भारतातील पहिली अटल अकादमी जयपूरमध्ये
- अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (एआयसीटीई) जयपूरमध्ये भारतातील पहिली AICTE Training and Learning (ATAL) अकादमी स्थापन करणार आहे.
- पुढील वर्षात अशा आणखी तीन अटल अकादमी तिरुवनंतपुरम (केरळ), गुवाहाटी (आसाम) आणि बडोदा (गुजरात) येथे स्थापन केल्या जातील.
अटल अकादमी
- ही अकादमी तांत्रिक शिक्षण अधिक प्रभावी होण्यासाठी या अध्यापनाच्या नवीन पद्धती उपलब्ध करून देईल.
- या अकादमींमध्ये, ५ महिन्यांत ८ मॉड्यूलच्या कोर्सचे प्रशिक्षण दिले जाईल. २०१९पासून नवीन शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण आवश्यक असेल.
- पदोन्नतीसाठी अर्ज करण्यासाठी विद्यमान शिक्षक आणि सहाय्यक शिक्षकांनाही हे प्रशिक्षण घेणे अनिवार्य असेल.
- या अकादमींच्या बांधकामासाठी संबंधित राज्यांनी विनामूल्य पायाभूत सुविधा आणि जमीन उपलब्ध करून दिली आहे.
अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद
- इंग्रजी: ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई)
- स्थापना: नोव्हेंबर १९४५
- मुख्यालय: नवी दिल्ली
- चेअरमन: अनिल सहस्त्रबुद्धे
- ही भारत सरकारची देशातील पदविका अभ्यासक्रमामध्ये सुसूत्रता आणि किमान दर्जा राखण्यासाठी व्यापक विचारमंथन घडवून ठोस धोरण आखण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली संस्था आहे.
- नव्या तांत्रिक शिक्षण संस्थांना मान्यता देणे, अभ्यासक्रम आणि प्रवेश परीक्षेतील बदलांची मान्यता देणे ही एआयसीटीईची प्रमुख कार्ये आहेत.
- १९८७मध्ये एआयसीटीईला संसदेच्या अधिनियमाद्वारे संवैधानिक दर्जा मिळाला. त्यापूर्वी ती फक्त एक सल्लागार संस्था म्हणून कार्यरत होती.
- एआयसीटीईचे प्रादेशिक कार्यालय मुंबई, कोलकाता, चेन्नई, कानपूर, चंदीगड, भोपाळ आणि बंगळूर येथे स्थित आहेत.
३० सप्टेंबर: आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन
- ३० सप्टेंबर २०१८ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे दुसरा आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन साजरा केला गेला.
- आंतरराष्ट्रीय कूटनीतीमध्ये संभाषणात भाषा विशेषज्ञ म्हणून कार्य करणाऱ्या आणि त्याद्वारे जागतिक शांतता व विकासास प्रोत्साहन देणाऱ्या लोकांना सन्मानित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जाते.
- या दिवसाद्वारे साहित्यिक आणि वैज्ञानिक यांच्या कार्याच्या शुद्ध आणि स्पष्ट अनुवाद कार्याचे महत्वही अधोरेखित केले जाते.
पार्श्वभूमी
- इंटरनॅशनल फेडरेशन फॉर ट्रान्सलेटर्सच्या स्थापनेपासून म्हणजेच १९५३मध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.
- १९९१मध्ये मध्ये इंटरनॅशनल फेडरेशन फॉर ट्रान्सलेटर्सने जागतिक पातळीवर हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.
- संयुक्त राष्ट्रसंघाने मे २०१७मध्ये आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन साजरा करण्याची घोषणा केली.
- बायबलचे अनुवादक आणि भाषांतराचे जनक सेंट जेरोम यांच्या स्मरणार्थ ३० सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन साजरा केला जातो.
- देशांना जवळ आणण्यासाठी, संवादामध्ये सहकार्यासाठी अनुवादाची भूमिका अतिशय महत्वाची आहे. विश्वशांती आणि विकासासाठीही अनुवादाचे योगदान मोठे आहे.
निधन: सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक बालाभास्कर
- सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक आणि संगीतकार बालाभास्कर यांचे २ ऑक्टोबर रोजी निधन झाले. ते ४० वर्षांचे होते.
- आठवडाभरापूर्वी बालाभास्कर यांच्या कारचा अपघात झाला होता. या अपघातात बालाभास्कर यांच्या दोन वर्षांच्या मुलीचाही घटनास्थळीच मृत्यू झाला होता.
- बालाभास्कर आणि त्यांच्या पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू होते. बालाभास्कर यांच्या मेंदूला इजा झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.
- बालाभास्कर हे दक्षिणेतील प्रख्यात व्हायोलिनवादक असून त्यांनी हरिहरन, सुरेश वाडकर, के. एस. चित्रा यांच्यासारख्या दिग्गजांसोबत काम केले होते.
१ ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय कॉफी दिन
- दरवर्षी १ ऑक्टोबर हा दिवस हा आंतरराष्ट्रीय कॉफी दिन म्हणून साजरा केला जातो. कॉफी या पेयाला प्रोत्साहन देणे हे आहे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
- तसेच कॉफीला शेतापासून दुकानापर्यंत आणण्यासाठी कठोर परिश्रम करणाऱ्या सर्व लोकांचा सन्मान करणे, हादेखील या दिनाचा मुख्य हेतू आहे.
- यंदाच्या आंतरराष्ट्रीय कॉफी दिनाचा मुख्य विषय ‘Women in coffee’ हा होता. कॉफी उत्पादन प्रक्रियेतील महिलांची भूमिका अधोरेखित करणे, हा यंदाच्या कॉफी दिनाचा हेतू होता.
भारतातील कॉफी उत्पादन
- भारत जगातील ६वा सर्वात मोठा कॉफी उत्पादक देश आहे. जगातील एकूण कॉफीच्या उत्पादनापैकी ४ टक्के उत्पादन केवळ भारत करतो.
- ब्राझिल, व्हिएतनाम, कोलंबिया, इंडोनेशिया आणि इथियोपिया हे जगातील पाच सर्वात मोठे कॉफी उत्पादक देश आहेत.
- २०१६मध्ये भारतात ४.५४ लाख हेक्टर क्षेत्रात ३.६६ लाख शेतकऱ्यांनी कॉफीचे उत्पादन घेतले.
- भारतात कॉफीचा सर्वात जास्त उत्पादन कर्नाटक (५४ टक्के), केरळ (१९ टक्के) आणि तमिळनाडू (८ टक्के) या राज्यांमध्ये होते.
- भारतात उत्पादित एकूण कॉफीपैकी ७०-८० टक्के कॉफी इटली, रशिया आणि जर्मनीसारख्या देशांमध्ये निर्यात केली जाते.
- भारतात रोबस्टा (कोफीया कानेफोरा) आणि कोफीया अरेबिका या प्रकारच्या कॉफीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
- भारतातील हॉकीची सर्वोच्च संघटना असलेल्या हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी मश्ताक अहमद यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी अहमद यांनी संघटनेमध्ये महासचिव हे पद सांभाळले होते.
यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार रद्द
- ‘मी टू’ मोहिमेमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या स्वीडिश अॅकॅडमीने यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे.
- संस्थेमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय अॅकॅडमीने घेतला आहे. २०१८चा साहित्याचा पुरस्कार २०१९मध्ये जाहीर केला जाणार आहे.
- स्वीडिश अॅकॅडमीची स्थापना १७८६मध्ये राजे गुस्ताव तृतीय यांनी केली. तर साहित्याचा नोबेल पुरस्कार १९०१ पासून दिला जात आहे.
- या पुरस्कारासाठी विजेत्यांची निवड स्वीडिश अॅकॅडमीतर्फे केली जाते. आजवर अनेक दिग्गज लेखक, कवी, नाटककार यांची साहित्याच्या नोबेल पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
- गेल्या ७० वर्षांत असे पहिल्यांदाच घडत आहे की साहित्यातील नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही.
पार्श्वभूमी
- २०१६मध्ये अमेरिकी रॉकस्टार बॉब डिलन यांची नोबेल पुरस्कारासाठी झालेली निवड वादाच्या भोवऱ्यात सापडली.
- डिलन यांची निवड करताना अन्य लोकप्रिय तसेच समीक्षकांनी गौरवलेल्या साहित्यिकांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला.
- या लोकप्रिय साहित्यिकांमध्ये २२ मे २०१८ रोजी निधन झालेले अमेरिकी कादंबरीकार फिलिप रोथ यांचाही समावेश होता.
- त्यानंतर २०१७मध्ये अॅकॅडमीने जपानी वंशाचे ब्रिटीश लेखक काजुओ इशिगुरो यांना नोबेल पुरस्कार जाहीर करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
- मात्र या पुरस्काराची घोषणा केल्यानंतर अॅकॅडमी ‘मी टू’ मोहीमेमुळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली.
- स्टॉकहोममधील एका प्रभावी सांस्कृतिक क्लबचा प्रमुख असलेला फ्रेंच नागरिक आणि फोटोग्राफर जीन क्लॉड अर्नाल्ट याच्यावर लैंगिक शोषण आणि आर्थिक हितसंबधांवरुन गभीर आरोप झाले आहेत.
- लैंगिक शोषणाचा आरोप करत अनेक महिलांनी अर्नाल्टविरुध्द ‘मी टू’ मोहीम चालवली होती.
- अर्नाल्टने अॅकॅडमीची सदस्य असलेल्या एका महिलेशी विवाह केला आहे. तसेच अॅकॅडमीने अर्नाल्टच्या क्लबलाही अनेक वर्षे आर्थिक सहाय्य केले आहे.
- या वादानंतर अॅकॅडमीतील १८ आजीवन सदस्यांनी अॅकॅडमीच्या कामकाजात सहभागी होण्यास नकार दिला.
- या पार्श्वभूमीवर स्वीडिश अॅकॅडमीने २०१८चा साहित्याचा नोबेल पुरस्कार पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
- यामुळे नोबेल अकादमीच्या प्रतिमेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा अकादमीने साहित्यातील नोबेल पुरस्कार न देण्याचा निर्णय घेतला आहे.
बांगलादेश सैन्यात प्रथमच महिला मेजर जनरल
- बांगलादेशातील इतिहासात पहिल्यांदाच सैन्यात मेजर जनरल होण्याचा मान डॉ. सुसाने गिती यांच्या रूपाने एका महिलेला मिळाला आहे.
- गिती या सैन्य दलाच्या वैद्यकीय महाविद्यालयातील पॅथालॉजी विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
- त्या एमबीबीएस असून त्यांच्याकडे MCPS, FCPS, MMAD या पदव्याही आहेत.
- त्यांचे पती निवृत्त ब्रिगेडियर जनरल असदुल्ला हसिन साद हे स्वतः एक सैन्यातील फिजिशियन होते.
- गिती यांनी १९८५ मध्ये राजशाही वैद्यकीय महाविद्यालयातून आपली डॉक्टरकीची पदवी घेतली.
- त्यानंतर त्यांनी १९८६ मध्ये सेन्यदलात कॅप्टन पदावर फिजिशियन म्हणून कामास सुरुवात केली.
- १९९६साली हेमॅटॉलॉजी विषयात FCPS पदवी घेणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहीमेत त्यांनी पॅथालॉजिस्ट म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
कर्नाटकमध्ये गुड समारिटनसाठी कायदा मंजूर
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कर्नाटक गुड समारिटन अँड मेडिकल प्रोफेशनल (प्रोटेक्शन अँड रेगुलेशन ड्यूरिंग इमरजन्सी सिचुएशन) अधिनियम, २०१६ संविधानाच्या अनुच्छेद २००अंतर्गत मंजूर केले.
- यामुळे दुर्घटना किंवा आपत्कालीन परिस्थितीत लोकांना मदत करणाऱ्या चांगल्या नागरिकांना (समारिटन) कायदेशीर संरक्षण प्रदान करणारे कर्नाटक देशातील पहिले राज्य ठरले.
- अपघाताच्या अथवा दुर्घटनेच्या परिस्थितीत लोकांना मदत करणाऱ्या चांगल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, हा या कायद्याचा उद्देश आहे.
या कायद्यातील तरतुदी
- अपघाताच्या वेळी जखमींना मदत करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देणे, हा या कायद्याचा उद्देश आहे.
- दुर्घटना अथवा अपघातातील व्यक्तीना वेळेवर मदत करणाऱ्यांना सुरक्षा प्रदान करणे.
- सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालयांना जखमी व्यक्तीचा प्रारंभिक उपचार करणे अनिवार्य आहे.
- या कायकायद्यांतर्गत वैद्यकीय व्यावसायिकांना साक्षीदार या नात्याने सुरक्षा दिली जाईल.
- अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर मदत करणारी व्यक्ती तेथून जाऊ शकते.
- कर्नाटक सरकार अपघातात जखमी व्यक्तीस मदत करणाऱ्या व्यक्तीस आर्थिक मदत देखील देईल.
- तसेच त्या व्यक्तीस पुन्हा-पुन्हा न्यायालय आणि पोलीस स्टेशनला भेट देण्यापासून मुक्त केले जाईल.
- त्या व्यक्तीचा न्यायालय आणि पोलिस स्टेशनला जाण्यासाठीचा खर्च भागविण्यासाठी गुड समारिटन फंड उभारला जाईल.
पार्श्वभूमी
- भारतात २०१६मध्ये ४.८० लाख रस्ते अपघात झाले, ज्यामध्ये सुमारे १.५० लाख लोकांचा मृत्यू झाला.
- रस्ते अपघातांच्या बाबतीत कर्नाटक देशातील आघाडीच्या पाच राज्यांपैकी एक आहे.
- रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला योग्य वेळी उपचार मिळाल्यास त्याचे प्राण वाचू शकतात.
- परंतु अशा जखमींना मदत करणाऱ्या लोकांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारचा कोणताही कायदा अस्तित्वात नाही.
- २०१५मध्ये केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने अशा लोकांच्या संरक्षणासाठी फक्त काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
२ ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन
- जगभरात २ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा केला गेला. अहिंसेचे समर्थक महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
- अहिंसेच्या धोरणाद्वारे जगभरात शांततेचा संदेश पोहचविण्यासाठी महात्मा गांधींनी दिलेल्या योगदानाची आठवण म्हणून आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा केला जातो.
- हा दिवस साजरा करण्याचे मुख्य उद्दीष्ट संपूर्ण जगात शांतता निर्माण करणे आणि अहिंसाचा मार्ग अवलंबणे आहे.
- ५ जून २००७ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने दरवर्षी २ ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा