चालू घडामोडी - ९ मे २०१५


    Gir Lions
  • गेल्या पाच वर्षात गुजरातच्या गिर अभयारण्यातील सिंहांची संख्या २७ टक्क्यांनी वाढली आहे. गिर अभयारण्यात सध्या ५२३ सिंह आहेत. आफ्रिकेतील जंगला व्यतिरीक्त हा जंगलचा राजा आशियात फक्त भारतातच आढळून येतो. 
  • गिरमध्ये पाच वर्षापूर्वी २०१० ला ४११ सिंह होते. आता सिंहांच्या संख्येत २७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
  • जुनागड जिल्ह्यात २६८, सोमनाथमध्ये ४४, अमरेली आणि भावनगरध्ये ४७ सिंह आहेत. सिंहांची सर्वाधिक संख्या अमरेली जिल्ह्यात वाढली आहे. 
  • गणनेत ५२३ सिंहांमध्ये २१३ छावे, १०९ नर व २०१ माद्या आहेत. वनधिकारी आणि वन विभागाने ठेवलेल्या चोख सुरक्षेमुळे हे यश हाती आलं आहे, असं वन्यजीव तज्ज्ञांचं आणि वन्यप्रेमींचं म्हणणं आहे. 
  • गुजरातच्या सौराष्ट्र भागात २२ हजार स्केअर किलोमीटर एवढा अवाढव्य हा गिर अभयारण्याचा परिसर आहे. हे अभयारण्य सौराष्ट्रच्या ८ जिल्हांमध्ये पसरलेलं आहे. गुजरातचा गौरव असलेला हा सिंह पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडियाच्या चिन्हातूनही झळकतो आहे. 
  • जगात सिंह फक्त आफ्रिकेच्या जंगलात आणि गिरच्या अभयारण्यात उरले आहेत. आफ्रिकेतील जंगातल सिंहांची संख्याही ८० टक्क्यांनी कमी झाली आहे. गेल्या शतकात दोन लाख सिंहांवरून ही संख्या फक्त ३० हजारांवर येऊन ठेपली आहे.

  • अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे चौथे मराठी विश्वसंमेलन पुन्हा एकदा रद्द होण्याच्या मार्गावर आहे. चौथे विश्व साहित्य संमेलन हे टोरंटो येथे होणार होते, मात्र नियोजनातील अडचणींमुळे आणि महामंडळाने घेतलेल्या भूमिकेमुळे हे संमेलन रद्द झाले. 
  • त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे चौथे विश्व साहित्य संमेलन होईल, असे महामंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आले. मात्र राज्य सरकारने अनुदानासंबंधी हात वर केले आणि आयोजकांची एवढा खर्च उचलण्याची तयारी नसल्यामुळे विश्व साहित्य संमेलन रद्द करावे, अशी मागणी महामंडळातील सदस्यांनी केली आहे.
  • शिक्षण-व्यवसाय नोकरीच्या निमित्ताने आज महाराष्ट्रातील अनेक जण परदेशी वास्तव्याला असले तरीही मराठी मातीशी त्यांची नाळ अजूनही जुळलेली आहे. त्यामुळे अशांपर्यंत मराठी साहित्य, मराठी साहित्यिक पोचावे यासाठी विश्व साहित्य संमेलन भरविण्यात येते.
  • प्रत्येक विश्व साहित्य संमेलनासाठी राज्य शासनाकडून २५ लाखांचा निधी मिळतो; मात्र यंदा मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी निधी दिला जाणार नाही, असे सूचित केले.
मराठी विश्वसंमेलन ठिकाण वर्ष अध्यक्ष
पहिले सॅन फ्रान्सिस्को २००९ डॉ. गंगाधर पानतावणे
दुसरे दुबई २०१० मंगेश पाडगावकर
तिसरे सिंगापूर २०११ महेश ऐलकुंचवार

  • पर्वतीय भागात असलेल्या गिलगीट येथे दोन प्रकल्पांचे उद्‌घाटन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या हस्ते होणार होते. यासाठी लष्कराच्या एमआय-१७ या हेलिकॉप्टरमधून ११ विदेशी पाहुण्यांसह सहा पाकिस्तानी अधिकारी प्रवास करत होते. 
  • या वेळी अचानक हेलिकॉप्टर एका शाळेवर कोसळून नॉर्वेचे राजदूत लिएफ लार्सन आणि फिलिपिन्सचे राजदूत डोमिंगो डी. लुसीनेरिया यांच्यासह मलेशिया आणि इंडोनेशियाच्या राजदूतांच्या पत्नींचाही मृत्यू झाला असून, पोलंडचे राजदूत आंद्राझेज ऍनिकझोलिश आणि हॉलंडचे मर्केल डी. विंक हे जखमी झाले आहेत. हेलिकॉप्टरचे दोघा वैमानिकांचा मृत्यू झाला.
  • प्रकल्पाच्या ठिकाणी जाणारे इतर दोन हेलिकॉप्टर व पंतप्रधान नवाज शरीफ सुखरूप असल्याचे पाकिस्तानच्या लष्कराने सांगितले.
  • हे हेलिकॉप्टर आम्ही पाडले असल्याचा दावा तेहरिके तालिबान पाकिस्तानने केला आहे. 

  • अल्पसंख्याकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचे शासकीय सेवेतील प्रमाण वाढावे म्हणून राज्यातल्या सर्व उर्दू शाळांत ‘मराठी फाउंडेशन वर्ग’ सुरू करण्यात येणार आहे. 
  • त्यासोबतच मराठी शाळांतही अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचे विद्यार्थी वाढावेत यासाठी राज्यातल्या सर्व मराठी शाळांमधे उर्दूचे वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.
  • अल्पसंख्याकांचे पॉलिटेक्निक कॉलेज : अल्पसंख्याकांनी तंत्रशिक्षणाकडे वळावे यासाठी अल्पसंख्याक तंत्रशिक्षण महाविद्यालये (पॉलिटेक्निक कॉलेज) उभारण्यात येणार असून, या वर्षी पहिले महाविद्यालय जळगावमधील मुक्ताईनगर येथे उभारण्यात येणार आहे. त्यानंतर मालेगाव, संभाजीनगर, बुलडाणा, परभणी, भिवंडी अशा अल्पसंख्याकबहुल भागात ही महाविद्यालये उभारण्याचा विचार सुरू आहे.

  • बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. ‘हिंदुस्तानी आवाम मोर्चा’ (एचएएम) या नावाने पक्ष स्थापून ते बिहारच्या आगामी निवडणुकीत सर्व २४३ जागांवर निवडणूक लढविणार आहेत.

  • ‘हिट ऍण्ड रन’ खटल्यात पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावलेल्या आरोपी अभिनेता सलमान खानचे अपील मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणीसाठी मंजूर केले असून, त्याची शिक्षा स्थगित केली आहे. 
  • तसेच त्याला सशर्त जामीनही मंजूर केला. त्यामुळे शिक्षा झाली असली, तरी त्याचा तुरुंगवास मात्र टळला आहे.

  • हौती बंडखोरांविरुद्धचे हवाई हल्ले तीव्र करत असतानाच सौदी अरेबियाने १२ मेपासून येमेनमध्ये शस्त्रसंधी लागू करण्याची घोषणा केली. 
  • येमेनमध्ये अध्यक्ष अब्दरब्बू मन्सूर हादी आणि हौती बंडखोरांच्या फौजांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. यात अध्यक्ष हाजी यांनी देश सोडून परदेशात आश्रय घेतला. या बंडखोरांविरुद्ध सौदी अरेबिया आणि अमेरिकेने हवाई हल्ले सुरू केले आहेत. 
  • येमेनमधील युद्धग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्या, यासाठी पाच दिवसांचा शस्त्रसंधी लागू होईल, असे सौदी अरेबियाने जाहीर केले. या काळात बंडखोरांशी चर्चा करण्याचेही प्रयत्न केले जातील.

    Britain Election - David Cameron
  • जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या ब्रिटनची सूत्रे आपल्याकडेच ठेवण्यात पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यशस्वी ठरले आहेत. 
  • ७ मे रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कॅमेरून यांच्या कॉन्झर्वेटिव्ह पार्टीने ६५० पैकी ३२९ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले. चांगला प्रचार करून लढत चुरशीची करणाऱ्या लेबर पार्टीला २३२ जागांवर समाधान मानावे लागले. 
  • ब्रिटनच्या ५६व्या संसदेसाठी मतदान झाले होते. यामध्ये डेव्हिड कॅमेरून हे सलग दुसऱ्यांदा ब्रिटनचे पंतप्रधान होण्यास सज्ज झाले आहेत. ते विटने मतदारसंघातून विजयी झाले. सर्व निकाल जाहीर होताच कॅमेरून यांनी ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांची भेट घेतली. 
  • स्कॉटिश नॅशनल पार्टीने स्कॉटलंडमध्ये लेबर पार्टीचे बालेकिल्ले समजल्या जाणाऱ्या बहुतेक सर्व मतदारसंघांत विजय मिळविल्याने लेबर पार्टीचे आव्हानच संपुष्टात आले. या पराभवामुळे त्यांचे नेते एड मिलीबॅंड यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे. त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत पक्षातील पदांचा राजीनामाही दिला आहे. 
  • या उलट स्कॉटिश नॅशनल पार्टीने स्कॉटलंडमधील ५९ पैकी ५६ जागांवर विजय मिळविला. गेल्या वर्षी स्कॉटलंडच्या स्वातंत्र्याबाबत झालेल्या सार्वमतात हा भाग ब्रिटनशी संलग्न ठेवण्याचा कौल नागरिकांनी दिला होता. स्कॉटिश नॅशनल पार्टी स्वतंत्र स्कॉटलंडच्या बाजूने आहे, त्यामुळे या विजयाने त्यांचा उत्साह दुणावला आहे. 
  • लिबरल डेमोक्रॅट्‌स पार्टीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर त्यांचे नेते निक क्लेग यांनी राजीनामा दिला आहे. तसेच, या पक्षाच्या बहुतेक सर्व मोठ्या नेत्यांना मतदारांनी नाकारले. गेल्या निवडणुकीत पन्नासहून अधिक जागा मिळविणाऱ्या या पक्षाला यंदा फक्त आठ जागांवर विजय मिळाला. 
  • स्कॉटिश नॅशनल पार्टीची उमेदवार म्हाइरी ब्लॅक या वीस वर्षांच्या महाविद्यालयीन युवतीने लेबर पक्षाच्या उमेदवाराला हरवून इतिहास घडविला आहे. तब्बल ३५० वर्षांनंतर ब्रिटनच्या संसदेतील ती इतक्या तरुण वयातील सदस्य ठरली आहे.
  • प्रमुख पक्षांच्या जागा 
    • कॉन्झर्वेटिव्ह पार्टी : ३२९ 
    • लेबर पार्टी : २३२ 
    • स्कॉटिश नॅशनल पार्टी : ५६ 
    • लिबरल डेमोक्रॅट्‌स : ८ 
    • यूके इंडिपेन्डन्स पार्टी : १ 
    • इतर पक्ष : २४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा