चालू घडामोडी - १२ मे २०१५


  • ११ मे : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
  • १२ मे : जागतिक परिचारिका दिन

मोदी प्रत्येकाला ‘पॅन कार्ड’ देणार
  • एक लाख रुपयांहून अधिकच्या रकमेची खरेदी किंवा विक्री करण्यासाठी "पॅन‘ देणे बंधनकारक केले जाणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पामध्ये केली होती.
  • जन धन योजना यशस्वी केल्यानंतर आता केंद्र सरकारने सर्वांसाठी पर्मनन्ट अकाउंट नंबर (पॅन कार्ड) देण्यासाठी मोहीम हाती घेण्याची घोषणा केली आहे.
  • जनधन योजनेप्रमाणे सर्वांना पॅन कार्ड देण्यासाठी सरकारतर्फे आता ऑनलाइन सुविधा सुरू केली जाणार आहे. ऑनलाइन सुविधेमुळे अर्जदाराला ४८ तासांच्या आत पॅन कार्ड मिळणार आहे. याशिवाय, केंद्र सरकारतर्फे पॅन कार्ड देण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
  • देशातील सुमारे २१ कोटी व्यक्तींकडे पॅन कार्ड आहे. त्यात कार्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या ७.५ लाख व्यक्तींचा समावेश आहे.

पोखरण अणुचाचणीस १७ वर्षे पूर्ण
  • राजस्थानमधील पोखरण येथे झालेल्या अणुचाचणीस १७ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींसह सर्व शास्त्रज्ञांचे कौतुक केले.
  • ट्विटरवरून मोदींनी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’ असा नारा दिला.

जयललिता यांची निर्दोष मुक्तता
  • कर्नाटक उच्च न्यायालयाने अण्णा द्रमुक पक्षाच्या सर्वेसर्वा जे. जयललिता यांना बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्या प्रकरणात निर्दोष ठरविल्याने त्या लवकरच पुन्हा मुख्यमंत्रिपदावर आरूढ होण्याची शक्यता आहे.
  • जयललिता यांच्यावर १८ वर्षांपूर्वीच्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी बंगळूर येथील विशेष न्यायालयाने त्यांना आणि शशिकला, सुधाकरन आणि इलावरसी या त्यांच्या तीन सहकाऱ्यांना चार वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. गेले सात महिने सक्रिय राजकारणापासूनही दूर होत त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
  • प्रदीर्घ न्यायालयीन लढतीमध्ये जयललितांना मिळालेला हा दुसरा मोठा विजय आहे. २००१ मध्ये मद्रास उच्च न्यायालयाने त्यांना एका प्रकरणात मुक्त केले होते.
  • न्यायालयाच्या निर्णयाला द्रमुक पक्ष आणि मूळ तक्रारदार सुब्रमण्यम स्वामी हे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे.
  • न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्याने उमेदवार म्हणून जयललितांची अपात्रता रद्द झाली आहे, तरीही त्यांना विधानसभेचे सदस्य होण्यासाठी पुन्हा निवडणूक लढावी लागणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यास त्यानंतर सहा महिन्यांच्या आत जयललिता यांना निवडणूक लढवून विधानसभेचे सदस्यत्व मिळविणे भाग असल्याचे आयोगाने सांगितले आहे.
  • आधीच्या निर्णयानुसार त्यांना अपात्र ठरवत सदस्यत्वच रद्द झाले होते. आता त्या अपात्र नसल्या तरी ती जागा पुन्हा त्यांना आयतीच मिळणार नसल्याचे आयोगाने सांगितले.

२००० शक्तिशाली कंपन्यांच्या यादीत भारतामधील ५६ कंपन्या
  • फोर्ब्ज नियतकालिकाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या शक्तिशाली कंपन्यांच्या ‘ग्लोबल २०००’ या यादीनुसार जगभरातील सर्वात मोठ्या दोन हजार कंपन्यांपैकी भारतामध्ये तब्बल ५६ कंपन्या कार्यरत आहेत.
  • शक्तिशाली कंपन्या कार्यरत असणाऱ्या देशांमध्ये अमेरिकेने बाजी मारली आहे. जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी अमेरिकेत ५७९ कंपन्या कार्यरत आहेत.
  • भारतात कार्यरत असलेल्या ५६ मोठ्या व शक्तिशाली कंपन्यांमध्ये मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजचा प्रथम क्रमांक आला आहे. जागतिक क्रमवारीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा क्रमांक १४२वा आला आहे.
  • याशिवाय भारतीय स्टेट बॅंक (१५२), ऑईल अँड नॅचरल गॅस (१८३), टाटा मोटर्स (२६३), आयसीआयसीआय बॅंक (२८३), इंडियन ऑईल (३४९), एचडीएफसी बॅंक (३७६) इत्यादी मोठ्या कंपन्यांचा या यादीत समावेश आहे.

नेपाळला पुन्हा भूकंपाचा धक्का
    Earthquake in Nepal
  • २५ एप्रिल रोजी झालेल्या प्रलयंकारी भूकंपामधून सावरत असतानाच नेपाळला १२ मे रोजी पुन्हा एकदा शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता तब्बल ७.४ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपामुळे चार जण ठार झाले.
  • नेपाळबरोबरच राजधानी दिल्ली, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांसहित संपूर्ण उत्तर भारतासही या भूकंपाचा धक्का जाणवला. नागपूरच्या काही भागांमध्येही या भूकंपाचा धक्का जाणवला.
  • नेपाळमधील कोडारी येथे भूगर्भामध्ये १९ किमी अंतरावर या भूकंपाचे केंद्रस्थान होते. एव्हरेस्ट शिखराच्या बेसकॅंपपासून जवळच असलेले हे ठिकाण काठमांडूच्या पूर्वेस सुमारे ५२ किमी अंतरावर आहे. येथून चीनची सीमारेषाही जवळच आहे.
  • दिल्लीबरोबरच बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका येथेही या भूकंपाचा धक्का जाणवला.

पिकासो यांच्या चित्राला विक्रमी १७ कोटी डॉलर
  • जगप्रसिद्ध प्रतिभाशाली चित्रकार पाब्लो पिकासो यांच्या एका कलाकृतीची न्यूयॉर्क येथील लिलावामध्ये नुकतीच १७.९४ कोटी डॉलर किमतीला विक्री झाली.
  • या किमतीमुळे नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. ‘विमेन ऑफ अल्जियर्स’ या नावाची ही चित्रनिर्मिती आहे. पिकासो यांनी १९५४-५५ मध्ये निर्माण केलेल्या १५ चित्रांच्या मालिकेमधील हे एक चित्र आहे.
  • याच लिलावामध्ये अल्बर्टो जियाकोमेत्ती या ख्यातनाम स्वीस शिल्पकाराचे ‘पॉइंटिंग मॅन’ हे शिल्प विक्रमी किमतीत (१४.१२ कोटी डॉलर) विकले गेले. या दोन्ही कलाकृती विकत घेणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.
  • या लिलावासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे नाव ‘लूकिंग फॉरवर्ड टू द पास्ट’ असे होते. या लिलावामध्ये विसाव्या शतकामधील ३६ कलाकृतींपैकी ३५ कलाकृतींचा लिलाव करण्यात आला. या एकूण लिलावाची किंमत ७०.६ कोटी डॉलर इतकी झाली.

‘नमस्ते रशिया’ उत्सवाचे प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते उद्घाटन
  • रशियात भारतीय कला, चित्रपट आणि संस्कृतीचे दर्शन घडवून आणणाऱ्या ‘नमस्ते रशिया’ उत्सवाचे उद्घाटन मॉस्को दौऱ्यावर असलेले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आले.
  • पुढील सहा महिन्यांत हा उत्सव रशियातील विविध प्रांतांपर्यंत पोहोचून भारतीय संस्कृती व कलेचा प्रचार करणार आहे.

तुर्की जहाजावर लीबियाचा हल्ला
  • लीबियाच्या टोब्रुक बंदरात आलेल्या तुर्की जहाजावर लीबियाच्या सागरी संरक्षक दलाने हल्ला केला. यामध्ये जहाजावरील एक अधिकारी मारला गेला असून कर्मचारी दलातील काही जण जखमी झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा