चालू घडामोडी - ३० एप्रिल २०१५
- केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी १०० स्मार्ट शहरे बनविण्याच्या प्रकल्पाला मंजुरी व ही योजना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने चालविण्याचा निर्णय सरकारने घेतला. महाराष्ट्रातील सहा शहरे स्मार्ट होणार आहेत.
- देशात १०० स्मार्ट शहरे बनविण्याच्या योजनेला गती देण्याचा निर्णय सरकारने घेतला. जुलै २०१४ मध्ये मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने या योजनेची घोषणा केली होती. या योजनेला वाजपेयी यांचे नाव देण्याचेही सरकारने निश्चित केले.
- भारतीय हवाई दलाच्या ‘सी-१३० जे’ सुपर हर्क्युलस या मालवाहू विमानाला आता अमेरिकेचे तांत्रिक बळ मिळणार असून, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने तब्बल ९६ दशलक्ष अमेरिकी डॉलरचे तांत्रिक साहित्य, सुटे भाग आदींच्या विक्रीला मान्यता दिली आहे. यामुळे भारताला मोठ्या मोहिमेसाठी या विमानाला सज्ज ठेवता येईल.
- भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये सुपर हर्क्युलस विमान अधिक प्रभावी ठरू शकते. आंतरराष्ट्रीय दळणवळण, देशांतर्गत वाहतूक, संकटाच्या काळामध्ये आपत्तिग्रस्त भागांना मदत पोचविणे आदी कामांसाठी हर्क्युलसचा अधिक प्रभावीपणे वापर करता येऊ शकतो.
- सध्या भारत सरकार नेपाळला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी आणि दुर्गम भागामध्ये अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी याच विमानाचा वापर करत आहे.
- भारताने या आधी सहा सुपर हर्क्युलस विमानांची खरेदी केली असून, यातील एक विमान मागील वर्षी मार्च महिन्यात अपघातग्रस्त झाले होते.
- कर्मचारी पेन्शन योजना (ईपीएस)
- कर्मचारी पेन्शन योजनेंतर्गत (ईपीएस) कामगारांना मिळणारे एक हजार रुपये निवृत्तिवेतन सुरू राहणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत ही योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला. यासाठी सरकारला ८५० कोटींची आर्थिक तरतूद करावी लागणार आहे.
- या योजनेची मुदत मार्च २०१५ ला संपुष्टात आल्याने त्यासाठीच्या आर्थिक तरतुदीला कात्री लावण्यात आली होती. यावरून सरकारवर टीकेचा भडिमार झाला होता.
- कंपनी विधेयक २०१४
- कंपनी विधेयक २०१४ मध्ये दुरुस्ती करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार आता कोणत्याही कंपनीला व्यवसाय सुरू करणे व कर्ज घेणे यासाठी अगोदर विशिष्ट करार व घोषणापत्र भरणे बंधनकारक राहणार नाही. याबाबतची अट नव्या विधेयकात काढून टाकण्यात आली आहे. विविध कंपन्यांना सवलतींसाठी प्रक्रियेला सुसंगत बनविण्यात येणार आहे.
- भ्रष्टाचाराबद्दल कडक शिक्षा
- ‘भ्रष्टाचार निर्मूलन कायद्यातील दुरुस्ती विधेयक २०१५’ला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यानुसार आता लाच देणारा व घेणारा या दोघांनाही कडक शिक्षेची तरतूद केली जाणार आहे.
- सरकारी कर्मचारी व निवृत्त कर्मचाऱ्यांवर खटला भरण्याआधी परवानगी घेणे बंधनकारक असेल. त्याचप्रमाणे भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत त्वरित गुन्हा दाखल करणे व अशा खटल्यांचा निपटारा दोन वर्षांच्या निर्धारित कालावधीत करणे हे उपायही नव्या विधेयकात आहेत.
- याच अधिवेशनात हे विधेयक संसदेत मंजुरीसाठी आणण्याचे सरकारने ठरविले आहे.
- सदोष गोलंदाजी शैलीबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) क्लीन चीट दिल्यानंतरही वेस्ट इंडीजचा ऑफ स्पिनर सुनील नारायणला त्याच कारणावरून नव्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.
- हैदराबादविरुद्ध २२ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात पुन्हा एकदा पंचांनी त्याच्या गोलंदाजी शैलीविषयी आक्षेप घेतला. त्यानंतर पुन्हा एकदा नारायण याने चेन्नईत बायोमेकॅनिकल चाचणी दिली होती. त्या सामन्यातील त्याच्या गोलंदाजीचे चित्रण आणि बायोमेकॅनिकल चाचणीचा अहवाल तपासून बीसीसीआयने त्याच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
- बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, नारायण आयपीएलसह बीसीसीआय आयोजित कुठल्याही स्पर्धेत ऑफ स्पिन गोलंदाजी करू शकणार नाही.
- नारायणला जर त्यांच्या फ्रॅंचाईजीने खेळविण्याचा निर्णय घेतला, तर तो केवळ ‘नकल’ आणि ‘क्विकर स्ट्रेट’ असे दोन प्रकारचेच चेंडू टाकू शकतो. त्याने ऑफ स्पिन गोलंदाजी केल्यास मैदानावरील पंचांना नियम २४.२ नुसार त्याचा असा प्रत्येक चेंडू नो-बॉल ठरविण्याचा अधिकार असेल. त्यानंतर पंच त्याच्या गोलंदाजीविषयी नव्याने अहवाल सादर करतील.
- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार सुनील तटकरे याची फेरनिवड करण्यात आली. सलग दुसऱ्यांदा ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बनले.
- आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला विविध वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या रशियाच्या मानवरहित अवकाशयानाचा ताबा सुटल्याची माहिती नुकतीच देण्यात आली. हे अवकाशयान ताबा सुटल्यामुळे वेगाने पृथ्वीकडे झेपावत आहे.
- प्रोग्रॅस एम-२७ एम हे अवकाशयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेपावले होते; परंतु उड्डाणानंतर त्याच्याशी असलेला संपर्क तुटला. अवकाशयानाशी संपर्क साधण्यासाठी रशिया प्रयत्न करीत असली तरी त्याचा ताबाच सुटल्यामुळे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत आहेत.
- हे अवकाशयान वेगाने पृथ्वीकडे झेपावत असून, ते कोठे पडेल याबाबत काहीही अंदाज व्यक्त करणे शक्य नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
- आठवडाभरापेक्षा जास्त काळ हे अवकाशयान तेथील कक्षेत फिरत राहून ते पृथ्वीवर पडून नष्ट होईल, अशी माहिती या मोहिमेच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
- कोळसा खाण गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) उद्योजक नवीन जिंदाल यांच्यासह चौदाजणांविरोधात आरोपपत्र सादर केले. यामध्ये झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा, माजी कोळसा राज्यमंत्री दसारी नारायण राव आणि माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता यांच्या नावांचाही समावेश आहे. या सर्व आरोपींविरोधात गुन्हेगारी कारस्थान, फसवणूक असे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.
- साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी सरकारने साखरेचे आयातशुल्क २५ टक्क्यांवरून ४० टक्के केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
- या वाढीव शुल्कामुळे साखरेची आयात कमी होईल आणि देशांतर्गत साखरेला उठाव येईल असा सरकारचा विश्वास आहे. याशिवाय कापसाच्या किमान आधारभूत किमतीवर नियंत्रणासाठीचे अधिकार महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपण महासंघाला देण्यात आले असून, अवकाळी पाऊस, गारपीटग्रस्त राज्यांमधील गव्हाच्या खरेदीसाठी दरकपातही थांबविण्यात आली आहे.
- विनाशकारी भूकंपात उद्ध्वस्त झालेला नेपाळ चोहोबाजूंनी संकटात सापडला आहे. नेपाळमध्ये अन्न, पाणी, वीज आणि औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. पंतप्रधान सुशील कोईराला यांनाही एका शिबिरात लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
- मदतीवरून स्थानिक आणि परदेशी नागरिकांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. चार दिवसांनंतरही दुर्गम भागात मदत पोचू शकलेली नाही. त्यातच भूकंपामध्ये जमीनदोस्त झालेल्या इमारती आणि घरांचे ढिगारे पूर्णपणे उपसले गेले नसल्याने रोगराईचेही संकट निर्माण झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा