काळा पैसा धारक पाच भारतीयांची नावे उघड
- स्वित्झर्लंडमधील बॅंक खात्यांत पैसा जमा करणाऱ्यांची नावे उघड होण्यास सुरवात झाली असून, स्वित्झर्लंडने त्यांच्या अधिकृत राजपत्राद्वारे काळा पैसा जमा करणाऱ्या परदेशी व्यक्तींची नावे जाहीर केली आहेत.
- भारतीय अधिकाऱ्यांनी मागितलेल्या माहितीच्या आधारावर स्वित्झर्लंडने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात उद्योगपती यश बिर्ला यांच्यासह स्नेहलता सोहनी, संगीता सोहनी, गुरजितसिंह कोचर आणि रितीका शर्मा या पाच भारतीयांची नावे जाहीर झाली आहेत.
- ही यादी संबंधित व्यक्तींच्या देशांना अधिक तपासासाठी पुरविली जाणार आहे. या पाच जणांपैकी बिर्ला आणि शर्मा यांच्याबाबत काही माहिती याआधीच स्वित्झर्लंडच्या कर प्रशासन विभागाने भारताला पुरविली आहे.
- गुरजितसिंह कोचर आणि रितीका शर्मा हे दोघेही सिटी लिमोझीन गैरव्यवहाराशी संबंधित आहेत.
- आयकरासंबंधीच्या परस्पर सहकार्यांतर्गत भारतीय प्रशासनाला सविस्तर माहिती देण्यासंदर्भात आक्षेप असल्यास फेडरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कोर्टासमोर ३० दिवसांत अपील करावे, असे स्विस फेडरल टॅक्स ऍडमिनिस्ट्रेशनने या भारतीयांना सांगितले आहे.
- काळा पैसाधारकांची नावे उघड करताना या सर्वांची नावे आणि जन्म तारखांव्यतिरिक्त अन्य कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
फोर्ब्सच्या प्रभावशाली महिलांच्या यादीत ४ भारतीय
- ‘फोर्ब्स‘ मासिकाने प्रसिद्ध केलेल्या जगातील १०० सर्वांत प्रभावशाली महिलांमध्ये चार भारतीय महिलांचाही समावेश आहे. या यादीत जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल पहिल्या स्थानावर आहेत.
- फोर्ब्सकडून दरवर्षी जगातील शंभर प्रभावशाली महिलांची यादी जाहीर करण्यात येते. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधति भट्टाचार्य (३०व्या स्थानी), आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर (३५व्या स्थानी), बायोकॉनच्या संस्थापक किरण मजूमदार-शॉ (८५व्या स्थानी) आणि हिंदुस्तान टाईम्स माध्यम समुहाच्या अध्यक्षा शोभना भारतीया (९३व्या स्थानी) यांचा समावेश आहे.
- फोर्ब्सच्या या यादीत भारतीय वंशाच्या इंदिरा नुयी (पेप्सिकोच्या अध्यक्षा) आणि पद्मश्री वॉरियर (सिस्को टेक्नॉलॉजीच्या प्रमुख) याही आहेत.
- फोर्ब्सच्या हि १२वी वार्षिक यादी आहे. अँजेला मर्केल यांच्यानंतर अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या हिलरी क्लिंटन दुसऱ्या स्थानी, दानकर्त्या मेलिंडा गेट्स व फेडरल रिझर्व्हच्या प्रमुख जॅनेट येलेन तिसऱ्या स्थानावर आहेत.
चंडीगड शहरात निकोटीनवर बंदी
- चंडीगडमध्ये निकोटीनवर संपूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
- अलीकडेच निकोटीनवर बंदी असलेले पंजाब हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने याबाबत काल निर्देश दिल्यानंतर चंडीगड प्रशासनाने ही बंदी घातली आहे.
- ‘बर्निंग ब्रेन’ या सोसायटीने दाखल केलेली जनहित याचिका निकालात काढताना न्यायालयाने बंदीचे निर्देश दिले आहेत.
- हुक्का पार्लरमध्ये निकोटीनचा गैरवापर करण्यात येत असल्याच्या प्रकरणी न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी चंडीगड प्रशासनाला आढावा घेण्याचे निर्देश दिले होते.
- विषाचा कायदा १९१९ आणि विष (ताबा आणि विक्री) नियम २०१५ अन्वये ही बंदी घालण्यात आली आहे.
- द्रवरूपातील निकोटीनच्या वापराचा आढावा घेण्यासाठी न्यायालयाने चंडीगड प्रशासनाला कृती समिती स्थापन करण्याचे निर्देशही दिले आहेत.
ब्लॉगरवर हल्ला करणाऱ्या संघटनेला बांगलादेशात बंदी
- बांगलादेशमधील तीन ब्लॉगर्सवर हल्ला करून त्यांना ठार मारणाऱ्या अन्सरूल्ला बांगला टीम (एबीटी) या दहशतवादी संघटनेवर बांगलादेशात बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी सरकारकडे या संघटनेवर बंदी घालण्याची जोरदार मागणी केली होती.
- गेल्या काही महिन्यांतच तीन धर्मनिरपेक्ष ब्लागर्सची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या हत्यांनंतर नागरिकांनी आणि विविध संघटनांनी मोठी निदर्शने केली होती.
- पोलिसांनी केलेल्या तपासात या हत्यांमागे ‘एबीटी’ असल्याचे निदर्शनास आले होते.
भारत-व्हिएतनाम सामंजस्य करार
- संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि व्हिएतनामचे संरक्षणमंत्री फुंग क्वांग थान्ह यांच्यातील बैठकीनंतर भारत आणि व्हिएतनाम या दोन्ही देशांदरम्यान पुढील पाच वर्षांसाठीच्या संरक्षण क्षेत्रातील सहकार्याबद्दलच्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
- दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांनी संरक्षण क्षेत्रातील विविध मुद्द्यांवर या वेळी चर्चा केली. तसेच, दोन्ही देशांच्या तटरक्षक दलांमध्ये सहकार्य करण्याबाबतच्या सामंजस्य करारासही या वेळी मान्यता देण्यात आली. व्हिएतनामचे संरक्षणमंत्री सध्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.
तीन राज्यांमध्ये ‘रेड बॉक्स’ वॉर्निंग
- देशातील उष्णतेच्या लाटेची तीव्रता वाढल्याने याचा जबरदस्त फटका दक्षिण भारताला बसला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगण या दोन राज्यांमध्ये उष्माघातामुळे साडेसातशेपेक्षाही अधिक लोक मरण पावले आहेत.
- पुढील आठवडाभर ही उष्णतेची लाट कायम राहणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हवामान खात्याने ओडिशा, झारखंड, किनारी आंध्रसाठी ‘रेड बॉक्स’ वॉर्निंग जारी केली आहे.
- सर्वसाधारणपणे वातावरणातील उष्णता वाढल्याने जेव्हा उष्माघाताचा धोका बळावतो तेव्हा ‘रेड बॉक्स’ वॉर्निंग जारी करण्यात येते. आंध्र प्रदेशातील तापमानाने ४५ अंश सेल्सिअसची पातळी ओलांडल्याने ‘रेड बॉक्स’ वॉर्निंग जारी करण्यात आल्याचे समजते.
- आतापर्यंत उष्माघातामुळे आंध्र प्रदेशात ५५१ आणि तेलंगणमध्ये २१३ मृत्यू झाले आहेत. रामागुंडम शहरामध्ये ४४.८ अंश सेल्सिअस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली.
- ओडिशामध्येही उष्णतेची लाट आली असून भुवनेश्वरमध्ये ४५.४ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. राज्याची औद्योगिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंगूल शहरामध्ये ४७ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदविले गेले.
राजधानीत सार्वजनिक वाहनात जीपीएस अनिवार्य
- दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक वाहनांमध्ये जीपीएस अनिवार्य करण्याची घोषणा केली.
- याअंतर्गत सर्व वाहनांना योग्यतेचे प्रमाणपत्र मिळविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जीपीएस नसलेल्या वाहनांना हे प्रमाणपत्र दिले जाणार नाही.
- विशेषतः महिलांच्या सुरक्षेसाठी दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत १ जूननंतर ऑटो रिक्षा, टॅक्सीसहित कोणत्याही सार्वजनिक वाहनास जीपीएस डिव्हाइसशिवाय योग्यता प्रमाणपत्र दिले जाणार नाही.
- जीपीएस-संबंधित माहिती :
- जीपीएस (ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम) उपग्रह आधारित दिशादर्शक प्रणाली आहे. या माध्यमातून रिअल टाइम माहिती साध्य करता येते. ज्या वाहनात जीपीएस डिव्हाइस बसवलेले असेल त्या वाहनावर नियान्त्राल खोलीत बसून नजर ठेवणे शक्य होणार आहे.
२-जी प्रकरणी ‘पुस्तक बॉम्ब’
- “२-जी दूरसंचार परवाने देताना सहकार्य न केल्यास तुम्हाला महागात पडेल, अशी धमकी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपल्याला दिली होती,” असा गंभीर आरोप ‘ट्राय’ चे माजी अध्यक्ष प्रदीप बैजल यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.
- २-जी प्रकरणात मी अरुण शौरी व रतन टाटांना अडकवावे, अशी सीबीआयची इच्छा होती, असा दावाही त्यांनी केला.
- २-जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळा प्रकरणात बैजल हेही एक आरोपी आहेत. त्यांनी या घोटाळ्यावर प्रकाश टाकणारे एक पुस्तक स्वत:च प्रकाशित केले आहे. ‘द कम्प्लिट स्टोरी ऑफ इंडियन रिफॉर्म्स : २-जी, पॉवर अँड प्रायव्हेट एंटरप्राइझ - ए प्रॅक्टिशनर्स डायरी’ असे या पुस्तकाचे नाव आहे.
- बैजल म्हणतात, “संपुआचे दूरसंचारमंत्री राहिलेले दयानिधी मारन यांच्या कार्यकाळापासूनच २ जी घोटाळ्याची सुरुवात झाली होती. जर मी सहकार्य केले नाही तर माझे नुकसान होईल, अशी सीबीआयने मला प्रत्येक बाबतीत धमकी दिली.”
- माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि त्यांच्या सरकारच्या कार्यकाळातील कथित २-जी गैरव्यवहारावर प्रकाश टाकणारे गेल्या वर्षभरात प्रकाशित झालेले हे तिसरे पुस्तक आहे. याआधी मनमोहनसिंग यांचे सहकारी व मीडिया सल्लागार राहिलेले संजय बारू आणि माजी कोळसा सचिव पी. सी. पारेख या दोघांनीही आपल्या पुस्तकात मनमोहनसिंग यांच्यावर आरोप केले होते.
पाक क्रिकेट मंडळाकडून रझावर दोन वर्षांची बंदी
- उत्तेजक सेवन प्रकरणात दोषी आढळल्याने पाकिस्तान क्रिकेट मंडळाने फिरकी गोलंदाज हसन रझा याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. स्थानिक स्पर्धेदरम्यान जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या क्रिकेटपटूंच्या नमुन्यात तो दोषी आढळला.
- रझा पाकिस्तानकडून एकमेव एकदिवसीय, तर १० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे.
- या निर्णयामुळे रझा पाक मंडळाच्या वतीने आयोजित कुठल्याच क्रिकेट स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा