- १५ मे : विश्व कुटुंबसंस्था दिन
मोदींना बीजिंगमध्ये ‘गार्ड ऑफ ऑनर’
- चीनसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या विचाराने शियान येथे दाखल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर शानदार स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेलही मोदींसमवेत चीनमध्ये दाखल झाले आहेत.
- विमानतळावर शियान प्रांतातील पारंपरिक नृत्याने मोदींचे स्वागत करण्यात आले. चीनमधील प्रथम सम्राट क्विन शी हुआंग याच्या लष्कराची प्रतिकृती असलेल्या येथील जगप्रसिद्ध टेराकोटा वॉरियर्स संग्रहालयाला मोदींनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी दा शिंग शान या बौद्ध मंदिराला भेट दिली आहे.
- दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी चीनची राजधानी असलेल्या बीजिंग येथील ऐतिहासिक ‘ग्रेट हॉल ऑफ पीपल’ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चीनचे प्रधानमंत्री (प्रीमियर) ली केगीयांग यांनी समारंभपूर्वक स्वागत केले. मोदी यांच्या सन्मानार्थ चिनी सैन्यदलातर्फे मानवंदना (‘गार्ड ऑफ ऑनर’) देण्यात आली. यानंतर मोदी व ली यांच्यामधील राजनैतिक चर्चेस प्रारंभ झाला.
- (प्रीमियर) ली केगीयांग व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये परस्पर सहकार्यावर विशेष भर देण्यात आल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
घाऊक महागाई दर नीचांकी पातळीवर
- घाऊक महागाई निर्देशांकात (डब्ल्यूपीआय) सलग सहाव्या महिन्यात लक्षणीय घट झाली आहे. इंधन आणि उत्पादित वस्तूंच्या किमती कमी झाल्याने एप्रिलमध्ये या निर्देशांकाने उणे २.६५ टक्क्यांची पातळी नोंदवली.
- त्यामुळे एकीकडे चलनघटीची समस्या उद्भवली असतानाच रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरांत कपात करावी, अशी मागणीही वाढली आहे.
- गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरपासून ‘डब्ल्यूपीआय’ उणे पातळीवर आहे. उत्पादित वस्तूंच्या किमतींमध्ये सलग दुसऱ्या महिन्यात घट झाली आहे.
- अन्नधान्य घटकांच्या किमतीचा महागाई दर मार्चमध्ये ६.३१ टक्के होता, तो एप्रिलमध्ये आणखी कमी होऊन ५.७३ टक्क्यांवर आला.
- मार्चमध्ये ‘डब्ल्यूपीआय’ घसरून उणे २.३३ टक्क्यांवर आला होता. आता एप्रिलमध्ये त्याने आणखी नीचांकी पातळी नोंदवली आहे.
नेपाळमध्ये पुन्हा भूकंप
- नेपाळला पुन्हा भूकंपाचे पाच हादरे जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी आलेल्या ७.३ रिश्टर स्केलच्या भूकंपातील बळींची संख्याही १०० हून अधिक झाली आहे.
- नेपाळची राजधानी काठमांडूजवळ बसलेले हे भूकंपाचे हादरे ४ ते ५ रिश्टर तीव्रतेचे होते. यांचा केंद्रबिंदू दोलखा जिल्ह्याजवळ होता. मात्र यामुळे भयाचे वातावरण पसरविण्याव्यतिरिक्त नव्याने कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही.
- बेपत्ता अमेरिकन हेलिकॉप्टर
- अमेरिकी नौदलाचे यूएच-१ वाय हे हेलिकॉप्टर बेपत्ता झाले होते. या हेलिकॉप्टरचे अवशेष काठमांडू येथील कालिनचौक भगवती मंदिराजवळ आढळले आहेत. या हेलिकॉप्टरमध्ये अमेरिकेचे सहा, तर नेपाळचे दोन सैनिक होते. या अपघातामधून कोणीही वचल्याचे वृत्त नाही.
सलमानची याचिका फेटाळली
- काळवीट शिकार प्रकरणासंबंधी शस्त्र कायद्याअंतर्गत अभिनेता सलमान खानविरोधात असलेल्या गुन्ह्यात पाच साक्षीदारांची पुन्हा साक्ष घेण्याची त्याची याचिका जोधपुर न्यायालयाने फेटाळून लावली.
- या प्रकरणी सलमान उच्च न्यायालयात जाणार आहे.
- सलमान खानवर १९९८ मध्ये काळविटाची शिकार केल्याचा आरोप असून, या वेळी त्याच्याजवळच्या शस्त्र परवान्याची मुदतही संपली होती, असाही त्याच्यावर आरोप आहे.
माजी सीबीआय संचालकांची होणार चौकशी
- केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) रणजित कुमार सिन्हा यांनी त्यांच्या घरी टू जी स्पेक्ट्रम व कोळसा खाण गैरव्यवहार प्रकरणांमधील आरोपींबरोबर घेतलेली भेट ‘अत्यंत अयोग्य’ असल्याचे मत व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय दक्षता आयोगास दिले.
- चौकशी अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत सिन्हा यांची आरोपींशी भेट झाली, या आरोपात काही अंशी तथ्य असल्याचे न्यायाधीश मदन बी. लोकूर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले आहे. या संदर्भात न्यायालयाने केंद्रीय दक्षता आयोगाला ६ जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
- कोळसा गैरव्यवहार प्रकरणी तपासावर नकारात्मक परिणाम करण्यासाठी सिन्हा यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करत यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी एका स्वयंसेवी संस्थेने केली होती. ज्येष्ठ वकिल प्रशांत भूषण यांनी या संस्थेतर्फे वकिल म्हणून काम पाहिले होते.
- सिन्हा यांनी आपल्याविरोधातील आरोप नाकारत यामागे भूषण यांना नियंत्रित करणारा अदृश्य हात असल्याची टीका केली होती. मात्र न्यायालयाने सिन्हा यांचा हा दावा खोडून काढला.
नकाशातून जम्मू-काश्मीरला वगळले
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्याचे वार्तांकन करताना चीनच्या अधिकृत दूरचित्रवाहिनी असलेल्या ‘सीसीटीव्ही’ने भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीर वगळले असून, अरुणाचल प्रदेशचाही काही भाग वगळून भारताचा नकाशा दाखविला आहे.
- तसेच फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी त्यांच्या टाइमलाइनवर अलीकडेच इंटरनेट डॉट ओआरजीबाबत माहिती देणारी पोस्ट केली आहे. आफ्रिकेतील मलावी येथे इंटरनेट डॉट ओआरजीच्या माध्यमातून विनामूल्य सेवा सुरू करण्यात आल्याबाबत मार्क यांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली आहे.
- त्याच पोस्टमध्ये आजपर्यंत ज्या देशांना अशी सुविधा देण्यात आली आहे त्यांची नावे आणि नकाशेही देण्यात आले आहेत. मात्र, भारताचा नकाशा देताना त्यातून काश्मीरचा भाग वगळण्यात आला आहे. या पोस्टवर नेटिझन्सनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली असून, नकाशा सुधारण्याची सूचना मार्कला केली आहे.
प्रसारमाध्यमांविरुद्धच्या परिपत्रकास स्थगिती
- दिल्ली सरकार आणि मंत्र्यांची बदनामी केल्यास माध्यमांवर बदनामीचा ठपका ठेवून खटला चालवण्याचे परिपत्रक ६ मे रोजी आप सरकारने जारी केले होते.
- सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल सरकारच्या या जाचक परिपत्रकाला स्थगिती देत यावर दिल्ली सरकारकडून स्पष्टीकरण मागविले आहे.
- काय होते परिपत्रकात? : वृत्तपत्रातील एखाद्या बातमीमुळे किंवा वृत्तवाहिनीवरील रिपोर्टमधून मुख्यमंत्री, मंत्री किंवा दिल्ली सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याचे सरकारशी संबंधित कुठल्याही अधिकाऱ्याला वाटले, तर त्याने गृह विभागाच्या मुख्य सचिवांकडे लगेच तक्रार करावी. मुख्य सचिव याचा अभ्यास करून ते प्रकरण दिल्ली सरकारच्या कायदे मंत्रालयाकडे पाठवतील आणि या तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधित वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिनीवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
‘अराउंड द वर्ल्ड इन एटी डेज’
- ‘अराउंड द वर्ल्ड इन एटी डेज’ या प्रसिद्ध कादंबरीने प्रेरित होऊन जगप्रवासाला निघालेले फ्रान्सचे दोन वैमानिक व्हीन्सेंट मॉइसन आणि फिलीप रेनॉट भारतात आले आहेत. भारतात ते अहमदाबाद, नागपूर आणि कोलकता येथे थांबणार आहेत.
- ते एमसीआर-४ एस या विमानातून प्रवास करत आहेत. जगप्रवासादरम्यान ते चोवीस देशांमधून एकूण ४५ हजार किलोमीटर इतके अंतर कापणार आहेत. १८७३ मध्ये ज्युल्स व्हर्न यांनी लिहिलेल्या या कादंबरीतील फिलीएस फॉग या नायकानेही याच मार्गाने प्रवास केल्याचा उल्लेख आहे.
- रोलॅंड गॅरोस या वैमानिकाने मध्य समुद्र पार केल्याच्या घटनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या दोघांनी हा जगप्रवास करण्याचे ठरविले आहे.
बुरुंडीतील लष्करी बंड फसले
- मध्य आफ्रिकेमधील बुरुंडी या देशामध्ये राष्ट्राध्यक्ष पिएरे न्कुरुंझिझा यांची सत्ता उलथवून लष्कराने आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न केला.
- न्कुरुंझिझा हे शेजारील टांझानिया देशामध्ये चर्चेसाठी गेले असता त्यांचे सरकार बरखास्त करण्यात आल्याची घोषणा लष्कराने केली होती. परंतु हे बंड फसल्याचे निष्पन्न झाले आहे.
- कुरुंझिझा यांनी आपण मायदेशी परतल्याचे जाहीर केले आहे. ते देशास संबोधित करणार असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली आहे.
- लष्कराच्या बंडाचे उपनेते जनरल सिरील दायिरुकिये यांनी बंडाची योजना फसल्याचे मान्य केले आहे.
उत्तर प्रदेश सरकारची समाजवादी जल एटीएम योजना
- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ‘समाजवादी शीतल पेयजल योजनेंतर्गत’ जल एटीएमचे उद्घाटन केले.
- या एटीएमद्वारे बस प्रवाश्यांना स्वस्त दरात पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यानुसार साध्या पाण्यासाठी १ रुपये / प्रतिलिटर आणि थंड पाण्यासाठी २ रुपये / प्रतिलिटर मोजावे लागणार आहेत.
तेजस्विनी सागर ‘वर्ल्ड चॅम्पियन’
- भारताची प्रतिभावान युवा खेळाडू तेजस्विनी सागर हिने थायलंड (पटाया) येथे संपलेल्या जागतिक शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत १५ वर्षांखालील गटात सुवर्णपदक जिंकताना ‘वर्ल्ड चॅम्पियन’चा बहुमान मिळविला. तेजस्विनी सागर हिचे हे पहिले जगज्जेतेपद आहे.
- औरंगाबादच्या तेजस्विनी सागर हिने श्रीलंकेच्या काविन्या मियुनी राजपक्षे हिचा नवव्या आणि अखेरच्या फेरीत पराभव करताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
मृदा स्वास्थ्य कार्ड देणारे पंजाब भारतातील पहिले राज्य
- केंद्र सरकारच्या मृदा स्वास्थ्य कार्ड योजनेंतर्गत पंजाब राज्य १२ मे २०१५ रोजी मृदा स्वास्थ्य कार्ड देणारे भारतातील पहिले राज्य ठरले.
- केंद्र सरकार या योजनेंतर्गत प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोबाइल मृदा परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार आहे.
- सध्या पंजाब सरकारने अशा ६६ प्रयोगशाळा स्थापन केल्या असून, एका वर्षात ३.५ लाख नमुन्यांचे परीक्षण करण्याची त्यांची क्षमता आहे.
भारतीय वंशाची हरभजन कौर धीर ब्रिटनमधील महापौरपदी
- भारतीय वंशाची हरभजन कौर धीर १२ मे २०१५ रोजी ब्रिटनमधील महापौरपदी नियुक्त होणारी पहिली आशियायी महिला ठरली.
- विक्टोरिया हॉलमध्ये आयोजित एका समारंभात ६२ वर्षीय हरभजन कौर धीर यांना तेज राम बाघा यांच्या उत्तराधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले.
- हरभजन कौर यांनी अनेक शाळांचे गव्हर्नर म्हणून काम पाहिले आहे. तसेच कौर मानसिकरित्या अशक्त मुले व वृद्ध यांच्या अधिकारांसाठी कार्य करतात.
- हरभजन कौर धीर यांचा जन्म १९५३ मध्ये पंजाब मध्ये झाला होता. त्या १९७५ साली भारतातून ब्रिटनमध्ये स्थायिक झाल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा