जयललिता पुन्हा तमिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्री
- ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) पक्षाच्या प्रमुख नेत्या असलेल्या जयललिता यांनी तमिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी शपथ घेतली. तमिळनाडुचे राज्यपाल के. रोसय्या यांनी जयललिता यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. जयललिता यांच्याबरोबरच यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळामधील २८ सहकाऱ्यांनीही शपथ घेतली.
- याबरोबरच जयललिता या पाचव्यांदा तमिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या आहेत. चेन्नई येथील मद्रास विद्यापीठामध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यास दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील सुपरस्टार रजनीकांत हेदेखील उपस्थित होते.
- जयललितांना पदावरून दूर व्हावे लागल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा भार सांभाळणारे जयललितांचे एकनिष्ठ मंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी २२ मे रोजी आपला राजीनामा राज्यपालांकडे सादर केला व राज्यपालांनीही तो मंजूर केला होता.
- बेहिशोबी मालमत्ता गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आल्यामुळे सप्टेंबर २०१४ मध्ये जयललिता यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते.
सरकारी कर्मचाऱ्यांच्याही कामाचे मूल्यमापन
- लालफितीचा कारभार संपुष्टात आणून प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान व्हावे, यासाठी आता प्रत्येक खात्याने नेमके काय करावे, याचा वार्षिक आराखडा तयार केला जाणार असून, राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना कॉर्पोरेट क्षेत्राप्रमाणे ‘केआरए’ (Key Result Area) भरावा लागणार आहे.
- वर्षभरात कर्मचाऱ्याने काय केले याच्यावरच त्याची वेतनवाढ तसेच पदोन्नतीचे निर्णय घेतले जातील, असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.
- कर्मचारी संघटनांशी या संदर्भात चर्चा झाली असून, प्रशासकीय कामाला वेग येण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे संघटनांनीही मान्य केले आहे.
- कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या प्रयत्नांतर्गत वेगवेगळे प्रयोग अंमलात आणले जात आहेत. याच मालिकेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाच्या खात्याने येत्या काळात काय करायचे याचा मोठा आराखडा तयार करण्यात आला आहे.
गुज्जर समुदायाने रेल रोको आंदोलन
- केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षण मिळण्यासाठी गुज्जर समुदायाने सलग तिसऱ्या दिवशी रेल रोको आंदोलन केले. यामुळे दिल्ली-मुंबई मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
- गुज्जर समुदायाच्या आंदोलनामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर अनेक गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
माऊंट एव्हरेस्टवर भारताचे ऐतिहासिक गिर्यारोहणाला ५० वर्षे पूर्ण
- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी २० मे २०१५ रोजी राष्ट्रपती भवनात ‘भारतीय गिर्यारोहण फाउंडेशन’तर्फे आयोजित माऊंट एव्हरेस्टवर भारताचे ऐतिहासिक गिर्यारोहणाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभाचे उद्घाटन केले. २० मे १९६५मध्ये भारताने एव्हरेस्ट शिखर सर केले होते.
- १९६५ मध्ये लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंग कोहली यांच्या नेतृत्वाखाली २१ सदस्यीय भारतीय पथक माउंट एव्हरेस्टवर पोहोचले होते. हि मोहीम भारतीय गिर्यारोहण फाऊंडेशनने प्रायोजित केली होती.
- अलिकडच्या वर्षांत या फाऊंडेशनने हिमालयात पर्यावरणाच्या संरक्षणाचे कामदेखील स्वीकारले आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाचे ‘ॲमेझॉन’ व ‘पेपाल’बरोबर करार
- भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) २० मे २०१५ रोजी ई-कॉमर्स क्षेत्रातील मोठी कंपनी ‘ॲमेझॉन’बरोबर सामंजस्य करार केला.
- या कराराद्वारे स्टेट बँक आपल्या ग्राहकांना विशेषतः लहान आणि मध्यम उद्योगाच्या ग्राहकांना ई-कॉमर्स संकेतस्थळावर भरणा (पेमेंट) सुविधा उपलब्ध करून देणार आहे.
- या व्यतिरिक्त या कराराद्वारे स्टेट बँकेला अशा ग्राहकांपर्यंत पोहचणे शक्य होईल जे नियमितपणे ॲमेझॉनचा वापर करतात.
- तसेच एसबीआयने २० मे रोजी डिजिटल भरणा कंपनी ‘पेपाल’ (Paypal) बरोबर देखील सामंजस्य करार केला.
- या करारामुळे ९ लाख लहान आणि मध्यम ग्राहकांना सुरक्षित पैसे व्यवहार करण्यास मदत होईल. सुरुवातीला या कराराचा उद्देश परदेशात निधी व्यवहार करणे असून नंतर स्थानिक व्यवहारांचादेखील यात समावेश करण्यात येणार आहे.
- हि सुविधा एसबीआय डेबिट कार्ड धारकांसाठी देखील उपलब्ध होईल.
- विक्रम नारायण पेपालचे भारतातील व्यवस्थापक आहेत. पेपाल जगातील २०३ देशांमध्ये उपलब्ध असून हि कंपनी प्रतिदिन १.१५ कोटी रुपयाचे व्यवहार करते.
व्ही. शंगमुखनाथन मेघालयचे १५वे राज्यपाल
- कोलकाताचे माजी भाजप नेते व्ही. शंगमुखनाथन यांनी मेघालयचे १५वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उमा नाथ सिंग यांनी राज्यघटनेचे कलम १५९ च्या तरतुदी नुसार राज्यपाल पदाची शपथ दिली.
- जानेवारी २०१५ मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांच्यावर मेघालय राज्यपाल पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती. त्यांची जागा आता व्ही. शंगमुखनाथन घेतील.
- व्ही. शंगमुखनाथन यांच्याबद्दल
- जन्म : १९ नोव्हेंबर १९४९
- शिक्षण : राजकीय विज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण (पोस्टग्रॅज्युएट) आणि एम. फिल
- ते १९६२ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मध्ये सामील झाले आणि नंतर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सदस्य झाले. त्यांनी पक्षाच्या विविध महत्वाच्या पदांवर कार्य केलेले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संयुक्त मंत्रिस्तरीय आयोगाची ९वी बैठक
- भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संयुक्त मंत्रिस्तरीय आयोगाची (जेएमसी) ९वी बैठक दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे १९ मे २०१५ रोजी पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान दक्षिण आफ्रिकेचे परराष्ट्र मंत्री मैती नकोआना मशाब आणि भारताचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्तरीत्या भूषविले.
- या बैठकीला जेएमसीच्या ७ उपसमित्यांचे अधिकारीदेखील उपस्थित होते.
या बैठकीतील प्रमुख निर्णय
- संयुक्त मंत्रिस्तरीय आयोगला अधिक प्रभावी बनविण्यासाठी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाच वर्षाच्या धोरणात्मक कार्यक्रमाच्या चौकटीत काम करण्यास सहमती दर्शवली. त्यांनी सहकार्यासाठी प्राधान्य भागात खालील क्षेत्रांचा समावेश केला. संरक्षण | केंद्रित उत्खनन | विज्ञान आणि तंत्रज्ञान | कृषी आणि अन्न प्रक्रिया | विमा
- हे सुलभ व्हावे यासाठी व्यापार आणि आर्थिक व्यवहार प्रकरणांवर एका नवीन संयुक्त गटाची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- विज्ञान आणि तंत्रज्ञान याकरिता एक नवीन उपसमिती स्थापन करण्याचा तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमध्ये (एमएसएमई) सहकार्यासाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे.
- दोन्ही देशांनी परस्पर सोयीस्कर तारीखेला संयुक्त मंत्रिस्तरीय आयोगाची पुढील (१०वी) बैठक भारतात आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताने चीनमधील नवीन दूतावासाच्या कार्यक्षेत्रातून तिबेटला वेगळे ठेवण्याची घोषणा
- भारताने चीनमधील नवीन दूतावासाच्या कार्यक्षेत्रातून तिबेटला वेगळे ठेवण्याची घोषणा केली. याअंतर्गत चीनच्या चेंगदू शहरात भारताचा नवीन दूतावास सुरु झाल्यावर तिबेट त्याच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर राहणार आहे.
- भारताचा हा निर्णय चीनबरोबरची मैत्री वाढविण्यासाठी घेण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.
- याच धर्तीवर चेन्नईमध्ये सुरु होणाऱ्या चीनच्या दूतावासाच्या कार्यक्षेत्रातून कर्नाटकला वेगळे ठेवण्यात आले आहे.
- भारत तिबेटची राजधानी ल्हासामध्ये आपला तिसरा दूतावास सुरु करण्यास इच्छुक होता परंतु चीनने याकरिता असहमती दर्शवली.
- चेंगदूस्थित भारताचा दूतावास सिजुआन, युन्नान, गुईझाओ राज्य व चूंगचींग नगरपालिका क्षेत्राची देखरेख करेल.
- भारताचे चीनमध्ये बीजिंग, शांघाय तसेच गुआंगझौ मध्ये दूतावास आहेत. त्त्याच्प्रमाने चीनचे भारतात दिल्ली, कोलकत्ता आणि मुंबईमध्ये दूतावास कार्यरत आहेत.
पाच आंतरराष्ट्रीय बँकांवर ५.७ अब्ज डॉलरचा दंड
- अमेरिकने पाच आंतरराष्ट्रीय बँकांवर ५.७ अब्ज डॉलरचा दंड लावला. जेपी मॉर्गन, सिटीग्रुप, बार्कलेज, आरबीएस आणि यूबीएस एजी या पाच बँकांवर परकीय चलन किंवा व्याज दरात घोटाळा करण्याचे आरोप आहेत.
- याअंतर्गत बार्कलेज बँकेवर सर्वाधिक २.४ अब्ज डॉलर दंड लावण्यात आला. कारण या बँकेने ब्रिटन, अमेरिका आणि स्वित्झर्लंडच्या नियामकांना तपासात सहकार्य केले नाही.
- जेपी मॉर्गन, सिटीग्रुप, बार्कलेज आणि आरबीएसने अमेरिकन कायद्यांचे उल्लंघन केल्याचे मान्य केले आहे. यूबीएस एजीने व्याजदरमध्ये घोटाळा केल्याचे आरोप मान्य केले आहेत.
सिंद्री प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्यास केंद्र सरकारची मंजुरी
- २१ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (FCIL) सिंद्री (झारखंड) प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्यास मंजुरी दिली आहे. याकरीता सुमारे ६००० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.
- FCILचे सिंद्री युनिट २००२ पासून बंद आहे. बिहार, पश्चिम बंगाल व झारखंडसहित पूर्वेकडील राज्यांची युरियाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
- या प्रकल्पामुळे प्रत्यक्षपणे ५०० आणि अप्रत्यक्षपणे ३००० लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा