पंतप्रधानाच्या हस्ते स्टॅच्यू ऑफ युनिटीचे लोकार्पण
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३१ ऑक्टोबर रोजी भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे लोकार्पण केले.
- ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची १४३वी जयंती साजरी केली जात आहे.
- या लोकार्पण सोहोळ्याआधी गंगा, यमुना आणि नर्मदेसहीत देशातील ३० नद्यांच्या पवित्र जलाने सरदार पटेल यांच्या या भव्य पुतळ्याला ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारात जलाभिषेक करण्यात आला.
- १ नोव्हेंबरपासून पर्यटकांना हा पुतळा पाहाता येणार आहे. हा पुतळा गुजरातमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी एक खास आकर्षण ठरणार आहे.
स्टॅच्यू ऑफ युनिटीची वैशिष्ट्ये
- सरदार पटेल यांच्या या भव्य पुतळ्याची उंची १८२ मीटर (५९७ फुट) आहे. तर या पुतळ्याचे वजन १७०० टन आहे.
- हे शिल्प जगातील सर्वात उंच शिल्प आहे. या पुतळ्याच्या पायांची उंची ८० फूट, हाताची उंची ७० फूट आहे.
- नर्मदा नदी पात्रात उभारण्यात आलेल्या या पुतळ्याची निर्मिती लार्सन आणि टुब्रो कंपनीने केली आहे.
- स्टॅच्यू ऑफ युनिटीची निर्मिती शिल्पकार राम सुतार यांनी केली आहे. राम सुतार हे त्यांच्या खास शैलीच्या पुतळ्यांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे अनेक पुतळे जगातील विविध देशांमध्ये आहेत.
- चीन मधील स्प्रिंग टेम्पलमध्ये असलेल्या गौतम बुद्धाच्या पुतळ्याची उंची १५३ मीटर आहे. हा पुतळा आत्तापर्यंत जगातला उंच पुतळा मानला जायचा, मात्र ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ने त्याचा पुतळ्याचाही रेकॉर्ड मोडला आहे.
- ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ची निर्मिती ३३ महिन्यात करण्यात आली आहे. या पुतळ्याच्या निर्मितीत ३ हजार ५०० पेक्षा जास्त लोकांचा सहभाग होता.
- सरदार पटेल यांचे हे शिल्प साकारण्यासाठी सुमारे २ हजार ९८९ कोटी रुपये खर्च आला आहे.
- या भव्य पुतळय़ाखाली एका सफेद रंगाच्या पाटीवर देशी-विदेशी भाषांमध्ये ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ लिहिले आहे. यात वेगवेगळय़ा हिंदुस्थानी भाषासुद्धा आहेत. परंतु यात मराठीचा समावेश नाही.
- या पुतळ्याचे काम ३१ ऑक्टोबर २०१३मध्ये सरदार पटेल यांच्या १३८व्या जयंती दिनी सुरु करण्यात आले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते.
सरदार वल्लभभाई पटेल
- सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी तर मृत्यू १५ डिसेंबर १९५० रोजी झाला. ते भारतीय राजकीय व सामाजिक नेते होते. त्यांना भारताचे बिस्मार्क म्हणूनही ओळखले जाते.
- त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले.
- वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे ते पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले.
- या रूपात त्यांनी पाकिस्तातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले.
- फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतिस्थापनेकरिताही त्यांनी कार्य केले. भारतातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलिनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय.
- मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरूष म्हणून ओळखले जातात.
- तसेच, ते आधुनिक अखिल भारतीय सेवा स्थापन करण्यासाठी भारताच्या नागरी सेवकांचे प्रेरणा दूत (Patron Saint) म्हणून देखील ओळखले जातात.
- त्यांच्या या महान कार्याचा गौरव म्हणूनच स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यात आला आहे. तसेच १९९१साली त्यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आला.
- २०१४पासून सरदार पटेल यांचा जन्मदिन देशभरात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो.
३१ ऑक्टोबर: राष्ट्रीय एकता दिवस
- देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन ३१ ऑक्टोबर हा दिवस देशभरात ‘राष्ट्रीय एकता दिवस’ (National Unity Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन केले जाते.
- भारतीय स्वातंत्र्य आणि भारताची राष्ट्रीय एकात्मता सुनिश्चित करण्याच्या दिशेने सरदार पटेल यांच्या योगदानाबद्दल जागृती निर्माण करणे, या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
- स्वातंत्र्यानंतर भारतातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलिनीकरण करवून घेण्यात सरदार पटेल यांनी महत्वाची भूमिका पार पडली होती.
- याशिवाय हैद्राबाद संस्थानाला भारतात विलीन करून घेण्यातही त्यांची भूमिका फार महत्वाची होती.
- त्यांना भारताचे लोहपुरूष आणि भारताचे बिस्मार्क म्हणूनही ओळखले जाते. ते देशाचे ते पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान आहेत.
- दरवर्षी ३१ ऑक्टोबर हा दिवस सरदार पटेल यांच्या विचारांच्या व कार्याच्या स्मरणार्थ ‘राष्ट्रीय एकता किंवा एकात्मता दिवस’ साजरा करण्याचा निर्णय सरकारने २०१४साली घेतला.
पंकज अडवाणीला आशियाई स्नूकर टूर स्पर्धेचे विजेतेपद
- भारताचा स्नूकरपटू पंकज अडवाणी याने चीन येथे सुरु असलेल्या आशियाई स्नूकर टूर स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पंकज अडवाणीने प्रतिस्पर्धी चीनचा जु रेती याला ६-१ असे पराभूत केले.
- आशियाई स्नूकर टूर स्पर्धेचे हे भारतासाठीचे पहिले विजेतेपद ठरले. पंकज अडवाणी हि स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला.
रूपम शर्मा याला स्टार्ट अप पुरस्कार
- २३ वर्षीय भारतीय तरुण रूपम शर्मा याला बर्लिनमध्ये जागतिक आरोग्य शिखर बैठकीचा २०१८मधील स्टार्ट अप पुरस्कार मिळाला.
- बुद्धिमत्तेच्या जोरावर समाजात बदल घडवून आणणारे तंत्रज्ञान त्याने विकसित केल्याबद्दल त्याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- गेल्या ३ वर्षांत त्याने विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवकल्पना वापरून जी निर्मिती केली, त्यामुळे त्याची तुलना स्टीव्ह जॉब्ज व एलोन मस्क यांच्यासारख्या दिग्गज वैज्ञानिक-तंत्रज्ञांशी होत आहे.
- अलीकडेच दृष्टिहीनांसाठी मॅनोव्ह्यू ही प्रणाली त्याने विकसित केली असून त्यामुळे आता छापील मजकूर वाचण्यासाठी ब्रेल लिपीची गरज उरणार नाही.
- रूपमने दृष्टी बुद्धिमत्तेचा वापर करून वेगळ्या पद्धतीने अंधांना वाचनाची सुविधा निर्माण करून दिली आहे.
- याच प्रणालीला २०१५मध्ये मायक्रोसॉफ्ट इमॅजिन करंडक व नंतर याहू असेंशुअर इनोव्हेशन जॉकीज पुरस्कार मिळाला होता.
- हरयाणातील फरिदाबाद येथे शिकलेल्या रूपमने तेथील मानव रचना विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे.
- रूपमला रंगांध व्यक्तींसाठी सुरुवातीला गेम तयार करायचा होता. त्यासाठी त्याने संशोधन सुरू केले.
- ब्रेल लिपीनंतर अंधांच्या साक्षरतेसाठी फारसे काम झालेले नाही, हे त्याच्या लक्षात आले. त्यातून त्याने ‘मानवरचना इनक्युबेशन अँड इनोव्हेशन सेंटर’च्या मदतीने अंधांच्या समस्यांवर उत्तरे शोधण्यासाठी प्रकल्प हाती घेतला.
- त्यातून मॅनोव्ह्यू हे उपकरण तयार झाले. हे उपकरण हातमोज्यांसारखे हातात घालता येते. त्यात कॅमेरा असून तो सर्व मजकूर वाचतो व त्याचे आवाजात रूपांतर करतो.
- जर वाटेत अडथळे असतील, तर कंपनांच्या माध्यमातून हे उपकरण इशारा देते. शिवाय, यामुळे दृष्टिहीनही मोबाइल-संदेश पाठवू शकतात.
- त्याने आरोग्य क्षेत्रासाठी ‘फिजिओ’ हे उपकरण तयार केले असून, त्यातून आरोग्य उद्योगाला विशेषतः फिजिओथेरेपिस्टला फायदा होणार आहे. मायक्रोसॉफ्टचा किनेक्ट संवेदक यात वापरला आहे.
- एमआयटी टेक रुव्ह्यूने त्याचा २०१६मध्ये गौरव केला असून त्याला भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय युवा पुरस्कारही मिळाला होता.
एचडीएफसी बँकेच्या सीईओपदी आदित्य पुरी यांची फेरनियुक्ती
- देशातील आघाडीच्या खाजगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आदित्य पुरी यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे.
- याबाबत बँकेने २२ ऑक्टोबरला मागितलेल्या परवानगीला रिझव्र्ह बँकेने मान्यता दिली आहे.
- १ नोव्हेंबर २०१८पासून ही नियुक्ती पुढील २ वर्षांसाठी असेल. पुरी यांच्या ५ वर्षे नियुक्तीला बँकेच्या भागधारकांनी २०१५मध्ये मंजुरी दिली होती.
- मुख्याधिकारीपदाबरोबरच व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार पुरी यांच्याकडे २६ ऑक्टोबर २०२०पर्यंत असेल.
- बँक अस्तित्वात आल्यापासून पुरी हे एचडीएफसी समूहाबरोबर आहेत. कोणत्याही खाजगी बँकेच्या प्रमुखपदावर सर्वाधिक काळ राहिलेले ते अधिकारी ठरले आहेत.
इज ऑफ डुइंग बिझनेसमध्ये भारताने ७७व्या स्थानी
- ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ म्हणजेच व्यवसाय करण्यासाठी अनुकूल वातावरण असलेल्या देशांच्या यादीत भारताने ७७वे स्थान पटकावले आहे.
- जागतिक बँकेकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या व्यवसाय करण्यासाठी सुलभ असलेल्या देशांच्या या क्रमवारीत गतवर्षी भारत १००व्या क्रमांकावर होता.
- व्यवसायांसाठी अनुकूल परिस्थिती असलेल्या १९० देशांची क्रमवारी जागतिक बँकेकडून प्रसिद्ध करण्यात येत असते.
- या क्रमवारीमध्ये २०१४साली भारत १४२व्या क्रमांकावर होता. त्यानंतरच्या काळात भारताने या क्रमवारीत सातत्याने सुधारणा केली आहे.
- गतवर्षी या क्रमवारीत भारताने ३० स्थानांनी प्रगती केली होती. भारताची या क्रमवारीतील ही आतापर्यंतची सर्वात मोठी झेप होती.
- यावर्षीही भारताच्या क्रमवारीत २३ स्थानांची प्रगती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इज ऑफ डुइंग बिझनेसच्या क्रमवारीत पुढच्या २ वर्षांत अव्वल ५० देशांमध्ये पोहोचण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
- गेल्या २ वर्षात भारताच्या क्रमवारीत ५३ स्थानांची सुधारणा झाली आहे. तर गत ४ वर्षात भारताच्या क्रमवारीत ६५ स्थानांची सुधारणा झाली आहे.
- या अहवालात भारताला सर्वाधिक सुधारणा झालेल्या अव्वल १० देशांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे.
- या यादीतील भारताच्या शेजारी देशांचे स्थान: भूटान (८१), श्रीलंका (१००), नेपाळ (११०), मालदीव (१३९), पाकिस्तान (१३६), अफगाणिस्तान (१६७), बांग्लादेश (१७६).
- या यादीतील अव्वल १० देश: न्यूजीलँड, सिंगापूर, डेन्मार्क, हाँगकाँग, चीन, कोरिया रिपब्लिक, जॉर्जिया, नॉर्वे, अमेरिका, यूनाइटेड किंगडम आणि मॅसिडोनिया.
जागतिक बँक
- स्थापना: १९४४
- मुख्यालय: वॉशिंग्टन डीसी
- जागतिक बँक ही आंतरराष्ट्रीय वित्त आणि पतपुरवठा संस्था आहे. ती विकसनशील व अविकसित देशांना विकासासाठी कर्जपुरवठा करते. या बँकेने पहिले कर्ज फ्रांस या देशाला दिले.
- विकसनशील व अविकसित देशातील सरकारांचे सबलीकरण, अर्थव्यवस्थांचा विकास, गरीबी दूर करण्यासाठी ही बँक जगभरात विशेष प्रयत्नशील आहे.
- जागतिक बँकेचे दोन प्रमुख भाग आहेत: आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँक आणि आंतरराष्ट्रीय विकास संघ.
संरक्षण मंत्रालयाचा जीआरएसईसोबत सर्वेक्षण व्हेसलसाठी करार
- संरक्षण मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील गार्डन रिच शिपबिल्डर अँड इंजिनीयर्स (जीआरएसई) या कंपनीसोबत ४ सर्वेक्षण व्हेसलच्या बांधणीसाठी २४३५.१५ कोटी रुपयांचा करार केला आहे.
- हा प्रकल्प ५४ महिन्यांत पूर्ण होईल. या करारांतर्गत पहिले व्हेसल ३६ महिन्यात हस्तांतरित केले जाईल तर उर्वरित व्हेसल्स प्रत्येक ६-६ महिन्यांनी प्राप्त होतील.
- हे सर्वेक्षण व्हेसल ११० मीटर लांब असेल. याची जलविस्थापन क्षमता ३,३०० टन असेल. हे व्हेसल्स आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या प्रदूषण मानकांशी अनुकूल असतील.
- या व्हेसलमध्ये आधुनिक हायड्रोग्राफिक उपकरणे आणि सेंसरचा वापर करण्यात येईल. यात अत्याधुनिक कमी वजनाचे हेलिकॉप्टर उतरविण्याची सुविधाही असेल.
- बंदरे, नेव्हिगेशन चॅनेल आणि खोल पाण्यातील हायड्रोग्राफिक सर्वेक्षणांसाठी या व्हेसल्सचा वापर केला जाईल.
- विशेष आर्थिक क्षेत्राच्या (SEZ) सर्वेक्षणासाठीही यांचा उपयोग होईल. सागरी आणि भूगर्भीय माहितीच्या संकलनासाठीही हे व्हेसल्स उपयुक्त ठरतील.
- या व्यतिरिक्त संरक्षण आणि बचाव कार्य, समुद्री संशोधन इत्यादींसाठीदेखील यांचा वापर केला जाणार आहे.
गार्डन रिच शिपबिल्डर अँड इंजिनीयर्स
- गार्डन रीच शिपबिल्डर अँड इंजिनियर (जीआरएसई) हा सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उपक्रम आहे.
- भारतातील अग्रगण्य सरकारी जहाज निर्मात्यांपैकी हा एक असून, तो कोलकाता (पश्चिम बंगाल) येथे स्थित आहे.
- हे शिपयार्ड व्यावसायिक आणि नौसेना व्हेसल्सची उत्पादन व दुरुस्ती करते. आता ते निर्यात जहाजांची बांधणीही करत आहेत.
- १८८४साली हुगळी नदीच्या शेजारी एक लहान खाजगी कंपनी म्हणून जीआरएसईची स्थापना केली गेली.
- १९१६मध्ये त्याचे नाव गार्डन रीच वर्कशॉप असे ठेवले गेले. १९६०मध्ये सरकारद्वारे जीआरएसईला राष्ट्रीयकृत केले गेले.
- सध्या जीआरएसई भारताच्या मिनीरत्न कंपन्यांपैकी एक आहे. १०० लढाऊ जहाजे तयार करणारे हे पहिलेच भारतीय शिपयार्ड आहे.
- सध्या हे शिपयार्ड P१७A प्रकल्पाखाली भारतीय नौसेनेसाठी ३ स्टील्थ फ्रिगेट्स तयार करीत आहेत.
मलाला युसुफझाई यांचा हॉर्वर्ड विद्यापीठाकडून सन्मान
- नोबेल पारितोषिक विजेत्या मलाला युसुफझाई यांना मुलींना शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल हॉर्वर्ड विद्यापीठाकडून सन्मानित करण्यात येणार आहे.
- ६ डिसेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात त्यांचा ग्लिट्समॅन पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल. सध्या मलाला युसुफझाई सध्या ऑक्सफोर्ड विद्यापीठात विद्यार्थी आहेत.
- ग्लिट्समॅन पुरस्कारांतर्गत जगातील जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांना १.२५ लाख डॉलर्सची रक्कम पुरस्कार्स्वरूप देण्यात येईल.
मलाला युसुफझाई
- जन्म: १२ जुलै १९९७
- मलाला युसूफझाई ही एक पाकिस्तानी विद्यार्थिनी, शिक्षण चळवळकर्ती व २०१४मधील नोबेल शांतता पारितोषिक विजेती आहे.
- मलाला तिच्या महिलांच्या शिक्षणासाठी चालवलेल्या चळवळीसाठी प्रसिद्ध आहे. तालिबान या अतिरेकी संघटनेने पाकिस्तानच्या वायव्य भागात मुलींच्या शिक्षणावर बंदी घातली होती.
- या बंदीविरुद्ध मलालाने लढा चालवला होता. तसेच या भागात महिलांच्या मानवी हक्कांच्या चाललेली पायमल्ली देखील तिने जगासमोर आणण्याचे प्रयत्न केले.
- २०१२मध्ये शाळेत जात असताना तालिबान अतिरेक्यांनी मलालावर ३ गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झालेली मलाला या हल्ल्यातून बचावली.
- मलालावरील या हल्ल्याची जगभर तीव्र नोंद घेतली गेली व अनेक देशांनी या घटनेबद्दल निषेध व्यक्त केला.
- ह्या जीवघेण्या हल्ल्यामधून बचावलेल्या मलालाने स्त्री शिक्षणासाठी आपला लढा चालू ठेवण्याचे जाहीर केले. ‘आय एम मलाला’ हे तिचे आत्मचरित्र आहे.
- २०१४मध्ये तिला नोबेल शांतता पारितोषिक भारताच्या कैलाश सत्यार्थीसोबत विभागून मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. नोबेल शांतता पुरस्कार जिंकणारी मलाला हा सर्वात तरुण व्यक्ती आहे.
तुर्कस्तानमध्ये जगातील सर्वांत मोठे विमानतळ
- तुर्कस्तानची राजधानी इस्तांबुलमध्ये जगातील सर्वांत मोठे विमानतळ बांधण्यात आले आहे. या विमानतळाचे उद्घाटन २९ ऑक्टोबरला तुर्कस्तानचे राष्ट्रपती रेचप तैयप एर्डोअन यांच्या हस्ते करण्यात आले.
- जवळपास ९ कोटी प्रवाशांची क्षमता असलेले हे विमानतळ १९ हजार एकर परिसरात पसरले आहे.
- एकावेळी २५० एअरलाइन्स ३५०पेक्षा जास्त जागांवरून उड्डाणे करतील असे हे विमानतळ असून संपूर्ण अत्याधुनिक बनविण्यात आले आहे.
- या विमानतळावर ऑर्टिफीशियल इंटेलिजन्सच्या मदतीने सर्व सुविधा पुरविल्या जाणार आहेत. याचबरोबर, विमानतळ एटीसी ट्युलिप डिझाइनमध्ये करण्यात आले आहे.
- या विमानतळाची निर्मिती करण्यासाठी जवळपास १० वर्षांचा कालावधी लागला आहे. तसेच, या विमानतळाचे बांधकाम करतेवेळी ३० कामगारांचा मृत्यू झाला होता.
- हे विमानतळ बांधण्यासाठी ३५ हजारहून अधिक कामगार आणि ३ हजार अभियांत्याचे योगदान लाभले आहे.
- २०२८पर्यंत या विमानतळावरुन २० कोटी लोक प्रवास करु शकणार आहेत. जगात सध्या अटलांटा विमानतळावरुन १० कोटी लोक प्रवास करतात.
३१ ऑक्टोबर: जागतिक नगर दिन
- ३१ ऑक्टोबर हा दिवस जगभरात जागतिक नगर (शहर) दिन म्हणून साजरा केला जातो. (World Cities Day)
- वाढती लोकसंख्या आणि समस्यांवर मात करून नियोजित आणि शाश्वत शहरी जीवनासाठी कार्य करणे, हा या दिनाचा उद्देश आहे.
- जागतिक शहरीकरणाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी विविध देशांमध्ये सहकार्य वाढविणे आणि शाश्वत शहरी विकासात योगदान देणे, या उद्देशाने हा दिन साजरा केला जातो.
- जागतिक स्तरावर वर्ल्ड सिटीज डे २०१८ युनायटेड किंगडम मधील लिव्हरपूलमध्ये साजरा केला गेला.
- यावर्षीच्या जागतिक नगर दिनाची मुख्य संकल्पना ‘शाश्वत आणि संवेदनक्षम शहरांची उभारणी’ (Building Sustainable and Resilient Cities) ही होती.
- विविध धोक्यांपासून शहरांना सुरुक्षित ठेवण्याकरिता संवेदनक्षम शहरे निर्माण करण्यावर भर देणे, हा या संकल्पनेचा उद्देश आहे.
- डिसेंबर २०१३मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने वर्ल्ड सिटीज दिनाची स्थापना केली होती. हा दिन साजरा करण्यामागची मूळ संकल्पना ‘उत्कृष्ट शहर, उत्कृष्ट जीवन’ (Better City, Better Life) ही आहे.