मुंबईचे नवनिर्वाचित पोलिस आयुक्त दत्तात्रेय पडसळगीकर
- मुंबईचे नवनिर्वाचित पोलिस आयुक्त दत्तात्रेय पडसळगीकर यांनी ३१ जानेवारीपासून आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.
- १९८२च्या आयपीएस तुकडीतील कर्तव्यदक्ष आणि कडक शिस्तीचे अधिकारी असलेले पडसळगीकर ‘मिस्टर क्लीन’ या नावानेही ओळखले जातात.
- केंद्रीय गुप्तचर विभागात १७ वर्षांपेक्षा जास्त काळ काम केलेले पडसळगीकर माजी पोलिस आयुक्त अहमद जावेद यांची जागा घेतील.
- नव्वदच्या दशकात मुंबई पोलिस दलात उपायुक्त म्हणून काम केलेले पडसळगीकर नंतरच्या काळात गुप्तचर विभागात उपसंचालक पदावर रुजू झाले. पुढे ते गुप्तचर विभागात सहसंचालक पदावर पोहचले.
- त्यानंतर तीन वर्षे ते वॉशिंग्टन येथे प्रतिनियुक्तीवर होते. याच काळात अनिवासी भारतीयांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी झालेल्या प्रयत्नांत त्यांचा मोलाचा वाटा आहे.
- त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना राष्ट्रपती पोलिस पदक (१९९८), राष्ट्रपतींचे शौर्यपदक (२००६) देऊन गौरविण्यात आले आहे.
जोकोविच अजिंक्य
- जागतिक रँकिंगमध्ये क्रमांक एकचा खेळाडू असलेल्या जोकोविचने फायनलमध्ये ब्रिटनच्या दुसऱ्या सीडेड विजय मिळवून सहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा जिंकली.
- नोवाक जोकोविचने अँडी मरेचा ६-१, ७-५, ७-६ अशा सरळ सेटमध्ये पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले. जोकोविचने यापूर्वी २००८, २०११, २०१२, २०१३ आणि २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला आहे.
- जोकोविचचे हे ११ वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद आहे. त्यात सहा ऑस्ट्रेलियन ओपन, तीन विम्बल्डन आणि दोन यूएस ओपन विजेतेपदांचा समावेश आहे.
- जोकोविचने या जेतेपदासह ऑस्ट्रेलियन रॉय इर्मसन यांच्या सहा ऑस्ट्रेलियन जेतेपदांशी बरोबरी केली. हा विक्रम गेली ४९ वर्षे कुणीच मोडलेला नाही.
- जोकोविचने ११वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावताना स्वीडनचा महान टेनिसपटू ब्योन बोर्ग आणि ऑस्ट्रेलियाच्या रोड लेव्हरच्या विक्रमाची बरोबरी केली.
ऑस्ट्रेलियन ओपनचे मानकरी | |
---|---|
पुरुष एकेरी | नोव्हाक जोकोविच |
महिला एकेरी | अँजलिक कर्बर |
पुरुष दुहेरी | जॅमी मरे-ब्रुनो सॉरेस |
महिला दुहेरी | मार्टिना हिंगिस-सानिया मिर्झा |
मिश्र दुहेरी | एलिना व्हेसनिना-ब्रुनो सॉरेस |
भारताची ऐतिहासिक कामगिरी
- भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा टी-२० सामनाही जिंकून प्रथमच त्यांना त्यांच्याच मायभूमीत ‘व्हाइटवॉश’ देण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.
- ही टी-२० मालिका भारताने ३-० अशी जिंकली. विराट कोहली या मालिकेचा मालिकावीर ठरला.
- या टी-२० मालिकेतील निर्विवाद वर्चस्वाबरोबर भारताने टी-२० आयसीसी क्रमवारीतही १२० गुणांसह अव्वलस्थान पटकावले.
- जागतिक क्रिकेटला सुरवात झाल्यापासून ऑस्ट्रेलियाला आपल्या मायभूमीत कधीही ‘व्हाइटवॉश’ला सामोरे जावे लागले नव्हते. पण, महेंद्रसिंह धोनीच्या भारतीय संघाने हा १४० वर्षांचा इतिहास बदलला.
२०१६-१७ हे वर्ष व्हिजिट महाराष्ट्र
- महाराष्ट्र शासनाने २०१६-१७ हे वर्ष ‘व्हिजिट महाराष्ट्र’ म्हणून घोषित केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची नवी दिल्ली येथे घोषणा केली.
- आणि पर्यटनाला प्रोत्साहन देणे व त्यातून रोजगारनिर्मितीसाठी मोठा वाव असलेल्या पर्यटन व्यवसाय व उद्योगाला गतिमान करणे हा हेतू त्यामागे आहे.
‘मन की बात’ लवकरच मोबाइलवर
- देशातील कोट्यवधी जनतेसाठी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर सुरू केलेला ‘मन की बात’ हा कार्यक्रम यापुढे मोबाइलवरही ऐकता येणार आहे. ८१९०८८१९०८ या क्रमांकावर मिस्ड कॉल देताच मोदींची ‘मन की बात’ मोबाइलवरही ऐकता येईल.
- पंतप्रधान मोदी यांनी ३१ डिसेंबर रोजी १६व्या ‘मन की बात’मधून देशवासीयांशी संवाद साधला. स्टार्ट-अप, पीक विमा योजना, सौर ऊर्जेशी संबंधित विविध योजनांविषयी मोदी यांनी यावेळी माहिती दिली.
- तसेच त्यांनी ‘मन की बात’ मोबाइलवर येणार असल्याची माहिती दिली. सध्या हा कार्यक्रम हिंदीत असला तरी लवकरच प्रादेशिक भाषांमध्येही त्याचे प्रसारण केले जाईल.
सीरियात आत्मघाती बॉम्बस्फोट
- सीरियातील दमास्कस प्रांतातल्या सय्यदा जैनब या शिया मुस्लिमांच्या मशिदीत दोन दहशतवाद्यांनी आत्मघाती बॉम्बस्फोट केले. या हल्ल्यात ४५ जण ठार आणि ११० नागरिक जखमी झाले आहेत.
- सीरिया सरकार आणि विरोधक यांच्यात यूएनच्या मध्यस्थीने चर्चा सुरू होण्याआधीच ही घटना घडली. याआधी २०१५ च्या फेब्रुवारीतही या मशिदीवर हल्ला झाला होता.
- लागोपाठ झालेल्या या हल्ल्यांमुळे शिया मुस्लिमांसाठी अतिशय पवित्र असलेल्या मशिदीच्या इमारतीचे प्रचंड नुकसान झाले.
- मोहम्मद पैगंबराच्या नातीची कबर असल्यामुळे शिया मुस्लिमांसाठी या मशिदीचे महत्त्व खूप जास्त होते. सीरिया सरकारने मशिदीच्या संरक्षणासाठी विशेष व्यवस्था केली होती. या व्यवस्थेमुळेच शियापंथीय दहशतवादी संघटना आणि इराण सरकारचा बशर-अल-असद यांच्या सरकारला पाठिंबा मिळत आहे.
- सीरियाचे अध्यक्ष : बशर-अल-असद