चालू घडामोडी - १० मे २०१५
- स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) 'नॅशनल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)’च्या सहयोगाने रूपे प्लॅटीनम डेबिट कार्ड सुरु केले आहे. रूपेच्या धर्तीवर प्लॅटीनम डेबिट कार्ड सुरु करणारी SBI देशातील पहिलीच बँक आहे.
- या सुविधेंतर्गत लोकांना ‘ई-वॉलेट’ दिले जाणार आहे. याचा वापर खरेदी, ऑनलाइन खरेदी, ऑनलाइन बिल पेमेंट व टॅक्सी चे भाडे यांसारख्या सुविधा देण्यासाठी करता येणार आहे.
- भारतीय स्टेट बँक (एसबीआय) चेअरमन : अरूंधती भट्टाचार्य
- नॅशनल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडिया मुख्य कार्यकारी अधिकारी : ए. पी. होता
- नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ मे रोजी भेट दिली. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील एका गावावर हल्ला करत तेथील सुमारे २५० नागरिकांचे अपहरण केले.
- मोदी दौऱ्याच्या निषेधार्थ नक्षलवाद्यांनी दोन दिवसांचा ‘दंडकारण्य बंद’ जाहीर केला आहे. यामुळे प्रशासनानेही सुरक्षेचा उपाय म्हणून येथील रेल्वेमार्गावरून वाहतूक न करण्याचा निर्णय घेतला आहे. या ‘बंद’मुळे बस्तर भागातील सामान्य जनजीवन विस्कळित झाले आहे.
- विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी बंदुका फेकून देऊन शांतता निर्माण होऊ द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नक्षलवाद्यांना केले आहे.
- गेल्या तीन दशकांत नक्षलग्रस्त दंतेवाडाला भेट देणारे ते पहिलेच पंतप्रधान आहेत. या दौऱ्यात मोदींनी बस्तर जिल्ह्यात पोलाद प्रकल्प आणि नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले.
- रिसर्च अँड अॅनॅलिसिस विंग (रॉ) या भारतीय गुप्तचर संस्थेच्या नागरी विमानन व संशोधन केंद्राचे प्रभारी अरविंद सक्सेना यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली.
- ३२ वर्षे जुन्या संशोधन आणि विश्लेषण सेवेतून या आयोगावर नेमले जाणारे ते पहिलेच अधिकारी ठरले आहेत.
- ऑगस्टमध्ये निवृत्त होणार असलेल्या सक्सेना यांची यूपीएससीवर निवड झाल्यामुळे या आयोगावर फक्त एका सदस्याची जागा रिक्त आहे. आयोगाचे अध्यक्षांव्यतिरिक्त १० सदस्य आहेत.
- सक्सेना यांनी लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांचा कार्यकाळ सुरू होईल.
- २५ व २६ एप्रिल रोजी नेपाळसह भारतातील अनेक राज्यांना भूकंपाचे धक्के बसले होते. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे लखनौ जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूंवर नेमके काय परिणाम झाले, याचा अभ्यास करून त्याबाबत उपाय सुचविण्याची विनंती प्रशासनाकडून आयआयटी-कानपूरला करण्यात आली आहे.
- या पार्श्वभूमीवर आयआयटी-कानपूरला ऐतिहासिक वस्तूंचा अभ्यास करण्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे एक पथक पाठविण्याची विनंती करण्यात आली आहे.
- बराक ओबामा यांनी ‘एशियन अमेरिकन्स अँड पॅसिफिक आईलँडर्स’च्या सल्लागारी मंडळावर आयआयटीची माजी विद्यार्थिनी संजीता प्रधानला नामांकित केले.
- संजीता प्रधान नेपाळी-अमेरिकन आहे व त्यांच्याकडे आयआयटीची MBA ची पदवी आहे.
- ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय वंशाच्या १० जणांनी विजय मिळवला असून, भारतीय वंशाच्या संसदसदस्यांची आजवरची हा सर्वाधिक संख्या आहे.
- या निवडणुकीत कन्झर्वेटिव्ह पार्टीने सणसणीत विजय मिळवला असून, हा पक्ष, तसेच विरोधी लेबर पार्टी या दोन्ही पक्षांमधून भारतीय वंशाचे सदस्य हाऊस ऑफ कॉमन्सवर निवडून आले आहेत.
- हाऊस ऑफ कॉमन्सवर निवडून आलेले भारतीय
- कन्झर्वेटिव्ह पार्टी : प्रिती पटेल | अलोक शर्मा | शैलेश वारा | सुएला फर्नांडिस
- 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक हे टोरी येथून विजयी झाले आहेत.
- लेबर पक्ष : केथ वाझ | वीरेंद्र शर्मा | वेलरी वाझ | सीमा मल्होत्रा
- तरुणीचा विक्रम
- ब्रिटनमधील स्कॉटिश नॅशनल पार्टीच्या २० वर्षीय माहिरी ब्लॅक या विद्यार्थिनीने लेबर पक्षाचे प्रचारप्रमुख आणि परराष्ट्र धोरणविषयक प्रवक्ते डग्लस अलेक्झांडर यांना ६ हजार मतांच्या फरकाने पराभूत विक्रमी विजय मिळवला आहे.
- १६६७ मध्ये १३ वर्षीय ख्रिस्तोफर मोंकटन याच्या विजयानंतर कमी वयात निवडून आलेली ती पहिली उमेदवार आहे.
- सागरी सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेले आयएनएस सरदार पटेल हे नाविक तळ गुजरातच्या पोरबंदर येथे कार्यान्वित झाले.
- गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते या नाविक तळाचे राष्ट्रार्पण करण्यात आले.
- ओखाजवळील आयएनएस द्वारकानंतर पोरबंदर येथील आयएनएस सरदार पटेल हे गुजरातमधील दुसरे महत्त्वाचे नाविक तळ ठरले आहे.
- गुजरात हे सागरी राज्य असून, या राज्यातील समुद्राची किनारपट्टी १६०० किलोमीटर इतकी लांब आहे. राज्यात खाजगी आणि सरकारी अशी मिळून ४३ बंदरे असून, देशातील सागरी व्यवसायात या बंदरांचे योगदान ५० टक्के आहे.
- नोदलप्रमुख : ऍडमिरल अनिल धोवन
- पाकिस्तान पीपल्स पार्टीमधील कार्यकर्त्यांनी सफदार अब्बासी यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान पक्षाध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनाच आव्हान पाकिस्तान पीपल्स पार्टी-वर्कर्स (पीपीपी-डब्लू) या नव्या पक्षाची घोषणा केली आहे.
- दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ला मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते.
- समुद्राच्या आतून मारा करण्याची क्षमता असलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची उत्तर कोरियाने यशस्वी चाचणी घेतली.
- या क्षेपणास्त्राला उत्तर कोरियन सरकारने जागतिक युद्ध नीतीविषयक शस्त्र असे नाव दिले आहे. उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग यांनी या क्षेपणास्त्राच्या परीक्षणाचे आदेश दिले होते. क्षेपणास्त्राचे परीक्षण एका पाणबुडीतून करण्यात आले आहे.
- ‘जागतिक आरोग्य संघटना’ (WHO)ने लायबेरियाला इबोलामुक्त जाहीर केले आहे.
- लायबेरियामध्ये इबोला या संसर्गजन्य रोगामुळे ४,७१६ लोक मृत्युमुखी पडले.
- देश इबोलामुक्त होण्यासाठी निकष
- एखाद्या देशात सलग २१ दिवस (इबोला विषाणूच्या पोषणकाळाच्या दुप्पट दिवस) एकही नवीन रुग्ण न आढळल्यास जागतिक आरोग्य संघटना त्या देशाला इबोलामुक्त घोषित करू शकते.
- लायबेरियामध्ये मागील ४२ दिवसात एकही इबोलाचा रुग्ण आढळला नव्हता. लायबेरीयात इबोलामुळे २७ मार्च २०१५ रोजी शेवटचा मृत्यू झाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा