले होते.
- वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी सरकारने २०१६मध्ये घोषणा केली होती की, बीएस-५ मानकांऐवजी २०२०पर्यंत संपूर्ण देशात बीएस-६ मानक लागू केले जाईल.
ट्रेन-१८: भारताची पहिली इंजिनाविना धावणारी ट्रेन
- भारतात पहिल्या इंजिनाविना धावणाऱ्या ट्रेनची निर्मिती करण्यात आली असून, या ट्रेनची चाचणी २९ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.
- ट्रेन-१८ असे या ट्रेनचे नामकरण करण्यात आले आहे. ती संपूर्णपणे संगणकीकृत असून, बुलेट ट्रेनच्या धर्तीवर ही ट्रेन विकसित करण्यात आली आहे.
- या ट्रेनची बांधणी चेन्नई इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये करण्यात आली आहे. ही ट्रेन बनवण्यासाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च आला आहे. अशी ट्रेन परदेशातून आयात केली असती तर सुमारे १७० कोटी रुपये खर्च आला असता.
- तिच्या बांधणीसाठी दीड वर्षाचा कालावधी लागला. या ट्रेनमध्ये १६ एसी आणि २ एक्झिक्युटिव्ह क्लासचे डबे असतील.
- प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणारी स्वदेशी बांधणीची ही हायस्पीड ट्रेन ताशी १६० ते २०० किमी वेग गाठू शकते.
- या ट्रेनमध्ये दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष असे दोन बाथरूम आणि बेबी केअरसाठी विशेष स्थान देण्यात आले आहे.
- तसेच ट्रेनच्या कोचमध्ये खास स्पेनमधून मागवण्यात आलेल्या सीट बसवण्यात आल्या आहे. या सीटचे वैशिष्ट्य म्हणजे या सीट पूर्ण ३६० अंशांमध्ये वळू शकतात.
- आणीबाणीच्या परिस्थितीत ट्रेनच्या ड्रायव्हरशी संवाद साधता यावा यासाठी टॉकबॅक सुविधाही देण्यात आली आहे.
- मुरादाबाद-बरेली आणि कोटा-सवाई माधोपूर या रेल्वे मार्गांवर या ट्रेनची चाचणी होणार आहे. त्यानंतर देशातील प्रमुख रेल्वे मार्गांवर ही ट्रेन धावणार आहे.
- ही ट्रेन ३० वर्षे जुन्या शताब्दी एक्स्प्रेसची जागा घेईल अशी आशा आहे. सध्या शताब्दी एक्स्प्रेस २० मार्गांवर धावते. ती मेट्रो शहरांना इतर प्रमुख शहरांशी जोडते.
इस्रायल भारताला देणार बराक-८ क्षेपणास्त्र प्रणाली
- इस्रायलची सरकारी कंपनी इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजने भारताला बराक-८ क्षेपणास्त्र पुरविण्यासाठी ७७८ दशलक्ष डॉलर्सचा करार केला.
- भारतीय नौदलाच्या ७ जहाजांवर इस्त्रायल एअरोस्पेसची बराक-८ क्षेपणास्त्र आणि क्षेपणास्त्र बचाव यंत्रणा तैनात केली जाईल.
- बराक-८ हे लांब पल्ल्याचे जमिनीवरून हवेत मारा करणारे (LR-SAM: Long Range Surface-to-Air Missile AIR) क्षेपणास्त्र आहे.
- केंद्र सरकारच्या मालकीच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबरोबर हा करार करण्यात आला आहे.
बराक-८
- बराक-८ क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजने (आयएआय) संयुक्तपणे विकसित केले आहे.
- बराक-८ क्षेपणास्त्राचा कमाल वेग २ मॅक असून, ते ७० किमी अंतरावरील लक्ष्याचा भेद घेऊ शकते.
- इस्त्रायली नौदलबरोबरच भारताचे नौदल, हवाई दल आणि भूदल LR-SAM यंत्रणेचा वापर करते.
- LR-SAM क्षेपणास्त्रे सब-सॉनिक व सुपर-सॉनिक क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने, समुद्री टेहळणी जहाजे आणि हेलीकॉप्टर इत्यादी नष्ट करू शकतात.
- याशिवाय ही क्षेपणास्त्रे अत्याधुनिक जहाज विरोधी क्षेपणास्त्रे नष्ट करण्यासाठी सक्षम आहेत.
- भारत आणि इस्त्रायलचे अत्यंत दृढ संबंध असून संरक्षणाबरोबरच शेती आणि अन्य तंत्रज्ञान क्षेत्रात नेहमीच इस्त्रायलने भारताला सहकार्य केले आहे.
- अमेरिका आणि रशियाच्याबरोबरीने इस्त्रायलनेही भारताला अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला आहे.
- भारताने अलीकडेच रशियाबरोबर एस-४०० एअर डिफेन्स मिसाइल सिस्टिमचा खरेदी करार केला आहे.
पेटीएम बँकेचे नवे सीईओ आणि एमडी सतीश कुमार गुप्ता
- पेटीएमने पेटीएम पेमेंट्स बँकेचे सीईओ आणि एमडी म्हणून सतीश कुमार गुप्ता यांची नियुक्ती केली.
- सतीश कुमार गुप्ता यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपमहाप्रबंधक (डेप्युटी जनरल मॅनेजर) म्हणून काम केले आहे.
- त्यानंतर त्यांनी नॅशनल पेमेंट्स कारपोरेशन ऑफ इंडियाचे मुख्य प्रकल्प अधिकारी म्हणूनही कार्य केले. गेल्या ३५ वर्षांपासून ते बँकिंग क्षेत्राशी संबंधित आहेत.
पेमेंट बँक म्हणजे काय?
- पेमेंट बँक म्हणजे आकाराने छोट्या असणाऱ्या बँका. या बँका शक्यतो मोबाइल फोनच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत विविध सेवा पोहोचवतात.
- त्यामुळे बँकेकडून देण्यात येणाऱ्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाला प्रत्यक्ष बँकेच्या शाखेपर्यंत जाण्याची आवश्यकता भासत नाही.
- कोणीही सामान्य व्यक्ती वा व्यावसायिक वा संस्था पेमेंट बँकेत खाते उघडू शकतो. पेमेंट बँक प्रत्येक खातेधारकाकडून १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम स्वीकारू शकते.
- सामान्य बँकांच्या तुलनेत पेमेंट बँकांची कार्यपद्धती थोडी वेगळी असते. या बँका कर्जे अथवा क्रेडीट कार्ड सेवा देऊ शकत नाही.
- या बँका केवळ रक्कम जमा करून घेणे अथवा परकी चलन स्वीकारू शकतात. याशिवाय त्या इंटरनेट बँकिंग आणि अन्य विशिष्ट सेवाही प्रदान करतात.
- जानेवारी २०१४मध्ये डॉ. नचिकेत मोर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पेमेंट बँका स्थापन करण्याची शिफारस केली होती.
भारतीय वंशाचे नील चॅटर्जी अमेरिकेतील एफईआरसीचे अध्यक्ष
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक नील चॅटर्जी यांना फेडरल एनर्जी रेग्युलेटरी कमिशनचे (एफईआरसी) अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे.
- ही संस्था अमेरिकेच्या पॉवर ग्रीडची देखरेख आणि अब्जावधी डॉलरच्या ऊर्जा प्रकल्पांशी संबंधित निर्णय घेते.
- एफईआरसीचे विद्यमान अध्यक्ष केविन मॅकलिंटायर हे २२ ऑक्टोबरला निवृत्त होत आहेत. त्यांची ऑगस्ट २०१७ मध्ये या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
- सध्या चॅटर्जी एफईआरसीच्या ३ आयुक्तांपैकी एक आहेत. चॅटर्जी यांनी याआधी सिनेटचे नेते मिच मॅककॉनेल यांचे ऊर्जा सल्लागार म्हणून काम पाहिले होते.
- नील चॅटर्जी केंटकीचे निवासी आहेत. त्यांचे कुटुंब ५० वर्षांपूर्वी कोलकत्ता येथून अमेरिकेत स्थायिक झाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा