चालू घडामोडी : १८ सप्टेंबर

एनआयएच्या महासंचालकपदी वाय सी मोदी

 • वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय सी मोदी यांची राष्ट्रीय तपास पथकाच्या (एनआयए) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 • एनआयएचे विद्यमान महासंचालक शरदकुमार हे ३० ऑक्टोबर २०१७ला निवृत्त होत आहेत. त्यानंतर वाय सी मोदी हे पद ग्रहण करतील आणि ते ३१ मे २०२१ला निवृत्त होतील.
 • शरदकुमार यांची जुलै २०१३मध्ये एनआयएच्या महासंचालकपदी नियुक्ती झाली होती. यानंतर दोन वेळा त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता.
 • ३० ऑक्टोबरपर्यंत एनआयएचे विशेष अधिकारी म्हणून वाय सी मोदी यांची तात्काळ नियुक्ती करण्यात आली आहे.
 • १९८४च्या आसाम-मेघालय बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले मोदी सध्या सीबीआयच्या विशेष संचालक पदावर कार्यरत आहेत.
 • २००२मधील गोध्रा (गुजरात) दंगल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने चौकशीसाठी नेमलेल्या विशेष तपास पथकात वाय सी मोदी यांचा समावेश होता.
 • गोध्रा प्रकरणानंतर घडलेल्या गुलबर्ग सोसायटी, नरोडा पाटिया आणि नरोडा गाम येथील हिंसाचार प्रकरणांचा तपासही वाय सी मोदी यांनी केला आहे.
 • त्यानंतर शिलाँग येथे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून व नंतर २०१५मध्ये त्यांची सीबीआयच्या अतिरिक्त संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती.
 एसएसबीच्या महासंचालकपदी रजनीकांत मिश्रा 
 • यासोबतच वरिष्ठ आयपीएस अधिकारी रजनीकांत मिश्रा यांची सशस्त्र सीमा दला (एसएसबी)च्या महासंचालकपदी नियुक्ती केली आहे.
 • मिश्रा हे उत्तर प्रदेश कॅडरचे असून १९८४च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. ते सध्या सीमा सुरक्षा दल (बीएसएफ)चे अतिरिक्त महासंचालक आहेत. ते ३१ ऑगस्ट २०१९ ला एसएसबीच्या महासंचालकपदावरून निवृत्त होतील.

निवडणुकांमध्ये आता व्हीव्हीपेएटीचा वापर होणार

 • गुजरात आणि हिमाचल प्रदेशात या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये व्होटर व्हेरिफिबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपेएटी)चा वापर करण्यात येणार आहे.
 • मात्र, या दोन्ही राज्यांमध्ये या मतदान पावत्यांची मोजणी होईलच असे नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
 • निवडणुकांमध्ये पूर्णपणे व्हीव्हीपेएटीचा वापर होणारी गुजरात आणि हिमाचल प्रदेश ही देशातील पहिली राज्ये ठरणार आहेत.
 • यापूर्वी गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये काही भागात व्हीव्हीपेएटीचा वापर करण्यात आला होता.
 • गेल्या काही काळात सातत्याने होत असलेल्या आरोपांमुळे ईव्हीएम मशिन्सची विश्वासार्हता ढासळू लागली होती.
 • त्यामुळेच निवडणूक आयोगाने आता अधिक काटेकोर धोरणे अवलंबली असून त्यासाठी नवे तंत्रज्ञानही वापरण्यात येणार आहे.
 • या पार्श्वभूमीवर, व्हीव्हीपेएटीचा वापर केल्यास मतदात्याला आपण दिलेल्या मतदानाची पावती मिळणार आहे.
 • यावर आपण कोणाला मतदान केले याची माहिती असणार आहे. यामुळे मतदान प्रक्रियेतील फेरफार रोखता येईल.

नाशिकची भैरवी बुरड मिस ग्लोबल एशिया २०१७

 • जमैकाच्या मोंटीगोको शहरात आयोजित ‘मिस ग्लोबल इंटरनॅशनल’ स्पर्धेत नाशिकची भैरवी बुरड हिने अंतिम फेरीत धडक मारत पहिल्या १० क्रमांकांत स्थान मिळविले.
 • याच स्पर्धेत ती ‘मिस ग्लोबल एशिया २०१७’ या कॉन्टिनेंटल टायटलची विजेती ठरली. याच स्पर्धेत तिने बेस्ट रॅम्प, बेस्ट कंजुनिॲलिटी हा किताबही पटकावला आहे.
 • भैरवीने ऑगस्टमध्ये दिल्ली येथे झालेल्या ‘मिस ग्लोबल इंटरनॅशनल इंडिया २०१७’ या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. त्यामुळे तिला ‘ग्लोबल इंटरनॅशनल’ स्पर्धेत भारतातर्फे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.
 • २०१६मध्ये झालेल्या मिस टीजीपीसी या ऑनलाइन सौंदर्य स्पर्धेत तिने विजेतेपद पटकावले होते.
 • याशिवाय सप्टेंबर २०१७मध्ये मध्य अमेरिकेत झालेल्या सौंदर्य स्पर्धेत तिने पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले होते.
 • भैरवी नाशिकमधील बीवायके महाविद्यालयात कॉमर्स शाखेत तृतीय वर्षाचे शिक्षण घेत आहे.

इन्फोसिसचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय राजगोपालन यांचा राजीनामा

 • इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांच्यानंतर त्यांचे जवळचे सहकारी आणि कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय राजगोपालन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
 • इन्फोसिसमध्ये येताना सिक्का यांनी एसएपी (SAP) कंपनीतून काही विश्वासू सहकाऱ्यांना बरोबर आणले होते. राजगोपालन हेही त्या अधिकाऱ्यांपैकीच एक होते.
 • २०१४मध्ये ते इन्फोसिसमध्ये रुजू झाले होते. त्यांनी ३ वर्षे काम केल्यानंतर इन्फोसिसमधील वरिष्ठ उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
 • महिनाभरापूर्वी सिक्का यांनी आपल्या चांगल्या कामाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत मुख्य कार्यकारीपदाचा राजीनामा दिला होता.
 • माझ्या कामात सातत्याने अडथळे निर्माण करण्याचे काम केले जात आहे, असेही त्यांनी राजीनामा देताना म्हटले होते.

जमात उद दावा सार्वत्रिक निवडणुका लढवणार

 • मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याच्या जमात उद दावा या संघटनेने २०१८मध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
 • लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचं नेतृत्त्व करणाऱ्या जमात उद दावाने गेल्या महिन्यात 'मिल्ली मुस्लिम लिग' या राजकीय पक्षाची घोषणा केली होती.
 • भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून नवाज शरीफ यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली होती.
 • या निवडणुकीत जमात उद दावाच्या पाठिंब्यावर याकूब शेख याने निवडणूक लढवली. परंतु, नवाज शरीफ यांच्या पत्नी कुलसूम यांनी शेख याकुब यांनी त्याचा पराभव केला होता. मात्र, या निवडणुकीत त्यांना मिळालेल्या मतांची संख्या लक्षणीय होती.
 • अमेरिकेने २०१२मध्ये जमात उद दावावर बंदी घातली होती. तसेच अमेरिकेकडून २०१२मध्ये जारी करण्यात आलेल्या दहशतवादी नेत्यांच्या यादीत याकुब शेख यांचा समावेश होता.