मंगोलियाला भारताचे एक अब्ज डॉलरचे कर्ज
- मंगोलियामध्ये आर्थिक आणि पायाभूत सुविधांचा विकास होण्यासाठी त्यांना एक अब्ज डॉलरपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय मंगोलियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आहे.
- भारत आणि मंगोलियाने आपले संबंध धोरणात्मक पातळीपर्यंत वाढविण्याचे ठरविले आहे. त्यामुळेच मंगोलियाचे पंतप्रधान शिमेद सैखानबिलेग यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये संरक्षण, सायबर सुरक्षा, कृषी, अपारंपरिक ऊर्जा आणि आरोग्य क्षेत्र यासंबंधातील १४ करारांवर सह्या करण्यात आल्या.
- द्विपक्षीय संबंध आणि संरक्षण सहकार्य वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न करत उच्च पातळीवर भेटीगाठीचे प्रमाण वाढविण्याबाबतही दोन्ही देशांदरम्यान एकवाक्यता झाली आहे.
- मंगोलिया दौऱ्याची वैशिष्ट्ये
- विविध क्षेत्रांमधील सहकार्यासंबंधी १४ करार
- येथील विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठात ‘माहिती तंत्रज्ञान केंद्रा’चे भूमिपूजन
- येथील प्रसिद्ध मिनी नादाम महोत्सवाला मोदींची उपस्थिती
- मंगोल वंशाच्या इतिहासासंबंधीच्या १३व्या शतकातील दस्ताऐवज मंगोलियाच्या अध्यक्षांना भेट
- संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत कायम सदस्यत्वासाठी भारताला मंगोलियाचा पाठिंबा
- नादाम महोत्सवादरम्यान मोदींना मंगोलियाच्या पंतप्रधानांकडून घोडा भेट
मोदी दक्षिण कोरियामध्ये दाखल
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन देशांच्या अखेरच्या टप्प्याला सुरवात झाली असून, पंतप्रधान मोदी दक्षिण कोरियामध्ये दाखल झाले आहेत.
- दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये दाखल होताच पंतप्रधान मोदी यांचे विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. भारतीय समुदायाच्या नागरिकांनी मोदींचे स्वागत केले.
- मोदी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष पार्क ग्युन हाय यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या होणार आहेत.
नारंगने जिंकले विश्वकपमध्ये कांस्य
- भारतीय नेमबाज गगन नारंग याने अमेरिकेतील फोर्ट बेनिंग येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वकपच्या ५० मीटर रायफल प्रोन स्पर्धेत कास्यपदक जिंकले आणि २०१६ मध्ये होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकसाठी कोटा प्राप्त केला.
- लंडन ऑलिम्पिकमध्ये दहा मीटर एअर रायफलमध्ये कास्यपदक जिंकणाऱ्या नारंगने एकूण १८५.८ गुण मिळवून तिसरे स्थान मिळवले. अमेरिकेच्या मायकल मॅकफॅल (२०८.८) याने सुवर्ण तर नॉर्वेच्या ओले क्रिस्टियन ब्राइन (२०६.३) याने रौप्यपदक जिंकले. या स्पर्धेतील अन्य कोटा स्थान मॅकफॅल याला मिळाले.
- त्याआधी या स्पर्धेत नारंग आणि भारताचा एकमेव ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा १० मीटर एअर रायफलमध्ये पात्र ठरण्यात अपयशी ठरले.
- नारंग रियोसाठी पात्र ठरणारा तिसरा नेमबाज आहे. त्याआधी जीतू राय आणि अपूर्वी चंदेला यांनी ऑलिम्पिक कोटा स्थान मिळवले होते. चंदेलाने गेल्या महिन्यात कोरियात विश्वकपमध्ये दहा मीटर रायफलमध्ये कास्यपदक जिंकताना कोटा स्थान प्राप्त केले होते.
- पिस्टल नेमबाज जीतू राय याने गेल्या वर्षी स्पेनच्या ग्रेनाडात विश्व चॅम्पियनशिपमध्ये भारताला पहिला ऑलिम्पिक कोटा स्थान मिळवून दिले होते. त्याने त्या वेळेस ५० मी. फ्री पिस्टलमध्ये रौप्यपदक जिंकले होते.
वाराणसीमध्ये उस्ताद योजनेचे उद्घाटन
- केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री डॉ नजमा हेपतुल्ला व अल्पसंख्यांक राज्य मंत्री मुख़्तार अब्बास नक्वी यांनी वाराणसीमध्ये उस्ताद योजनेचे उद्घाटन केले.
- उद्देश : वाराणसी तसेच पूर्वांचल भागातून विलुप्त होत चाललेल्या परंपरागत आणि विख्यात शिल्पकलेचे व हस्तकलेचे संवर्धन तसेच विकास करणे. तसेच १५ ते ३५ वर्षाच्या शिल्पकारांच्या कौशल्य विकासासाठी त्यांना प्रशिक्षण देणे.
- केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयाद्वारे ही योजना सध्या फक्त अल्पसंख्यांकांसाठी राबविण्यात येत आहे.
झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी रोखला बालविवाह
- शिक्षण सोडून विवाहाचा प्रस्ताव स्वीकारण्याबाबत कुटुंबीयांकडून येत असलेल्या दबावातून सतरा वर्षांच्या मुलीची झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी स्वत: कुटुंबीयांशी सल्लामसलत करून सुटका केली आहे.
- ही मुलगी रांचीतील एका शिक्षण संस्थेत शिकत आहे. काही दिवसांपूर्वी या मुलीने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मुलीची समस्या ऐकल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुलीच्या वडिलांना स्वत: दूरध्वनी केला. तसेच त्यांना अल्पवयीन विवाहाला कायद्याने परवानगी नसल्याचे सांगितले. तसेच त्यांनी सदर मुलीला शिक्षणासाठी काही पैसेही देऊ केले आहेत.
प्रलंबित खटले निकाली
- चुकीचे आरोपपत्र, पुराव्यांचा अभाव आदी कारणांमुळे राज्यातील विविध न्यायालयांत प्रलंबित असलेले खटले मागे घेण्याबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करीत असून, तसे निर्देश देण्यात आले आहेत.
- राज्यातील १२९१ न्यायालयांमध्ये १८ लाखांहून अधिक फौजदारी खटले प्रलंबित आहेत. त्यामध्ये एकट्या मुंबईचे खटले साडेचार लाखांच्या घरात आहे.
- राज्याचे शिक्षा सुनावण्याचे प्रमाण केवळ १५ टक्के इतकेच आहे. प्रलंबित खटले निकाली काढण्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे.
मिथुन चक्रवर्ती यांची ‘इडी’कडून चौकशी
- तृणमूल कॉंग्रेसचे खासदार तथा अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची कोट्यवधींच्या शारदा चिट फंड गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (इडी) चौकशी केली. चौकशीदरम्यान मिथुन यांनी शारदा चिट फंडने दिलेला पैसा परत करण्याचे आश्वासन दिले. ही चौकशी सुमारे तीन तास सुरू होती.
- जबाब नोंदविल्यानंतर मिथुन यांनी चौकशी अधिकाऱ्यांकडे डीव्हीडी, सीडी तसेच काही कागदपत्रे हवाली केले. मिथुन चक्रवर्ती शारदा कंपनीचे ब्रॅंड ऍम्बेसिडर म्हणून नियुक्त केलेले असल्यामुळे कंपनीसंदर्भात त्यांच्याकडे महत्त्वाची ही कागदपत्रे होती.
- चौकशी अधिकाऱ्यांनी मिथुन यांच्या जबाबामुळे समाधान व्यक्त केले असून, आणखी त्यांची गरज पडणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली.
शिखा जोशी या मॉडेलची आत्महत्या
- शिखा जोशी (वय ४०) या मॉडेलने वर्सोवा येथे मित्राच्या घरात सुरीने गळा कापून आत्महत्या केली. चित्रपट आणि मालिकांत काम मिळत नसल्याने आलेल्या नैराश्यातून तिने हे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
- मूळची दिल्लीची असलेली शिखा चित्रपटांत काम करण्यासाठी काही वर्षांपूर्वी मुंबईत आली होती. तिने काही चित्रवाणी मालिका, जाहिराती आणि चित्रपटांतही काम केले होते.
पॅलेस्टाइनच्या दोन नन्सना संतपद
- पॅलेस्टाइनमधील १९व्या शतकातील मेरी अल्फोन्सिन आणि मरियम बवार्डी या दोन नन्सना ख्रिस्ती धर्माचे सर्वोच्च नेते पोप फ्रान्सिस यांनी संतपद बहाल केले.
- पॅलेस्टाइनमधील नन्सना प्रथमच संतपद मिळाले आहे. या कार्यक्रमाला पॅलेस्टाइनचे अध्यक्ष मेहमूद अब्बास उपस्थित होते.
- मेरी यांनी पॅलेस्टाइनमध्ये महिलांच्या शिक्षणासाठी जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच, अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी सुरू केले होते. मरियम यांनी गूढरीत्या आयुष्य व्यतीत केले होते.
- मेरी यांना तत्कालीन राजवटीत मारून टाकल्यानंतर नातेवाइकांनी प्रार्थना केल्यानंतर त्या दोन दिवसांनंतर जिवंत झाल्याचे सांगण्यात येते.
जम्मू आणि काश्मीरच्या पर्यटनाला जर्मनीची मदत
- काश्मीर खोऱ्याला भेट देण्यासाठी इच्छुक पर्यटकांची सुरक्षेविषयीची मानसिकता बदलण्यासाठी जर्मनीने जम्मू-काश्मीर सरकारला मदतीचा हात देऊ केला.
- जर्मनीचे भारतातील राजदूत मायकल स्टेनर यांनी मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.
- स्टेनर यांनी जर्मनीतील पर्यटकांना आम्ही अधिकृतपणे काश्मीर खोऱ्यात जाण्याची शिफारस करू असे सांगितले. या बैठकीत सईद आणि स्टेनर यांच्यामध्ये दोन्ही देशांना फायदेशीर ठरणाऱ्या मुद्यांवर चर्चा झाली.
- मुख्यमंत्री सईद यांनी जम्मू आणि काश्मीरच्या ट्रॅव्हल मार्टबद्दलही माहिती दिली. यामध्ये २० देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. १९८८ नंतर पहिल्यांदाच काश्मीर खोऱ्यात ट्रॅव्हल मार्टचे आयोजन करण्यात येत आहे.
येमेनमध्ये शांततेसाठी चर्चा सुरू
- येमेनमध्ये शांततेसाठी आणि देशाच्या भविष्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या मध्यस्थीने चर्चेला सुरवात झाली. येमेनचे सुमारे चारशे राजकीय नेते आणि आदिवासी नेते हे सभेला उपस्थित होते. मात्र, ज्यांच्यामुळे देशात अशांतता आहे, त्या हौथी बंडखोरांपैकी कोणीही चर्चेला उपस्थित नव्हते.
- येमेनमधील संयुक्त राष्ट्रसंघाचे राजदूत इस्माईल औद शेख अहमद यांनी ही बैठक घेतली होती. सौदी अरेबियाने या तीन दिवसांच्या बैठकीसाठी पुढाकार घेतला आहे.
पप्पू यादव यांची नव्या पक्षाची घोषणा
- राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) माजी नेते आणि माधेपुराचे विद्यमान खासदार राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव यांनी नव्या पक्षाची घोषणा केली.
- ‘जन क्रांती अधिकार मोर्चा’ असे नव्या पक्षाचे नाव असून, आपला पक्ष बिहारमध्ये मतदारांना तिसरा पर्याय उपलब्ध करून देईल, असे यादव यांनी सांगितले.
- बिहार विधानसभेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी केली आहे. लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलातून पप्पू यादव यांची काही दिवसांपूर्वीच हकालपट्टी करण्यात आली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा