चालू घडामोडी - ६ मे २०१५
- ६ मे १८६१ : मोतीलाल नेहरू जन्मदिन
- आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रसायनशास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. सी. एन. राव यांचा जपान सरकारतर्फे सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
- विज्ञान क्षेत्रातील अमूल्य योगदान आणि भारत-जपान माहिती आणि विज्ञान क्षेत्रात भरीव योगदानाबद्दल डॉ. राव यांना हा पुस्कार देण्यात येणार आहे.
- जपान सरकारतर्फे ‘ऑर्डर ऑफ द रायझिंग सन, गोल्ड अँड सिल्व्हर स्टार’ हा पुरस्कार डॉ. राव यांना देण्यात येणार असून जपानच्या संशोधन विभागातून निवड झालेले डॉ. राव हे एकमेव भारतीय आहेत.
- सध्या ते राष्ट्रीय संशोधन विकास संस्थेत प्राध्यापक व बंगळूरुच्या जवाहरलाल नेहरू विज्ञान संशोधन केंद्राचे अध्यक्ष आहेत.
- त्यांनी आत्तापर्यंत १६००हून अधिक संशोधन प्रबंध सादर केले असून ५०हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. शिवाय तब्बल ७० संस्थांनी त्यांना डॉक्टरेट बहाल केली आहे. अनेक देशांनी त्यांचा सर्वोच्च पुरस्कारांनी गौरव केला आहे.
- दिल्लीच्या ‘इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळा’चा जगातील सर्वश्रेष्ठ विमानतळांच्या यादीत समावेश झाला आहे.
- या विमानतळावर दरवर्षी २५ ते ४० मिलियन प्रवाशांद्वारे प्रवास केला जाते, हेच या विमानतळाचे वैशिष्टय़ आहे.
- यात जगभरातील तब्बल २०० पेक्षा अधिक विमानतळांचा समावेश असून, पहिल्या क्रमांकावर दिल्लीचे हे विमानतळ आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कर्मचाऱयांचे देखील कौतुक करण्यात आले आहे.
- केंद्र सरकारने मोटर स्पोर्टसला मान्यता दिली असून, क्रीडा मंत्रालयाकडून ज्या राष्ट्रीय क्रीडा संघटनांना मान्यता आहे, त्यात आता मोटर स्पोर्टस फेडरेशनचा समावेश करण्यात आला आहे.
- पण, हा समावेश इतर खेळांच्या गटात केला गेला आहे.त्यामुळे या खेळाला सरकारी मदत मिळणार नाही.
- केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने मान्यताप्राप्त क्रीडाप्रकारांची यादी नुकतीच जाहीर केली असून, त्यात या खेळाचा समावेश करण्यात आला आहे.
- भारतातील ५५७.७५ टन सोने हे रिझर्व्ह बॅंकेकडे असून, २० हजार टन सोने जनतेकडे असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात राज्यसभेत दिली आहे.
- सरकारने १९९९ मध्ये सोने जमा करण्याची मोहीम राबविली होती. त्याचा उद्देश देशातील सोने एकाच ठिकाणी गोळा करण्याचा होता, असेही जेटली म्हणाले.
- भारत हा जगातील सर्वाधिक सोने आयात करणारा देश आहे. भारतामध्ये दरवर्षी जवळपास ८००-९०० टन सोने आयात करण्यात येते, असेही त्यांनी नमूद केले.
- पाकिस्तानातील पहिल्या सौरऊर्जा प्रकल्पाचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी उद्घाटन केले. हा प्रकल्प पंजाब सरकारच्या मालकीचा असून, चीनच्या ‘टेबियन इलेक्ट्रिक ऍपरेटस स्टॉक को-लिमिटेड’ (टीबीईए) या कंपनीच्या सहकार्याने तो उभारण्यात आला आहे.
- १९ कोटी डॉलर खर्च करून एका वर्षात उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाची क्षमता शंभर मेगावॉट असून, पुढील वर्षापर्यंत ती एक हजार मेगावॉटपर्यंत नेली जाईल.
- देशात नेट न्यूट्रॅलिटी कायम राहील, तसेच कोणालाही विशेष सुविधा देण्यात येणार नसल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी राज्यसभेत स्पष्ट केले. ट्रायबाबत सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना प्रसाद यांनी ही माहिती दिली.
- यावेळी नेट न्यूट्रॅलिटीसाठी कायदा किंवा मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी अहवाल मागविल्याचेही त्यांनी सांगितले.
- संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन संपल्याबरोबर १४ ते १९ मे या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन, मंगोलिया व दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. ही त्यांची अधिकृत सरकारी भेट असेल.
- या तिन्ही देशांबरोबर द्विपक्षीय संबंधांची विस्तार व व्याप्ती यात वृद्धी करणे हा मुख्य हेतू असल्याचे परराष्ट्र मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.
- मोदी पहिल्या टप्प्यात १४ ते १६ मे दरम्यान चीनला भेट देणार आहेत. पंतप्रधान या नात्याने त्यांची ही पहिलीच चीन भेट असेल. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पूर्वी चीनला भेट दिलेली आहे.
- मोदी दुसऱ्या टप्प्यात १७ मे रोजी मंगोलियास भेट देणार आहेत. भारतीय पंतप्रधानांनी मंगोलियाला भेट देण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
- शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान १८ व १९ मे रोजी दक्षिण कोरियाला भेट देणार आहेत. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष पार्क गेउन ह्ये यांच्याबरोबर त्यांची द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा होणार आहे.
- ‘भारत-बांगलादेश जमीन सीमा करार‘ विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. हे ११९वे घटनादुरुस्ती विधेयक असून, त्यात दोन्ही देशांनी आपापल्या ताब्यातील अनेक भाग परस्परांना सोपविण्याची तरतूद आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने भारत-बांगलादेश कराराबाबतच्या विधेयकाला हिरवा कंदील देण्याचा निर्णय केला.
- दोन वर्षांपूर्वी (२०१३ मध्ये) हे विधेयक सर्वप्रथम राज्यसभेत मांडण्यात आले होते. वरिष्ठ सभागृहाच्या निवड समितीने विधेयक मंजूर करण्याची शिफारस एकमताने केली होती.
- ‘भारत-बांगलादेश जमीन सीमा करार‘ (एलबीए) विधेयकात दोन्ही देशांतील एकमेकांच्या हद्दीतील दोन्ही देशांच्या सुमारे १६१ तुकड्यांत विखुरलेल्या भूभागांच्या परस्पर आदान-प्रदानाची तरतूद आहे. यात आसाम, पश्चिम बंगाल, त्रिपुरा व मेघालय ही राज्ये येत आहेत.
- सुधारित सीमा निश्चित झाल्यावर भारत व बांगलादेशची सीमा सील होणार असल्याने त्यातून भारताला सध्या भेडसावणारे अनेक प्रश्न मार्गी लागतील.
- कॉंग्रेस पक्षाने या करारामध्ये आसामचा समावेश करण्याची सूचना केली आहे. तशी दुरुस्ती करून राज्यसभेत हे विधेयक मांडले जाईल व मंजूरही होईल, असा सरकारला विश्वास वाटतो.
- दोन्ही देशांतील ज्या भागांचे आदान-प्रदान प्रस्तावित आहे, तेथे आजमितीस सुमारे ५० हजार लोक राहात आहेत. त्यांना कोणत्या देशात राहायचे, याचा निर्णय त्यांच्याच मर्जीवर सोपविण्यात येणार आहे.
- ब्रिटनमध्ये सात मे रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.
- ब्रिटनमध्ये सध्या कॉंझर्व्हेटिव्ह (टोरी) आणि लिबरल डेमोक्रॅट यांचे आघाडी सरकार सत्तारूढ असून, विरोधी लेबर पक्षाचा यंदा सत्ता मिळविण्याचा प्रयत्न आहे.
- संसदेत ६५० जागा असून, बहुमतासाठी ३२६ जागा मिळवाव्या लागतात. गेल्या, म्हणजे २०१० च्या निवडणुकीत टोरींना ३०७ तर लेबरना २५८ जागा मिळाल्यामुळे त्रिशंकू संसद अस्तित्वात आली होती. पण लिबरल डेमोक्रॅटच्या निक क्लेग यांनी ५७ सदस्यांसह टोरींना पाठिंबा दिल्यामुळे आघाडी सरकार आले होते.
- यंदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या स्थलांतरितांची मते मोलाची भूमिका बजावतील, असे तज्ज्ञांना वाटते. भारतीय वंशाच्या मतदारांची संख्या सुमारे ६ लाख १५ हजार आहे.
- पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या ग्रीनपीस इंडिया या स्वयंसेवी संस्थेने (एनजीओ) भारतातील कामकाज बंद करण्याचा इशारा दिला.
- केंद्र सरकारने ग्रीनपीस इंडियाची देशातील एकूण सात बॅंक खाती गोठविली आहेत. हा निर्णय मागे न घेतल्यास एका महिन्याच्या आत भारतातील कामकाज बंद केले जाईल, असे ग्रीनपीस इंडियातर्फे स्पष्ट करण्यात आले.
- परदेशातून मिळणाऱ्या देणगीच्या हिशेबामध्ये कमतरता असल्याचे कारण दाखवत गृह मंत्रालयाने एप्रिल महिन्याच्या सुरवातीला ग्रीनपीस इंडियाची सात बॅंक खाती गोठविली होती.
- केंद्र सरकारच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमधील बाधितांना ५० टक्के नुकसानीची अट शिथिल करत ३३ टक्के नुकसान झाले, तरी भरपाई देण्याच्या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले.
- केंद्र सरकारच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार नैसर्गिक आपत्तीमधील बाधितांना २०१५ ते २०२० या कालावधीकरिता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकष व दरामध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
- केंद्र सरकारच्या नवीन निकषानुसार पीकनुकसानीची ५० टक्क्यांची अट ३३ टक्के इतकी शिथिल करण्यात आली आहे.
- नैसर्गिक आपत्तीमध्ये चक्रीवादळ, भूकंप, आग, पूर, सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, हिमखंड कोसळणे, टोळधाड, दुष्काळ, ढगफुटी व कडाक्याची थंडी या आपत्तींचा समावेश केंद्राने केला आहे.
- अशी असणार भरपाई...
- कोरडवाहू शेतीसाठी - ४५०० वरून ६८०० रुपये
- बागायती क्षेत्रासाठी - नऊ हजारांवरून १३,५०० रुपये
- फळबागांसाठी (बहुवार्षिक पिके) - १२ हजारांवरून १८ हजार रुपये
- मदत किमान दोन हेक्टरसाठी देण्यात येणार
- सन २०१० मधील हिट अँड रन खटल्यात अभिनेता सलमान खान याला न्यायालयाने दोषी ठरविण्यात आले असून, त्याला दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते.
- सदोष मनुष्यबळाचा सलमान खानवर ठेवण्यात आलेला आरोप सिद्ध करण्यात आला आहे. सलमानने पदपथावर झोपलेल्यांच्या अंगावर गाडी घातल्याने त्यातील एकजणांचा मृत्यू झाला होता.
- सलमान खान चालकाच्या जागेवर बसलेला होता. तो दारुच्या नशेत होता, तसेच वाहन चालविण्याचा परवाना त्याच्याकडे नव्हता.
- भारतीय दंडविधान कलम ३०४ (२) नुसार विनाहेतू हत्या केल्याचा गुन्हा सलमानवर आहे.
- तसेच, कलम ४२७ नुसार संपत्तीचे नुकसान केल्याचा गुन्हा आहे.
- कलम ३३९ - दुसऱ्याच्या जिवाला धोका निर्माण करणे
- कलम २३९ - बेपर्वाईने गाडी चालविणे
- माजी केंद्रीय राज्य मंत्री बाळेश्वर राम यांचे निधन झाले. ते ८७ वर्षाचे होते.
- १९५२ मध्ये ते बिहारमधील हसनपूर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले होते आणि १९८० मध्ये ते रोसडा संसदीय मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्यावर केंद्रात राज्यमंत्री बनले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा